' करन्सी नोट्स पासून शाळेच्या गणवेशापर्यंतचा ‘Updates’ चा प्रवास – InMarathi

करन्सी नोट्स पासून शाळेच्या गणवेशापर्यंतचा ‘Updates’ चा प्रवास

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

‘Update’ बद्दल (अद्यतनाबद्दल) नाकं मुरडली जाणं ही सहसा अगदी सामान्य बाब आहे. फेसबुकने वेळोवेळी केलेल्या चिकार अपडेट्समुळे लोक नाकं मुरडत असतात. अगदी लाईक बटणाला रिअॅक्शन्सचे पर्याय आले त्याला सुद्धा अनेकांनी नाकं मुरडली होती. व्हाॅट्स अॅपच्या अगदी अलिकडच्या अद्यतनात ईमोजींचा आकार मोठा केलाय जे बऱ्यांच जणांना अजिबात आवडलेलं नाहीये. गुगल क्रोमची काही अपडेट्स तर चीड आणावी अशी असतात.

शाळेत असताना प्राथमिक मध्ये माध्यमिक शाळेतल्या गणवेशाचे सगळ्यांना वेध लागलेले असतात. अर्धी चड्डी जाऊन फुल पँट कधी घालतो असं झालेलं असतं. कपाटातनं गपचूप मोठ्या भावाबहिणीचे गणवेश काढून फॅशन परेड करणारेही कमी नसतात. पण अचानक शाळेने गणवेश सरसकट बदलून टाकला, आपल्या आवडीचा रंग जाऊन कुठलातरी अति भडक किंवा अतिमळखाऊ रंग आला, तर डोकं फिरतंच. शाळेचा प्रचंड राग येतो.

आईवडिलांच्या बदलीमुळे एक घर सोडून दुस-या घरी जाणं, शाळा बदलणं, शहर बदलणं, हे मुलांना आवडत नसतंच. किल्ला चित्रपटात अनभिज्ञ कारणांमुळे आपल्या जीवनात होणा-या बदलांचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे छान दाखवलंय.

helmet-couple-marathipizza

अनेक शहरांत हेलमेट सक्तीची अंमलबजावणी सुरु झाल्यावर मोठ्या प्रमाणात नाराजीचे सूर उमटले होते. आपल्या परिसरातल्या, जुन्या आणि एरव्ही आपण अजिबात लक्ष देत नसलेल्या इमारतींच्या जागी अचानक नवं बांधकाम दिसून आलं की कसंसच वाटायला लागतं.

थोडक्यात काय तर सहसा कारण अज्ञात असताना, विशेष कारण नसताना, किंवा कारण मनाला पटलेलं नसताना, अंगवळणी पडलेल्या सवयी बदलाव्या लागणं आपल्याला आवडत नाही. आपल्याला बदल स्वीकारायला वेळ लागतो. आणि आपण प्रत्येक छोट्यामोठ्या बदलाकडे, आपसूकच, येऊ घातलेल्या एखाद्या संकटासारखे पाहतो.

एक मोठ्ठा बदल सध्या भारतात येऊ घातलाय. पाचशे-हजारच्या जुन्या नोटा जाऊन नवीन पाचशे आणि दोन हजारच्या नोटा येत आहेत. हे असं नेमकं का? याबाबत आधीच जनमानसात अनभिज्ञता आहे, त्यात आपल्या नेहमीच्या स्वभावाला धरून अनेक लोक नवीन नोटांकडे पाहून नाकं मुरडताना दिसतायत.

500-and-1000-rupees-notes-banned-marathipizza

कोणाला रंग आवडेना, कोणाला आकार, कोणाला चित्र. ‘जुनीच बरी होती. ही काय आवडली नाही बुवा. गुलाबी गुलाबी – खेळातली वाटते.’ असं बरेच जण म्हणतायत. काहीजणांनी त्यातल्या तथाकथित ‘चिप्स’ कुठे लपवल्या आहेत हे तपासायचे खर्चिक प्रयत्नही करून झालेत. काहींना पैसे एकदाचे हातात पडल्याचं सुख जास्त आहे. कोणाला नवीन नोटेबाबत उत्साहसुद्धा आहे. इतका की तिच्यासोबत सेल्फि काढले जातायत. नोटांच्या या अपडेटचं लोकांनी अशाप्रकारे संमिश्र प्रतिक्रिया देत स्वागत केलंय.

या बदलांची गंमत अशी असते की कितीही नावं ठेवली तरी लोकांच्या एकदा हे बदल अंगवळणी पडले, की तो नाराजीचा सूर आणि सगळा नाॅस्टॅल्जिया कुठेतरी हवेत विरून जातो. व्हाॅट्स अॅप, फेसबुक, क्रोमचे सगळे अपडेट्स आधी भरपूर शिव्या खाऊनसुद्धा अखेर लोकांच्या पसंतीस उतरले आणि उतरत राहतील. बदललेला गणवेश हळूहळू आवडायला लागतो. नवीन शाळेत, नवीन जागी ठरवलं तर रमता येतं आणि हळूहळू बदल स्वीकारायची मनाची तयारीही होते, हे किल्ला चित्रपटातच शेवटी दाखवलंय. हेलमेटं वापरल्यानं एकदोन प्रसंगात आपलं डोकं फुटण्यापासून कसं वाचलं, याचा अनुभव आला की हेलमेटला नावं ठेवणारी माणसं त्याचं गुणगान गाऊ लागतात. परिसरात नवीन बांधकाम होऊन नवीन माणसं राहायला आली आणि त्यांच्याशी ओळख होऊन आपली नवी नाती निर्माण झाली की आपणही ‘आधीचं चित्र कसं छान होतं या ठिकाणचं’ असं म्हणणं कमी करतो.

अपडेट्स म्हणा, बदल म्हणा – आपण कितीही नाकं मुरडली, तरी आपल्या मानसिक विकासासाठी हे सगळं आवश्यक असतं. नाहीतर इंटरफेसमध्ये सतत अनावश्यक बदल करून सतत नाविन्याचा आभास निर्माण करणा-या फेसबुकला इतकी वर्षं तग धरून एवढं फोफावता आलं नसतं. एकेकाळी सर्वांची लाडकी असलेल्या नोकिया कंपनीनं अँड्राॅइड तंत्र वेळेत आत्मसात केलं नाही आणि पाहता पाहता ती मागे पडली.

एक, दोन आणि पाच रुपयांची नाणीही बदललीच की. आधीची नाणी किती छान होती. आत्ताची पाहायला किती टिनपाट आणि तकलादू वाटतात!! पण आपण ती खुशाल वापरतोच की. आकाराने छोटी आणि वजनानं हलकी असल्यानं सोयीची पडतात. कदाचित नोटांबाबतही तेच होऊ शकतं.

बदल हा आपल्याला खरं तर हवा असतो. बदलासाठी माणूस कायम भुकेलेला असतो. बदलाशिवाय आयुष्य निरस वाटू लागतं. पण बदलाची भितीही वाटत राहते. कारण बदल हा सगळ्यांसाठीच सकारात्मक असेल याची काही शाश्वती नसते. काहीही असलं तरी शेवटी सगळेच जुळवून घेतात आणि बदललेल्या परिस्थितीत जमेल तितकं सुखानं राहायला शिकतात हेही तितकंच खरं. अपडेट होण्याची भूक बाळगणं हा आपला खरा धर्म आहे. बदलाचं स्वागत करणं ही खरी मानवी संस्कृती आहे. त्यामुळे रोजच्या वापरात या पाचशे आणि दोन हजाराच्या नव्या नोटांचं दिलखुलासपणे स्वागत करूया. शेवटी महात्मा गांधींनी डीपी बदललाय यार! एक लाईक तरी ठोकला पाहिजेच!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

कौस्तुभ अनिल पेंढारकर

मी व्यवसायाने लेखक (content writer/copywriter) आणि अनुवादक आहे. मी मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतराची कामं स्वीकारतो. संपर्क साधण्यासाठी लिंक्ड-इन प्रोफाईलवर संदेश पाठवावा.

kaustubh-pendharkar has 4 posts and counting.See all posts by kaustubh-pendharkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?