' काश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं – InMarathi

काश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गेले अनेक दिवस काश्मीर अनुभवतोय…माध्यमांमधून दिसणारं, लेखांमधून उभं रहाणारं…ह्या पेक्षा फार फार वेगळं कश्मीर…

आई बाबा नुकतेच परतलेत ट्रिप पूर्ण करून. भीत भीत गेले होते, पण भारावून परत आले. भरभरून बोलताहेत. ह्या भारावून जाण्यात तिथल्या निसर्गाचं सौंदर्य आहे की कश्मिरी माणसाच्या वर्तनातली अदब…की त्याच्या डोळ्यातलं दुःख…की – पूर्वग्रहदूषित जगाचं, आपल्याला माहिती नसलेलं, एक वेगळं रूप असं एकदम समोर उभं राहिल्याने ते भारावलेत – कळत नाहीये. तिथला एक अनुभव सांगताना तर आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते…माझेही डोळे पाणावले…

आई बाबांची काश्मीर ट्रिप त्यांच्यासाठी आणि त्यांच्याद्वारे माझ्यासाठी विचारात पाडणारी होती. मीडियातून दिसणारं, अभ्यासकांतून चर्चिलं जाणारं काश्मीर आणि वस्तुस्थितीतील काश्मीर बरंच वेगळं आहे हे जाणवलं. आई बाबांनी काश्मिरी तरुणांशी साधलेल्या संवादातून जे कळालं ते धक्कादायक आणि चिंतेत टाकणारं होतं.

हे सर्व मला लिहायचं होतं. ही वस्तुस्थिती सर्वांसमोर मांडायची होती. परंतु हा आवाज आपापसात, आपल्या फेसबुकपुरता रहाणार होता. खुद्द आई बाबांना हे नको होतं. त्यांची इच्छा होती काश्मिरी तरुणाचं दुःख आणि त्यालाही कळत नसणारी त्याची वास्तविकता ‘वर पर्यंत’ पोहोचवण्याची. ते व्हिडीओ द्वारेच होऊ शकणार होतं…म्हणून आम्ही कधीही विचार केला नव्हता ते करण्याचा प्रयत्न केलाय – आई बाबांचा, त्यांच्या काश्मीर अनुभवावर व्हिडीओ तयार केलाय.

Kashmir Aai Baba

हा व्हिडीओ मराठी लोकांपर्यंत मर्यादित राहू नये म्हणून हिंदीत केलाय. अस्सल मराठी माणूस हिंदीत व्यक्त होताना जो गोंधळ उडतो, तो उडाला आहेच. पण आशा आहे की त्या मागची भावना – आई बाबांची कळकळ, तळमळ – दर्शक समजू शकतील.

हा संपूर्ण व्हिडीओ तयार करताना बाबांच्या भावना नियंत्रणात ठेवणं भयंकर अवघड गेलंय. आई ने अनेकदा आवंढा गिळलाय. परंतु अनेक रिटेक करून करून मुद्द्याचं, आवश्यक तेवढं समोर ठेवायचा प्रयत्न केला आहे. त्यांना जे बोलायचं होतं ते मी शेवटी समराईज करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तो प्रयत्न देखील जमला असेल.

आवर्जून ऐकाल…आणि ह्या प्रयत्ना मागची भावना पटली तर कृपया शेअर कराल.

हा व्हिडीओ बघितल्यावर, व्हिडिओच्या शेवटी मी जे सांगितलं गेलं आहे, जो निष्कर्ष काढला आहे – काश्मीर जनतेचा विश्वास जिंकणं आवश्यक आहे – हा निष्कर्ष – अनेकांना भोळसट-अज्ञानी-उथळ वाटेल. परंतु त्या मागचा तर्क समजून घ्यायला हवा.

भारत सरकार दर वर्षी करोडोंचा खर्च काश्मीर वर करत असतं. त्यांना भरपूर पैसे पाठवत असतं. एवढं करून ही काश्मीरची बेरोजगारी कमी होत नाहीये. गरिबी तशीच आहे. ते लोक भारतापासून “तुटलेले” आहेत असं त्यांना वाटतं. ह्या मागे काय कारणं आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. तिथे गेल्यावर एक गोष्ट स्पष्ट जाणवते की काश्मिरी लोकांवर पद्धतशीरपणे भारत द्वेषाचे संस्कार होत आहेत. हे संस्कार कोण करतं, का करतं ह्यावर रडगाणं गात बसायची गरज नाही – कारण ते भारतातील ५ वर्षाचं पोरगं सुद्धा जाणून आहे. आपण त्याबद्दल तक्रार करायची की पुढे जाऊन ते बदलण्याचा चंग बांधून ठोस पावलं उचलायची – हा प्रश्न आहे.

आणि – ही पावलं फक्त सरकारने नव्हे, आपण सर्वांनी उचलायची आहेत.

अनेकांच्या मते, काश्मीर समस्येचं मूळ “इस्लाम” हे आहे. हे मत योग्य की अयोग्य ह्या वादात नं पडता, आपण “तर काय करायचं?” हे स्वतःला विचारायला हवं. ठीके – इस्लाम हा प्रॉब्लम आहे – तर काय? काय करायचं? कसा सोडवायचा हा प्रॉब्लम? – इथे आपली गाडी येऊन थांबते.

काश्मीरमधील कट्टरवाद, गरिबी, बेरोजगारी ह्या सर्व कारणांचा परिणामस्वरूप काश्मिरी भारतापासून तुटला आहे ना? तर आता आपल्याला (सरकार + सामान्य भारतीय, दोघांना) हे तुटणं थांबवून जोडण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे. हे जोडता कसं येईल – बस्स ह्यावर विचार करायला हवा.

कल्पना करा एका ४-५ वर्षाच्या मुलाला, लहानपणापासून एखाद्या व्यक्तीबद्दल फक्त नकारात्मक गोष्टीच सांगितल्या गेल्यात. त्या व्यक्तीला भेटण्याची संधीच दिली गेली नाही – फक्त आणि फक्त नकारात्मक प्रतिमा निर्मितीच केली गेली. हे सर्व तो ४-५ वर्षाचा असताना सुरू झालं आणि तो मरेपर्यंत ते सुरूच राहिलं. अश्या परिस्थितीत त्या मुलाने ह्या व्यक्तीचा द्वेष करणं स्वाभाविक नाही का?

Kashmir kids marathipizza
स्रोत: राजीव कुमार । rkbharat@gmail.com

त्याने “स्वतःचं डोकं लावायला हवं” हे म्हणताना आपण सहज म्हणू शकतो. पण त्याचं स्वतःचं डोकं म्हणजे तरी काय?! शेवटी त्याच्यावर झालेल्या संस्कारांचं मातीचं पक्कं भांडं म्हणजे त्याचं डोकं असतं. जो पर्यंत त्याच्या विश्वासावर, गैरसमजावर – बाहेरून आघात होणार नाही – तो पर्यंत त्या भांड्याला तडा जाणं अश्यक्य आहे. तो तडा जाईल, मग आतील पाण्याच्या दबावाने तो माठ कदाचित फुटेल. किंवा हळूहळू पाणी झिरपायची प्रक्रिया सुरू होईल.

हे सर्व तेव्हा आणि तेव्हाच होईल – जेव्हा आधी बाहेरून आघात होतील.

दुर्दैवाने, काश्मिरी मनावरील गैरसमजावर भारतीय बाजूने कुठलेच आघात होत नाहीयेत. मग त्यांचं मत बदलेल तरी कसं?

आता – त्यांचं मत कधीच बदलणार नाहीत, “सगळे मुस्लिम असेच असतात” – असा ठाम विश्वास असेल तर चर्चाच नको. प्रश्न सुटणार नाही असा विश्वास असणाऱ्याने त्या प्रश्नावर बोलायचं तरी कशाला? कशाला वेळ घालवायचा? पण ज्यांना प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे – त्यांनी हा विचार करायला हवा आणि काश्मिरी जनतेच्या गैरसमजाला, अविश्वासाला तडा देण्याचे प्रयत्न करायला हवेत. ते करण्यासाठी आपण वारंवार काश्मीर ला जायला हवं. “भारतीय सरकार तुमचा द्वेष करत नाही” हे ठसवायला हवं. त्या जोडीला भारत सरकारचे प्रयत्नही हवेतच. भारत सरकारच्या प्रयत्नांना यश मिळणं, हे वेळ खाऊ काम आहे. त्याचे रिझल्ट्स दिसतील तेव्हा दिसतील – त्याची वाट नं बघता सामान्य नागरिकांनी कृती करायला हवी.

काश्मीर प्रश्न आपल्यासाठी वारंवार चर्चा करण्याचा विषय आहे की – मनापासून सोडवण्याची इच्छा असलेला प्रश्न – ह्यावरून आपण आपली कृती, आपलं धोरण ठरवावं.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?