' मराठा आरक्षण आंदोलन – खरी राजकीय खेळी काहीतरी वेगळीच आहे? – InMarathi

मराठा आरक्षण आंदोलन – खरी राजकीय खेळी काहीतरी वेगळीच आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक: प्रसाद राऊत

===

गुजरात निवडणुकीच्या वेळी मी सुरतमध्ये गेलेलो. त्यावेळी तिथल्या कंपनीच्या प्रतिनिधीबरोबर माझ्या सोबत गेलेल्या कस्टमरची चर्चा सुरु होती. तेव्हा तो प्रतिनिधी बोलला होता की जे जातीपातीचं राजकारण गुजरातने आजपर्यंत पाहिलं नव्हतं ते त्यावेळी पहावं लागलं.

तो प्रतिनिधी स्वतः पटेल होता…!

 

Gujarat-patel-reservation inmarathi
scroll.in | Sam Panthaky/AFP

 

त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं की पटेल आरक्षण मिळणं इतकं सोप्प नाहीये हे आता समजून आलंय. त्यासाठी कोर्ट, संविधानातील तरतुदी या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त त्या मुद्द्याचा राजकारणासाठी वापर होतोय.

त्यावेळी देशभर गाजलेल्या पटेल आरक्षणाचा नेता हार्दिक पटेल आज कुठे आहे? तेव्हा घडलेला घटनाक्रम बघा…

अचानक पटेल आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यातून हार्दिक पटेल हे तरुण नेतृत्व पुढे आलं. हळूहळू हाच नेता राजकारणात उतरला.

 

 

या दरम्यान टीव्हीवर आरक्षण या विषयावर तिकडे साधक-बाधक चर्चा सुरु होत्या. पटेलांना आरक्षण मिळण्यात असलेल्या अडचणीत पटेल समाजासमोर येत होत्या.

त्यात हार्दिक पटेल राजकारणात उतरून मोदी आणि भाजपला विरोध करू लागला तेव्हा हळूहळू पटेल समाजाला जाणीव होऊ लागली की या मुद्द्याचा फक्त काँग्रेसतर्फे राजकारणासाठी उपयोग होणार…!

 

hardik jignesh alpesh inmarathi
themorningchronicle.in

 

याची परिणीती ही होती की सुशिक्षित पटेल समाज मृगजळामागे धावण्यापेक्षा आपल्या कामधंद्यावर लक्ष देण्यासाठी या आंदोलनापासून दूर गेला. आज ना हार्दिक दिसतो ना पटेलांचं आरक्षण…!

महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा मुद्दा तसा जुना आहे. पण यामागे खेळल्या गेलेल्या चाली पाहिल्या तर बरेच पडद्यामागचे सूत्रधार समोर येतात.

जर कोणाला आठवत असेल तर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याआधी काही काळ घाई घाईत मराठा आरक्षण राष्ट्रवादी व काँग्रेसने जाहीर केलं. कोर्ट त्याला नामंजुरी देणार हे दिग्गज राजकारणी पवार साहेबांना माहित होतं! तरीही घाईघाईत हे केलं गेलं! त्यामागची अटकळ ही होती की –

कोर्टात हे आरक्षण टिकवण्यासाठी मराठा समाज एकगठ्ठा मतदान राष्ट्रवादी आणि काँग्रेसला करेल. हा सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठीचा एक मार्ग होता त्यावेळच्या मराठा नेत्यांसाठी.

पण अंदाज चुकला! मोदी लाट म्हणा किंवा तत्कालीन सरकारबद्दल असलेला राग म्हणा – महाराष्ट्रात सत्तांतर घडलं!

सोशल मीडियावरचं त्यावेळचं वातावरणाचा शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की महाराष्ट्रात सत्तांतर घडल्या नंतरच “ना हिंदुत्ववादी ना बहुजनवादी, आम्ही फक्त मराठावादी” या एका विचारधारेला प्रमोट करणारे लोक उदयाला आले.

सतत मराठा आरक्षण हा विषय धगधगता ठेवण्यासाठी काही संघटनांकडून आंदोलनं होत होती.

एकीकडे हे सुरु असताना दुसरीकडे सोशल मीडियावर राष्ट्रवादीची बी टीम सक्रिय झाली होती. त्यांचा एकच अजेंडा होता – फडणवीस यांची जात हायलाईट करायची. “मुख्यमंत्री “ब्राह्मण” असल्यानेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीये” अशा प्रकारचे विचार त्यावेळी मुद्दाम प्रसारित केले जात होते.

पण त्याला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. त्यात कोपर्डीची दुर्दैवी घटना घडली आणि जी ठिणगी पडली तिचा वणवा व्हायला वेळ लागला नाही.

 

all kopardi accused convicted inmarathi

 

पण यात झालं उलटंच. ऍट्रॉसिटीमुळे मराठा समाजात जो रोष होता तो बाहेर पडला. मराठ्यांना बहुजनवादी चळवळीत ओढण्यासाठी पुरोगाम्यांकडून जे काही प्रयत्न झाले होते ते फसले आणि मराठा विरुद्ध दलित अशी उभी फूट बहुजन चळवळीत निर्माण झाली.

 

atrocity-marathipizza

 

हे सर्व घडत असताना परत राष्ट्रवादीच्या बी टीममधले काही चेहरे अचानक सोशल मीडियातून गायब झाले. ते ग्राऊंड लेव्हलला सक्रिय झाले…!

“मराठा क्रांती मोर्चा”चा पहिला भर ओसरल्यानंतर कोपर्डीच्या बहिणीसाठी काढलेला मोर्चा आणि त्याचं उद्दिष्ट मागे पडून मराठा आरक्षण हा एकमेव मुद्दा मराठा मोर्चाचं उद्दिष्ट झालं.

आता परिस्थिती अशी आहे की मराठा आरक्षण आणि ते मिळण्यातील कायदेशीर अडचणी चर्चांमधून समोर येतायत…

पण –

या वयातही सत्तेची आस असणाऱ्या काही नेत्यांना आता मराठा आरक्षण नको झालंय…! कारण ते शस्त्र त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता निर्माण झालीय…!

जर फडणवीस सरकारच्या प्रयत्नामुळे कोर्टाने मराठ्यांना आरक्षण दिलंच तर आणखी एक टर्म भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

म्हणून आता मोर्चा मराठा आरक्षण एवढ्यापुरता नं राहता फडणवीसने सत्ता सोडावी किंवा निवडणुकीच्या आधी निदान आरक्षणाच्या बाबतीत कोर्टाचा निर्णय येऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मराठा मोर्चामधील आंदोलक काकासाहेब शिंदे यांचा जलसमाधी आंदोलनात मृत्यू झाला. हळूहळू आंदोलकांना चिथावून मोर्चा हिंसक कसा करता येईल हे पाहिलं जातंय.

५०च्या वर शांततापूर्ण मोर्चे काढणारा मराठा समाज अचानक आक्रमक कसा झाला? संभाजी बिग्रेड अचानक फ्रंटफूटवर कशी आली?

असे अनेक प्रश्न स्वतःलाच विचारले तरी काही उत्तरं आपोआप मिळतील.

मला फडणवीस सरकार राहील की जाईल याने फरक पडत नाही. पण जे काही हिंसक प्रकार सुरु आहेत त्यामुळे हळूहळू सुशिक्षित मराठा समाज या आंदोलनापासून दूर जाईल. आणि मग बिग्रेडसारख्या संघटनांच्या हातात हा मोर्चा गेला की आजपर्यंत काढलेल्या सर्व मोर्चाचं वैशिष्ठय असलेली शिस्त संपून फक्त हिंसक मोर्चा एवढाच संदेश समाजात जाईल ही काळजी वाटते.

आरक्षण मिळणार नाही… सततच्या चर्चाना वैतागून मराठा समाज आरक्षणाचा नाद सोडून देईल… जे पटेलांचं झालं तेच मराठ्यांचं होईल…

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?