' कळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर – InMarathi

कळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

===

दोन आठवड्यापुर्वीच्या दोन घटना लक्षणिय होत्या. पण त्यावर माध्यमात फारशी चर्चा झाली नाही. त्यापैकी एक घटना स्पष्ट होती आणि दुसरी पुसटशी होती.

गुजरात विधानसभा निवडणूकीत राहुल गांधी यांनी नेहमीपेक्षा खुप कष्ट घेतले होते आणि बर्‍याच मोदी विरोधकांना मोठा हुरूप आला होता. अखेरीस विधानसभेची मतमोजणी सुरू झाली आणि काही काळ त्यात भाजपापेक्षाही कॉग्रेसने अधिक जागांवर आघाडी घेतल्याचे ओझरते चित्र तयार झाले होते. सहाजिकच मोदींना त्यांच्या गुजरातमध्ये दणका बसण्याची स्वप्ने रंगवणार्‍यांना झिंग चढल्यास नवल नव्हते. पण अल्पावधीतच पुन्हा भाजपाने आघाडी घेतली आणि तो विषय तसाच मागे पडला.

 

bjp-marathipizza01
india.com

नंतर अर्णब गोस्वामी याने आपल्या रिपब्लिक वाहिनीवर त्याकडे बोट दाखवून ल्युटीयन्स दिल्लीच्या बुद्धीमंत व संपादकांची चांगली हजेरी घेतली. पण त्या उतावळेपणावर फाररशी कुठे चर्चा झाली नाही, होतही नाही. लोकसभा निवडणूकीतही कोणी मोदींना यशाची हमी देत नव्हता आणि एनडीए म्हणून तयार झालेल्या आघाडीलाही कोणी बहूमत देऊ इच्छित नव्हता. मात्र निकाल लागले तेव्हा एनडीए सोडाच, खुद्द भाजपालाच बहूमताचा पल्ला ओलांडता आलेला होता. पण देशातल्या कुणाही राजकीय अभ्यासक वा संपादकाला आपले आकलन कुठे व का चुकले, याचे आत्मपरिक्षण करायची गरज वाटली नाही. देशाच्या किंवा सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीनेच आपण बोलत असल्याचा आव आणणार्‍या अशा लोकांची भाकिते वा अंदाज इतके चुकीचे का ठरतात? त्याचे आत्मचिंतन त्यांनी नाही तर सामान्य जनतेने करावे काय?

आणखी एक अशी घटना आहे ती लालूंच्या चारा घोटाळा प्रकरणातील दुसर्‍या खटल्याच्या निकालाची. तेव्हाही जवळपास सर्व वाहिन्यांनी लालूंची निर्दोष मुक्तता झाल्याची ब्रेकिंग न्युज दाखवून झाली होती. पण काहीक्षणात अशा लोकांना आपलेच शब्द गिळावे लागले होते.

गुजरात निकालात भाजपाची थोडी पिछेहाट झाली होती आणि नंतर २ जी घोटाळा खटल्यात युपीएच्या भ्रष्ट मंत्र्यासह सर्व आरोपींची पुराव्यावभवी मुक्तता झालेली होती. त्याच्या दुसर्‍याच दिवशी आदर्श घोटाळ्यातले आरोपी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यास राज्यपालांनी दिलेली परवानगी कोर्टाने फेटाळली आणि ल्युटियन्स दिल्लीतल्या तमाम शहाण्यांना युपीए निर्दोष असल्याची लाट आल्याचे साक्षात्कार झालेले असावेत. मग त्याच क्रमात लालूंचा खटला आलेला होता आणि म्हणूनच त्यांना लालूही सुटणार, अशी आशा वाटली तर चुकीचे म्हणता येणार नाही. पण त्या खटल्याचा निकाल व्हायचा असताना आधी कोर्टाने अन्य एका खटल्यातील आरोपीला पुराव्याअभावी मुक्त केले. त्याचे वकील बाहेर येऊन ती माहिती देत असताना, अनेक वाहिन्यांकडून उतावळेपणाने तो निकाल लालूंसाठी असल्याच्या समजूतीने चुक झालेली होती. यातला मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

त्यातले अनेकजण दिल्लीकर विचारवंत संपादक लालूंचे समर्थक अजिबात नाहीत. उलट अशाच लोकांनी कधीकाळी लालूंना चारा घोटाळ्यातला आरोपी म्हणून यथेच्छ बदनाम केलेले आहे. पण आज लालू मोदी विरोधातले आघाडीचे योद्धा असल्याने दिल्लीच्या किंवा देशातल्या तमाम पुरोगामी शहाण्यांसाठी लालू गंगास्नान केल्यासारखे पवित्र आहेत. त्यामुळेच लालूंना व पर्यायाने युपीएच्या पापक्षालनाच्या बातम्या देण्यासाठी उत्सुक असलेल्यांनी ती चुक केलेली होती. पण त्याचा गाजावाजा झाला नाही.

मुद्दा तेवढा किंवा तोच नाही.

स्वत:ला शहाणे व विचार करणारे लोक समजणार्‍यांकडून असा मुर्खपणा वा चुका होतात कशा? सत्य समोर येईपर्यंत किंवा सत्य समोर आल्यानंतरही त्यांना ते स्विकारण्याची सारासार बुद्धी कशाला नसावी? रस्त्यावरच्या झुंडी व विचार करू शकणार्‍या शहाण्यांमध्ये काही फ़रक असतो की नाही?

सुशिक्षित शहाणा वा सामान्य बुद्धीचा अडाणी, असा माणसात कुठलाही फरक नसतो. प्रत्येक माणसाची बुद्धी व विचार करण्याची क्षमता कमीअधिक असली, तरी अखेरीस तो माणूस असतो आणि मानवी भावना विकारांपासून त्याची मुक्तता असू शकत नाही. क्लिंटन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तरीही त्यांना एका तरूण मुलीच्या आकर्षक देहापासून स्वत:ला आवरता आले नाही. ही त्यांच्यातल्या बुद्धीपेक्षा ते माणूस असल्याची साक्ष असते. तशीच इतरही माणसे कितीही अडाणी वा विचारवंत असली, तर मुलत: माणसेच असतात आणि त्यांनाही आपल्या भावना व विकारांपासून सहजासहजी अलिप्त होता येत नसते.

निसर्गाच्या रचनेत माणुस एक पशू वा सजीव आहे आणि निसर्गाने ज्या मर्यादा त्याला घालून दिलेल्या आहेत, त्यावर मात करणे माणसाला क्वचितच साधलेले आहे. अशा लोकांकडे आपण अपवाद म्हणून बघितले पाहिजे. बाकीची माणसे कमीअधिक बुद्धीची असली तरी माणूस नावाचा पशूच असतात आणि त्यातले सर्व गुणदोष त्याच्यातही तसेच्या तसे असतात.

नागरी मूल्ये पाळणारा प्राणी म्हणून जो माणूस ओळखला जातो, तो एक मुखवटा असतो आणि त्याच्याआड असलेला पशूच अखेरीस निर्णायक असतो. जेव्हा कसोटीची वेळ येते, तेव्हा ज्याचा साक्षात्कार होतो, तोच खरा असतो. मग तो किती सुशिक्षित आहे आणि किती बुद्धीमान वा अडाणी आहे, यामुळे कोणताही फ़रक पडत नाही.

एकूण पशूंप्रमाणेच माणूसही कळपाने वागणारा व जगणारा प्राणी असतो. म्हणूनच तो कुठल्याही बाबतीत कळपाच्या वृत्तीने प्रतिसाद देताना वा पुढाकार घेताना दिसतो. उपरोक्त घटना वा अनेक प्रसंगी म्हणूनच असे शहाणे विचारवंतही तसेच बेताल वागलेले आपल्याला दिसतात. त्यांनी वैचारिक मंथनातून घेतलेला निर्णय असे कितीही काही भासवले, तरी प्रत्यक्षात त्यात एक कळपवृत्ती वा झुंड सामावलेली असते.

 

hindu-reactive-violence-marathipizza

 

गेल्या चार वर्षात भक्त किंवा मोदीभक्त असे एक विशेषण प्रचलीत झालेले आहे. म्हणजे ज्यांना मोदी आवडतात वा जे कोणी मोदींचे समर्थन करतील, त्यांची हेटाळणी करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. त्यामागचा हेतू साफ असतो. जे कोणी भक्त असतात, ते विचार करत नाहीत किंवा त्यांची बुद्धी निकामी झालेली आहे, असे त्यातून सूचवायचे असते. पण जितके भक्त आहेत तितक्याच प्रमाणात मोदी विरोधक दिसतील. तेही तितक्याच तावातावाने मोदींच्या विरोधात आवेशपुर्ण बोलताना लिहीताना दिसतील. त्यापैकी कितीजण विचारपुर्वक तसे बोलत लिहीत असतात? कुठेतरी एकाने मोदींचे समर्थन करणारे लिहिल्या बोलल्यावर त्याचे आंधळे समर्थन चुकीचे असेल. पण व्यक्तीगतरित्या कोणाला मोदींची कृती पटली असेल, तर त्याला भक्ती म्हणता येणार नाही. उलट मोदी विरोधातही तसाच आंधळा विरोध आवेशात होताना दिसतो.

गुजरातमध्ये मोदींना राहुलनी घाम आणला, किंवा भाजपाची सत्ता थोडक्यात वाचली, तर त्याला आपला “पुरोगामी विजय” संबोधणारे किती विचारपुर्वक भूमिका मांडत होते? राहुल वा कोणा पुरोगाम्याने भाजपा विजयाला नैतिक पराभव ठरवले आणि तात्काळ जे लोक नैतिक विजय वा पराजयाच्या गोष्टी बोलू लागले; त्यांना भक्त म्हणण्य़ापेक्षा कोणते वेगळे संबोधन लावता येईल? मुद्दा भक्ती वा आंधळेपणाचा नाही, तर प्रवृत्तीचा आहे.

असे आवेशपुर्ण बोलणारे वा आंधळेपणाने विरोधाच्या समर्थनाच्या भूमिका घेणारे, सारखेच निर्बुद्ध असतात. त्यांच्यापाशी स्वत:ची आकलनशक्ती वा बुद्धी नसते, तर कळपाने अमूक बाजूने वळण घेतले, मग ते डोळे उघडून समोर बघण्यापेक्षा बिनदिक्कत तसे वळण घेत असतात. त्यानुसार आ्पली बुद्धी वाकवत वळवत असतात. त्यालाच पशूची कळपवृत्ती वा झुंडशाही म्हणतात. शहाणे असोत किंवा निर्बुद्ध लोक असोत, ते जेव्हा झुंडीसारखे वागू लागतात, तेव्हा बुद्धीचा विषय आपोआप निकालात निघालेला असतो.

अर्थात प्रत्येक माणूस आपण बुद्धी वापरतो, अशी ठाम समजूत घेऊनच जगत असतो. मग त्यात भक्त कोणाला म्हणायचे? उपरोक्त दोन घटना बघितल्या तर त्यात वास्तवाला सामोरे जाण्यापेक्षा ज्यांनी गुजरात पराभवाचा आनंदोत्सव सुरू केला ते, किंवा लालूंना निर्दोष मुक्त केल्याच्या बातम्या देणारे बुद्धीमान कसे म्हणता येतील? तेही भक्तांच्याच रांगेत उभे असतात. प्रत्येकाचे दैवत वेगवेगळे असते. कारण ज्याच्यापाशी स्वतंत्र बुद्धी असते आणि विचार करण्याची कुवत असते, तो कळपाच्या मागे दौडत नाही. समोरची स्थिती बघून आपल्यापुरता निर्णय घेत असतो. तसे करताना आपल्याला नावडत्या व मनाविरुद्ध असलेल्या गोष्टीही समजून घ्याव्या लागतात. अलिकडल्या प्रसार व सोशल माध्यमांनी ती सुविधा माणसाकडून काढून घेतली आहे.

विसाव्या शतकात प्रसार माध्यमे ठराविक कंपूच्या हाती होती. म्हणून ते जितकी महिती सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचू देत होते, त्यापेक्षा अधिक माहिती मिळवण्यासाठी लोकांना कष्ट घ्यावे लागत होते. आज सोशल माध्यमांनी जग इतके वेगवान झालेले आहे, की सामान्य माणसालाही आपल्या मनातले जगाला ओरडून सांगण्याची सुविधा सोपी व स्वस्त करून टाकलेली आहे. जगभरची माहितीही इंटरनेटच्या रुपाने सहजगत्या उपलब्ध झालेली आहे. पण ती माहिती खरी किती व परिपुर्ण किती, याची कोणी खात्री देऊ शकत नाही. त्याखेरीज अशी माहिती मुख्यत: तंत्रज्ञानावर आधारलेली असल्याने त्यातही तुमच्यापर्यंत कोणती माहिती यावी किंवा टाळली जावी, यावरही नियंत्रण राखले जाऊ शकते.

म्हणूनच समोर येणारी माहिती तारतम्याने तपासण्याच्या बुद्धीला महत्व आहे. ते नसेल तर तुमच्याकडून तुमच्या नकळत मला हवे ते मी वदवून घेऊ शकतो. किंबहूना अन्य कुणाचे मत आपण आवेशात आपले म्हणूत तावातावाने मांडू लागतो. कारण आपल्या नकळत आपण कुठल्या तरी कळपाचे झुंडीचे एक सदस्य होऊन गेलेले असतो.

त्या नॅट जिओ किंवा डिस्कव्हरी वाहिन्यांवर दाखवतात त्या झेब्रे, रानरेडे व हरणांसह सिंह, जंगली कुत्र्यापेक्षा माणसाच्या झुंडी किंचीतही वेगळ्या नसतात. त्या झुंडीत सगळे जसे कळप मनोवृत्तीने वागतात, त्यापेक्षा आपण किती वेगळे असतो? अंगावरच्या कपड्यापेक्षा अन्य कुठला व कितीसा फ़रक दाखवता येईल?

ही बाकीची सजीव मंडळी निसर्गाने त्यांना जे रूप बहाल केलेले आहे, तसे जगतात आणि माणसाला त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धी दिली म्हणून माणसाने सजीवांपेक्षा आपले बाह्यरूप काहीसे बदलून घेतले आहे. आपण देखावा म्हणून अंगात कपडे घालून वावरतो, तितके झाकलेले असतो. पण जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन व मनातल्या गोष्टी यांचे परिशीलन केले, तर आपल्यातील पाशवीवृत्ती लपून रहात नाही. नेमक्या तशा व त्याच कळप मानसिकतेने आपले वागणे होत असते.

आपणही आपले कळप बनवले आहेत, जातीपाती, वर्णभेद उभे केले आहेत. त्याच्यापलिकडे जाणार्‍या माणसात तशाच भिंती वैचारिक, सांस्कृतिक स्वरूपात उभ्या राहिलेल्या दिसतील. पण अशा प्रत्येक कळपाच्या विविध घडामोडीतल्या कळपवृत्ती वा झुंडीच्या मानसिकतेचा अविष्कार जसाच्या तशा पाशवी असतो. तितकाच क्रुर, निर्दयी व निष्ठूर असतो. कधी एकमेकांना रक्तबंबाळ करणारा असतो, तर कधी शब्दांनी विव्हळ करून टाकणारा असतो. त्यातले माणूसकीचे वा संस्कृतीचे नाटक निव्वळ देखावा असतो. आपापल्या कळपाशी निष्ठा दाखवल्या जात असतात आणि त्यासाठी स्वतंत्रपणे विचार करून कृती करण्याचा अधिकार गहाण टाकलेला असतो. अन्यथा तुम्हाला कुठल्या कळपात वा झुंडीत सामावून घेतले जात नाही.

कळपा बाहेरच्या कुठल्या कृतीचे नुसते समर्थन केले, तरी तुमचाच कळप तुमच्यावर इतके भेदक जिव्हारी घाव घालणारे हल्ले करतो, की तुम्हाला अगतिक करून टाकले जाते आणि निमूट तुम्ही कळपाला शरण जात असता.

 

leftists rightists intellectuals marathipizza
globindian.wordpress.com

थोडक्यात ज्याला आपण “मानवसंस्कृती” म्हणतो, ती पाशवी झुंडशाहीचा सुधारीत अवतार असतो. त्यातला पाशवी रक्तपात टाळण्याचा प्रयास केलेला आहे. बाकी इथेही तितकेच जंगली वातावरण कायम असते आणि झुंडी परस्परांशी लढत असतात, एकमेकांना नामोहरम करण्यासाठी उतावळ्या झालेल्या असतात. जबडे वा नख्यांपेक्षा सौम्य भासणारे धारदार शब्द आपण हत्यार बनवलेले आहेत. त्यातून काम झाले नाही तर विध्वंसाची विदारक हत्यारे शस्त्रास्त्रेही निर्माण करून ठेवलेली आहेत. म्हणूनच जगाचे वा मानवी समाजाचे प्रश्न व गुंतागुंत समजून घ्यायची, तर कळपाची मानसिकता समजून घेतली पाहिजे.

हजारो वर्षाच्या इतिहासात माणसाने बुद्धीच्या बळावर आपल्याहून शक्तीशाली व बलदंड सजीव सृष्टीला आपले गुलाम करून टाकले. त्यातल्या अमानुषतेने हा इतिहास भरलेला आहे. कुठल्याही हिंस्र पशूलाही लाजवेल इतकी पाशवी कृत्ये माणसाने झुंडीच्या रुपाने केलेली आहेत. पण त्याचवेळी या मानवी झुंडींनी निसर्गालाही थक्क करून सोडणारे भौतिक चमत्कारही घडवलेले आहेत. त्याचे विवेचन व विश्लेषण विश्वास पाटील या व्यासंगी मराठी लेखक अभ्यासकाने करून ठेवलेले आहेत.

‘झुंडीचे मानसशास्त्र’ या ग्रंथातून विश्वास पाटील ह्यांनी अतिशय मेहनतीने मानवी संस्कृतीतला हा विरोधाभास सविस्तर मांडला आहे. पण त्यांची भाषा क्लिष्ट असल्याने त्याचा सोप्या भाषेत व सविस्तर गोषवारा आवश्यक आहे. मानवतेचा मुखवटा टरटरा फ़ाडून टाकणार्‍या या पुस्तकातला एखादा परिच्छेदही एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. इतके गहन अभ्यासपुर्ण विवेचन त्यात विश्वास पाटिल यांनी केलेले आहे. पुढल्या काही लेखातून तेच काम करायचा व त्यातल्या विविध सिद्धांतांना प्रासंगिक उदाहरणांनी समजावण्याचा माझा प्रयत्न असेल. पण मुळात प्रत्येकाने पाटलांचे हे ‘झुंडीचे मानसशास्त्र’ वाचावे व त्याचे बारकाईने परिशीलन करावे असेच मला वाटते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

bhau-torsekar has 26 posts and counting.See all posts by bhau-torsekar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?