बाबासाहेबांच्या जिवनातील शेवटचे ६ दिवस

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मित्र हो ६ डिसेंबर हा डॉ. भीमराव आंबेडकर यांचा निर्वाण दिन म्हणून आपण सर्वांना ठाऊक असतो. अनेकांना बाबासाहेबांबद्दल अगदी राजकीय आणि सामाजिक माहिती असते.

उदाहरणार्थ, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी जीवनभर कार्य केलं, गोलमेज परिषद गाजवली, पुणे करार, घटना लिहिली आणि त्यांनी १४ ऑकटोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसकट नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून भारताच्याच अस्सल मातीत जन्मलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला इत्यादी.

परंतु अनेकांना बाबासाहेब मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत काय करत होते याची माहिती ठाऊक नाही किंवा अपुरी असते…!

बाबासाहेबांचं सांगायचं तर भारतात कोणीही बॅरिस्टर बाबासाहेबंसारखा ग्रंथ वेडा नव्हता आणि होणारही नाही.

लोक कुटुंबासाठी स्वत:साठी महाल आणि राजवाडे बांधतात. परंतु ग्रंथांसाठी भव्य वास्तू बांधणारे आंबेडकर हे केवळ एकमेव!

babasaheb-ambedkar-marathipizza

बाबासाहेबांनी आपला मृत्यू कसा यावा यावर विचार केला असावा किंवा नसावा – पण या महामानवाने मृत्यूची चाहूल लागल्यावर आपले शेवटचे दिवस अत्यंत प्रिय असलेल्या ग्रंथांच्या सहवासात घालवले हे अनेक जणांना ठाऊकही नाही. आपण प्रस्तुत लेखातून बाबासाहेबांच्या आयुष्यातील शेवटच्या ६ दिवसात काय काय झालं याबद्दल थोडसं बोलूया – ज्यावरून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख पटेल.


१४ ऑक्टोबर, १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसकट बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांना नागपूर महापालिकेकडून मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या प्रसंगी त्यांनी पं. नेहरूंच्या घातकी साम्यवादावर आणि सुएझ कालव्याच्या राष्ट्रीयीकरणाला असलेल्या भारताच्या पाठिंब्यावर कडाडून टीका केली. यानंतर लगेच बाबासाहेब १६ तारखेला धम्म दीक्षेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास चांदा शहरात गेले. परंतु अतिशय थकवा आल्यामुळे चांद्याला काहीही भाषण न करता ते १८ तारखेला पुन्हा नागपूरला आले आणि लगेच विमानाने माईसाहेब आंबेडकर आणि नानकचंद रत्तू यांच्यासमवेत दिल्लीला रवाना झाले.

दिल्लीत गेल्यावर आराम करतील तर ते बाबासाहेब कसले?! १९५६ हे वर्ष बौद्ध धम्माच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे होते. कारण भगवान बुद्ध यांच्या जन्माला २५०० पूर्ण झाल्यामुळे युनेस्कोने संपूर्ण जगात साजरे करायचे ठरवले होते व याचाच भाग म्हणून नेपाळ इथे आंतरराष्ट्रीय ४ थी बौद्ध धर्म परिषद भरवली जाणार होती. अर्थातच त्यांना या परिषदेचं आमंत्रण मिळालं आणि त्यांनी ते स्वीकारलं. २० नोव्हेंबर १९५६ ला त्यांनी या परिषदेत जगविख्यात असे कार्ल मार्क्स आणि बुद्ध यावर भाषण केले, ज्यात त्यांनी कार्ल मार्क्स कम्युनिझम अमलात आणण्याकरिता हिंसेला आणि कामगारांच्या हुकूमशाहीला प्राधान्य देतो म्हणून बौद्धांनी कार्ल मार्क्स पासून दूरच राहावे हे स्पष्ट सांगितले.

अशा प्रकारे नेपाळ गाजवून बाबासाहेब वाराणसी मार्गे मुक्काम करत दिल्लीत आले. दिल्लीच्या निवासस्थानी १ डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी दिल्लीत बुद्धिस्ट आर्ट प्रदर्शनाला नानकचंद रत्तू आणि ज्येष्ठ समाजसेवक सोहनलाल शास्त्री यांच्यासमवेत भेट दिली.

यानंतर देखील बाबासाहेबांचे दिनक्रम भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला होता, ज्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा दिल्लीतील सत्कार सोहळा.

या कार्यक्रमस्थळी बाबासाहेब अनेक वेळ लोकांशी धर्मावर चर्चा करावीत बसले होते, परंतु त्याच रात्री त्यांनी त्यांचे सहाय्यक रत्तू यांना ते लिहीत असलेल्या ग्रंथांबद्दल काळजीने विचारले की, “हे ग्रंथ त्यांच्या जिवंतपणीच प्रकाशित होतील का?” कदाचित भयंकर दगदगीमुळे पुढे येणाऱ्या निर्वाणाची यांना पुसटशी कल्पना आली असावी.

 

dr-babasaheb-ambedkar-marathipizza02

 

३ डिसेंबर रोजी त्यांनी जे-जे लिहिलं होत ते सर्व टाईप करून घेऊन ते अचानकपणे त्यांच्या आजारी असलेल्या माळ्याला पाहायला त्याच्या खोलीत गेले बाबासाहेबांना पाहुण तो माळीच ओक्सबोक्शी रडू लागला आणि आज देव माझ्या घरी स्वतःहून आला असे म्हणू लागला.

त्याला समजावताना बाबासाहेब म्हणू लागले –

रडू नको मलाही आज ना उद्या जावेच लागणार आहे मरण कोणालाही चुकणार नाही.

वास्तविक बाबासाहेब असे कधीही बोलत नसत परंतु त्यांची ही वाक्यं ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

४ डिसेंबरला बाबासाहेबांनी लिहिलेल्या अनेक मजकूर आणि लेखांवर सह्या केल्या, शिवाय त्यांनी आचार्य अत्रे आणि एस. एम. जोशी यांना पत्रे लिहिली याशिवाय रिपब्लिकन पक्षाचे ध्येये हा १५ पानांचा लेख लिहिला.

५ डिसेंबर रोजी प्रकृती बर्यापैकी खालावली असूनही त्यांनी ‘बुद्ध आणि मार्क्स’ या ग्रंथाचा काही भाग लिहायला घेतला. परंतु त्यांना ते जमेना. दिवसभर म्लान स्थितीत असलेल्या बाबासाहेबांना पाहण्यास रत्तू यांना बरे वाटले नाही, म्हणून ते त्यांना रात्रीच्या जेवणाचा आग्रह करू लागले. त्यांनी आधी नकार दिला परंतु रत्तू ऐकेना म्हणून ते जेवणासाठी ड्रॉईंग रूम मधून जेवणाच्या हॉलमध्ये जायला निघाले. या ड्रॉईंग रूममध्ये बाबासाहेबांनी जमवलेली ग्रंथ संपदा होती, ज्यात सर्व जातीधर्माच्या ग्रंथांपासून कायदे अर्थशात्र , समाज शास्त्र, तत्वशास्त्रातील महान आणि दुर्मिळ ग्रंथ होते.

 

dr-babasaheb-ambedkar-marathipizza

बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमाने या संपदेकडे पहात, त्यातील काही ग्रंथ रत्तू यांच्या हातात दिले आणि ते जेवायच्या खोलीत बसले.

त्या दिवशी बाबासाहेबांनी अगदी थोडासच जेवण रत्तू यांच्या समाधानासाठी घेतले आणि ते पुन्हा आपल्या ग्रंथ संपत्तीजवळ बसले आणि उठताना कधी नव्हे ते “चल उठा ले कबीरा तेरा भवसागर डेरा!” हा दोहा मोठ्याने बोलू लागले. यानंतर बिछान्यात झोपल्यावरही त्यांनी बिछान्याजवळ असलेल्या टेबलावरील सर्व ग्रंथांना चाळून पहिले आणि आचार्य अत्रे आणि जोशी यांना लिहिलेली पत्रे पुन्हा वाचून ते झोपी गेले.

अशा प्रकारे या महामानवाच्या आयुष्यात ५ डिसेंबर ला शेवटचा सूर्य आला. ५ तारखेला बाबासाहेबांची प्रकृती व्यवस्थित नसतानाही ते पूर्ण दिवस आणि उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे ६ डिसेंबरला पहाटे १२ वाजेपर्यंत जमेल तितकं लिखाण करत झोपी गेले… ते नं उठण्यासाठी…

हा महापंडित संपूर्ण आयुष्य दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून झटत राहिला…


हा कधी ही दमला नाही की थकला नाही…

याने यांच्या विद्वत्तेच्या जोरावर अनेकांना वाकवले…

यांच्या अफाट ज्ञानाच्या मेहनतीवर आज एक देश जगात अनेक संकटांना तोंड देत ठाम उभा आहे.

यांच्या घटनेवर आज एक देश अनेक धर्म, शेकडो जाती, हजारो भाषा आणि संस्कृती असूनही एकसंघ आहे.

हजारो लोक आपला मृत्यू आपल्या परिवारजनांमध्ये होवो, नातेवाईक मुले यांच्या समोर होवो अशी इच्छा बाळगतात. बाबासाहेबांनी काय इच्छा बाळगली असावी हे सांगू शकत नाही – पण मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या ग्रंथांच्या संपत्तीला वारंवार प्रेमाने पाहिले आणि त्यांनाच उशाशी घेऊनच ते कायमचे शांत झाले – हे वीरमरणच होय! कारण उशाशी ग्रंथ घेऊन कोणतीही आस न ठेवता मृत्यूला सामोरं जण हे वीराचचं काम. ग्रंथ पाहून समाधानाने जाणारा मनुष्य जगात अजून कोणीही नाही.

बाबासाहेबांना आदराजंली…

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Ajit Tambe

नमस्कार मी अजित तांबे बदलापूरचा . मी विमान क्षेत्रात काम करतो पण फावल्या वेळात नव्या नव्या विषयांवरील नवं नवं काही लिहून वाचकांचं मनोरंजन कारण हा माझा आवडता छंद आहे .

ajit-tambe has 3 posts and counting.See all posts by ajit-tambe