' उत्तर प्रदेश निवडणुकीची ही रणनीती तुम्ही ओळखली नाहीये! – InMarathi

उत्तर प्रदेश निवडणुकीची ही रणनीती तुम्ही ओळखली नाहीये!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

उत्तर प्रदेशाच्या पार्श्वभूमीवरील राष्ट्रीय राजकारणाची एक रोमहर्षक अन चित्तवेधक रणनीती सध्या रंगत आहे. भारतीय राजकारण हे नेहमीच अभूतपूर्व डावपेच अन मानसशास्त्रीय चालींचे एक अगम्य मिश्रण राहिले आहे. स्वातंत्र्य काळापासून या देशाने अनेक नेते बघितले, ज्यांनी आपल्या अनोख्या व रोमहर्षक खेळीने भारतीय समाज मनावर गरुड केले. या प्रचंड देशाचे नेतृत्व करणे काही सोम्यागोम्याचे काम नव्हे, आणि अश्या आव्हानांचा सामना करण्यासाठीच काही लोकांचा जन्म झालेला असतो, अन मग त्या पदावर आरूढ होण्यासाठी पटावरची प्यादी कशी अन कधी हलवायची हे जाणते व्यवस्थित जाणतात.

नरेंद्र मोदींची रणनीती आणि त्याची यशवी सांगता याने भारतीय राजकारणाचा पोतच बदलून टाकला. भारतीय समाजमनाला एक निडर, अन जगाला कवेत घेणारे नेतृत्व हवे ही जनतेची सुप्त इच्छा जर जाणत्या नेत्यांनी ओळखली नसती तर आश्चर्य होते.

narendra-modi-health-marathipizza02

मुलायम सिंग हा असाच एक भारतीय मानस टिपणारा नेता, ज्याची या देशाचा पंतप्रधान बनण्याची तीव्र इच्छा कधीही लपून राहिली नाही. एका समाजवादी चळवळीच्या मुशीतून तयार झालेलं त्यांच नेतृत्व, आणि त्यावेळचा राजकारणाचा पोत बघून त्यांनी आपल्या राजकारणाच्या चाली रचल्या. पण आता समाजातील बदलांचा अचूक अंदाज त्यांनी हेरला आणी भारतीय राजकारणाचं पटलावर एक नवी चाल खेळावयास घेतली.

मुस्लीम समाजाचा अनुयय ही आजवरची मुलायामसिंगांच्या समाजवादी पक्षाची मुख्य विचारधारा होती. त्याच्या आधारे आजवर अनेकदा त्यांनी उत्तरप्रदेश विधानसभा जिंकली व लोकसभेतही बर्यापैकी खासदार जमवले, पण हे पुरेसे नव्हते. त्यांची हीच छबी आज त्यांचे कुंपण बनली आणि ते तोडणे इतके सहज नव्हते, व तीच छबी ठेवून आता बदललेल्या परिस्थिती राहणेही शक्य नव्हते. जर राष्ट्रीय स्तरावर अधिराज्य हवे तर बंधनमुक्त व्हावयाला हवे या जाणीवेतून एका अफलातून चालीची निर्मिती झाली.

इकडे आड अन तिकडे विहीर अश्या परिस्थितीत, सध्या उत्तर प्रदेशात इलेक्शन च्या पार्श्वभूमीवर एक अतिशय उत्कंठावर्धक मानसशास्त्रीय खेळ समाजवादी पक्षातर्फे खेळला जात आहे. जो पुढे जाऊन राष्ट्रीय पातळीवरील आपले रंग दाखवेल.

या खेळाचा केंद्रबिंदू आहे – अखिलेश यादव.

अखिलेश यादवचे एक तरुण,तडफदार, प्रसंगी ताकतवर लोकांशी पंगा घेणारा कणखर, प्रामाणिक, स्वकर्तुत्ववान, उदयोन्मुख, प्रगतिशील नेता अशी प्रतिमा बनवणे – हा खेळाचा पहिला आणि प्रमुख हेतू आहे. तर दुसरा हेतू म्हणजे “मुस्लीम धार्जिणे असलेली आणि पित्याच्या पाठिंब्याने बनलेला नेता” अशी प्रतिमा मोडून काढणे.

akhilesh yadav marathipizza

या कार्याचा मानस शास्त्रीय पैलू म्हणजे उत्तर प्रदेशातील जनमानसाचे फक्त आपल्यावर खिळवून विरोधकांना विस्मरणात टाकणे. या कारणाने मीडिया व लोकांच्या विचारात सातत्याने राहणे व आपण एक असामान्य अन प्रगतिशील नेतृत्व आहोत असे लोकांच्या मनात ठसवणे. असे होतांना इतर पक्षांची लोकमानसावरील पकड काही काळासाठी ढिली होते व सहानुभूतीचे वातावरण निर्माण होऊन लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. त्या कालावधीत काही परिणामकारक कामे करून प्रतिमा घट्ट करता येते.

असा खेळ शिवसेने तर्फे राज अन बाळासाहेब यांच्यात मनसे ने लढवलेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत रंगला होता. त्याचा परिणाम राज ठाकरेला पदार्पणात नेत्रदीपक यश तर शिवसेनेच्या आमदार संख्येत बरीच वाढ झाली होती. पण उद्धव अन राज दोघेही त्या मधल्या शिथिलतेचा फायदा घेऊ शकले नाहीत. उद्धव ने फक्त सेनेला फुटीपासून रोकले तर राज ने अक्षरशः या संधीची माती केली.

या मार्गाने अँटीइन्काबंसी फॅक्टर वर मात करणे, हा तात्पुरता फायदा आहे – पण खरे पाहता हा खेळ लोकसभेसाठी एक कणखर प्रतिस्पर्धी उभा करणे हाच आहे.

आज घडीला यातील पहिला भाग संपून दुसरा भाग सुरु झाला आहे, अखिलेश यादव व समाजवादी पक्ष हा मुलायमसिंग यांच्या छायेतून बाहेर आला असून आता दुसऱ्या अंकाची मांडणी सुरु झाली आहे, उद्देश समाजवादी पक्षाची मुस्लिम धार्जिणा म्हणून असलेली छबी बदलणे, व सर्वसमावेशक बनवणे, त्याच वेळी मुस्लिम मतदार दूर जाणार नाही याची काळजी घेणे.

यासाठी फार काळजीपूर्वक शब्द पेरणी होत आहे, जसे “मोदी कडून अखिलेशने शिकावे, की आई वडिलांशी कसे वागावे”, “अखिलेश चे मुस्लिम धोरण चुकीचे आहे “, ” मी सदैव मुस्लिम समाजाचे हित बघितले” – इत्यादी सर्व वाक्ये वर वर अखिलेश विरोधी वाटली तरी त्याच्या प्रतिमेचे रूप बदलण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. आजवर मोदींवर केलेली जहरी टीका ही मोदींच्या फायद्याची ठरते हे मुलायमसिंगांना व्यवस्थित उमगले आहे. त्यामुळे मोदी विरोध करावयाचा नाही, पण अखिलेशला प्रगतिशील दाखवायचे व सर्वसमावेशक बनवावयाचे – त्याच वेळी काँग्रेस सोबत युती करून मोदी विरोधकांना आपल्या सोबत ठेवायचे. याला समाजवादी पक्षाचे सकारात्मक राजकारण म्हणता येईल. कारण यात काँग्रेसचे पूर्ण नुकसान आहे, निवडणूक जरी हरले तरी अखिलेशची प्रतिमा बनणार आणि राहुल आणखी मागे पडणार, अन जिंकले तरी राहुलला काहीही फायदा होणार नाही याची काळजी घ्यायची.

akhilesh mulayam yadav marathipizza

याच्या पुढची चाल म्हणजे देशात आपले अस्तित्व वाढवणे, कदाचित मधल्या काळात समाजवादी पक्ष, हा अनेक लहान पक्षांशी युती किंवा विलीनीकरणावर भर देईल व आपले संघटन सर्वव्यापी करण्याचा प्रयत्न करेल.

व्यवस्थित बघितले तर लक्षात येईल की, समाजवादी पक्षाचे चिन्ह, त्यांचा नेता आज त्यांच्या कडेच आहे जे बदलले आहे ती फक्त प्रतिमा.

भारतीय राजकारणात मुलायमसिंग यांचे नाव का आदराने घेतले जाते याचे उत्तर या राजकीय खेळ्या बघितल्या की लक्षात येत. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेचा बळी देऊन, आपल्या मुलाला राष्ट्रीय क्षितिजावर उजागर करणारा असामान्य बाप अशी प्रतिमा मुलायमसिंगांची नक्कीच बनेल.

आमच्या कडे अश्या सकारात्मक खेळ्या करण्यापेक्षा ब्राह्मण विरुद्ध मराठा, बहुजन विरुद्ध धनगर अश्या चाली रचण्यात जास्त स्वारस्य आहे, त्यामुळे मोदींच्या नंतर देशाचे नेतृत्व करेल असा नेता म्हणून फक्त फडणवीस हेच दिसतात. बाकी पवार घराणे असे काही खेळ खेळून आपल्या नव्या नेतृत्वाला नवे आकाश देतील असे वाटत नाही.

जर समाजवादी पार्टी यात यशस्वी ठरली तर अखिलेश यादव हा येणाऱ्या लोकसभा इलेक्शन मध्ये समाजवादी पक्षातर्फे पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल.

या नाटकाचा उत्तर प्रदेश जनमानसावर काय परिणाम काय होतो हे अभ्यास करण्या योग्य असेल. अर्थातच ममता बॅनर्जी व नितीशकुमार आपल्या खेळी खेळातीलच. पण राहुल गांधी व केजरीवाल आता फायनल्स मध्ये नसतील.

2019 ची लढाई मोदी, अखिलेश, ममता आणि नितीश यांच्यात असणार. वरील पैकी मोदी यांचे पारडे सध्या जड आहे. बघूया काय होतंय.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?