' बीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचवण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांची गोष्ट : जोशींची तासिका – InMarathi

बीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचवण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांची गोष्ट : जोशींची तासिका

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मी स्वतः एक सामान्य मतीचा माणूस आहे हे मान्य करतो. लेखाचे शीर्षक वाचून ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागून हा वैद्यनाथाचा शब्दसेवक लिहीते होत आहे. मी स्वतः परळी वैजनाथ शहराचा नागरिक आहे. जर आमचे शहर जिल्हा झाले तर आनंदच आहे. पण,

उगाच काहीतरी तर्कहीन मागणी करणे म्हणजे चांगल्या गोष्टीला किंवा प्रस्तावाला मातीत घालण्यासारखे आहे म्हणून हा लेखनप्रपंच करत आहे.

सध्या बीड जिल्हा विभाजनाची एक जुनी टूम नव्याने समोर आली आहे. कोणी अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे म्हणून आग्रही आहे तर कोणी परळी वैजनाथ हा नवीन जिल्हा झाला पाहिजे असे म्हणत आहेत. यात अजून एक मधला मार्ग समोर येत आहे तो म्हणजे परळी वैजनाथ – अंबेजोगाई हा संयुक्त जिल्हा करण्यात यावा.

कोणतीही मागणी करण्यामागे एक विशिष्ट हेतू, तर्क, दिशा त्यानुसार मार्गक्रमण आणि साध्य असे विविध टप्पे पार करणे आवश्यक असते.

 

Beed District Map InMarathi
mahagramin.in

काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाबाबत एका कार्यक्रमात भाष्य केले अन् राज्यात सर्वत्र जिल्हा विभाजनाचे वारे वाहू लागले. यात बीड जिल्हा तरी अपवाद कसा राहील? परळी वैजनाथ येथे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ तहसील कार्यालयात गेले आणि अलीकडच्या काळातील पहिली मागणी त्यांनी मांडली. पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला आघाडी त्याच मार्गावर गेली. त्यानंतर दोन – तीन दिवसांत विधीज्ञ अतुल तांदळे यांच्या नेतृत्वाखाली परळी वैजनाथ जिल्हा निर्मिती कृती समिती स्थापन झाली. पाठोपाठ राजेश देशमुख यांनी वेगळी परळी वैजनाथ जिल्हा निर्मिती कृती समिती स्थापन केली.

दोन्ही समितींमध्ये मूलभूत फरक असा आहे की अतुल तांदळे यांनी आंदोलन कशा रीतीने पुढे जाईल याची संकल्पना मांडली आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण सुरु केले. मात्र दुसऱ्या समितीत कधी वकील संघ जोडल्या गेला तर कधी मेडिकल असोसिएशन यातून सर्वपक्षीय कृती समिती असे नवीन खूळ जन्मास आले. इंग्रजीत एक म्हण आहे “too many spoons spoils the soup” थोडक्यात अनेकजण एकाच भांड्यात एकाचवेळी स्वयंपाक करायला गेले तर जेवण बिघडण्याचीच शक्यता अधिक असते.

तर्क / तर्कटांचे खंडण-मंडण

परळी वैजनाथ जिल्हा का व्हावा यासाठी दोन्ही समित्यांनी काही तर्क मांडलेले आहेत. याबाबत आता थोडी चिकित्सा करू..

१. बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचे स्थान म्हणून दरवर्षी देश विदेशातून भावीक भक्त, पर्यटक परळी वैजनाथमध्ये येत असतात.

> देश सोडा. राज्यातील परळी वैजनाथ वगळता औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर यापैकी कोणते गावं जिल्ह्याचे ठिकाण आहे?

२. मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आहे.

> परळी पेक्षा मोठे औष्णिक विद्युत केंद्र खानदेशातील भुसावळ येथे आहे त्याचा जिल्हा जळगांव आहे.

३. रेल्वे मार्गावरील प्रमुख जंक्शन म्हणून परळीची ओळख आहे. देशाच्या विविध भागांशी रेल्वेने जोडले गेलेले शहर आहे.

> परळी पासून जवळ पूर्णा जंक्शन आहे, तिथे परळीपेक्षा अधिक रेल्वे ये-जा करतात तरी त्या गावांत कधी जिल्हा निर्मितीची टूम ऐकली नाही.

४. दिवाणी न्यायालय क स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कार्यरत आहे.

> अंबेजोगाई येथे परळी वैजनाथपेक्षा मोठे सेशन कोर्ट आहे. याचा अर्थ मी अंबेजोगाई जिल्ह्याचे समर्थन करतो असे अजिबात नाही, मी फक्त वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

५. आर्थिक व व्यावसायिकदृष्ट्या मराठवाड्यात नावाजलेले शहर आहे.

प्राप्त माहितीनुसार सन २०१७ – २०१८ मध्ये परळी वैजनाथ तालुक्याचे महसूल वसुली उद्दिष्ट हे अंदाजे एक कोटी एक लक्ष रुपये होते, त्यापैकी आजतागायत पंच्चावन्न लक्ष वसूली झाली आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे सध्या एक जिल्हा निर्माण करण्यासाठी सरकारी तिजोरीला सुमारे ५०० कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा भार सहन करावा लागतो.

ही तूट कशी भरून निघणार किंवा या रक्कमेची पूर्तता कशी होणार हे कोणीही सांगत नाही.

६. वैद्यनाथ साखर कारखाना, इंडिया सिमेंट कारखाना, औद्योगिक वसाहत आदी रोजगारनिर्मितीची प्रमुख माध्यमे उपलब्ध आहेत.

> दुष्काळी परिस्थितीत राज्यातील साखर कारखाने किती हंगाम बंद ठेवावे लागतात हे सर्वज्ञात आहेत. सिमेंट कारखान्याचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे हे वास्तव कोण नाकारणार. औद्योगीक वसाहतीत पायाभूत सुविधा किती उच्च दर्जाच्या आहेत हे देखील सर्वांना माहिती आहे. मुळात हा निकष होऊच कसा शकतो असा प्रश्न आहे.

७. कापूस उत्पादक आणि पणन महासंघ, पाटबंधारे विभागाचे विभागीय कार्यालये शहरात आधीच कार्यान्वीत आहेत.

पाटबंधारे विभागाचे कार्यालय किंवा कामगार कल्याण केंद्र जेव्हा लातूरला हलवण्याचा डाव मागील काही वर्षात रचला जात होता तेव्हा जिल्हा निर्मितीचे प्रेम असणारी मंडळी कुठे होती असा प्रश्न पडतो. तसेच परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्याचे “शहर आणि संभाजीनगर” असे विभाजन होऊन जवळपास नऊ महिने होत आहेत तरी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसायला पुरेशी जागादेखील नाही.

मुळात उपहार गृहाची अंदाजे १०’ × १२’ जागा असलेल्या खोलीत एक किचन ओटा, तीन कपाटे, चार टेबल आहेत. इतक्या जागेत २ एपीआय, ३ पीएसआय आणि प्रत्येकी एक वाचक असे एकूण दहा कर्मचारी या खोलीत काम करतात मात्र याविषयी कोणी काही बोलत नाही. तसेच मेरू पर्वतावर असलेले शासकीय विश्राम गृह अनेक वर्षांपासून बंद आहे त्याविषयी कोणी चकार शब्द बोलत नाही. इतकेच काय तर गेले अनेक वर्षे प्रयत्न करून साधी एक परळी वैजनाथ – मुंबई रेल्वे सुरु करता आलेली नाही.

उलटपक्षी अंबाजोगाई येथे अतिरिक्त महसूल अधिकारी कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, आरटीओ आदी कार्यालये स्थापन झालेली आहे. या आस्थापनेत जमीन खरेदी, बांधकाम ते अधिकारी – कर्मचारी यांच्या नेमणूका आदी गोष्टींसाठी सुमारे दोनशे कोटींची गुंतवणूक झालेली आहे. हे सर्व होत असताना परळीचे जिल्हा निर्मितीचे घोडे दामटणारे धुरंधर कुठे होते?

८. वैद्यकीय सेवेचा विचार करता सध्या उपजिल्हा रुग्णालय शहरात आहे.

> अंबेजोगाई इथले शासकीय आणि परळी येथील उपजिल्हा रुग्णालय यांची तुलना म्हणजे हास्यास्पद प्रकार होईल. परळी येथून महिन्याला हजारो रुग्ण अंबेजोगाई येथे जाऊन उपचार घेतात.

९. बीड शहर भौगोलीकदृष्ट्या लांब पडते तसेच परळी वैजनाथ जिल्ह्यासाठीचे सर्व निकष पूर्ण करते.

मुळात केंद्र किंवा राज्य सरकारकडे नवीन जिल्हा निर्मितीसाठीचे निकष काय? याचा खोलवर जाऊन शोध घेतला तर असे कोणतेही निकष सद्यस्थितीत अस्तित्वात नाहीत. अशा परिस्थितीत परळी किंवा अंबेजोगाई अथवा संयुक्त जिल्हा झाला तर नकाशा कसा असेल याबाबत कोणीही भाष्य करायला तयार नाही.

तरी क्षणभर गृहीत धरू नवीन जिल्हा झालाच तर केज, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, माजलगांव, धारूर अश्या पाच तालुक्यांचा एक जिल्हा होऊ शकतो.

पण, आगामी काळात या जिल्ह्यासाठी खासदार जेव्हा निवडला जाईल तेव्हाची समीकरण प्रस्थापित नेतृत्वाला अडचणीत आणणारे असतील तेव्हा या मागणीस राजकीय ईच्छाशक्ती कितपत आहे याबाबत निश्चित कोणालाच सांगता येत नाही.

१०. परळी वैजनाथचे सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आदी गोष्टींचा विचार करता इथेच नवीन जिल्हा अधिकारी कार्यलय व्हायला हवे.

> प्रत्येक लहान मोठ्या शहराचे स्वतंत्र सामाजिक, राजकीय, व्यावसायिक अस्तित्व असते.

११. परळी नगर प्रस्तावित लोह मार्गावरील सुरुवातीचे जंक्शन.

> या मुद्द्याचा आणि जिल्हानिर्मितीचा काय संबंध हे माझ्या अल्प मतीसाठी अनाकलनीय आहे.

१२. ब वर्ग नगर पालिका महसुलात सर्वात जास्त.

> मुद्दा क्रमांक ५ मध्ये याबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

१३. प्रस्तावित जिल्ह्यात लोकसंख्येने सर्वात मोठे शहर परळी वैजनाथ.

> शासनाने मागे प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक समिती गठीत केली होती ज्यात त्यांनी शासनास अहवाल दिला होता की एक जिल्हाधिकारी २५ लाख जनतेसाठी सहजपणे प्रशासन चालवू शकतो. बीड जिल्ह्याची २०११ सालच्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही अंदाजे २५ लाखांच्या घरातच आहे.

१४. निजाम काळात मोठे प्रशासकीय केंद्र.

> निजाम काळात तत्कालीन मोमीनाबाद म्हणजे आजचे अंबेजोगाई हे लहान प्रशासकीय केंद्र होते की मोठे यावर बीड जिल्हा विभाजन कसे अवलंबून आहे हे कळत नाही. वस्तुतः मोमीनाबाद हा निजाम राजवटीत जिल्हा होता.

या सर्व उहापोहानंतर याविषयी थोडे राजकीय भाष्य अपरिहार्य आहे. बीड जिल्हा विभाजनाबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना एका सार्वजनिक ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवशी बोलते करण्याचा प्रयत्न केला गेला जे की पूर्णतः अप्रस्तुत होते.

असो, याबाबत धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे सांगितले की

“शहराचा एक नागरिक म्हणून मी तुमच्यासोबत असेन पण या मागणीचे नेतृत्व मी करणार नाही. तसेच या मागणीमागे कसलाही तर्क आणि तर्काधिष्टीत शेवट दिसत नाही.”

तसेच यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते म्हणाले की

“मी वरच्या सभागृहाचा सदस्य आहे, तेव्हा सरकारकडे नवीन जिल्हा निर्मितीसाठी निधीच नाही. याबाबत परळी वैजनाथच्या भाग्याने जनतेने निवडून दिलेल्या आमदार या राज्याच्या मंत्री आहेत तेव्हा त्यांनी याबाबत काही ठोस पाऊले उचलले तर आनंद होईल.”

असे म्हणत त्यांनी चेंडू बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या कोर्टात ढकलला.

थोडक्यात ज्या मागणीस तर्क नाही, नकाशा नाही, दिशा नाही, दशा नाही त्यामुळे बीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचावण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांचे उद्देश नेमके काय हे संबंधितांनाच ठाऊक. तूर्तास संबंधितांना त्यांच्या कार्यास शुभेच्छा देऊन या लेखास विराम देतो.

जय हिंद

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?