' समाजवादी भों(ग)ळेपणा : भारतीय राजकारणाचा आरसा – भाग-१ – InMarathi

समाजवादी भों(ग)ळेपणा : भारतीय राजकारणाचा आरसा – भाग-१

 

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सर्जीकल स्ट्राईक्स झाल्यानंतर सरकारविरोधकाकडून दोन प्रमुख आक्षेप घेण्यात आले.

एक – हिंसेचा वापर करू नका. पाकिस्तानशी चर्चा वगैरे करून प्रश्न सोडवा.

ही मागणी गांधी अधिक समाजवादी यांच्या संकरातून निर्माण झालेल्या आजच्या अर्धवट समाजवादी यांच्या कडून आलेली आहे.

दुसरा – यावर राजकारण करू नये.

यावर राजकारण करू नये हे वक्तव्यच यावरील राजकारण करण्याची सुरूवात आहे, हे अशी मागणी करणार्यांच्या गावी नाही किंवा कळतंय पण वळत नाही अशी काहीशी त्यांची परिस्थिती असावी. अनुक्रमे या दोन्हीही आक्षेपांनविषयी आपण वस्तुस्थिती जाणून घेऊयात.

digvijay-sing-sanjay-niupam-arvind-kejriwal-marathipizza

पाकिस्तानशी असलेले सर्व प्रश्न अहिंसक मार्गाने, शांततामय पद्धतीने मार्गी लागावेत भारताच्या कोणत्याही सरकारची अशीच इच्छा असेल कारण याचे फायदे अनंत आहेत याची त्यांनाही चांगली कल्पना आहे. पण पाकिस्तानशी आपले असलेले वाद हे शांततामय मार्गाने खरंच सुटू शकतील काय? भारत-पाकिस्तानच्या निर्मितीनंतर आतापर्यंतचा इतिहास आपण लक्षात घेतल्यास याचे उत्तर “नाही” असे येते.

आजपर्यत भारतात अधिकारावर आलेल्या प्रत्येक भारतीय सरकारने(सद्यसरकारही)पाकिस्तानशी आपले संबंध सामान्य करण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न केले असल्याचे दिसून येते पण याबदल्यात त्यांना नेहमीच समोरून (पाकिस्तानकडून)धोका मिळालेला आहे. याचे कारण भारत सरकार पेक्षा पाकिस्तानातील सत्ता बळकावून बसलेल्या प्रभावी वर्गाचा भारताविषयीचा दृष्टिकोन आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

हा दृष्टिकोन काय आहे? आपण वारंवार का फसतो? या दोन प्रश्नांची उत्तरे आपण अनुक्रमे जाणून घेऊयात.

पाकिस्तानातील सत्ताकेंद्र (सैन्य, राजकारणी, नोकरशाही, जमिनदार, जाहगिरदार) हे भारताकडे व त्याच्या नागरिकांकडे देश व मनुष्य या दृष्टिकोनातून नं बघता हिंदूराष्ट्र व हिंदूलोक म्हणून बघतात व त्यानुसार आपली धोरणे ठरवतात. पाकिस्तानी एलिट्स भारताविषयीची आपली धोरणे ठरवताना ती धर्माच्या चष्म्यातून, आपल्या धर्माच्या मान्यतेनुसारच ठरवतात आणि नियंत्रित करतात.

india-pakistan-flags-marathipizza

याउलट आपण पाकिस्तानकडे एक देश म्हणून बघतो व त्यानुसारच व्यवहार करतो. पाकिस्तानशी व्यवहार करताना भारत सरकार धर्म मध्ये आणत नाही तर एका राज्याने दुसऱ्या राज्याशी व्यवहार करण्यासाठी जी नियमावली आज अस्तित्वात आहे त्यानुसारच व्यवहार करत असते. यामुळेच त्यांच्या धोरणात एकप्रकारचे सातत्य (भारतद्वेष) तर आपल्या धोरणात धरसोडपणा दिसतो. आपला धारसोडपणा हा “पाकिस्तान हा देश (State) आहे” ह्या मान्यतेमुळे आलेला आहे.

भारताने आपले पाकिस्तान विषयक धोरण ठरवताना पाकिस्तान्यांच्या भारताविषयक असलेल्या एकंदरीत धार्मिक मान्यता लक्षात घेऊन ठरवले तर ते जास्त प्रभावी व अचूक होईल. या पद्धतीने विश्लेषण करून आपण धोरण ठरवलं तर आपल्या धोरणकर्ते यांना पाकिस्तानशी लढण्यावाचून आपल्याला पर्यायच नाही हे लक्षात येईल. त्यांनी पाकिस्तानच्या या भारताविषयीच्या दृष्टिकोनाची भारतीय लोकांना ओळख करून देऊन पाकिस्तानशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकतर्फी प्रयत्न करत राहण्याची मागणी करणाऱ्या  समाजवादी भोंगळपणातील फोलपणा दाखवून दिला पाहिजे.

गंमत म्हणजे – यासाठी ते गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा असे म्हणतात. खुद्द बापू यांच्या हयातीतच भारताने कश्मीरात सैन्य तर पाठवलेच होते पण पाकिस्तानला कश्मीरचा कब्जा करण्यापासूनही रोखलेच होते.

या अहिंसेबाबतीत त्यांचे पट्टशिष्य असणारे सरदार यांचे काय मत होते ते आपण बघूयात.

gandhi05

 

सरदारांनी – देशाचे अंतर्गत व बाह्य धोक्यापासून रक्षण करायचे असेल तर आजच्या काळात बापूंचे अहिंसा तत्वज्ञान कसे फोल आहे – हे त्यांच्या हयातीतच सांगितले होते. याबाबतीत सरदार यांनी खालीलप्रमाणे मत व्यक्त केले होते:

मला राज्य चालवायचंय! तोफा, बंदूका आणि सैन्य बाळगायचंय! गांधीजी म्हणतात की याची काहीच आवश्यकता नाही. पण मी तसं वागू शकत नाही, कारण मी तीस कोटी जनतेचा विश्वस्त बनलोय. सर्वांचं रक्षण करण्याचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे. देशावर हल्ला झाला तर मी तो सहन करणार नाही. कारण तो परतवणं ही माझी जबाबदारी आहे. मी गांधीजींना सांगितलंय की, तुमचा मार्ग चांगला आहे. पण मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही.

इती-सरदार वल्लभभाई पटेल…!

सरदार जास्त गांधीवादी होते की मेधा पाटकर?

सरदारांनी आपलं अख्ख आयुष्य गांधींबरोबर घालवले होते पण तरीसुद्धा राज्य चालविण्यात त्यांनी त्यांच्या अहिंसा तत्वज्ञानाचा अतिरेक करण्यासाठी तर नकार दिलाच पण गरज पडली तिथे देशाच्या हितासाठी हिंसा करण्यासाठीही त्यांनी मागेपुढे बघितलेले नाही.

आजचे गांधीवादी जेव्हा अहिंसेचे तत्व कुठेही लावतात तेव्हा ते खरंतर त्याला अप्रासंगिक व निष्प्रभावी करण्यासाठी मदतच करत असतात. धर्माची प्रेरणा घेऊन दहशतवादी तयार करणारे, त्याचप्रेरणेने मारायला तयार होणाऱ्या लोकांशी शस्त्रानेच निपटले जायला हवे. त्यांना अहिंसेची भाषा कधीही कळणार नाही. आमच्या भागात एक म्हण आहे, “पोट दुखल्याशिवाय माणूस ओवा खात नाही”.

पाकिस्तानी दहशतवादी व त्यांना पाळणारे यांना जोपर्यंत आपण त्रासदायक ठरेल असे काही करणार नाहीत तोपर्यंत ही जमात सुधारणारच नाही, याबाबतीत आपल्या राज्यकर्त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका असता कामा नये.

या सर्जिकल स्ट्राईक्सवर करण्यात येणाऱ्या राजकारणाविषयी पुढील लेखात सविस्तर.

क्रमशः

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?