कॉफीतून निर्माण झालेलं अवाढव्य उद्योग साम्राज्य : कहाणी स्टारबक्सच्या उत्पत्तीची!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

व्यवसायात चढ उतार येतच असतो. पण एक वेळ अशी येते कि त्या वेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय तुमच आयुष्य बदलून टाकतो. याला आपण कधी कधी “नशीबाने दार ठोठावणे” असेही म्हणतो. कधी कधी नशीब पण एखाद्याला भरभरून द्यायला येतं, पण त्याच्याकडे घ्यायला काहीच नसतं, तर दुसरीकडे तुम्ही एक वडापावची अपेक्षा करावी आणि नशिबाने प्रसन्न होऊन ८-१० बालुशे फेकून मारावे अशी अवस्था असते. आज तुम्हाला एका सत्य घटनेवर आधारित अशीच एक स्टोरी सांगतो. कॉफिचा कप घेऊन आराम खुर्चीत किंवा गॅलरीमध्ये बसून ह्या स्टोरीचा आस्वाद घ्या!

starbucks-marathipizza01
fool.com

ही स्टोरी आहे एका यशस्वी व्यावसायिकाची. व्यवसायामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक प्रकार असतो तो म्हणजे ‘जे आहे त्यात समाधान मानून जगायचं, जास्तीची अपेक्षा करायची नाही (थोडक्यात रिस्क घ्यायची नाही)’ आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे ‘सतत नवीन काहीतरी करायचं, वेगळ्या वाटा धुंडाळत रहायचं, धडपडायचं रहायचं. (थोडक्यात रिस्क घेणारे)’. ह्या स्टोरीची अशीच दोन पात्रे आहेत. हि स्टोरी आहे हावर्ड शुल्ज़ आणि गार्डन बॉकर, जेरी बोल्डवीन, आणि जेव सीग यांची. हि स्टोरी आहे स्टारबक्सच्या उत्पत्तीची आणि कॉफी साम्राज्याची.

1953 मध्ये हावर्ड शुल्ज़ हा न्यूयॉर्क मधील ब्रूकलीन भागात एका गरीब ज्यू कुटुबांत जन्माला आला. घरची परस्थिती गरिबीची असल्याने लहान वयातच तो पेपर टाकणे, हॉटेलमध्ये काम करणे अशी छोटी मोठी कामे करत असे. तो फूटबॉल चांगले खेळायचा, स्पोर्ट्स मुळे स्कॉलरशीप मिळाली आणि त्याच्यासाठी उच्च शिक्षणाची दरवाजे उघडी झाली. घराण्याच्या इतिहासातील एकमेव ग्रेजुएट असा हा हावर्ड शुल्ज़ 1975 मध्ये “झेरॉक्स ” ह्या कंपनीत कामाला लागला.


starbucks-marathipizza03
emaze.com

या कंपनीत सेल्स आणि मार्केटिंग चे त्याने ४ वर्ष काम केले. याच दरम्यान त्याचं शौरी नावाच्या मुलीशी लग्न हि झालं होतं. त्यानंतर हावर्ड झेरॉक्स कंपनी सोडून “हैमरप्लास्ट” ह्या स्वीडिश कंपनीत जॉबला लागला होता. हि कंपनी स्वयंपाक घरातील उपकरणे बनवत असत. इथं मेहनतीने नोकरी करत तो अल्प कालावधीत अमेरिका प्रभाग प्रमुख झाला. मस्त अशी मोठी नोकरी, रग्गड पैसा, प्रेमळ पत्नी आणि एक सुखी आयुष्य या शिवाय एखाद्याला आणि काय हवं असतं? पण हावर्डची यशोगाथा इथंच थांबली नाही. आता तर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळणाऱ्या वळणावर तो येऊन पोहचला होता. सीएटल स्थित एक छोटी “स्टारबक्स कॉफी, टी अँड स्पाइस कंपनी” हि हैमारप्लास्ट कंपनीकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कोन फिल्टर्स विकत घेतं असत. हि कंपनी नक्की एवढ्या फिल्टर्सचं करते तरी काय हे बघायला ते एकदा स्टारबक्स ह्या कंपनीत उत्सुकतेपोटी सीएटल गेला.

1971 ला सुरु झालेली स्टारबक्स हि दहा वर्षाची छोटी कंपनी होती. हि फक्त सीएटल राज्यात आपला व्यवसाय करत असत. तीन मित्र म्हणजे लेखक गार्डन बॉकर, इंग्रजी शिक्षक जेरी बोल्डवीन, आणि इतिहास शिक्षक जेव सीगी यांनी ह्या स्टारबक्स ची स्थापना केली होती. त्यावेळी हि कंपनी फक्त कॉफीच्या बी(Bean’s) विकायची .

starbucks-marathipizza02
brandautopsy.com

हावर्डला हि कंपनी बघताच क्षणी आवडली. काही दिवसात संस्थापकां सोबत ओळखी झाल्यानंतर हावर्ड ने स्टारबक्स मध्ये नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखवली, स्टारबक्सचे संस्थापक सुद्धा नोकरी देण्याकरीता राजी झाले आणि अश्याप्रकारे हावर्ड स्टारबक्सचा रिटेलचा डायरेक्टर हि झाला. हावर्ड ने स्टारबक्स मध्ये जबरदस्त अशी कामगिरी सुरु केली.

1983 मध्ये कंपनीच्या कामानिमित्त हावर्ड मिलान (इटली) येथे गेला होता, तिथे त्याने पहिल्यांदा “कॉफी बार” पहिला, आणि तो व्यवसाय पाहून त्याने स्टारबक्समध्ये हि अशी कॉफी ड्रिंक देता येणं शक्य आहे का याची पडताळणी सुरु केली. असे कॅफेबार फक्त कॉफी पिण्याचे ठिकाण नसून लोक एकत्र येऊन गप्पा मारतात, एकमेकांना भेटतात. अमेरिका मध्ये अश्या पद्धतीची कॅफेबार चेन व्यवसाय कोणाचाच नव्हता. हार्वडला ह्या मध्ये मोठा व्यवसाय दिसत होता. स्टारबक्स आतापर्यंत केवळ कॉफी बी विकत होती, त्यातच जर छोटासा कॉफी बार सुरु केला तर कंपनी मोठी कामगिरी करेल अशी त्याची मनीषा होती.

अमेरिकेला पोहचताच त्याने कॉफी बार काढण्याची कल्पना संस्थापकांना सांगितली. ह्या कल्पनेवर संस्थापक एवढे खुश नव्हते, त्यांचं म्हणणं होतं की स्टारबक्स एक कॉफी बी विकणारी कंपनीचं राहू द्यावी पण हावर्ड च्या प्रबळ इच्छेपुढे त्यांनी एका शॉप मध्ये कॉफी ड्रिंक बार सुरु करण्याची परवानगी दिली. हळू हळू स्टारबक्स ची कॉफी लोकांना आवडू लागली, काही दिवसातच शेकडो लोक कॉफीसाठी स्टारबक्स ला भेट देऊ लागली. हावर्ड च्या अपेक्षेनुसार त्याला ह्या व्यवसायात मोठी बाजारपेठ दिसू लागली, पण एवढं होऊन हि स्टारबक्स च्या संस्थापकांच हेच म्हणणं होतं की स्टारबक्स हि एक कॉफी बी विकणारी कंपनी राहू द्यावी. उगाच मोठी कंपनी करून डोक्याला ताप करून घायला नको, आहे तो व्यवसाय ठीक आहे. कॉफी ड्रिंक्स बंद करायला हवं.

starbucks-marathipizza04
bluesky.chicagotribune.com

हावर्ड ला कॉफी ड्रिंक बारचा व्यवसाय खुणावत होता, त्याने लागलीच स्टारबक्स ला राजीनामा दिला आणि स्वतःची “टू गिओरनॅल ” अशी कॉफी ड्रिंकची चेन बार सुरु केली. हा कॉफी बार खूपच लोकप्रिय झाला. पुढे 1987 मध्ये स्टारबक्स चे संस्थापक त्यांची कंपनी विकत आहेत अशी खबर हावर्ड ला मिळाली, मग त्यानेच पुढे चक्रे फिरवली आणि स्टारबक्स विकत घेतली. ह्या काळात स्टारबक्सची 11 स्टोअर्स होती आणि हावर्डची स्वतःची 6 स्टोअर्स अशी एकूण 17 कॉफी स्टोअर्स त्याच्याकडे होतीत.

हावर्ड म्हणयचा की,

 आम्ही फक्त कॉफी विकत नाही, आम्ही अनुभव विकतो, असा अनुभव कि लोक स्टारबक्समध्ये सारखे सारखे येतील.

लोकांना आरामदायी कित्येक तास बसून तिथे कॉफी घेत गप्पा गोष्टी करता याव्यात म्हणून कॅफेची रचना ही त्याने तशी बनवली होती.
लोकांच्या समक्ष कॉफी बी रोस्ट करून कॉफी बनवून देऊ लागला, कॉफी बनवण्याची पद्धत एकसारखी ठेऊ लागला ज्यामुळे लोकांना नेहमी त्यांची मनपसंत कॉफी मिळू लागली. स्टारबक्स मधील कर्मचाऱ्यांना तो पार्टनर्स बोलायचा, त्याने सर्व कर्मचाऱ्यांचे हेल्थ इन्शुरन्स काढून दिले होते. स्टारबक्स दर वर्षी जवळपास 30 करोड डॉलर्स हे फक्त कर्मचाऱ्यांच्या हेल्थ इन्शुरन्स वर खर्च करते. हा खर्च त्यांच्या मुख्य रॉ मटेरियल कॉफी बी वर केले गेलेल्या खर्च पेक्षा कित्येक जास्ती आहे. 1992 मध्ये स्टारबक्स चा IPO आणला गेला आणि ही अपनी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली तिथून ह्या कंपनीने मागे वळून पाहिले नाही.

starbucks-marathipizza05
food.allwomenstalk.com

पुढच्या 8 वर्षात त्यांनी शेकडो कॅफे सुरु केले, दर वर्षी नवीन मार्केट, नवीन देशात त्यांनी आपला व्यापार वाढवला. 1992 मध्ये स्टारबक्स चे 165 कॅफे होते, तेच 1999 मध्ये कॅफेची संख्या 2498 झाली होती, यावरून तुम्ही कंपनीचा विस्तार कसा झपाट्याने होत गेला याचा अंदाज बांधू शकता. 2000 साली जेव्हा कंपनीचे 3500 कॅफे झाले, तेव्हा हावर्ड ने रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला आणि “ओरिम स्मिथ” याला कंपनीचा ceo बनवून सगळी जबाबदारी त्याच्याकडे सोपवून स्वतः चेअरमन झाला आणि इथेच त्याने चूक केली.

हावर्ड बाजूला झाला तसा कंपनी आपल्या मुख्य उद्दिष्टापासून दूर जाऊ लागली. शेअर मार्केट मध्ये अग्रेसर होण्याच्या दृष्टीने दरवर्षी कॅफेची संख्या तर वाढू लागली पण कॉफीची गुणवत्ता आणि ग्राहकांची सेवेची गुणवत्ता ढासळू लागली. नुकसान होण्याची कल्पना असून सुद्धा नवीन कॅफे उघडण्यात आले, कंपनीने कॉफी सोबतच खाद्य पदार्थाच्या सेगमेन्टमध्ये शिरकाव केला, सोबत म्यूजिक सीडी सेगमेन्ट हि सुरु केला जो कि त्यांच्या व्यवसायाच्या पूर्णतः वेगळा व्यवसाय होता, यामुळे कंपनीच लक्ष मुख्य उद्दीष्टापासून दूर होत गेलं. याच काळात टेक्नॉलॉजी वाढली, सोशल मीडिया झपाट्याने वाढला, प्रतिस्पर्धी वाढत गेले त्यामुळे कंपनीचा व्यवसाय मार्जिन कमी होत गेला.

2007 मध्ये स्टारबक्स कंपनीचे 15000 कॅफे असून सुद्धा या कंपनीचे आर्थिक आकडे गडगडायला लागले आणि असे वाटू लागले की आता ही कंपनी बुडीत निघणार, बंद पडणार. तेव्हा हावर्ड ने क्रांतिकारक निर्णय घेतला आणि 2008 मध्ये कंपनीच्या CEO पदावर पुनरागमन केलं. पदभार स्वीकारल्या बरोबरच त्याने झटपट निर्णय घ्यायला सुरुवात केली. सर्वात पहिला त्याने 10,000 स्टोअर्स मॅनेजर लोकांना एका ठिकाणी मीटिंगला बोलावून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा कशी द्यायची याचे प्रशिक्षण दिले. त्याने स्टारबक्स चे उद्धिष्ट, उच्च गुणवत्तेची कॉफी, आणि ग्राहकांची सेवा यावर लक्ष्य केंद्रित करण्यावर भर देण्यास सांगून कर्मचार्यांच्यात आत्मविश्वास भरला.

starbucks-marathipizza06
forbes.com

त्या नंतर हावर्ड ने तोट्यात चालणारी 600 कॅफे लगेचच बंद करून टाकले. सोबत इतर कॅफेत नवीन लॅपटॉपस्, अद्यावत उपकरणे लावून घेतली. एवढेच नाही तर त्याने जगभरातील स्टारबक्स च्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित तीन तास कॅफे बंद ठेऊन, परफेक्ट कॉफी कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले. हे खूपच अद्भुत होतं कारण एवढा वेळ कॅफे बंद करणे म्हणजे 3 तास लेबर कॉस्ट कमी होणे, जे कि कित्येक लाख डॉलरचं नुकसान होतं. हावर्डने कॉफीचे काही नवीन फ्लेवर्स आणून मार्केटवर आपली पकड मजबूत केली आणि अश्याप्रकारे जी कंपनी बुडत होती तिला त्याने पुन्हा जिवंत आणि यशस्वी करून दाखवली.

आज जवळपास 72 देशात, 2 लाख 38 हजार कर्मचारी आणि 24 हजार कॅफे सोबत हावर्डच्या नेतृत्वात हि कंपनी यशस्वीरीत्या सुरु आहे. कंपनीचं रेव्हेन्यू तब्बल 2 हजार करोडच्या आसपास आहे. भारतात टाटा समूहासोबत स्टारबक्स कंपनीने करार करून भागीदारीमध्ये स्टारबक्स कॅफे देशभर सुरु केले आहेत. काळासोबत कंपनीने स्वतःमध्ये बरेचसे बदल केलेले आहेत.

starbucks-marathipizza07
money.cnn.com

इथं सांगायचा मुद्दा हा आहे की जर तुम्ही व्यवसायाबद्दल passionate असाल आणि संधी ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर तुम्हाला यशस्वी होण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही, स्वतःही नाही, मग तो व्यवसाय कॉफीचा असो, मसाल्याचा असो किंवा कोणताही छोटा मोठा असो.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *