' जगभ्रमंती केली तरी ही आगळीवेगळी सफर तुम्ही कधीही पाहिली नसेल! – InMarathi

जगभ्रमंती केली तरी ही आगळीवेगळी सफर तुम्ही कधीही पाहिली नसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : संतोष सराफ

अथांग आभाळाखाली मोकळ्या माळरानावर संपूर्णच्या संपूर्ण रात्र घालवणे ही कल्पनाच खूप मनोहारी आहे.
शहर-उपनगरांत रहाणाऱ्या प्रत्येकाच्या मनांत एक गाव असतं. कधीकाळी त्या विशिष्ट गावी आभाळाकडे पहात मोकळ्या माळरानावर काढलेल्या आंधाऱ्या रात्रींचे क्षण आठवतात.

कोणा भावंडांच्या साथीने अंगणात आजी आजोबांच्या कुशीत झोपी जाताना ऐकलेल्या नक्षत्रांच्या गोष्टी मनांत रुंजी घालतात.  तो धृव तारा, त्याच्या भोवती रिंगण घालणारे सप्तर्षि, त्यांच्या बरोबरची अंधूकशी अरूंधती.

 

sky in night 1 InMarathi

धृव ताऱ्यांच्या अढळपणाची ऐकलेली गोष्ट, जुन्या लोकांनी सांगितलेल्या धूमकेतूंच्या रोमांचक कहाण्या, राहू-केतूंच्या चंद्रसूर्याला ग्रहण लावण्याच्या साक्षी हे सगळं कसं मनांत घर करून बसलेलं असतं.

 

sky-in-night-marathipizza
i.pinimg.com

 

पण आता मात्र अश्या अंधाऱ्या आकाशाच्या दर्शनाचे योग येतच नसतात. उंच  इमारतींच्या झाकोळात आणि रात्रीच्या कृत्रिम झगमगाटात आभाळातले ते निसर्गाचे मुक्त उधळण कसे दिसणार? आणि येत्या पिढीला जर ते दिसलंच नाही तर त्याचं आकर्षण कसं निर्माण होणार?

आमच्या पिढीच्या लोकांना मात्र नेहमी बा.सी. मर्ढेकरांसारखे ‘कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो…’ असे वाटत रहाते. वाटते, ठरवून असे शहराच्या दूर जावे.

सायंकाळी ठरलेल्या माळावर अंग झोकून द्यावे. पश्चिमेचा लालिमा गडद होताना एकेक तारका स्पष्ट होते. तिचे मर्म जाणून घ्यावे. पूर्वजांच्या अडचणींना वाट दाखवणाऱ्या या तारका-नक्षत्रांच्या भाषा आपणही समझून घ्याव्यात.

 

red-sky-in-the-night InMarathi

 

पण असे योग हे एकट्याने ठरवण्याचे नसतातच मुळी. असे ठरवून माळावर भेटणे कसे फ्रुटफुल झाले पाहिजे. आजच्या वेगवान आयुष्यात एखादी रात्र फुकट घालवणे परवडते थोडीच?

त्या एकाच रात्री शक्य असेल तितक्या आभाळाचे दर्शन झाले पाहिजे. त्यातले आधुनिक विज्ञानातले बारकावे इतिहास-पुराणातल्या संदर्भांसकट समजले पाहिजेत. आणि त्यासाठी सज्ज असतात ती आकाशदर्शन घडवणारी तज्ज्ञ मंडळी.

मला आठवतं, पहिल्यांदा जेव्हा हा असा कार्यक्रम मी अटेंड केला तेव्हा अत्यंत भारावून गेलो होतो. म्हणजे तारांगणात शो पहाणे वेगळे आणि असे खुल्या आकाशात रात्रभर डोकावणे वेगळे हे जाणवले.

 

sky-in-night-marathipizza01
i.pinimg.com

एखाद्या संगीताच्या मैफिलीला रंग चढावा तसा या कार्यक्रमाला रंग चढतो अक्षरश:. त्यातून तज्ज्ञ मंडळी उत्तम समालोचक असतील तर क्या बात है!

बाळ पंडितांची लहानपणी ऐकलेली क्रिकेटची मराठी कॉमेंटरी आठवते? समालोचन? तसे कहाण्या रंगवून सांगणारे समालोचक हवेत.

हल्लीच विकसित झालेला तो लेझर टॉर्च सर्वदूर पटांगणावर पसरलेल्या श्रेते वर्गाला एकाच बिंदूकडे पहायला लावायला मदत करतो. मग या समालोचकापासून आपले अंतर कुठेही असो. आपल्याला त्याने जणू एखाद्या विशिष्ठ तारकेवरच बोट ठेवले आहे असे जाणवते.

माहिती आणि आकाश पुढे पुढे सरकत रहाते. उत्तरेकडचा तो ध्रुव मात्र साथ सोडत नाही. दुष्ट ढग शहाण्या खलनायकाप्रमाणे अनुपस्थित राहिले तर कमीत कमी चोवीस नक्षत्रांची दिमाखदार परेड खरोखर चुकवू नये अशी असते.

 

sky in night 2 InMarathi

यात अधूनमधून भल्या मोठ्या दुर्बिणींतून ग्रह-तारे पहावयास मिळतात. कधी शुक्राची कोर तर कधी गुरुचे विलोभनीय दर्शन. त्याची उपग्रह मंडळी. कधी शनीची कडी तर कधी दूरस्थ नेब्युला. कधी कोणता तारका गुच्छ तर कधी एखादा द्वैती तारा.

आपल्याकडे त्यामानाने अवेअरनेस कमी असल्याने हे कार्यक्रम क्वचित होतात. आणि उपनगरे इतकी दूरवर पसरल्याने हल्ली पूर्वीच्या आकाशदर्शनांच्या जागा प्रकाश प्रदूषित झाल्यात.

 

sky in night 3 InMarathi

 

हौशी मंडळी मात्र अजूनही योग्य जागा शोधतातच. कितीही अडचणीचे असेल तरी लोकांना विनासायास डेस्टिनेशनवर पोहोचवतातच. आणि सायंकाळी सातच्या सुमारास खेळ सुरु करतातच.

अश्या कार्यक्रमांच्या शोधात असणाऱ्यांनी सहसा या मंडळांचा पूर्वानुभव लक्षात घेऊनच कार्यक्रमास जावे. मी पूर्वी खगोल मंडळाच्या कार्यक्रमास आवर्जून वर्णी लावत असे.

त्याचे कारण म्हणजे त्यांची तज्ज्ञ मंडळी. तो काळ देखील तसाच होता. वीस एक वर्षांपूर्वी वांगणीची रात्र अंधारी असे. हल्लीची कल्पना नाही. शिवाय हल्ली आमच्या भागातून लहान मुले आणि फ्यामिली घेऊन ट्रेनने प्रवास करणे फार जिकीरीचे झाले आहे.

त्यामुळे माझा असा सल्ला आहे की अश्या कार्यक्रमाला जाणाऱ्यांनी आपापल्या भागातील मंडळ निवडणे उत्तम. कारण त्यामुळे जाण्या-येण्याची योग्य सोय होते.

 

sky-in-night-marathipizza02
do512family.com

तिथे जाताना सहसा खूप सामान न्यावे लागणार नाही ना हे पहाणे गरजेचे असते. त्यामुळे नाश्ता, जेवण याची सोय मंडळ करत असेल तर फार बरे.स्थळ एखादे शांत रिसॉर्ट निवडावे कारण मग स्वच्छतागृहे चांगली असण्याचा प्रश्न सुटतो.

रात्री बेरात्री काही सेवा-मदत हवी असल्यास स्टाफ हजर असतो. स्थळ अती लांब नको. तासाभरात जागेवर पोहोचणे उत्तम. पण फार जवळ असले की प्रकाश प्रदूषण असणारच. त्यामुळे हा नियम थोडा शिथिल करावा.

माळरानाच्या अगदी जवळ उंच पहाड असेल तर त्या दिशेचे क्षितीज समजाऊन घेता येत नाही. पूर्व आणि पश्चिम दिशेला असे क्षितीज झाकले जात असेल तर फारसे बिघडत नाही.

कारण आकाश पूर्व ते पश्चिम असे सारखे बदलत असते आणि संपूर्ण पॅनोरमा आपल्या डोक्यावरून जाणारच असल्याने फारसे मोठे नुकसान होत नाही. परंतु उत्तरेला फार महत्वाची नक्षत्रे असतात.

काही महत्वाची नक्षत्रे दक्षिणेलाही असतात. या दिशांची नक्षत्रे फारशी डोक्यावर येत नसल्या कारणांमुळे उत्तरेकडे बुटका जरी असला तरी आणि दक्षिणेकडे उंच पहाड असलेली जागा नको. किंबहुना दूरदूरवर क्षितिजापर्यंत नजर जावी असे सपाट मैदान या कार्यक्रमाला आदर्श होय.

 

sky in night 4 InMarathi

 

मी जेव्हापासून ह्या कार्यक्रमांचे आयोजन करू लागलो, तेव्हापासून मला नेहमी जाणवते ती लहान मुलांची लक्षणीय उपस्थिती. आपल्या आजूबाजूला असलेले हे विश्व नेमके कसे आहे, कशाचे बनले आहे याची उत्सुकता छोट्यांना नसेल तरच नवल.

आणि म्हणूनच इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्ही माध्यमांतील विद्यार्थ्यांना समजेल अश्या पद्धतीने कार्यक्रम करण्याची खासियत या आकाशदर्शन घडवणाऱ्या तज्ञांकडे असली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना- लहानांपासून वयोवृद्ध लोकांना हा कार्यक्रम तितक्याच गोडीने अनुभवता यावा हे उद्दिष्ट असावे.

विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावावी त्याचप्रमाणे कलाशाखेच्याही विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम जरूर अटेंड करावा. भाषा, संस्कृती, इतिहास, प्राच्यविद्या, भूगोल हे सगळे विषय प्यारे असतात या कार्यक्रमाला.

sky-in-night-marathipizza4
nightskyinfo.com

आपल्या भारतीय खागोलशास्त्राने आपली- म्हणजे आपल्या मराठी महिन्यांची कालगणना बनते. या महिन्यांच्या नावावरून आकाश कसे वाचावे, पाश्चात्यांच्या चालीरीती आणि आपल्या चालीरीती यांचा उगम आणि संगम कसा ओळखावा हे सगळे आकाशदर्शनातून कळते.

मराठी कवितांना तर आकाशातल्या तारकांनी कितीतरी ओळी पुरवल्यात. हे सर्व नक्षत्रांचे देणे याची देही याची डोळा समजाऊन घेणे भाषा आणि संस्कृतीप्रेमी मंडळींना देखील आपलेसे करते.

 

sky in night 5 InMarathi

 

रामायण आणि महाभारताचा काळ नेमका कुठला? भारताच्या दक्षिणेला असलेल्या या महाराष्ट्राच्या पठारावर वस्ती निर्माण होताना आकाशात काय स्थिती होती, अती प्राचीन काळी आकाश कसे दिसत होते, भविष्यातले आकाश कसे असेल इतकेच नाही तर सर्वदूर पसरलेल्या या तारकांचे आयुष्य कसे असते, यांच्या रंगांचे वैशिष्ठ्य काय?

हे आकाराने किती मोठे असतात, यांना कोणी जोडीदार असतात काय, हे कायम असेच चमकतात का? अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे जेंव्हा संवादातून मिळत जातात तेव्हा प्रत्यक्ष आकाश दर्शनाचा खरा आनंद मिळतो.

तेव्हा मंडळी, “का रोहीणीस वाटे, चंद्रासवे असावे?’ या दत्ता केसकरांच्या कविप्रश्नाचे उत्तर शोधायला या सिझनमध्ये आकाशदर्शनास आवर्जून हजेरी लावा. एका वेगळ्या विकेंड पर्यटनाचा अनुभव मिळवाल.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com  त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?