' देहाचे कोड पुरविणाऱ्याला नारायणाची भेट कधी घडायची नाही : जाऊ तुकोबांच्या गावा भाग : ४५ – InMarathi

देहाचे कोड पुरविणाऱ्याला नारायणाची भेट कधी घडायची नाही : जाऊ तुकोबांच्या गावा भाग : ४५

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक : “आज ते विठ्ठलाचे झाले, ब्राह्मण राहिले नाहीत” : जाऊ तुकोबांच्या गावा भाग :४४

===

 

jave-tujave-tjave-tukobanchya-gaava-marathipizza01ukobanchya-gaava-marathipizza01kobanchya-gaava-marathipizza01

 

तुकोबांनी रामकाकांना आपल्या घरी जेवू घातले हे ऐकताच नारायणाचा चेहेरा उतरला. ते पाहून रामभटांनी विचारले, “का रे? काय आले मनात?”

नारायण म्हणाला, “मी खूप मागे लागलो होतो, मला जेवू घाला म्हणून पण नाही म्हणाले, काशीबाईकडे पाठवीत होते.”

रामभट म्हणाले, “असे होय! मग त्यात नाराज होण्यासारखे काय? एखादे वेळेस अपवाद होतो आणि त्याने नियमच सिद्ध होतो. मलाही दुसऱ्या दिवशी सकाळी दूध पाजून काशीबाईकडेच धाडून दिले की त्यांनी! बरेच दिवस राहिलो मग मी देहूत. आमचे कुटुंबही काही दिवस आले होते तिकडे. खूप ऐकले तुकोबांना. खूप शिकविले त्यांनी. विशेष करून अद्वैत सिद्धांत शिकविला. त्याचा नेमका अर्थ काय आणि तो व्यवहारात कसा आणायचा ते शिक्षण फार झाले.”

“आता तुमी आम्हास्नी त्येच सांगनार ना?” आबाने विचारले. आबाची ती उस्तुकता पाहून रामभटांनाही उत्साह वाटला व ते म्हणाले, “होय तर! तुकोबांनी एक छान अभंग केलाय. तेथून सुरुवात करतो.”

माया तें चि ब्रह्म ब्रह्म तें चि माया । अंग आणि छाया तया परी ॥
तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणातळीं हारपते ॥
दुजें नाही तेथें बळ कोणासाठी । आणिक ते आटी विचाराची ॥
तुका ह्मणे उंच वाढे उंचपणे । ठेंगणीं लवणें जैसी तैसी ॥

तुम्ही ब्रह्म आणि माया हे शब्द अनेकदा ऐकले असतील. नारायणाला तर दर कीर्तनात ते वापरावे लागतात. ‘जे अविचल आहे ते ब्रह्म आणि जे बदलते आहे ती माया’ असे लक्षात ठेवा.

किंवा असे म्हणा की ह्या सृष्टीचे स्वरूप सारखे बदलते असते, तिचे कारण माया. मायेचे हे कामच की तिने प्रत्येक गोष्ट बदलती ठेवायची. ती बदलताना कधी वाटते वस्तू नष्टच झाली की काय? परंतु, ते तसे नसते. ह्या वस्तुचे रूपांतर त्या वस्तूत होत असते.

आता विचाराल की हे कशावरून? तर त्याचे उत्तर असे की ही सृष्टीचे रूप बदलत राहिले तरी सृष्टी नष्ट कधीच होत नाही. ती नष्ट का होत नाही याचे कारण ब्रह्म.

तर अशा अविनाशी ब्रह्माचे आणि बदलत्या मायेचे नाते कसे ते सांगताना तुकोबा म्हणत आहेत की,

माया तें चि ब्रह्म ब्रह्म तें चि माया । अंग आणि छाया तया परी ॥

आबा, हा विषय तुम्ही नीट समजून घ्या आणि त्यावर सतत चिंतनही करा. काहीतरी स्थिर आहे आणि काहीतरी बदलते आहे अशा ह्या विश्वाचे आपण घटक आहो. आपणही त्याच सृष्टीचे घटक आहो. म्हणून आपल्यातही काही स्थिर गोष्ट आहे आणि काही बदलती गोष्ट आहे. हा सिद्धांत एकदा मनात ठसला की अशा बदलत्या दिसण्याऱ्या पण कधीही नष्ट न होणाऱ्या विश्वात आपले वर्तन कसे असावे ते आपल्याला ठरविता येईल.

नारायणा, तू द्वैत अद्वैत वगैरे भाषा बरीच वाचलेली आहेस. ब्रह्म आणि माया ह्या दोन वेगळ्या वस्तु आहेत की एक ह्यावर आपल्याकडे मोठा वाद चालू असतो. हा वादही अनादी म्हणावा असा आहे. काहींना वाटते की, ह्या दोन गोष्टी एकमेकांपासून भिन्न आहेत. एकदा ही भिन्नत्वाची कल्पना मान्य केली की ब्रह्म म्हणजे परमेश्वर असे म्हणता येते आणि तो सर्वश्रेष्ठ असेही ठरविता येते.

श्रेष्ठ कनिष्ठ ह्या भेदभावाच्या कारणाचे मूळ असे नीट लक्षात घ्या. हे स्पष्ट आहे की आपल्याला आपला देह आहे आणि तो रोज थोडा थोडा बदलत आहे. म्हणजे ही माया झाली. जो बदलत नाही तो वेगळा आहे, तो परमेश्वर आहे असे मानणे म्हणजे द्वैतमत स्वीकारणे. ह्यात आपल्याला कनिष्ठपणा आला. तो अनेकांना आवडतो. आपण कनिष्ठ आहोत अशी एकदा भावना केली की वरिष्ठाकडून कृपेची अपेक्षा करता येते. त्याने प्रसन्न व्हावे म्हणून याचना करता येते. आपण जन्मतःच कनिष्ठ असल्याने वरिष्ठ कधीच होणार नाही आहोत ह्या भावनेचा जोर द्वैत्यांमध्ये फार असतो.

ह्या उलट अद्वैत्यांची भूमिका असते. सृष्टीत होणाऱ्या रूपांतराचे कारण माया व स्थैर्याचे कारण ब्रह्म असे ठरले याचाच अर्थ ‘जे आहे व जे कधीच नष्ट होणार नाही’ त्याचे रूपांतर माया करीत असते असा बोध आपल्याला होतो.

एकदा हे समजले की ब्रह्म आणि माया यांचे नाते कळेल. ते कळावे म्हणून आपल्या सावलीचे उदाहरण तुकोबांनी ह्या अभंगात दिले आहे. तुकोबा म्हणत आहेत –

माया तें चि ब्रह्म ब्रह्म तें चि माया । अंग आणि छाया तया परी ॥

आपली सावली कशी असते? दिवसभर तिचा आकार सारखा बदलता असतो. एका क्षणी तर ती नष्टच होते किंवा म्हणा आपल्यात मिसळून जाते. ब्रह्म आणि मायेचे तसेच आहे. माया रूपे बदलत असली तरी अंगाला धरूनच असते, कधीच त्याच्यापासून ती तुटत नसते. मात्र आपण लोटांगण घातले तर ती आपल्यात हरवून जाते. म्हणून तुकोबा म्हणतात,

तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणातळीं हारपते ॥

माया मात्र कोणतीही रूपे धारण करू शकते.

तुका ह्मणे उंच वाढे उंचपणे । ठेंगणीं लवणें जैसी तैसी ॥

जी गोष्ट जशी असायला हवी तशी बनविणे हे ही मायेचेच काम आहे. नारळाचे झाड उंच उंच वाढते आणि मिठाचे कण मात्र लहानच बनतात आणि लहानच राहतात.

ह्या साऱ्याचा सारांश सांगताना तुकोबा म्हणतात,

दुजें नाही तेथें बळ कोणासाठी । आणिक ते आटी विचाराची ॥

दुजे म्हणजे दोन वा दुसरे असे काही येथे नाहीच. जे आहे ते एकच आहे. ही माया वेगवेगळी रूपे घेते म्हणून आपल्याला विविधता भासत असते इतकेच. अशा स्थितीत विचार तरी किती करता? आपल्यापाशी जे बळ आहे ते कशासाठी आहे? आपण ते बळ कशावर खर्च करणार आहोत? तसा बलप्रयोग करावयास येथे दुसरे कुणी नको?

हे विवेचन ऐकून आबा म्हणतो, “म्यां लय लोकांचं बोलनं आईकलं हाय ह्ये विषयावर. पण आज बरा उलगडा होतुया. लय बोलीत आसतात लोक ह्यावर, न्हाय का नारोबा?”

आबा बोलला ते नारायणाला उद्देशून पण उत्तर दिले रामभटांनीच. ते म्हणाले,

हा विषय बोलून धंदा करणारेच अधिक असतात. तुकोबांना त्यांचा फार राग येतो. ते म्हणतात,

माया ब्रह्म ऐसे ह्मणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥
विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागे नाद्या होऊनि फिरे ॥
करूनी खातां पाक जिरे सुरण राई । करिता अतित्याई दुःख पावे ॥
औषध द्यावया चाळविले बाळा । दावूनियां गुळां दृष्टीपुढे ॥
तरावया आधी शोधा वेदवाणी । वांजट बोलणी वारा त्यांची ॥
तुका ह्मणे जयां पिंडाचे पाळण । न घडे नारायण भेट तयां ॥

माया, ब्रह्म आदी शब्द वापरून सर्वसामान्य लोकांना नागविणाऱ्यांना तुकोबांनी धर्मठक म्हटले आहे. धर्माच्या नावाखाली मोठे मोठे शब्द वापरून ठकविणारे म्हणजे धर्मठक. वास्तविक त्यांचे बोलणे म्हणजे नुसता वाराच तो. काहीही उपयोग नसलेला शब्दांचा वारा. वांझोटा. पण त्यांच्या बोलण्याची भूल लोकांवर पडतेच. ती मंडळीही हुषार असतात.

आजारी मूल औषध घेण्यास टाळाटाळ करीत असते. अशा वेळी त्याच्या समोर गूळ धरतात. त्याला ते बाळ फसते आणि कडू औषध गुळाच्या लोभाने पिते. हीच युक्ती ही मंडळी वापरतात. तुम्हाला काही तरी घबाड मिळेल अशी आशा लावणारी भाषा करतात. त्या बोलण्याला वजन यावे म्हणून माया ब्रह्म असे शब्द वापरून आपण विद्वान असल्याचे भासवतात. मग मनाने दुर्बल लोक त्यांच्या गळाला लागतात.

===

===

वास्तविक हे लोक अत्यंत विषयलंपट असे असतात. त्यांना सर्व भोग हवे असतात. ते भोग भोगावयास मिळावे म्हणून लोकांना कुविद्या शिकविण्यासही ते मागे पडत नाहीत. खरे तर ह्या आततायी वागण्याने ते शेवटी दुःखच पावणार असतात. पण आपल्याच मनाच्या ते इतके इतके नादी लागलेले असतात की ते जसे जिकडे जाईल तसे त्याच्या मागे ते जात राहतात. मग जे वाटेल ते करावे, मनाला येईल ते खावे. ह्याला पिंडाचे पाळण म्हणे देहाचे लाड करणे म्हणतात. देहाचे कोड पुरविणाऱ्याला नारायणाची भेट कधी घडायची नाही असे तुकोबांचे सांगणे आहे.

हा संसार तरून जाऊन नारायणास भेटावयाचे असले तर अशा धर्मठकांची नव्हे तर वेदांची वाणी ऐकली पाहिजे असे तुकोबा सुचवित आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?