' रशियाचा आधुनिक सामरिक Romance – InMarathi

रशियाचा आधुनिक सामरिक Romance

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जुलै २०१५, सीरियाच्या अध्यक्षांचा म्हणजेच असादांचा पराभव अटळ दिसत होता. सीरियाची सेना, थकली होती, कमालीची ताणली गेली होती. देशाच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या निंदनीय पराभवामुळे हे स्थापित झाले होते की, असाद यांची सत्ता आता फक्त देशाच्या काही भागापुरतीच मर्यादित राहिली आहे. दोन महिन्यांचा अवकाश आणि रशियन वायू सेनेची विमाने सीरियन अवकाशात आपली शक्ती दाखवू लागली. सीरियाला नतमस्तक करू पाहणाऱ्या सर्व ताकतींना याच विमानांच्या बॉम्बवर्षावाने काबूत आणले.

 

Russia-inmarathi01
sana.sy

दिवस ११ डिसेंबर, २०१७. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी सीरियाला अचानक भेट दिली. भेटीचे स्थान होते ख्मिमिम! व्लादिमिर पुतिन आपल्या सेनेला उद्देशून बोलले

“एक मोठ्या विजयानंतर तुम्ही तुमच्या घरी परतत आहात, तुमच्या नातेवाईकांजवळ, पालकांजवळ, तुमच्या पत्नीजवळ, मुलांजवळ, मित्रांजवळ. तुमची मातृभूमी तुमची वाट बघत आहे !”

जवळपास सर्व रशियन सैनिकांना माघारी बोलवले गेले आहे, काही जुजबी सैनिकांना सोडून. जाताजाता पुतीन यांनी हे पण निक्षून सांगितले की “ जर आतंकवादी जमावाने पुन्हा डोके वर काढले, तर त्यांना अश्यारितीने ठोकू जे त्यांनी कधीच बघितले नसेल”

सीरियाच्या बहुतांशी भागात इसिसचा खात्मा झाला होता आणि कुठल्याच भूभागात इसिसचे नियंत्रण उरले नव्हते.

सीरियामध्ये रशिया का गेला ? मैत्री का लोभ ?

 

Vladimir-Putin-russia-inmarathi
dailystar.co.uk

रशिया आणि युक्रेन संबंध क्रिमियामुळे धोक्याच्या पातळीवर ताणले गेले. युरोपमध्ये युद्ध होते की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली. युरोपिअन राष्ट्रसंघ आणि अमेरिका यांनी मग रशियावर आर्थिक निर्बंध लादले. रशियाचा व्यापार हा पूर्णपणे युरोपीय देशांसोबत चालतो. रशिया कच्चे तेल आणि वायू देतो आणि युरोप वेगवेगळ्या जीवनाश्यक गोष्टी. हे आर्थिक निर्बंध एवढे कमालीचे कडक होते, की रातोरात २० रुबलला मिळणारी ब्रेड १०० रुबलपर्यंत येऊन ठेपली. महागाई दर रोज नवे उच्चांक गाठू लागला. त्यातच कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारत किंमत घसरायला चालू झाली. तिकडे फ्रांसने mistral नावेचा करार रद्द केला. अजून एक मोठी जखम.

रशियाची अर्थव्यवस्था दोन मोठ्या गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे कच्चे तेल आणि वायू, दुसरी म्हणजे शस्त्रांची निर्यात. पुतीन यांनीसुद्धा या गोष्टीला मान्यता देत म्हटले की, आपण आपली अर्थव्यवस्था diversify करू शकलो नाही, आगामी काळात करू! दोन्ही ठिकाणी रशियाला काही नवीन हाती लागणे, ज्याने अर्थाव्यावास्थेवरचा ताण कमी होईल, असे काही दिसत नव्हते. रशियाकडे होत्या फक्त तीनच गोष्टी एक अफाट परकीय चलनाची गंगाजळी, दुसरी मुत्सद्दी राजकीय नेतृत्व आणि शेवटची गोष्ट म्हणजे रशियन जनतेचा कणखर स्वभाव !

हा एक अध्याय संपला ना संपला तोच सीरियाची परिस्थिती बदलायला सुरवात झाली. इकडे एकाठिकाणी सामरिक तोल सांभाळला नाही की, तिकडे सामरिक तोल बिघडायला सुरवात झाली होती. सामरिक तोल कसा वरचढ ठेवायचा आणि कशी त्यात वृद्धी करत न्यायची हेच तर पुतीन यांचे लक्ष्य होते, आहे आणि राहणारच!

 

Russia-inmarathi02
debka.com

तसं बघितल तर सीरिया आणि रशियाचे जूने संबंध. हे संबंध चालू झाले ते सोविएत युनिअन आणि सीरिया यांच्या द्विपक्षीय करारातून ( फेब्रुवारी १९४६). करार होता सोविएत युनिअन सीरियाला फ्रेंच सैनिक हुसकावून लावण्यात मदत करणार. ऑक्टोबर ८, १९८० मध्ये ब्रेझनेव आणि हफिझ-अल-असाद यांनी मैत्री करारावर स्वाक्षरी करून, सीरिया आणि सोविएत युनिअन यांच्यात सामरिक संबंधाची मुहूर्तवेढ रोवली. इराण-इराक युद्ध आणि Palestine वरील विषयांवरील मतभेद बाजूला ठेवून २४ एप्रिल १९८७ मध्ये गोर्बाचेव यांनी असाद यांना ग्वाही दिली की, सोविएत युनिअन सीरियाला आर्थिक आणि लष्करी मदत करत राहणार. सोविएत युनिअनच्या पतनानंतर सीरियाने अमेरिकेसोबत सद्दाम विरोधी पक्षात आपले संबंध मजबूत केले. खरे वळण आले ते विद्यमान राष्ट्रपती बशर अल-असाद आणि पुतीन यांच्या २००५ साली झालेल्या बैठकीतून. पुतीन यांनी सोविएत युनिअन आणि सीरिया यांचा राजकीय इतिहास बघता, जुने कर्ज ७०% कमी केले. तिथून मग सीरीयाला रशियाने बरेच बळ दिले, शस्त्राने आणि कुटनीतीने (UN सुरक्षा परिषदेतून)

हे सगळ ठीक आहे, पण सीरियाच्या युद्धात उडी मारणे म्हणजे एक मोठा निर्णय! युद्धात उडी मारायची म्हणजे पैसा लागणार! इकडेतर पैश्याची बोंब! पैसा एकीकडे, जर युद्धात मोठी मानवी हानी झाली तर? जास्त आर्थिक हानी झाली तर? त्यात कच्च्या तेलाची किंमत कमी. कसे करणार? रशियाने मग सर्व गोष्टी ध्यानात ठेवून सीरियाला मदत करायचा निर्णय घेतला. जवळचा तोटा दुर्लक्षित करून, लांबचा फायदा कसा पक्का करता येईल हेच रशियाने ठरवले. एक पत्थर मे २ पंछी!

पहिला फायदा म्हणजे मैत्री टिकणार आणि दृढ होणार. त्याचा फायदा भूमध्यसागरात नक्कीच होणार. भूमध्यसागरात रशिया म्हणजे पश्चिमी देशांच्या कुरापतीला कुठेतरी लगाम! राजकीय आणि सामरिक फायदा पक्का! दुसरा म्हणजे आर्थिक! तो कसा? शस्त्र विकून वापस अर्थव्यवस्थेला मजबुती देणे आणि आंतरिक आणि बाह्य सुरक्षेला मजबूत करणे. हे जरा विस्तृतपणे बघू!

लोभ:

रशियाचे रक्षा मंत्री युरी बोरीसोव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही २०० च्यावर शस्त्र सीरियाच्या भूमीवर तपासून बघितले. त्यात जी शस्त्रास्त्रे नवीन आहेत, ज्याचं उत्पादन आता चालू होणार आहे हे आजमावले गेले. आहे की नाही गंमत! त्यातल्या काही ठळक गोष्टी आपण बघू आणि त्याचा उपयोग रशियाला कसा झाला हे बघू :

१) Su-३४ विमान:

हे रशियाच्या आधुनिक विमानांपैकी एक आहे. आपले Su-३० ज्या विमानाचा आधुनिक अवतार आहे, तिथेच या विमानाचा उगम आहे. फक्त याचं कार्य म्हणजे बॉम्बवर्षाव! तेही इतका की शत्रूचे कंबरडे मोडून निघेल. आपले Jagur विमान जे कार्य करते तेच हे विमान करणार पण अजून शक्तीशालीपणे! या विमानाची खासियत म्हणजे यात एक छोटं शौचालय आहे, जे याची उड्डाण क्षमता दाखवते. तुम्हीच थोडा विचार करा की कसे? या विमानासाठी खास अस्त्रे तयार करण्यात आली आणि त्यांनी त्यांचे काम बखुबीने केले. अल्जेरीयाने लगेच १२ विमानांसाठी मागणीपण केली. इंडोनेशिया, भारत, इथोपिया, मलेशिया, नायजेरिया इत्यादी देशांनी लगेच आपली इच्छा दर्शवली. त्यातल्या त्यात इंडोनेशिया, भारत आणि मलेशिया यांच्याकडून नक्कीच मोठी मागणी नजीकच्या काळात होणार! कारण एकच सुखोईवरचा विश्वास, त्यासाठी असलेले मनुष्यबळ आणि सुटसुटीतपणा!

२) S-४०० आणि S-३००:

हे अस्त्र जगातील एक नावाजलेले अस्त्र आहे. NATO सुद्धा या अस्त्राची धास्ती खाऊन आहे. आकाशात उडणाऱ्या मोठ्या गोष्टींची हे अस्त्र शिकार करते. S-४०० तर असे म्हणतात की, ५ व्या पिढीच्या विमानाला पण पकडते. गंमत म्हणजे ज्या देशाला हे अस्त्र रशिया विकते, समजायचे की तो देश रशियाच्या जवळचा आहे. साध आणि सोप्प गणित! आपण सुद्धा हे विकत घेत आहोत आणि घेतले आहे, फक्त किती हे मोठ्या अधिकारी वर्गालाच माहित! याचे एक कारण म्हणजे चीनचे J-२०!

३) Terminator-२ :

चेचन्याने युद्धामधून जे शिकले ते म्हणजे हे अस्त्र. रॉकेट लाँचर घेऊन चेचन्याच्या सैन्याने रशियाची बरीच हानी केली. दंगे, शहरी युद्ध आणि सुरक्षा यात हे अस्त्र फार कामाचं आहे आणि नाविन्यपूर्ण आहे. T-७२ रणगाड्यावर तयार झालेलं हे अस्त्र म्हणजे सोबतच्या रणगाड्यांच एक सुरक्षा कवच. आपल्याकडेसुद्धा बरेच T-७२ आहेत. भविष्यात हे अस्त्र जर भारतीय सेनेकडे आले तर काही वावगं नाही वाटणार!

ही अस्त्रे बाकी राष्ट्रे का घेणार तर याचं कारण म्हणजे ‘Technology Validation’. कागदावर वाघ असलेली शस्त्रे कोणीच घेत नाही, घेणार नाही आणि घेतलेलीही नाही ! एकदा एक करार झाला की तो वर्षानुवर्षे चालणार आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला वेग देणार! कसा? तर, एखादे वाहन आपण घेतले की, त्याला मेंटेनन्स लागणार, सुटे पार्ट लागणार, इत्यादी. तसेच इकडेही लागू होणार.

 

Russia-inmarathi04
i.ytimg.com

याचे रशियाला आणखी काही फायदे झालेत, ते म्हणजे अशे की :

१) रशिया-युक्रेन नंतर पश्चिमी राष्ट्रांना रशियासोबत एकाच टेबलवर चर्चेला बसावे लागले आणि पुढेही बसावे लागणार.
२) रशियाने नवीन लष्करी डावपेच, नीती आणि अस्त्रे यांचे ‘Technology Validation’ करून चांगलेच शक्तीप्रदर्शन केले.
३) आजचा रशिया १९९१ चा रशिया नाही हे व्लादिमिर पुतीन यांनी दाखवून दिले.
४) पश्चिमी राष्ट्रांच्या एककल्ली कारभारावर एक अंकुश तयार झाला.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?