' कोण म्हणतो बलात्कार “लैंगिककते”मुळे होतो? : पोस्टमार्टेम बलात्काऱ्यांचे – InMarathi

कोण म्हणतो बलात्कार “लैंगिककते”मुळे होतो? : पोस्टमार्टेम बलात्काऱ्यांचे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

बलात्कार करून खून झाल्याची बातमी येते, यथावकाश ‘बॉडी’चं ‘पोस्टमार्टम’ होतं. तर कधीकधी बलात्कार झाल्यावर पिडीतेला जिवंत सोडलं जातं तेव्हा तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यासाठीच ‘टू फिंगर’ टेस्ट केली जाते. कोर्टात होणारी प्रश्नांची सरबत्ती म्हणजे जणू तिचं जिवंतपणी या व्यवस्थेने केलेलं ‘पोस्टमार्टम’च असतं.

रिपोर्ट बनतात, बदलले जातात मग वर्षानुवर्षे केस चालते. चुकून-माकून निर्भया-कोपर्डी-उन्नाव-कथुवासारखी प्रसिद्धी मिळते आणि मग झोपेलेले लोक मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यासाठी जागे होतात. बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी जोर धरू लागते, तशातच एखादा गुन्हेगार अल्पवयीन असल्याचं समोर येतं, मग बालगुन्हेगार ठरवण्याचे निकष बदलायची मागणी होते. सरकारला लोकलज्जेखातर खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागतो. क्वचित प्रसंगी आरोप सिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होते.

नंतर कधी जामिनावर सुटलेले आरोपी तुरुंगाबाहेर पडताच आणखीन एक बलात्कार करतात. आणि उठलेला धुरळा खाली बसला कि लोक पुन्हा झोपून जातात. मग प्रश्न पडतो एक पोस्टमार्टम या मुर्दाड व्यवस्थेचं आणि या व्यवस्थेतेने जन्माला घातलेल्या बलात्काऱ्यांचं का नको?

अंगप्रदर्शनाने बलात्कारी उद्युक्त होतो असा निष्कर्ष काढण्याआधी पाळण्यातल्या चिमुरडीपासून ते जख्ख म्हातारीपर्यंत कोणावरही बलात्कार करू पाहणाऱ्या लोकांची मानसिक विकृती नीट समजून घ्यायला हवी. म्हणून सुरुवातीलाच अत्यंत जबाबदारीने आणि परखडपणे हे सांगणे गरजेचे आहे कि

“लैंगिकतेचे विकृत किंवा गुन्हेगारी किंवा हिंसक रुपात झालेले प्रकटीकरण म्हणून बलात्कार होत नसतात तर विकृती किंवा गुन्हेगारीवृत्ती किंवा हिंसकवृत्तीचे लैंगिकरुपात झालेले प्रकटीकरण म्हणून बलात्कार होतात”.

 

 

rape-marathipizza01
thequint.com

लैंगिकता स्त्री-पुरुष या दोहोंजवळ असते, मात्र ज्यांच्या ठायी मनोविकृती/गुन्हेगारीवृत्ती/हिंसकवृत्ती आधीपासूनच वसत असते, केवळ अशाच व्यक्ती बलात्कार करायला धजावतात. फारच कमी लोकांना माहिती असेल पण स्त्रियांनी-पुरुषांवर किंवा स्त्रियांनी-स्त्रियांवर व पुरुषांनी-पुरुषांवर (समलिंगी) केलेल्या बलात्काराचीसुद्धा अनेक उदाहरणे आहेत, प्रत्यक्ष गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण नगण्य असले तरी भारतासहित जगभरात या घटना घडल्या आहेत.

मनोवैद्यक चाचण्या, सर्व्हेज आणि समुपदेशन यामधून हे सत्य बाहेर येत आहे. क्वचित प्रसंगी प्राण्यांशीसुद्धा लैंगिक गैरवर्तन केल्याच्या घटना अगदी महाराष्ट्रातदेखील घडल्या आहेत.

ज्या विविध आकडेवारी आणि सर्वेक्षणे माहितीच्या महाजालात सहज उपलब्ध आहेत, त्या पाहिल्यावर लक्षात येते कि लैंगिक शोषणाचा किंवा बलात्काराचा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ५ ते ६% प्रकरणांची नोंद होते. भारतात दरवर्षी सुमारे ७२०० अल्पवयीन मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचारांची नोंद होते. बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी हे पिडीतेच्या परिचयातील किंवा नातलगांपैकीच असतात. जिच्यावर बलात्कार करताना ९बलात्काराला विरोध होणार नाही किंवा झाला तरी कारवाई होण्याची शक्यता नसेल अशी सामजिकदृष्ट्या दुर्बल स्त्रियाच बहुतेक प्रकरणात वासनेच्या शिकार झाल्याचं दिसून येतं.

परस्पर संमतीने शाररीक संबंध ठेवल्यानंतर पुढे काही कारणाने वितुष्ट निर्माण झाल्यावर बलात्काराचा हेत्वारोप करणाऱ्या घटनाही अनेक आहेत, पण म्हणून सामाजिक वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

बलात्कार हा फक्त लैंगिक भूक शमवण्यासाठी नसतो. RAINN नावाच्या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुलखती घेण्यात आल्या. त्यातून समोर आलेल्या संदर्भांनुसार बलात्कारामागे इतर सामजिक प्रेरणा असल्याचं सत्य उघड होतं. निर्भया, कोपर्डी आणि इतर अनेक प्रकरणात बलात्कारानंतर योनी मार्गात सळई, लाकडाचा दांडा, माती, दगड आणि तत्सम गोष्टी खुपसणे, मृतदेहाची विटंबना करणे यासारख्या गोष्टी बलात्काऱ्यांची भूक लैंगिकतेपलीकडे आहे हेच सिद्ध करतात.

पुरुषी वर्चस्ववादी गंड आणि स्त्रीच्या पिडेत सुख मानण्याची मनोवृत्ती हा आपल्या परंपरावादी पितृसत्ताक सामाजिक परिस्थितीचाच परिणाम आहे.

नुकत्याच कथुवामध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणानंतर आज समजात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सदर घटनेला धार्मिक-राजकीय रंग न देण्याचे आव्हान करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर फिरत आहेत. बॉलीवूडमधल्या कलाकारांनी सदर घटनेचा निषेध केल्यावर त्यांच्या अंगप्रदर्शनाकडे बोट दाखवून त्यांना अत्यंत अश्लाघ्यरित्या ट्रोल केलं जात आहे. पण त्याने वास्तव बदलणार नाही, कथुवामधील घटना केवळ बलात्कारापुरती सीमित नाही.

 

asifa-kathua-jammu-rape-victim-inmarathi
ndtv.com

जम्मू-काश्मीरमध्ये ऋतूमानानुसार स्थलांतर करणाऱ्या बखेरवाल ‘मुस्लिमां’ना दहशत बसवण्यासाठी स्थानिक ‘धर्मांध हिंदूं’नी केलेलं हे एक नृशंस कृत्य आहे. बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ ‘तिरंगा’ हाती घेऊन रस्त्यावर येऊन ‘भारत माता कि जय’ आणि ‘जय श्रीराम’ सारख्या घोषणा देणारे ‘हिंदू एकता मंच’चे लोक आणि भाजप व पीडीपीचे आमदार-मंत्री हे चित्र स्पष्ट करते कि या प्रकरणामागे धार्मिक-राजकीय कंगोरे आधीपासूनच आहेत.

परधर्मीय शत्रूच्या स्त्रियांचाही आदर करण्याच्या शिवाजी महाराजांच्या मोठेपणाला ‘सद्गुण विकृती’ संबोधणारे, मुस्लीम स्त्रियांना कबरीतून बाहेर काढून पुनःपुन्हा बलात्कार करू म्हणणारे आणि स्त्रियांना गुलामीत ठेवणाऱ्या ‘मनुस्मृती’चे समर्थन करणारे विचारच दुर्दैवाने आजच्या आधुनिक काळातील ‘हिंदुत्ववादी’ राजकारणाचे प्रेरणास्त्रोत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला इस्लाममध्ये कुटुंबनियोजन आणि गर्भपात हराम असल्याचं सांगितल्याने बहुतांश मुस्लीम या गोष्टींना विरोध करतात. त्यामुळे मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, पण मुस्लिमांचे शिक्षण व इतर मार्गांनी प्रबोधन करण्याऐवजी द्वेषातून मुस्लीम बहुसंख्य बनण्याचा बागुलबुवा उभा केला जातो आहे. याचाच दृष्य परिणाम कथुवाची हि घटना आहे.

या सगळ्या सामाजिक प्रश्नांचा गुंता सोडवत असतानाच योग्य वयात लैंगिक शिक्षण हाच यावरील एकमात्र उपाय आहे.

समाजात विकृती निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करण्याऐवजी आजवर आम्ही या ना त्या मार्गाने लैंगिकता दडपण्याचा प्रयत्न करीत आहोत. जोवर द्वेष आणि लांगुलचालन-लोकानुनय या टोकाच्या भूमिका आपण सोडून देणार नाही तोवर निर्भया आणि असिफा आणखीन होत राहणार हे नक्की. पक्ष-संघटना-धर्म-जात-पंथ-लिंग याच्या पलीकडे जाऊन जोवर बलात्काऱ्यांचं असं पोस्टमार्टम करणार नाही तोवर आपण माणूस म्हणवून घेण्यास लायक नसू.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?