' राहुल गांधी हिंदूच…पण… – InMarathi

राहुल गांधी हिंदूच…पण…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सीझरच्या पत्नीचं चारित्र्य संशयातीत असलंच पाहिजे, किंवा राजाने रामच असलं पाहिजे अश्या स्वरूपांच्या गृहीतकांवर समाज चालत असतो. जगभरात कोणत्याही धर्मात श्रद्धाळू आणि पापभिरू समाज सर्वाधिक आहे. त्यामुळे कायमच ह्या समाजाला आपल्या काही मान्यता बरकरार ठेवायच्या असतात. त्यापायी आपल्या श्रद्धांचं पालन सर्वत्र होतंय की नाही ह्याही बाबतीत ह्या पापभिरू वर्गाला उत्सुकता असते.

 

Brife History Pandit Nehru InMarathi 12
commons.wikimedia.org

भारतामध्ये लोकशाही मार्गाने राजघराण्याचा अदृश्य मुकुट लाभलेल्या गांधी घराण्याबद्दल अनेकांना हाच विश्वास किंवा अविश्वास असतो. त्यापायीच गांधी घराण्याबद्दल वेगवेगळ्या मजेशीर थिअऱ्या येत असतात. आता राहूल गांधींच्या वागण्याने अनेकदा त्या चर्चेत येत असतात. राहूल गांधी वेडसर आहेत असं अजिबात नाही. आज त्यांच्या ज्या चुका सहज दृग्गोचर होतात, त्या चुका पूर्वीही अनेक नेत्यांनी केल्या आहेत. पण त्यांच्यावेळेला समाजमाध्यमं एवढी प्रभावी नव्हती म्हणून त्या समोर आल्या नाहीत. एरवी आपल्या देशात “पाण्यातून वीज काढली की पाण्याचा कस कमी होतो आणि त्यामुळे शेतीला ते पाणी निरुपयोगी ठरतं” असली अक्कल पाजळणारे उपपंतप्रधानपदी पोहोचलेत.

“गांधी घराण्याच्या धार्मिक मान्यता” हा अनेक भाजपाप्रणित काँग्रेस विरोधकांचा एक आवडता मुद्दा असतो. एखाद्या उसाच्या मळीतून जात असताना दुर्गंध यावा तसा तो प्रत्येक महत्वाच्या निवडणुकीत येत असतो. त्याची सुरवात झाली इंदिरा गांधींपासून.

इंदिरा गांधी फिरोझ गांधी त्यांच्या प्रेमात पडल्या इथपासून ह्या कल्पनाविलासाला सुरवात होते. माहोल कोणताही असो. एखादा कॉलेजचा सांस्कृतिक महोत्सव असो, की कोणत्याही विषयावरचं आंदोलन, साधा परीक्षेचा अभ्यास असो की अजून कसलं आयोजन. निसर्ग आपलं काम करत असतो. तरुण मुलं मुली एकत्र आली की विचारांची देवाणघेवाण, आचारांचं निरीक्षण यातून प्रेम ही भावना उमलली तर त्यात अजिबात काही गैर नाही. मग मुलगी ब्राह्मण असली आणि मुलगा पारशी असला तरीही निसर्ग थांबत नसतो.

 

Indira gandhi.Inmarathi1
newindianexpress.com

फिरोज गांधींच्या धर्मापासून याला सुरवात होते. GHANDY हे त्यांचा आडनाव त्यांनी GANDHI असं बदललं. त्यामागे त्याला सर्वसमावेशकता आणि सर्वमान्यता यावी हा मुद्दा असेलच. पण फिरोझ गांधींनी आपला धर्म बदलला नाही आणि लपवलाही नाही. एरवी पारशी लोक किती कट्टर असतात ते त्यांच्याशी संबंध आलेल्यांनाच ठाऊक असतं. अत्यंत देखण्या आणि कमालीच्या हुशार पारशी मुली धर्माबाहेर जाऊन लग्न करू शकत नाहीत आणि मुलांचीही तीच कथा. उशिरा होणारी लग्न आणि आंतरधर्मीय विवाहांना अजिबातच मान्यता नसणे ह्या गोष्टी पारशी समाजाच्या मुळावर आल्या आहेत. नरेंद्र मोदी सरकारला ‘जियो पारशी’ योजना राबवावी लागत आहे, यातच सगळं आलं.

त्या पार्श्वभूमीवर फिरोज गांधी यांचं धाडस वाखाणायला हवं. त्यांचं मूळ आडनाव ‘खान’ होतं वगैरे आरोप गेली अनेक दशके होतायत. पण त्याबद्दल कोणताही पुरावा बाहेर आलेला नाही. अगदी संभाजी महाराजांची हत्या ब्राह्मणांनी केली ह्या मूर्ख मताच्या पुष्टीसाठी फालतू पुरावे जेवढे आले तेवढे ही पुरावे फिरोज गांधी हे फिरोज ‘खान’ होते ह्यासाठी आले नाहीत.

पुढे राजीव गांधींनी सोनिया गांधींशी लग्न केलं आणि त्यांची पुढची पिढी या देशात नांदत्ये.

विभिन्न धर्माच्या जोडप्यांच्या मुलांचा धर्म कोणता? हा मुद्दा आला तर लेकरांना धर्म बापाचा मिळतो. परंतू जर आईचा धर्म मुलांना लावायचा असेल तर तशी मुभा कायद्यात असते. कायदेशीर तरतुदींचा आणि घडामोडींचा अभ्यास केला तर असे प्रसंग दिसून येतील. शिवाय जर ही मुले दोन्ही धर्मांचे संस्कार होत वाढली (उदा: शाहरुख खानची मुले) तर वयाच्या १८ व्या वर्षी या मुलांना आपला धर्म निवडायची मुभा असते. भारतात कागदोपत्री तरी धर्म निवडावा लागतो.

राजीव गांधींनी आईचा धर्म (अन त्यानुषंगाने जात) घेतला. (जरी लौकिकार्थाने ते पारशी ठरतात तरीही).

 

rahul-gandhi-marathipizza01
opindia.com

पुढे राजीव गांधींनी सोनिया गांधी या इटालियन कॅथलिक तरुणीशी लग्न केलं. उभ्या आयुष्यात कधीही सोनिया गांधी कोणाला चर्चमध्ये जाताना दिसल्या नाहीत. सोनिया गांधींचे लग्नानंतर माहेरच्या लोकांबरोबर कोणाला फोटोही दिसले नाहीत. राहुल गांधींनी राजीव गांधींप्रमाणे आईचा धर्म न घेता वडिलांचा धर्म घेतला.

नुकतीच राहुल गांधींनी सोमनाथ मंदिराला भेट दिली आणि त्यातून मोठा वाद निर्माण झाला. कारण अहिंदू अभ्यागतांची नोंद ठेवायची पद्धत तिकडे आहे, आणि त्या रजिस्टरमध्ये अहमद पटेल यांच्या बरोबरीने ‘राहुल गांधी जी’ हा उल्लेख सापडला.

अर्थातच ही चूक राहुल गांधींनी केलेली नव्हती. त्यांच्याबरोबर असलेल्या कोणातरी तद्दन मूर्ख आणि बावळट हुजऱ्याने हा शुंभपणा केला हे जगजाहीर आहे. पण गडबड पुढे झाली.

अत्यंत ग्रेसफुली ह्यावरच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी काँग्रेसने राहुल गांधी केवळ हिंदू नाहीत तर ‘जानवंधारी हिंदू’ आहेत असा हास्यास्पद बचाव केला.

 

rahul gandhi hindi or catholic inmarathi

 

एवढ्या मोठमोठ्या मंदिरांना भेटी देऊन राहुल गांधी हिंदूंची मतं मिळवायचा हास्यास्पद प्रयत्न करतायत. अश्या मंदिरांना भेटी देऊन हिंदूंच्या मतांची बेगमी होत असती तर जनसंघ आणि भाजप यांनी काँग्रेसमुक्त भारतच नव्हे तर भाजपयुक्त्त भारत केला असता. हिंदुत्ववाद आणि हिंदू हितवाद (ज्याला सॉफ्ट हिंदुत्व हे अत्यंत भंपक आणि पुरोगाम्यांनी रूढ केलेलं चुकीचं नाव आहे) यातला फरक हिंदूंना सबकॉन्शस माईंडमध्ये समजतो. सबकॉन्शस माईंड म्हटलं कारण तो ते आवर्जून समजून घेतात असं नाही.

सोमनाथाच्या देवळात जाऊन वैष्णव आनंदी होत नाहीत. किंवा अयोध्येत राममंदिर बनलं तर शैव समाज आनंदी होणार नाही. आणि समग्र हिंदू समाजाचा लसावि बघितला तर हिंदू समाज मंदिर मशिदीच्या वादावर निवडणुकीत मत देत नाही. पण “मोदींच्या मागे की नई, फक्त ३१ टक्के जनता आहे बरं का” असं चेकाळून चेकाळून सांगणारे हेच पुरोगामी भाजपच्या दिग्विजयाला हिंदुत्वाचा ज्वर समजतात.

 

modi-marathipizza
pbs.twimg.com

भारतातल्या बहुसंख्य हिंदूंच्या अपेक्षा साध्या आणि सरळ आहेत.

मुसलमानांचे लाड कमी व्हावेत (संदर्भ शाहबानो खटला आणि आत्ताचा ट्रिपल तलाकवरचा सायराबानो खटला आणि अनेक प्रकरणे) आणि त्यांची संख्या मर्यादित राहावी. यापलिकडे बिजली सडक पानी आणि रोजगार ह्याच सामान्य अपेक्षा हिंदू समाज ठेवतो. प्रत्येक निवडणुकीआधी इमामना जाऊन भेटणारे नेते (यात अगदी वाजपेयीही आले) पाहिले, तरी जो हिंदू विरुद्ध मतदान करत नाही, तो हिंदू देवळात आला म्हणून त्या नेत्याच्या पक्षाला मतदान करणार आहे काय?

सेक्युलॅरिझमचा आव आणलेला अनेकांना आवडत नाही. २६ /११ नंतर काहीच महिन्यांनी लष्कर ए तोयबा पेक्षा आपल्याला देशातला हिंदू दहशतवाद जास्त गंभीर वाटतो ही भूमिका पुरोगामी काँग्रेसने घेतली. ए के अँटनी सारख्या संतवृत्तीच्या निरलस नेत्याने २०१४ च्या पराभवाच्या अहवालात ह्याच गोष्टीवर बोट ठेवलं होतं. त्यामुळे मुस्लिमांचं लांगुलचालन थांबवणं म्हणजे देवळात वाऱ्या करणं असं नसून हिंदूंना तसा विश्वास देणं हाच मार्ग आहे.

इम्रान मसूद ह्या माणसाने ‘नरेंद्र मोदींचे तुकडे तुकडे करून टाकेन’ असं म्हटल्यावरही हा मनुष्य काँग्रेसच्या तिकिटावर लढू शकतो – ह्यावर काँग्रेसला विचार करावा लागेल. हेच जर एखादा भाजपाला सोनिया किंवा राहुलबद्दल बोलला असता तर पुरोगामी समाजाच्या भावनांना किती ठेच लागली असती ह्याचा विचार काँग्रेसने करावा इतकीच भाजप समर्थक हिंदूंची इच्छा आहे. त्यालाच ते आपलं हित समजतात.

राहता राहिला प्रश्न गांधी घराण्याच्या धार्मिक मान्यतांचा. तर यावर आमच्या एका अत्यंत जवळच्या स्नेह्याचा काळीज पिळवटून टाकणारा किस्सा आहे.

एका संध्याकाळी हे अधिकारी माझ्या वडिलांना भेटले आणि म्हणाले ‘मुलीचं लग्न आहे, माझे वडील म्हणून आशिर्वादाला तरी या’ आम्ही चरकलो. आमचा स्नेह उत्तमच होता हे मान्य पण त्यांची एवढी अपेक्षा असेल असं वाटलं नाही. ते पुढे म्हणाले ‘मुलीने दुसऱ्या समाजतल्या मुलाशी जमवलंय. त्यामुळे माझ्या आई वडिलांनी माझ्याशी संबंध तोडलेत, ते लग्नाला येणार नाहीत’. आजही भारतीय समाजाचा लसावि हाच आहे.

ह्याच पार्श्वभूमीवर एक ब्राह्मण मुलगी पारशी माणसाशी लग्न करते, तिचा मुलगा एका विदेशी कॅथलिक तरुणीला आपली सहचारिणी मानतो आणि त्यांची संतान गळ्यात जानवं घालू शकते…! आणि वर त्या जानव्याचा दाखला ही दिला जातो…!

राजीव गांधींना पारशी असण्यापेक्षा हिंदू असणे फायद्याचे होते. म्हणून त्यांनी मातृसत्ताक पद्धत वापरत हिंदू धर्म घेतला. राहुलनी पितृसत्ताक पद्धत वापरत हिंदू धर्म घेतला. गांधी कुटुंबाच्या बाबतीत हे घडून आलं – सामान्य भारतीय समाजात हे इतक्या सहज घडूच शकत नाही. तरीही हे सर्वांच्या बाबतीत घडावं अशी माणसापासून इच्छा आहे. नाहीतर अर्णब गोस्वामी ओरडून ओरडून सांगतो तो व्हीव्हीआयपी रेसिझम हाच.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 32 posts and counting.See all posts by sourabh

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?