' कुत्र्याला गच्चीवरून फेकणारे मेडिकलचे कॉलेजचे विकृत विद्यार्थी आठवताहेत? वाचा त्यांना काय शिक्षा झाली… – InMarathi

कुत्र्याला गच्चीवरून फेकणारे मेडिकलचे कॉलेजचे विकृत विद्यार्थी आठवताहेत? वाचा त्यांना काय शिक्षा झाली…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

गीतेच्या १६/२ मध्ये ‘दया भूतेषु’ असे नमूद करण्यात आले आहे. दया भूतेषु म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर दया. दुसऱ्याला दु:खी पाहून ते दु:ख दूर करण्याची, होणारी स्वार्थरहित क्रिया म्हणजे दया. दुसर्‍याला दु:ख न देणे ही अहिंसा व सुख पोचविणे ही दया आहे. अहिंसा व दयेमध्ये एवढे अंतर आहे. स्मृती आणि गुह्यसूत्रात पाच कर्मे नमूद होतात. ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, नृय . या गोष्टी विश्वातील अनेक धर्मग्रंथात आढळतात. यातील भूतयज्ञ म्हणजे ईश्वर सर्व जीवसृष्टीत व्यापून उरला आहे याचे भान ठेवून आपल्या अन्नातील काही भाग प्राणिमात्रांसाठी काढून ठेवणे.

माणूस आपले सुख आणि स्वार्थपूर्तीकरिता दुसर्‍याबद्दल दया दाखवितो. लोकांचे दु:ख दूर करणारे लोक सर्वसाधारण लोक असतात. कारण त्यांना आपल्यावरील दुःखाच्या अनुभवाने दुसर्‍याचे दु:ख कळत असते. सर्व सुखी व्हावेत ही भावना असते.

पण काही विकृती अशा प्रकारे समोर येतात आणि माणुसकी या शब्दावरच्या विश्वासाला तडे जातात. आणि बहिणाबाईंचे शब्द आठवतात..

“अरे मानसा मानसा कधी होशीले मानुस”

 

chennai dog torture case-inmarathi
indianexpress.com

ही घटना चेन्नईत घडलेली. साधारण दीड-दोन वर्षांपूर्वीची. दोन मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा तीन मजली इमारतीच्या गच्चीवरून कुत्र्याला खाली फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका तीन मजली इमारतीच्या गच्चीवर एक तरूण एका कुत्रीची मानगूट पकडतो आणि त्याचा साथीदार त्याचे चित्रीकरण करतो. काही क्षणांतच  त्या कुत्रीला थेट गच्चीवरून फेकले जाते. कुत्री व्हिवळते आणि या दोघांना मात्र तिच्या विव्हळण्यातून विकृत आनंद मिळतो. या आनंदात इतरांना सहभागी करावे, या हेतूने या घटनेचे केलेले थेट चित्रीकरण या दोघांनी समाजमाध्यमांवरही टाकले. मानवी विकृती आणि त्याच्या क्रौर्याचा प्रत्यय देणारी घटना. अंगावर काटा आणणारी. ही चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर या दोघांना अटक झाली आणि विशेष जामीनाची अट नसल्याने किरकोळ जामिनावर त्यांची सुटका ही झाली.

 

chennai dog torture case-inmarathi01
dailymail.co.uk

दोन आरोपी, ज्याने कुत्र्याला फेकून दिलं तो गौतम सुदर्शन आणि ज्याने या प्रसंगाचा व्हिडिओ काढला तो आशिष पाल हे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काही दिवसांतच पकडण्यात आले. केवळ मीडियानेच नव्हे तर तिथल्या लोकांनी सुद्धा आरोपींना पकडून देण्यात मदत केली.
प्राणीप्रेमींनी पोलिसात धाव घेतल्यानंतर ते भाड्यावर राहत असलेल्या खोलीच्या दिशेने कूच केलं. मात्र आपल्याला अटक होऊ शकते याची कुणकुण लागल्यामुळे दोघंही जण फरार झाले.

दुर्दैवाने त्या दोघांना पकडल्यावर लगेचच त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली कारण The Prevention of Cruelty to Animals Act 1960 (प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०) यात गेल्या 5 दशकात काही बदल अथवा सुधारणाच केल्या गेल्या नव्हत्या आणि त्यामुळे आरोपींना फक्त १० रुपये आणि ५० रुपये इतका दंड ठोठावण्याची तरतूद होती.

 

chennai dog torture case-inmarathi02
thenewsminute.com

आरोपींची इतक्या सहजासहजी सुटका झाल्याने प्राणिहक्क संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप असंतोष होता. त्यामुळे त्यांनी हा कायदा सुधारण्याची मागणी केली होती. या प्रकरणी मद्रास हायकोर्टाच्या आदेशाने एमजीआर मेडिकल विद्यापीठाची समिती स्थापन केली. या समितीने प्रत्येक विद्यार्थ्याला दोन लाखांचा दंड सुनावला आणि हा दंड अॅनिमल वेलफेअर बोर्डाकडे भरण्यास सांगितले. ह्या दंडामुळे प्राणिहक्क संरक्षण आंदोलनकर्त्यांचे नक्कीच समाधान झाले असेल.

पण हे इतक्यावरच थांबतं का ? हा एक प्रातिनिधिक प्रसंग झाला.. आपण विसरत चाललेल्या माणुसकीचा… लोप पावत चाललेल्या भूतदयेचा.. या भावना मनात येणं… यातून विकृत आनंद मिळवणं ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” असं सांगणारी आहे. ती जपायला हवी.. कारण तीच सर्वांना पुरून उरणार आहे.

आंदोलनं.. दंड.. ही तात्पुरती मलमपट्टी झाली. ही मानसिकता मुळापासून उखडून टाकायला हवी. आणि त्यासाठी अशा मानसिकतेमागची कारणं शोधायची खरी गरज आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?