काश्मीर नंतर पाकिस्तानला हवी आहे ‘डान्सिंग गर्ल’ !

अभिनेता हृतिक रोशन चा नुकताच येऊन गेलेला ‘ मोहंजोदारो ‘ हा चित्रपट पाहिला का कोणी ? मला वाटतंय रुस्तमच्या हवेत हा चित्रपट पार कोसळला. तरी पण मोहंजोदारो आणि हडप्पा ही शहर कशी असतील आणि त्यांची संस्कृती, समाजव्यवस्था, कला कशी असेल याचे उत्तम वर्णन  चित्रपटात  दाखवले आहे.  सिंधू संस्कृतीच्या उत्खननात १९२६ साली मोहंजोदारो येथे एक बाहुली / नर्तिका, दाढी धारी पुरुष, बैलगाडी या वस्तू सापडल्या आणि आज याच  वस्तू मोहोंजोदारो सारख्या प्राचीन संस्कृतीच्या प्रतीक होऊन जगविख्यात झाल्या आहेत. बरं तर या वस्तूंपैकी ज्या बाहुलीचा वा नर्तिकेचा आता उल्लेख केला ती बाहुली मोहोंजोदारो चित्रपटाच्या शेवटी जो पुराचा प्रसंग दाखवला आहे त्या पुरात हीच बाहुली किंवा नर्तिकेची मूर्ती  सिंधू नदीच्या पाण्यात पडून नष्ट होताना दाखवली आहे.

pakistan-claims-dancinggirl-marathipizza01

स्रोत

ही डान्सिंग गर्ल  १० सेंटीमीटर किंवा ४ इंच उंचीची आणि ब्रॉन्झ धातूची असून तब्बल ४५०० हजार वर्षांपूर्वीची आहे. शिवाय हि मूर्ती नग्नावस्थेत असून तिच्या डाव्या हातात २४-२५ आणि उजव्या हातात ४ बांगड्या आहेत. कमरेत किंचित वाकलेली ही मूर्ती जेव्हा सापडली तेव्हा तिला काय नाव द्यावं हे शास्त्रज्ञाना कळेनासं झालं, परंतु कमरेत किंचित वाकलेली असल्यामुळेच तिला डान्सिंग गर्ल हे नाव दिल गेलं आणि ते अजरामर ही झालं.१९२६ साली ही डान्सिंग गर्ल अर्नेस्ट मक केय या ब्रिटिश पुरातन वास्तू शास्त्रज्ञाला मोहंजोदारोच्या उत्खननात सापडली. अर्नेस्ट मक केय हे सिंधू संस्कृतीच्या उत्खननाचे जनक आणि अभ्यासक मानले जातात तर दुसरीकडे आर्किऑलीजिकल सर्वे ऑफ इंडियाचे जेष्ठ इतिहासकार आणि सर्व्हेअर आर डी बॅनर्जी यांना सुद्धा मोहंजोदारो शोधण्याचं श्रेय जातं.

मोहोंजोदारो संस्कृतीच्या शोधाची गोष्ट सुद्धा तशीच मनोरंजक आहे. १९२० साली येथे सर्व्हेअर आर डी बॅनर्जी यांनी सर्वात प्रथम इसवी सन १५० व्या शतकातील पुरातन बौद्ध स्तूप शोधून काढला होता, तेव्हा इथे संपूर्ण जगातील पुरातन शास्त्रज्ञाचं लक्ष वेधलं गेलं. त्याच सुमारास इथे सिंध पंजाब रेल्वे लाईनच्या विस्तृतीकरणाचं कार्य सुरु असताना खोदकाम करणाऱ्या मजुरांना जमिनीखाली घराचे चौथरे आणि विटा सापडू लागल्या. त्यांनी ही गोष्ट इंजिनिअरच्या कानावर घातली. तेव्हा कुठे या प्राचीन संस्कृतीचा संपूर्ण शोध घेण्यात आला आणि सुमारे ४५०० हजार वर्षांपूर्वी असलेली अत्यंत उत्तम अशी नागरी व्यवस्थेने नटलेली सिंधू सभ्यता संपूर्ण जगासमोर आली.

=====

=====


pakistan-claims-dancinggirl-marathipizza02

स्रोत

मोहंजोदारो आणि हडप्पा संस्कृतीमध्ये नगरसेवक नक्कीच नसतील कारण सर्व रस्ते काटकोनात वळलेले, रस्त्यात ठिकठिकाणी पावसाचं पाणी वाहून जाण्याकरिता असलेली बंदिस्त गटारे, उत्तम अशी सार्वजनिक स्नानगृहे, नदीवरील भल्यामोठ्या गोद्या आणि  कुठेही अनधिकृत वाटेल असं बांधकाम नसलेले रस्ते..!

असो ! आत्ता मूळ विषयाकडे पुन्हा येऊ. या मूर्तीसारखीच अगदी दुसरी मूर्ती सुद्धा सापडली होती. या सभ्यतेत उत्खननात ज्या ज्या वस्तू सापडल्या त्या सर्व वस्तू  भारताची फाळणीच्या व्हायच्या  आधीपासूनच दिल्लीत होत्या. पुढे फाळणी नंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात झालेल्या उत्खनन करारानुसार प्रस्तुत चित्रातील डान्सिंग गर्लची ब्रॉन्झ पासून बनवलेली मूर्ती भारतात कायम ठेवण्याचे पाकिस्तानने मान्य केले होते. त्याप्रमाणे ही मूर्ती सध्या राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे आहे आणि जी दुसरी मूर्ती सापडली ती कराचीच्या वास्तू संग्रहालयात ठेवण्यात आली. परंतु काही दिवसांपूर्वी जावेद अहमद जाफरी या पाकिस्तानी गृहस्थाने लाहोर हायकोर्टात या मूर्तीला परत आणण्याकरिता रिट याचिका दाखल केली होती आणि पाकिस्तान सरकारवर दबाव आणला होता. तेव्हापासून पाकिस्तानात ही डान्सिंग गर्ल परत आणण्याकरिता सरकारी पातळीवर उलाढाल चालू आहे. तर दुसरीकडे अनेक ज्येष्ठ भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की

फाळणीच्या वेळेस पाकिस्तानने डोकेदुखी नको म्हणून अनेक  पुरातन गोष्टी अगदी आनंदाने भारताला दिल्या. आणि आत्ता त्यांना मुद्दाम त्या वस्तूंची आठवण येत आहे.

=====

=====

भारतावरचा राग काढायचं हे नवं माध्यम पाकिस्तानला मिळालं आहे. तरी सुद्धा पाकिस्तानचा एक विशेष गुण भारतीयांना घेण्यासारखा आहे. आपल्याकडे पुण्यातील वाडे, दिल्ली, जयपूर, कलकत्ता आणि लखनौ मधील हवेल्या, कोल्हापूर भागातील जुन्या धाटणीची दगडी बांधकामे सर्रास पाडून आज त्यांच्यावर मोठाल्या सिमेंट आणि काचेचे डब्बे वाटावेत अशा इमारती बांधल्या जात आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानने लाहोर, कराची, पेशावर, सिंध -हैद्राबाद सारख्या  महानगरातील अनेक वाडे जुने महाल यांना वाचविण्याकरिता अतिशय चांगली पावले उचलली आहेत. अनेक स्थळांचे पुनर्बांधकाम करून, त्यांना रंगरंगोटी देऊन आणि भोवतालची अनधिकृत बांधकामे हटवून प्राचीन वास्तू वाचवण्याचा पाकिस्तान सरकारचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. वर्ल्ड ट्रेंड सेंटर चा हल्ल्यानंतर पाकिस्तानला अमेरिकन आणि युरोपिअन पर्यटकांनी कायमचा राम राम ठोकला त्यानंतर जे काही थोडे बहुत जपानी पर्यटक येत होते ते सुद्धा बंद झाले. पाकिस्तानचा परम मित्र असलेला चीन सुद्धा पाकिस्तानात आपली लोक फक्त कामासाठी पाठवतो. त्यामुळे पाकिस्तान सरकारच्या इतिहास आणि पुरातत्व खात्याला एक मूर्ती असतानाही दुसऱ्या मूर्तीचा हट्ट धरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागताना पाहून असा प्रश्न पडतोय की, त्या मूर्तीला पाकिस्तानात नेवून नेमकं करणार तरी काय आणि तिला दाखवणार तरी कोणाला ?

बहुधा ही डान्सिंग गर्ल शोभेची बाहुली म्हणून ठेवायचा त्यांचा विचार असावा !

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Ajit Tambe

नमस्कार मी अजित तांबे बदलापूरचा . मी विमान क्षेत्रात काम करतो पण फावल्या वेळात नव्या नव्या विषयांवरील नवं नवं काही लिहून वाचकांचं मनोरंजन कारण हा माझा आवडता छंद आहे .

ajit-tambe has 3 posts and counting.See all posts by ajit-tambe

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: