' राष्ट्रगीत: सक्ती आणून शक्ती घालवू नये – InMarathi

राष्ट्रगीत: सक्ती आणून शक्ती घालवू नये

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लहान मुलाला ‘शी’ करावीशी वाटली तर त्यानं ती चड्डीत न करता संडासात जाऊन करायला हवी हे त्या मुलाला शिकवावं लागतं. ते मूल हळूहळू शिकतंही. पण पालकांना हवं तेव्हा, त्यांच्या सोयीनं, मुलाला शी होत नाही म्हणून त्या मुलाला ठरावीक वेळी संडासात बसवून, त्याच्या कुल्यावर रट्टे हाणत “कसा करत नाहीस शी तेच बघते/बघतो मी आता!!” असं करून चालेल का? रट्ट्यांमुळे घाबरून चुकून त्या मुलानं थोडी शी केलीच समजा तरी त्याचं पोट साफ होईल याची काय खात्री?

कर्तव्याची भावना मुळातच इतकी वाईट आहे की तिचा पुरस्कार आपण जितक्या जास्त स्तरावर करतो तितकं आपण स्वतःचं आणि इतरांचंही नुकसान करत असतो. कर्तव्याच्या भावनेमुळे (असलेली/असू शकणारी) इच्छाशक्ती मरते.

उदा. स्वयंपाक करणं हा एखाद्याचा छंद असू शकतो. म्हणून संधी मिळताच तो किंवा ती लगेच स्वयंपाकाला लागतो/ते. स्वेच्छेने प्रेरित होऊन केलेलं कुठलंही काम हे कर्तव्याच्या भावनेपोटी केलेल्या कामापेक्षा जास्त चांगला परिणाम दर्शवतं. जर एखाद्याला स्वयंपाक करायला आवडत नसेल, पण घरची मंडळी, लहान मुलं, म्हातारी माणसं भुकेली असतील तर ‘मलाच हे करायला हवं’ आणि ‘मला हे करायलाच हवं’ या भावनेतून त्याला स्वयंपाक करावाच लागेल. अशा भावनेतून केलेला स्वयंपाक कसा असेल काही सांगता येत नाही. स्वयंपाक करण्याची सवय झालेल्यांना तो एखादवेळेस मन मारून करावा लागला तरी त्यांच्यासाठी ती एक यांत्रिक प्रक्रिया झालेली असते. म्हणून दर्जा टिकूनही राहू शकतो. पण स्वयंपाकात मन रमत नसताना एखादी नवीन पाककृती करावी लागली तर ती बिघडण्याचाच संभव जास्त.

सवय नसलेलं काम करण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करताना जेवढ्या प्रमाणात ते काम करण्याची इच्छा मनात असेल तेवढ्या प्रमाणात त्या कामाचा दर्जा टिकून राहील. प्रेरणेसाठी इच्छेऐवजी जेव्हा कर्तव्यभावनेचा वापर आपण करतो, तेव्हा त्याला ‘मन मारणं’ असं म्हणायची पद्धत आहे. जिथे कर्तव्यभावना उद्भवते, तिथे इच्छाशक्तीला धोका संभवतो. यामुळेच आवडत्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्वतःची फारशी समजूत घालावी लागत नाही. पुस्तक उघडलं आणि नजर फिरवली की बहुतांश वेळा आपण अभ्यास चालू ठेवतो. तोच जर एखाद्या रटाळ विषयाचा अभ्यास करायचा असेल तर मात्र स्वतःला सारखं बजावतो आपण. स्वतःच्या, एक नावाजलेला विद्यार्थी म्हणून असलेल्या, जास्त मार्क मिळवण्याच्या कर्तव्याची(!) स्वतःला जाणीव करून देत राहतो. का? कारण आपली इच्छा मेलीये याची जाणीव आपल्याला असते. अशा वेळी आपण ‘मन मारून’ अभ्यास करतो.

supremecourt-national-anthem-decision-marathipizza02

राष्ट्रीगीताच्या वेळी ते सुरू होताना उभं राहणा-या लोकांचं नीट निरीक्षण केलं तर ‘सक्ती’ केल्यामुळे काय होतं हे अगदी सहज दिसून येतं. देशप्रेमाची भावना किंचितशी का होईना, पण मनात जागृत असणारी सर्व वयोगटातली माणसं ताडकन् उभी राहतात. बाकीची माणसं तरूण असोत वा नसोत, अगदी नाईलाजास्तव उठून, मनातल्या मनात :

“ए यार आत्ता राष्ट्रगीत गायची/लावायची काय गरज होती? फुकट उभं राहावं लागतं. शाळेत आहोत का आता. मस्त बसलो होतो. पण सगळे उभे असताना आपण बसणं बरोबर नाही, राष्ट्रगीताचा अपमान करणं हा कायद्यानं गुन्हा आहे, आपलं देशप्रेम दाखवण्यासाठी उभं राहिलं पाहिजे, ते आपलं “कर्तव्य” आहे, त्यातून मिळतं काय? साध्य काय होतं? कोणास ठाऊक! असो आपल्याला काय! परंपरा आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण किती वेळ चालू आहे यार राष्ट्रगीत, माझा मोबाईल वायब्रेट होतोय. माझ्या नाकावर खाज येतेय. खाजवू का? बरं दिसेल का ते? हुश्श… संपत आलं, जय हे… जय हे… जय जय जय…. अगं इतकं ताणू नकोस आटप लवकर मला घरी जायचंय/खाली बसायचंय… संपलं एकदाचं.

भारऽऽऽऽऽऽऽऽतमाता की… (मोठ्यानं) जय!” (कारण मोठ्यानं जय म्हणताना मज्जा येते.)

– राष्ट्रगीताचा मान ठेवण्याची प्रसंगी इच्छा नसताना कायदेशीर/सामाजिक/मानसिक सक्तीपोटी तो दरवेळी ठेवणारी एखादी व्यक्ती, नागरिक स्वेच्छेनं, मनापासून हा मान किती ठेवत असेल, आणि देखावा किती करत असेल, हा प्रश्न न विचारलेलाच बरा. कारण उत्तरं देणारा प्रत्येक जण ‘मी तरी नेहमीच मनापासून ठेवतो बुवा. बाकीच्यांचं माहीत नाही’ असंच म्हणेल. मला विचाराल तर स्वतःवर कर्तव्यभावनेपोटी/सामाजिक दबावापोटी अशी सक्ती करण्याचा एकदा जरी प्रसंग आला, तरी त्यानंतर पुढच्या वेळी स्वेच्छेने उभं राहतानाचा आवेश पूर्वीपेक्षा अंमळ कमी झालेला जाणवलाय मला. याबाबतीत ‘बाकीच्यांचं मलाही माहीत नाही.’

राष्ट्रगीताचा मान ठेवावा, ते चालू असताना बसून राहून किंवा उभ्या उभ्या चुळबूळ करून त्याचा अपमान करू नये – का? हे योग्य प्रबोधनातून समजावलं तर आणि तरच मनापासून सगळ्यांकडून त्याचा मान राखला जाईल. एक पद्धत, संस्कार म्हणून रोजच्या रोज शाळेत लावल्या जाणा-या राष्ट्रगीताला,

पहिलीत – नव्यानं उमलू लागलेल्या देशप्रेमापोटी,
पाचवीत – शिक्षकाच्या धाकापोटी बहुतांशी मुलं स्तब्ध राहात असतील.

दहावीपर्यंत शिक्षकाची नजर चुकवून चुळबूळ करण्यात, खोड्या काढण्यात त्यातले कितीतरी जण तरबेज झालेले असतात.

म्हणून शाळांमध्ये राष्ट्रगीत लावायचं ते शाळा सुरु होण्याअगोदरच. सुटायच्या आधी लावलं की मुलं घरी जायच्या घाईत असल्याने चाळे करतातच.

भावना अंगी बाणण्याची सक्ती केल्यानं स्वेच्छेनं भावना बाणण्याची जी थोडीफार शक्यता असते, तीच आपण मारून टाकत असतो. आणि मग जो उरतो तो फक्त दिखावा असतो भावनेचा. असो. राष्ट्रगीताला उभं राहण्याची सक्ती करू नये असं मत मांडण्याचा इथे उद्देश नाही. पण सिनेमागृहात ते लावायची सक्ती तरी करू नये. आधी राष्ट्रगीताला उभं राहायचं आणि मग पाचच मिनीटांत सलमान खानच्या हिडीस नृत्यावर शिट्या वाजवायच्या यात कुठला आलाय राष्ट्रसन्मान? मुद्दा हा आहे की ज्या गोष्टी प्रबोधनानं साध्य कराव्यात आणि करता येणं शक्य आहे त्या गोष्टींची सक्ती करू नये. अशानं त्या गोष्टी ख-या अर्थानं कधीच साध्य होत नाहीत. ज्या थेटरांना राष्ट्रगीत लावायची हौस आहे त्यांनी लावावं. ज्यांना हौस नाही त्यांनी लावू नये.

supremecourt-national-anthem-decision-marathipizza03

दुसरं असं, की सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रगीत चालू असताना दरवाजे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे घातक आहे. दिल्लीत मागे एकदा आग लागली असता थेटरचा एक दरवाजा बंद राहिल्याने काही माणसं दगावली होती तर खूपजण जखमी झाले होते. राष्ट्रगीत चालू असताना थेटरच्या आत येणारा माणूस राष्ट्रगीत कानावर पडलं की असेल तिथे उभा राहतो. यात सक्तीची खरंच गरज नाही.

काही बाबतींत मात्र सक्ती करणं अपरिहार्य ठरतं.

उदाहरणार्थ स्वच्छता पाळण्याची सक्ती. कारण ती जर कोणी पाळली नाही तर तिचे तात्काळ परिणाम इतरांना भोगावे लागतात. पण केवळ ही सक्ती किंवा तिची अंमलबजावणी करूनही भागत नाही. त्याच बरोबर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत राहणंही गरजेचं असतं. कारण जर सगळ्यांना ते महत्त्व पटलं तर सक्तीची गरजच उरत नाही. इतर प्रगत देश हे सिद्ध करून चुकले आहेत. सक्ती कुठल्याही बाबतींत आणि कितीही प्रमाणात करा, ज्यांना ती मानायची नसते ते पळवाटा शोधून काढतातच. लोकांची ही नको तिथे पळवाट शोधण्याची इच्छाच निर्माण होऊ द्यायची नसेल, तर शिक्षण आणि प्रबोधन हेच पर्याय आहेत. वेळखाऊ आहेत, पण प्रभावीपणे अंमलात आणले तर रामबाण उपाय आहेत. सक्ती करून तिची शंभर टक्के किंवा त्या जवळपास जर अंमलबजावणी झालीच, तर बदलणा-या दृश्य चित्रावरून प्रबोधनाची गरज वाटेनाशी होऊ लागते. पण ती गरज असते. सक्तीनंतर ती गरज खूप जास्त असते कारण आपल्यावर सक्ती करण्याचं कारण जोवर लोक नीट समजून घेत नाहीत तोवर ते त्या सक्तीला अन्याय मानतात आणि बंडाची भावना त्यांच्या मनात बळावत राहते.

त्यामुळे चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवायची सक्ती करण्याचा आदेश मागे घ्यावा असं मत इथे मांडावंसं वाटतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

कौस्तुभ अनिल पेंढारकर

मी व्यवसायाने लेखक (content writer/copywriter) आणि अनुवादक आहे. मी मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतराची कामं स्वीकारतो. संपर्क साधण्यासाठी लिंक्ड-इन प्रोफाईलवर संदेश पाठवावा.

kaustubh-pendharkar has 4 posts and counting.See all posts by kaustubh-pendharkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?