' मोदी सरकारची तीन वर्षे- भारत घडवणारी की बिघडवणारी? – InMarathi

मोदी सरकारची तीन वर्षे- भारत घडवणारी की बिघडवणारी?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

या मे महिन्यात नरेंद्र मोदी सरकारला ३ वर्षे पूर्ण झाली. लागलीच कोणत्याही सरकारचे जसे दर वर्षपूर्तीनंतर मूल्यमापन होते, तसेच नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या तीन वर्षांतील वाटचालीचे मूल्यमापन देखील सगळीकडे होत आहे. समर्थकांच्या दृष्टीने ही तीन वर्षे म्हणजे भारतासाठी सुवर्णकाळ ठरली, तर विरोधकांच्या म्हणण्यानुसार ‘भारत जैसे थे’च आहे. आज आपण देखील मोदी सरकारच्या गेल्या तीन वर्षातील योजनेचा लेखाजोखा मांडतो आहे, पण तटस्थ दृष्टीकोन ठेवून! मोदी सरकारने काही भारताला थेट यशाच्या शिखरावर ठेवले असेही नाही आणि काहीच विकास केला असेही नाही, त्यांनी काही चांगली कामे केलीत, तर अनेक वाईट परिणामांना देखील तेच कारणीभूत आहेत.

modi-marathipizza01
indianexpress.com

पहिली नजर टाकूया सरकारच्या अपयशांवर-

बेरोजगारीमधील वाढ:

मोदींनी निवडणूक प्रचारात याचे आश्वासन दिले होते की ते भारतातील तरुणांना सक्षम करतील, त्यांच्यासाठी नोकरीच्या, प्रगतीच्या नवीन संधी निर्माण करतील, पण प्रत्यक्षात मात्र गेल्या तीन वर्षांत वचनपूर्ती सोडा उलट बेरोजगारीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पूर्वी भारतातील बेरोजगारीचा टक्का २.२ टक्के इतका होता तो आता ३.८ टक्क्यांवर पोचला आहे. एका अहवालानुसार ७८,०९,८०० इतक्या नोकऱ्या लोकांनी गमावल्या त्या देखील नोटाबंदीच्या पूर्वी आणि त्यानंतरही या संख्येत कमालीची वाढ झाली आहे आणि ही वाढ सातत्याने अजून मोठी हॉट आहे. म्हणजे लोकांना नोकऱ्या मिळण्याऐवजी, त्यांच्याकडे ज्या नोकऱ्या आहेत त्याच त्यांच्या हातातून निसटत चालल्या आहेत.

 

दहशतवाद आणि नक्षलवाद विरोधी धोरण:

मोदींनी नक्षलवाद आणि दहशतवाद कायमचा मुळापासून नष्ट करण्याचे जे आश्वासन दिले होते ते सध्याची परिस्थिती पाहता जणू मोदी विसरलेत की काय असे वाटते! जवानांवर रोज हल्ले होतायत आणि सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई मात्र होत असल्याचे दिसून येत नाही आहे. सरकारला दहशतवाद आणि नक्षलवाद नष्ट करण्यासाठी काही अडचणी नक्कीच येत असतील, परंतु त्यांनी अजून कडक धोरण अवलंबून त्यावर मात करायला हवी होती, जेणेकरून लोकांना सरकारबद्दल विश्वास निर्माण होईल, परंतु या अश्या कारवायांवर संयम बाळगून सरकार लोकांच्या मनात स्वत:विषय नकारात्मक भाव निर्माण करत आहे.

 

कृषी क्षेत्राचे मागासलेपण:

केवळ महाराष्ट्रच नाही तर भारतातील सर्वच गरीब शेतकऱ्यांची अवस्था हलाखीची आहे. शेतकरी आत्महत्या काही थांबायच नाव घेत नाही आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देण्यात सरकार वारंवार अपयशी ठरत आहे. नव्या संकल्पना, धोरणे, शेतकरी विकास कार्यक्रम घोषित केले जातात, पण त्यांची अंमलबजावणी तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत काही केल्या होत नाही आहे. एकंदरीत अश्या नाकर्तेपणामुळे सरकार कृषी क्षेत्राबाबत असंवेदनशील आहे का? असा विचार जनतेच्या मनात निर्माण होत आहे.

 

मोदी सरकारने गेल्या तीन वर्षात काय नाही केले हे सांगणारी अशी अजून अनेक उदाहरणे देता येतील. आता आपण पाहूया मोदी सरकारतर्फे घडलेली काही चांगली कामे-

modi-marathipizza02
indiatoday.intoday.in

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे वाढते वजन:

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी विदेशातील विविध देशांच्या भेटीगाठी सुरु केल्या, विरोधकांनी त्यांच्या या पर्यटनाबद्दल त्यांना नावे देखील ठेवली, पण आज आपण पाहतोय की त्यांच्या याचं भेटीगाठींमुळे अनके देशांशी भारताचे उत्तम संबंध प्रस्थापित झाले आहेत. या सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला उघड उघड पाठींबा दिला आहे आणि महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढती प्रतिष्ठा अतिशय महत्त्वाची आहे. मोदी सरकारने याचं माध्यमातून परदेशी गुंतवणूक भारतात आणली आणि आज त्याचाच परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर दिसत आहे.

 

योजनांची उत्तम अंमलबजावणी

मेक इन इंडिया, जनधन योजना, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान आणि अश्या असंख्य योजनांची उदाहरणे देता येतील, ज्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकारला यश आले आहे. गेल्या कॉंग्रेस सरकारच्या काळातील निष्क्रिय ठरलेल्या योजनांना देखील चालना देऊन, त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचवून मोदी सरकारने प्रशासकीय यंत्रणा सुधारल्याचे दाखवून दिले आहे. या योजनांमुळे कधी नव्हे इतका अमुलाग्र बदल भारतीय जनमानसात दिसून येतो आहे.

 

भ्रष्टाचारला आळा आणि पारदर्शक प्रशासन

मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान भ्रष्टाचार निर्मूलनाचे जे काही वचन दिले होते, ते बऱ्याच प्रमाणात पूर्ण करून दाखविले आहे. देशातील सरकारी यंत्रणांना लागलेली भ्रष्ट्राचाराची कीड हटवण्यात सरकारला मोठे यश आले आहे. एवढेच नाही तर गेल्या ३ वर्षात मोदी सरकारने स्वत:ला देखील भ्रष्ट्राचारापासून दूर ठेवल्याचे दिसून येते. जर सरकार भ्रष्ट नसेल आणि त्यांची प्रशासनावर करडी नजर असले तर आपोआपच भ्रष्टाचारच राक्षस उन्मळून पडतो हे मोदींनी सिद्ध केले आहे.

 

डिजिटल इंडिया:

भारताला डिजिटल बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मोदी सरकारने त्यादृष्टीने आपण अधिक कार्यक्षम असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. आजही विविध कार्यक्रम आणि योजनांच्या माध्यमातून ते जनतेला कॅशलेस युगाकडे वाटचाल करण्याचे आवाहन करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातही डिजिटल युगाची सुरुवात करून मोदींनी बदलत्या भारतीय शिक्षणव्यवस्थेची नांदी घातली आहे. गावोगावी डिजिटल साक्षरतेचे अभियान राबवून भारतातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल युगाशी जोडण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे आणि त्याचे परिणाम देखील हळूहळू दिसू लागले आहेत.

भारतासारख्या भल्यामोठ्या देशाची सत्ता सांभाळणे हे कोणत्याही सरकारसाठी तसे कठीण काम! आणि फक्त ३ वर्षांच्या काळात एखादे सरकार किती लायक ठरले किंवा नाही याचा निष्कर्ष काढणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे. अजून दोन वर्षे हे सरकार सत्तेत असणार आहे, त्यामुळे ही पुढील दोन वर्षे त्यांच्यासाठी आणि भारतासाठी देखी महत्त्वाची थाणार आहेत. कारण त्यानंतरच मतदारराजा स्वत: ठरवणार आहे की मोदी सरकारने खरंच पाच वर्षे उत्तम काम केले किंवा नाही, तोवर वाट पाहण्याखेरीज हातात काहीच नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?