' पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात साजरा होणारा अनोखा सण : “मारबत” प्रथा – InMarathi

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात साजरा होणारा अनोखा सण : “मारबत” प्रथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रत्येक गाव त्यातील एखाद्या खास आणि अनोख्या गोष्टी साठी प्रसिद्ध असते. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर प्रसिद्ध आहे हिवाळी अधिवेशन, आंबटगोड संत्री, वऱ्हाडी पाहुणचारासाठी तसेच झणझणीत सावजी जेवणासाठी! नागपुरच्या अजूनही काही गोष्टी प्रसिद्ध आहेत परंतु आज आपण जाणून घेणार आहोत नागपूर मधल्या अनोख्या “मारबत” ह्या प्रथेविषयी!

बळीराजाचा प्रामाणिक मित्र ,जो त्याच्या बरोबरीने शेतात उन्हातान्हात राबतो असा शेतकऱ्याचा लाडका ढवळ्या, पवळ्या, सर्जा राजा म्हणजेच बैल शेतकऱ्यांचा जिवलग मित्र असतो. त्याच्याप्रति कृतज्ञता म्हणून आपण पोळा हा सण श्रावण अमावस्येला साजरा करतो.

नागपूरमध्ये किंबहुना संपूर्ण विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करतात.

लहान मुलांचा हा सण आहे. मोठ्या माणसांप्रमाणे बैलांना सजवणे, त्यांची पूजा करणे, त्यांना फिरवणे हे लहान मुलांना शक्य नाही. म्हणून त्यांच्या हौसेसाठी लहान मुलांना छान डौलदार लाकडी बैल घेऊन देतात.

 

marbat-nagpur-inmarathi01

 

लहान लहान मुले त्यांचे लाकडी बैल छान सजवून त्यांना हार घालून घरोघरी नेतात. ह्या लहान मुलांना घरोघरी दक्षिणा दिली जाते व खाऊ दिला जातो.

काही ठिकाणी ह्या लाकडी बैलांचा मेळावा भरतो. लहान मुलांसाठी बैलांची सजावट व स्पर्धा आयोजित केल्या असतात. ज्याचा बैल सर्वात सुंदर असतो त्या मुलाला बक्षीस मिळते. लहान मुले मोठ्यांच्या साथीने त्यांच्या लाकडी बैलांची मिरवणूक सुद्धा काढतात. नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळापासून हा सण साजरा करणे सुरू झाले.

तान्ह्या पोळ्याच्या दिवशी अजून एक मोठी मिरवणूक नागपूर मध्ये निघते. “मारबत व बडग्या” ची ही जगातील एकमेव मिरवणूक फक्त नागपूरमध्ये बघायला मिळते. इंग्रजांच्या शासनात बांकाबाई ही इंग्रजांना जाऊन मिळाली. तिचा निषेध म्हणून बांकाबाईचा कागद व बांबू वापरून मोठा पुतळा तयार करतात .

बांकाबाईच्या नवऱ्याने सुद्धा तिच्या कृत्याला विरोध केला नाही म्हणून त्याचाही पुतळा बनवतात. हाच तो बडगा होय!

त्याचीही मारबतीबरोबर वाजतगाजत मोठी मिरवणूक काढून नंतर तिचे दहन करतात अशी ही अनोखी प्रथा केवळ नागपूर येथेच बघायला मिळते.

ह्या मारबत व बडग्याच्या मिरवणुकीला अलोट गर्दी लोटते व “समाजातील वाईट प्रथा आपल्याबरोबर घेऊन जाय गे मारबत” अश्या घोषणांच्या आवाजात तिचे व बडग्याचे दहन केले जाते.

 

marbat-nagpur-inmarathi03

 

नागपूरमध्ये काळी व पिवळी मारबत अश्या दोन मारबती असतात. ही मिरवणूक बघायला नागपूर मधील तसेच नागपूरच्या आजूबाजूच्या गावांतील अनेक लोक येतात. ह्यावेळी नागपूरला जत्रेचे स्वरूप असते. समाजातील व्यंग, वाईट चालीरीती, कुप्रथा, उणिवा, रोगराई तसेच ज्वलंत प्रश्न ह्यांचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे मारबत होय.

मारबतचा संदर्भ पुतनामावशीशी सुद्धा जोडला जातो. ही परंपरा मूळ आदिवासींची आहे जी नागपूरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने ही प्रथा सुरू झाली.

तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून “घेऊन जा रे मारबत ,घेऊन जा रे मारबत” असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात.

मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात.

 

marbat-nagpur-inmarathi

 

बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते. जागनाथ बुधवार चौकातील पिवळी मारबत ही मानाची मारबत असते.

१८८५ पासून ही पिवळी मारबत दहन करण्याची प्रथा सुरू झाली. ह्या मारबतीमागूनच इतर मारबतींची मिरवणूक सुरू होते. १९८५ साली ह्या पिवळ्या मारबतीला १०० वर्ष पूर्ण झाली तेव्हा ह्याचा शतक महोत्सव अतिशय दणक्यात साजरा करण्यात आला होता.

१८९५ साली रविवार बारदान चौकात नेहरू पुतळ्याजवळ काळी मारबत तयार करण्यात आली होती.

काळ्या मारबतीची मिरवणूक निघाली की ती पिवळ्या मारबतीला येऊन भेटते आणि मग पुढे जाते. पूर्वी मारबतींची उंची कमी असायची पण आता १२ फुटांपेक्षाही जास्त उंचीच्या मारबती असतात. शंभर वर्षांपूर्वी स्वर्गीय गणपतराव दसराजी रोडे ह्यांनी हे भव्य पुतळे बनवण्यास सुरुवात केली होती.

 

marbat-nagpur-inmarathi02

 

शहरात वाजतगाजत ह्या मारबतींची मिरवणुक काढल्यानंतर नाईक तलावाजवळ त्यांचे दहन केले जाते. मिरवणुकीत मारबतीला “आला बला, इडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत” अश्या घोषणा दिल्या जातात. ह्यातील काळी मारबत म्हणजे बांकाबाईचे प्रतिकात्मक स्वरूप आहे तर पिवळी मारबत म्हणजे ब्रिटिश लोक होते.

आता मारबत म्हणजे समाजातील सर्व वाईट गोष्टींचे रूपक समजले जाते आणि म्हणूनच तिचे सार्वजनीक दहन करतात आणि तिने जाताना आपल्याबरोबर सर्व वाईट गोष्टी घेऊन जावे असे आवाहन मारबतीला केले जाते.

तेली व कोष्टी बांधव ह्या मारबतीची मिरवणूक काढतात व इतर सर्व नागपूरकर ह्यात हिरीरीने भाग घेतात. हा सोहळा बघण्यासाठी हजारो लोक आवर्जून जमतात.

नागपूर मधील शाळा, तालमी,आखाडे ह्या मिरवणुकीत भाग घेतात. ह्यात तलवारबाजी तसेच दांडपट्टा ह्यांची प्रात्यक्षिके दाखवली जातात.

आमच्या नागपूरची ही आगळीवेगळी व फक्त ह्याच शहरात जोपासली जाणारी परंपरा म्हणजे आमच्या नागपूरचे भूषणच आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?