' अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने की केवळ संगीताच्या मैफिली? एक यक्षप्रश्न – InMarathi

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने की केवळ संगीताच्या मैफिली? एक यक्षप्रश्न

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

साहित्य… त्यात पुन्हा मराठी साहित्य. त्या भाषेतील लिखाणाचा सत्कार सोहळा म्हणजे मराठी साहित्य संमेलन. अनेक थोर क्रांतिकारक लेखकांची आणि कवींची परंपरा ज्या भाषेला लाभली त्या मराठी भाषेचा सोहळा हा वर्तमान लेखकांसाठी आणि कवींसाठी एक मोठी पर्वणी. स्वतःचे लेखनकौशल्य अखिल भारतीय जनतेसमोर मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साहित्य संमेलनाचा उद्देश हाच असू शकतो.

पहिल्यावहिल्या मराठी साहित्य संमेलनाचा हाच उद्देश होता. पण आज प्रत्यक्षात मात्र हे चित्र दिसत नाही.

 

marathi-sahitya-sammelan-inmarathi
plus.google.com

न्यायमूर्ती रानडे (महादेव गोविंद रानडे) यांनी १८६५ साली मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतला. त्यात त्यांना ४३१ गद्य व २३० पद्य पुस्तके प्रसिद्ध झाल्याचे दिसून आले. पुढे १८७८ सालच्या मे महिन्यात न्यायमूर्ती रानडेंनी रावबहादूर गोपाळ हरी देशमुखउर्फ लोकहितवादी यांच्या मदतीने ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. पुण्यातील हिराबागेत दिनांक ११ मे १८७८ रोजी पहिले मराठी साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे न्यायमूर्ती रानडेंनी भूषविले. या संमेलनाचा मूळ उद्देश हा ग्रंथ प्रसाराला चालना देणे तसेच एकत्र येऊन मराठी साहित्य यावर सकारात्मक विचारविनिमय करणे हा होता.

 

justice ranade-inmarathi
sardhardham.com

लेखनाविष्कार, पुस्तक परिचय, लेखक परिचय, प्रकाशक परिचय, वितरक परिचय आणि या अनुषंगाने चर्चा करणे हा साधा, सोपा आणि सरळ असलेला साहित्य संमेलनाचा उद्देश. पण त्याचा लवलेशही अलीकडील काळातील साहित्य संमेलनात दिसून येत नाही. मी ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझी कविता सादर केली. मला एकंदरीत अत्यंत वाईट आणि अपमानास्पद अनुभव या साहित्य संमेलनात आला.

पहिल्या दिवशी अत्यंत आतुरतेने मी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे भाषण ऐकण्यासाठी जाऊन बसलो. पण मला त्यात साहित्य काही सापडले नाही.

केवळ सरकारवर टीकास्त्र आणि मराठीची कशी गळचेपी होते आहे यावर भाषण. मराठी साहित्य जास्तीतजास्त लोकांसमोर कसे पोहोचेल याचे कोणतेही ठोस मार्गदर्शन नाही. संमेलनाध्यक्षांनी सामाजिक विषयांवर भाष्य केले. चांगले वाटले. स्त्रिया कश्या उपेक्षित आहेत यावर ते पोटतिडकीने बोलले. पण ते ज्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तिथे स्त्रियांच्या स्वच्छतागृहाची वानवा होती हे त्यांच्या लक्षातही आले नाही.

थोडक्यात काय, तर सरकारच्या ढिसाळपणाचा आढावा घेण्याच्या नादात ते स्वतः अध्यक्ष असलेल्या संमेलनाचा आढावा घेऊ शकले नाहीत किंवा तशी त्यांची इच्छा दिसून आली नाही. दिव्याखाली अंधार ही म्हण अत्यंत चपलखपणे तिथे लागू होत होती.

या आधुनिक जगात साहित्य संमेलनाची व्याप्ती वाढली आहे याचे कोणतेही भान मला याही साहित्य संमेलनात दिसून आले नाही. साहित्य म्हटलं कि लेखक इतकेच नसून प्रकाशक, वितरक, जाहिरातदार, तसेच आधुनिक युगातील आंतरजालावर साहित्य प्रकाशित करणारे हे देखील या साहित्याचा भाग असतात हे संमेलनाध्यक्षांसकट कोणाच्याही गावी नव्हते. मी एक लेखक म्हणून ज्यावेळी या संमेलनाकडे पाहतो त्यावेळी माझ्या गाठीशी या संमेलनामुळे सकारात्मक अनुभव बांधले गेले नाहीत हे प्रकर्षाने मला जाणवते.

नवीन लेखक, नवीन कवी यांना प्रकाशक आणि वितरकांची गरज असते पण त्यासंबंधीची माहिती मांडणारं आणि त्यासंबंधी चर्चा करणारं एकही व्यासपीठ या साहित्य संमेलनात मला आढळून आलं नाही.

 

marathi-sahitya-sammelan-inmarathi01
esakal.com

नवीन लेखक ज्याची रोजीरोटी ही लेखनावर अवलंबून आहे तो आज त्याचं लिखाण लोकांपर्यंत कसे पोहोचवावे या विचारात असतो. त्यासाठीचे विविध मार्ग तो धुंडाळीत असतो. साहित्य संमेलन हे अश्याच नवख्यांच्या उपयोगासाठी म्हणून असणे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. नवीन साहित्य त्या नवलेखकांना साहित्य संमेलनाच्या भव्य व्यासपीठावर मांडता आलेच पाहिजे.

अर्थात जे साहित्य दर्जेदार आहे केवळ तेच मांडू देणं हा सर्वार्थाने साहित्य संमेलन संयोजकांचा अधिकार आहे आणि तो त्यांनी योग्यरीतीने बजावावा पण असे भव्य व्यासपीठ हे साहित्य विषयासाठी न वापरता, साहित्य संमेलनाचा महत्वाचा वेळ हा साहित्यविषयक बाबींसाठी न वापरता त्या व्यासपीठावर संगीत मैफिली सादर व्हाव्यात हे प्रचंड मोठे दुर्दैव आणि तो एक साहित्यविश्वातील भ्रष्टाचार आहे.

संगीत मैफिली सादर करण्यासाठी साहित्य संमेलनाचा निधी, वेळ आणि व्यासपीठ हे का वापरले जाते ? त्याने साध्य काय होते ? साहित्य संमेलनाचा उद्देश केवळ मनोरंजन हा आहे का ? साहित्य संमेलनाचा निधी अश्याप्रकारे वाया घालवणे हा भ्रष्टाचार नाही तर दुसरे काय आहे ? या प्रश्नांची उत्तर देण्यास कोणी समर्थ आहे असे मला वाटत नाही.

 

marathi-sahitya-sammelan-inmarathi02
divyamarathi.bhaskar.com

आपण साहित्य संमेलनाची रूपरेषा पाहूयात. साहित्य संमेलनाच्या पहिला दिवस हा उद्घाटन वैगेरे साठी खर्ची पडला. अधूनमधून संयोजक आणि साहित्य परिषद सदस्य लेखकांच्या पुस्तकांची प्रकाशने सुरु होती. १७ फेब्रुवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी एका कोपऱ्यात काव्यकट्टा सुरु होता. तिथला गोंधळ तर फारच आगळा. कवी त्याची कविता म्हणतोय आणि व्यासपीठावरील कुणाचेही त्याकडे लक्ष नाही. जो तो आपापल्या जगात रममाण. कोणतीही दाद नाही की सुहास्य नाही. उदासीन वातावरण.

सायंकाळी साडेसात वाजता कोणतीही संपण्याची वेळ नसलेला संगीतकार श्रीनिवास खळे दर्शन संगीत मैफिल अगदी मोक्याच्या व्यासपीठावर. कवीकट्टा कुठेतरी कोपऱ्यात आणि संगीत मैफिल एकदम चकाचक व्यासपीठावर.

श्रीनिवास खळे हे नक्कीच आदरणीय आहेत पण ती वेळ ही मराठी साहित्याची होती, संगीत मैफिलीची नव्हे हे कुणाच्याही ध्यानी नव्हते. त्याच दरम्यान माझे काव्यवाचन त्या कोपऱ्यातल्या कवीकट्ट्यावर होते. अत्यंत उदासीन वातावरण. संगीत मैफिलीला आलेल्या सेलिब्रिटी गायकांमुळे कवीकट्ट्यावर शुकशुकाट. केवळ व्यासपीठावर नाईलाजाने बसलेले संयोजक, उपस्थित कवी, निवेदक आणि कवींसाठी प्रमाणपत्र व गुलाब घेऊन तयार असलेले स्वयंसेवक.

संपूर्ण माहिती मेलवर देऊनही कवींची ओळख केवळ नाव आणि गाव यापुरती करून देण्यात येत होती. माझ्या आधी एका कवीने छान लयबद्ध आवाजात त्याची कविता गाऊन वातावरणात उत्साह भरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण तो व्यासपीठावरील संयोजकांना काही रुचला नाही.

पुढे उद्घोषणा झाली की, ‘यापुढे गाऊन कविता म्हणू नये कारण बाजूला सुरु असलेल्या (सेलिब्रिटी) संगीत मैफिलीला त्रास होत आहे’ हे ऐकल्यावर डोक्यात संतापाची एक लाट उठली परंतु काव्य वाचन असल्यामुळे शांत राहिलो. अरे हे कसले साहित्य संमेलन ? ज्यात साहित्याला कवडीमोलाची किंमत दिली जात आहे असा विचार मनात आला. हा शुद्ध साहित्यिक व्याभिचार आणि सरकारी निधीचा भ्रष्टाचारच. काय म्हणावे ?

 

marathi-sahitya-sammelan-inmarathi03
news18.com

१८ फेब्रुवारी हा दिवस तर केवळ संगीताला वाहिलेला. त्या दिवशी कीर्तन, गौळण, नृत्य, नाट्य यांचा संगीतमय कलाविष्कार होता. एवढंच नाही तर चक्क दिवाळी पहाट सारखी संगीत पहाट देखील होती. यांना साहित्य संमेलनाच्या उद्देशांचा असा गळा घोटताना लाज कशी वाटली नाही ? याचं आश्चर्य वाटतं आणि याची चर्चा मिडीयामध्ये का नाही ? याबद्दल अचंबित व्हायला होतं. साहित्य आहे तरी कुठे या साहित्य संमेलनात ? हा प्रश्न डोक्यात सतत येत होता.

आमच्या पिढीने जुनी साहित्य संमेलने पाहिलेली नाहीत. पण साहित्य संमेलनाचा उद्देश काय असावा याबद्दल मात्र आमच्या मनात यत्किंचित शंका नाही. तो उद्देश सरकारी निधी वापरून साध्य होत नसेल तर हा खर्च सरकारने का करावा ? मनोरंजनासाठी अनेक संगीत मैफिली होतात. त्या संगीत मैफिलींमध्ये नवीन लेखकांना कुणी व्यासपीठ उपलब्ध करून देते का ? देत नसेल तर अश्या तद्दन व्यावसायिक मैफिलींसाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ का दिले जाते ? अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्न पुढे जाऊन उपस्थित केले जाऊ शकतात. पण या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊ शकेल या दर्जाचा संमेलनाध्यक्ष पुढील साहित्य संमेलनात निवडता आला तर साहित्य परिषदेने बघावे. नाहीतर जे सुरु आहे तसेच सुरु ठेवावे. याने साहित्यक्षेत्राचा कणभरदेखील फायदा होणार नाही.

गुदमरले गद्य …
काव्य कोमजले
साहित्य संमेलनी …
साहित्यची उपेक्षिले

त्या काव्य वाचनाचा …
त्रास संगीत मैफिलीस झाला
सेलिब्रिटी छान मिरविले …
साहित्यिक तो; दारावरून परतला

अध्यक्ष सरकारवरी ऐसा बरसला …
ऐकून; साहित्यिक तो खळाळून हसला
उजेड वैचारिक भला पसरला …
बुडाखाली दिव्याच्या बघ; घोर अंधार दाटला

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?