' देवकीचा टाहो अन दंडकारण्यात नराधम अतिरेक्यांचा रक्तपात! – InMarathi

देवकीचा टाहो अन दंडकारण्यात नराधम अतिरेक्यांचा रक्तपात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : प्रिया सामंत 

मोह, तेंदू, बिब्बा असा मनाजोगा रानपाला जमा करून ती परतीच्या वाटेला लागली. पूर्वी रानातून पाड्या पर्यंतचे अंतर ती काही क्षणात पार करी. पाठीला कितीही वजन असलं तरी पावलांचा वेग पूर्वी कधी मंदावला नाही.

पण आता मात्र परिस्थिती वेगळी होती. तिच्या संसाराची पूर्ती, आयतु आणि तिच्या प्रेमाचं गाठोडं तिच्या छातीशी होतं. पाणीदार डोळ्यांच गोंडस बाळ. तो हसरा चांद छातीशी बांधूनच ती गेले चार महिने रानोमाळ फिरत होती. नकट्या नाकाचं बोळक न्याहाळत टेम्भुर्णीचा पाला खुडत होती. त्या दोघांतली नाळ कधींच गळून पडली असली तरीही स्पंदने अजूनही एकच होती.

त्या अदृश्य नाळेने अजूनही एकरूप असलेली ती दोघ अवखळ रानवाऱ्यासोबत कित्तेक तास रोज एकत्र तरंगत होती.

छातीशी होणारी उष्ण ओली चुळबुळ तिच्या गाण्याने मंदावत; हल्ली हलके-हलके हुंकार देत तिच्या सुरात गुंफु लागली होती. हे एकाच श्वासातल, सहवासातल प्रेम आता दोघांच्या सवयीचं झालं होतं. परतीला नेहमीपेक्षा आज तिला जरा उशीरच झाला होता.

लडिवाळ आवाज करत बाळं आता पायाचा अंगठा लुचू लागलं तसं एका हाताने झोळीतल्या जीवाला घट्ट धरत तिने पायाचा वेग वाढवला.

‘दंडकारण्य लिब्रेटेड झोन’ मधलं माओवादी हिंसाचाराने मूर्च्छित पडलेलं नऊ दहा पाड्यांच तिचंही एक गाव; आज अधिकच खिन्न होतं.

गावात जन-अदालत भरली होती. मागच्यावेळी गावातल्या म्हाताऱ्या जोडप्याला आपल्या एकुलत्या एका मुलास दलममध्ये न पाठवता बाहेर नोकरीधंद्यास पाठवले म्हणून बेदम मारहाण झाली होती.

आज काय वाढून ठेवलंय काही कळायच्या आत तिनं आपल्या नवऱ्यास आयतुला दलपती समोर गुडघ्या-कमरेत वाकलेले, मार खाताना पाहिले; तसे तिच्या छातीत धस्स झाले.

छातीशी बिलगलेल्या तान्ह्या बाळाने आईच्या काळजाचा चुकलेला ठोका हेरला आणि भोकांड पसरले. तिनं काही हालचाल करायच्या आत अख्खा पाडा बाळान दणाणून सोडला आणि त्या नरधमानीं तिलाही धरलं.

लाथा बुक्याने तुडवत तिला आणि तिच्या कुटूंबाला फरफटत ते आता जंगलाच्या दिशेने निघाले.

 

naxal-maoist-chhattisgarh-inmarathi
news18.com

बाळाचे रोदन, तिच्या आणि आयतुच्या दया याचनेने जंगलातली पायवाटही गहिवरली; झाडोऱ्यात ओरबाडली, ठेचकाळली; घसटत मिट्ट अंधाराच्या दिशेने ओढली जाऊ लागली.

पुढे काय होणार ह्याचे भयाण वास्तव त्यांच्या नजरेस स्पष्ट दिसत होते. एवढ्यात त्या काळ्या हाताला हिसडा देत आयतुने तेथून पळ काढला.

मनात विचारांचे काहूर दाटून आले तरी विचलित न होता, वाट फुटेल तिथे तो पळत सुटला. आपल्या घरट्यास वाचवण्यासाठी त्याला लवकरात लवकर पोलीस चौकी गाठायची होती.

जीव मुठीत धरून पळणाऱ्या आयतुकडे पाहत ते नराधम तिथंच थांबले. छद्मी हसत, मायेच्या मिठीतून बाळाला खेचत त्यांनी आयतुला हाक दिली. त्या काळ्या हातात लोंबकळणारा आपला इवलासा जीव पाहून आयतु जागच्या जागी गोठला. छातीशी बांधलेली बाळाची रिकामी झोळी पसरत बाळासाठी त्या माईन हंबरडा फोडला.

त्या निष्ठुर हातांनी तो निष्पाप जीव …….ठेचून……!

दूर झुडपामागे आयतु थरथरत होता.

देवकीचा टाहो जंगलात दुमदुमला होता.

—-

छत्तीसगड! माओवादाचा हिंसाचार सर्वांत जास्त ह्याच राज्यात नोंदवला गेला आहे. येथील ‘दंडकारण्य लिब्रेटेंड झोन’ हे माओवादाचे महत्वाचं केंद्र. कित्तेक पिढ्या मोह, टेंभुर्णी, बिब्बा व इतर वनौषधींवर जगणारं आणि आज माओवादामुळे ग्रस्त असं इथलं वन्यजीवन.

 

naxal-camp-marathipizza
dailymail.co.uk

आधी हे माओवादी ‘टेम्भुर्णीच्या पानांची… तेंदू पत्याची ठेकेदार योग्य रक्कम देत नाही’ म्हणत गावांत घुसले. सरकारकडून चांगला भाव मिळवून देण्याकरीता, ठेकेदारी विरोधी पथनाट्य करता करता त्यांनी गावातल्याच तरुणांच्या हातात शस्त्र दिली आणि सशस्त्र दलमची येथे निर्मिती झाली.

सरकारचे वेळखाऊ कायदे कानून जाळत त्यांनी गावात जन-अदालत भरवण्यास सुरुवात केली.

सुरवातीला शस्त्राच्या जोरावर, मातलेल्या ठेकेदाराला गावच्या ह्या जन-अदलातमध्ये पकडून आणलं जाई; उठा-बश्या काढत तो दयेची याचना करे तेव्हा खुश होणारे गरीब भोळे भारतीय आज त्याच माओवादी जन-अदालतचा शिकार झाले आहेत.

सरकारच्या योजना फोल आहेत, ह्या जंगलावर फक्त आपलाच अधिकार आहे आणि ह्या सरकारी योजना राबवणे म्हणजे आपले वन्यजीवन नष्ट करून आपल्या जमिनी गिळंकृत करण्याचे सरकारचे षडयंत्र आहे.

केवळ म्हणूनच आपणं सरकार विरोधात, त्यांनी नेमलेल्या सुरक्षा जवानांच्या विरोधात लढा देण्यासाठी हातात शस्त्र घेणे जरुरीचे आहे, अश्या भूमिका घेत पथनाट्ये हे माओवादी करतात.

 

deccanchronicle.com

जंगलात स्थानिक लोकांचे सैन्य उभे करून सरकार विरोधी चळवळ उभी करतात. ही माओवादी सशस्त्र दले पुढे बंदुकीच्या जोरावर तेंदू पत्त्याच्या ठेकेदाराकडूनच खंडणी उकळतात, वन्य भूभाग बेकायदेशीर व्यवसायासाठी वापरतात.

आणि कथित बुद्धिवादी, पर्यावरण, मानवतावादी ह्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?