Love, लग्न : आग का दरिया है, डूब के जाना है!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“मला घटस्फोट घ्यायचाय.”

मी जेव्हा हे वाक्य घरात उच्चारलं तेंव्हा माझ्या आई-वडिलांना धक्का बसला. माझ्या काही मित्र-मैत्रीणींनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, कारण divorce घेण्यासारखं काहीच घडलं नाही, असं त्यांचं मत होतं. मी मात्र ठाम होते, मला कारण देता येत नव्हतं, पण ह्या लग्नात आपण आनंदात नाही एवढं मात्र कळत होतं. शेवटी मी ऐकतंच नाही म्हटल्यावर माझा divorce झाला…

=====

=====


कित्येकांच्या मते मी  मूर्खपणा केला होता. “divorce घ्यायचाच होता तर लग्नच कशाला केलंस?” मला काही जणांनी ऐकवलं. “तूच निवडलं होतंस, तुझ्याच इच्छेने झालं होतं सगळं, तुझं प्रेम होतं त्याच्यावर. आधीच विचार करायचास.” ऐकवणारे कमी नव्हते. मला वाटायचं, “ठीक आहे, चुकली माझी निवड, so what?” मी जाणीवपूर्वक अशा सल्ले देणाऱ्यांना बाजूला केलं.

ह्या गोष्टीला दहा वर्ष होत आली. माझ्या divorce च्या निर्णयाचा मला अजून एकदाही पश्चात्ताप झाला नाही. मी दुसरं लग्न केलं आणि सुखाने संसारही करते. आज पुन्हा ही गोष्ट आठविण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी एका मुलीच्या बाबतीत अशाच गोष्टी माझ्या कानावर आल्या. इथे मुलीवर नीट संस्कार केले नाहीत असंही सांगितलं गेलं. हल्ली बरेचदा अशा divorce च्या घटना कानावर पडतात. त्याचं कारण बरेचदा मुलांना नीट वाढवलं जात नाही, adjust करायला शिकवलं जात नाही, मुलांना हल्ली commitment कळत नाही ह्यावर येऊन थांबतं. का कुणास ठाऊक? पण हे मानायला मन तयार होत नाही.

couple-love-art-marathipizza

स्रोत

passion, intimacy आणि commitment हे प्रेमाचे तीन खांब! सिनेमातल्या प्रेमात आणि प्रत्यक्षातल्या प्रेमात फरक असतो तो हाच. प्रत्यक्ष आयुष्यातले प्रेमविवाह आणि ठरवून केलेली लग्नसुद्धा अनेकदा मोडतात. ह्याचं कारण ह्या तीन गोष्टींचा मेळ बसलेला नसतो.

प्रेम आणि त्याबद्दलच्या कल्पना ह्यांत चित्रपटांचा वाटा फार मोठा असतो. आपलं प्रेम देखील अगदी हिर-रांझा, लैला-मजनू, राज-सिमरन, आर्ची-परशा सारखंच आहे असं प्रत्येकाला वाटतं. त्या काळापुरते आपण सिनेमातले हिरो किंवा हिरोईन असतो. सामान्यत: teenage मध्ये प्रेमात पडल्यानंतर ह्या भावना जास्त प्रभावीपणे जाणवतात. प्रेमात पडणं हे खरंतर तेंव्हाच घडतं. १३-१४ वर्षाच्या वयात मुलांना आणि मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागतं. मेंदूमध्ये स्त्रवणारी काही रसायनं (neurotransmitters)ह्यांत महत्वाची कामगिरी करत असतात. आपल्या हिंदी गाण्यांमध्ये ह्याचं अगदी छान वर्णन केलेलं असतं. प्रेमामध्ये, सर्वत्र प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसणे, तहान-भूक हरपणे, झोप न लागणे (हा सगळा neurotransmitters चा परिणाम) इथूनच प्रेमाचा प्रवास सुरु होतो. तहान-भूक हरपत असली तरी प्रेमामुळे भूकबळी गेल्याचं कधी ऐकलं नाही. अर्थात, प्रेमाचा प्रवास इथे सुरु झाला तरी इथेच संपत नाही.

बऱ्याचदा, ह्या छान-छान फिलिंगवर भाळून साथ जियेंगे, साथ मरेंगे असं ठरवलं जातं. सुरुवातीचं आल्हाददायक फिलिंग हळूहळू ओसरू लागतं आणि ते ओसरल्यानंतर, “झक मारली अन प्रेम केलं”, असं म्हटलं जातं. आपल्याला पूर्वी अप्सरा वाटणाऱ्या मुलीचे पुढे आलेले दोन दात चेटकिणीसारखे वाटू लागतात आणि राजबिंड्या मुलाचा काळा रंग आणि अवाढव्य शरीर नजरेस खुपू लागतं. सुरुवातीच्या प्रेमाला ह्याच वेळी आधाराची गरज असते हा आधार असतो intimacy आणि commitment!

अडनिड्या वयात जेंव्हा प्रेमात पडून, साथ जियेंगे-साथ मरेंगे अशा आणा-भाका घेतल्या जातात, तेंव्हा त्यामध्ये intimacyचा रोल (बरेचदा) खूप कमी असतो. त्या वयातच नाहीतर पाहून, दाखवून केलेल्या लग्नांमध्ये सुद्धा फक्त passion आणि commitment ह्या दोन खांबांवर डोलारा उभा असतो. वयानुसार शारीरिक ओढ कमी होते आणि फक्त commitment उरते. फक्त commitment वर कितीतरी नाती तग धरून राहतात. जेव्हा नातं फक्त commitment वर आधारलेलं असतं तेव्हा फरफट ठरलेली असते. म्हणूनच, “मी होते म्हणून निभावून नेलं”, ही वाक्यं ऐकायला मिळतात. commitment म्हणजे फक्त एखाद्या स्त्रीशी किंवा पुरुषाशी एकनिष्ठ राहणे नाही. commitment म्हणजे जबाबदारी घेणे. चांगल्या, वाईट क्षणी एकमेकांना जपणे. commitment म्हटलं की मला नेहमी वाल्या कोळ्याची गोष्ट आठवते. सुखात वाटेकरी होणारे दु:खात वाटेकरी होताना विचार करतात. फक्त आपणच committed आहोत हे कळल्यावर त्याचा संसारातला इंटरेस्टच संपतो. जेव्हा दोघांपैकी एकच जण commitment पाळत असतो तेव्हा कदाचित कागदोपत्री घटस्फोट होत नसतील, पण संसार सुखाचा नसतो.

प्रेमाचा दुसरा खांब म्हणजे intimacy. Intimacy म्हणजे एकमेकांना ओळखणे. खरोखर मनात काय चाललंय हे समजून घेता येणे. intimacy म्हणजे मैत्री. म्हणूनच जेव्हा नात्यात intimacy असते तेव्हा मतभेद असले तरी भांडणं नसतात. रुसवा, अबोला ह्यांना जागाच नसते. जेंव्हा intimacy असते तेव्हा खूप गप्पा होऊ शकतात. intimacy आणि commitment ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र नांदतात तेव्हा तो संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा असतो. असे कितीतरी आजी-आजोबा आपल्याला भेटतात आणि एकमेकांसोबत ते खूप छान दिसतात. intimacy हळूहळू निर्माण करावी लागते. ह्यासाठी दुसऱ्याच्या आवडी-निवडीबद्दल आदर, विचारांबद्दल आदर, आपल्यापेक्षा वेगळं असण्याचा स्वीकार, विश्वास असणे खूप गरजेचे असते. जेव्हा पार्टनर म्हणून समान विचारांची, समान तत्वांची व्यक्ती निवडली जाते तेंव्हा intimacy लवकर निर्माण होऊ शकते. अर्थात, त्यासाठी पुन्हा कमीटमेंट असावीच लागते.

Intimacy आणि कमीटमेंट नात्यांत रुजवणं आणि त्याला passionची जोड देणं तसं अवघड काम आहे. तो काय तो, ‘आग का दरिया’ वगैरे तो हाच असावा.

हल्ली मुला-मुलींना( त्यांत मी देखील आले) हा दरिया पार करणं जमत नाही का? मला वाटतं, पूर्वीही हे फार कमी जणांना जमत असावं. पूर्वी, एकतर मुलींनी-मुलांनी  मोठ्यांसमोर बोलणं मान्य नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सहन करायलाच हवं ही शिकवण दिलेली असे. त्यामुळे बरेचदा नातं सडलं, मनातून मोडलं तरी लोकांसाठी म्हणून जपलेलं असे. आज जेव्हा मुलगा-मुलगी divorceच्या निर्णयापर्यंत पोहोचतात तेव्हा नात्याला ओढत नेण्याला, एखाद्याच्या मागे फरफटत जाण्याला  त्यांनी नकार दिलेला असतो एवढंच!

marriage-break-marathipizza

स्रोत

आईवडिलांनी आपली मते मांडण्यासाठी, मतांवर ठाम राहण्यासाठी जर सक्षम बनविलेलं असेल तर ही एक चांगली गोष्ट म्हणायला हवी.  जर एखादी मुलगी स्वतंत्रपणे विचार करून दु:खात कुढत जगण्याऐवजी आनंदाच्या शोधात निघत असेल तर ती जमेची बाजू समजायला हवी. त्यात तिने नवऱ्याशी committed असायलाच हवं आणि त्याच्याशी सूर जुळत नसले तरी तिथेच राहायला हवं अशी अपेक्षा  का? हल्ली मुलांना आणि मुलींना adjust करायला शिकवलं जात नाही असं नाही, पण एखादी स्वाभिमानी मुलगी किंवा मुलगाही जर स्वत:च्या मूल्यांशी compromise करायला नकार देत असेल, किंवा स्वत:च्या क्षमता ओळखून ह्या पलीकडे आपण adjust होऊ शकणार नाही हे मान्य करत असेल तर त्यांत चूक ते काय?

=====

=====

हा सगळा विचार लग्नापूर्वीच का होत नाही? होतो नक्कीच होतो. पण समजा, काहीवेळेस अंदाज चुकला तर? ते नातं तसंच ओढत राहायचं? हे म्हणजे, जीव जातोय हे समजतंय, किनाऱ्यावर पोचण्यासाठी कुणीतरी दोर टाकलेला दिसतोय पण आपण हातच पुढे करायचा नाही. हाताशी असणारा दोर सोडून द्यायचा आणि बुडायचं. म्हणजे मूर्खपणा नाही का? लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नक्कीच नाही.  म्हणूनच एखादं नातं जर  त्रासदायक होत असेल तर वेळीच बाहेर पडायलाच हवं. नात्यात adjustment करावी लागतेच पण adjustment म्हणजे स्वत्व हरवणं नक्कीच नाही.

‘आग का दरिया है, डूबके जाना है’,वगैरे ठीक आहे, पण त्यांत स्वत:ला मरेपर्यंत चटके बसत नाहीत ना, ह्याचा विचार करणे शहाणपणाचे नाही का?

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Vasudha Deshpande

Clinical Psychologist and Remedial Trainer

vasudha-deshpande has 4 posts and counting.See all posts by vasudha-deshpande

3 thoughts on “Love, लग्न : आग का दरिया है, डूब के जाना है!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?