' प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास – भाग २ – InMarathi

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास – भाग २

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास : भाग १

===

लेखक – आदित्य कोरडे

१९०१ साली दारू पिऊन बाप मेल्यानंतर आणि आई आधीच मनोरुग्ण म्हणून वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाल्यामुळे हे दोघे भाऊ आता खरेच रस्त्यावर आले. अत्यंत गरीबी आणि उपासमारीमुळे नाईलाजाने  तो आणि त्याचा भाऊ सिडने अक्षरश: रस्त्यावर येऊन लोकांचे हरतर्हेने मनोरंजन करून चार दिडक्या मिळवत आणि पोटाची खळगी भरत. या सगळय़ा प्रतिकूल परिस्थितीनच चार्ली चॅप्लिनला घडवलं.

 

charlie chaplin 9 InMarathi

 

असल्या निराशाजनक वातावरणात राहून स्वत: न बिघडता, न वाया जाता  त्याने पुढे जे कर्तृत्व गाजवलं, जी प्रसिद्धे आणि यश मिळवलं  ते पाहून त्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहवत नाही.

मोठा भाऊ सिडने हा बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला आणि त्याला फ्रेड कार्णो थियेटर्स ह्या तेव्हाच्या बऱ्यापैकी प्रसिद्ध नाटक कंपनीत काम मिळाले. त्याने लगेच आपल्या भावाला चार्लीला त्या कंपनीत ज्युनियर कलाकार म्हणून लाऊन घेतले.

तिथे तो नाटकातल्या दोन प्रवेशांच्या मधल्या काळात नकला वगैरे करून लोकांचे मनोरंजन करीत असे आणि वेळ पडेल तशी इतर कुठलीही कामे करीत असे.

 

charlie chaplin 10 InMarathi

 

१९१० साली तो कंपनी तर्फे कार्यक्रमाच्या दौऱ्याच्या निमित्तानं संधी मिळून  इंग्लंडमधून अमेरिकेत गेला. तिकडे तो छोटे छोटे सिनेमे बनवायला लागला. त्याच्या दारू पिऊन तर्र झालेल्या माणसाच्या विनोदी करामती भलत्याच लोकप्रिय झाल्या.

त्यात त्याचा साथीदार होता नंतर लॉरेल हार्डी ह्या अतिशय गाजलेल्या दुक्कलीतला स्टेनली लॉरेल (मराठीत हीच जोडगळ जाड्या-रड्या म्हणून प्रसिद्ध आहे).ज्याचा बाप दारू पिऊन मेला आणि आई मनोरुग्ण झाली त्या चार्लीने दारुड्याच्या भमिका करण्यात निपुणता मिळवली पण तो तिथेच थांबला नाही.

अशा अनेक भूमिका करता करता त्याला त्याच्या आयुष्यातले प्रभावी पात्र सापडले, तेच ते.. वेंधळय़ा चार्लीचे.. ज्यात तो पडतो, धडपडतो.. त्याच्यावर काही ना काही आदळतं.. किंवा तो कोणावर तरी आदळतो. असा सगळा मसाला असलेले. हसवणारेपण आतून सहृदय परोपकारी.

 

charlie chaplin 11 InMarathi

विचित्र वाटणारे कपडे घातलेलं. छोटी बोलर टोपी आणि मोठे बूट, काठी आणि फेंगडी चाल. ढगळ विजार आणि तंग कोट, फाटका विटलेला शर्ट आणि बेंगरूळ वाटणारा टाय आणि आखूड मिशा. हे विचीत्रतेने भरलेले रसायन लोकाना फारच भावले.

आश्चर्य म्हणजे ह्या अशाच मिशा दुसरा अत्यंत प्रसिद्ध- कुप्रसिद्ध  माणूस म्हणजे हिटलरने ठेवल्या होत्या. – अथात तेव्हा हिटलर आजून जागतिक पटलावर प्रसिद्धीला यायचा होता. पण तरीही चार्लीला नंतर सुद्धा त्या मिशा आपल्या पात्रातून कमी करायची गरज पडली नाही.

 

charlie chaplin 12 InMarathi

 

हा लिटल त्रंप लोकाना इतका भावला आणि प्रसिद्ध झाला कि त्याने जवळपास १७ महिन्यात ४५ छोट्या छोट्या फिल्म्स बनवल्या.

लवकरच जगभरातून लोकांनी त्याच्या ह्या लिटल ट्रंपची नक्कल करणे सुरु केले. अगदी लॉरेल-हार्डी मधल्या लॉरेल ला देखील हा मोह आवरला नाही. खाली उजवीकडचे चित्र त्याचेच आहे.

 

 

त्याचे सुरुवातीचे काही चित्रपट हे लघुपट असत-अर्ध्यातासाचे, “कि-स्टोन” कंपनी बरोबर केलेले पण लवकरच त्याला दुसऱ्या र्दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करणे रुचेना म्हणून त्याने कि स्टोन फिल्म कंपनी सोडून “एसाने” (तीच ती पक्षाच्या पिसांचा टोप घातलेल्या रेड इंडिअनचे चित्र-लोगो असलेली) फिल्म कंपनीशी करार केला इथे त्याला त्याचे चित्रपट स्वत: दिग्दर्शित करायला मिळणार होते.

त्याने स्वत:ची टीम बनवली त्याला नवी फ्रेश नायिका मिळाली एडना प्रोवायन्स. त्यांनी एकूण ३५ लघुपट केले.ती स्वत: फार ग्रेट अभिनेत्री नव्हती पण तिची पडद्यावर चार्लीशी तार जुळली.


charlie chaplin 13 InMarathi

लवकरच त्यांची वाढती प्रसिद्धी आणि यश बघून त्याच्या कडे अनेक ऑफर्स चालून येऊ लागल्या. त्याने मग न्युयोर्कच्या म्युच्युअल फिल्म कोर्पोरेशनशी करार केला. आठवड्याला १० हजार डॉलर पगार आणि एकरकमी दीड लाख रुपये मानधन. लक्षात घ्या हे साल होत १९१६. ज्या काळी सुखवस्तू माणूस आठवड्याला १२ डॉलर कमावून व्यवस्थित राहत असे. म्युच्युअल फिल्म कोर्पोरेशनचे संचालक म्हटले सुद्धा कि युरोप मध्ये चालू असलेल्या युद्धानंतर सगळ्यात महाग चार्लीच आहे.

हा करार घडवून आणण्यात त्याच्या भावाने-सिडनेने महत्वाची भूमिका बजावली. खरेतर तो आधी भरपूर प्रसिद्धी पावला होता. त्याचे काम लोकांना आवडतही असे, पण चार्लीची लोकप्रियता अफाटच होती आणि तो सिडनेशिवाय इतर कुणावर विश्वास ठेवत नसे.

 

charlie chaplin 14 InMarathi

त्यामुळे त्याचे इतर सर्व व्यवहार सिडनेच पाही आणि हे काम आता इतके वाढले कि स्वत:चा अभिनय बाजूला ठेवून तो पूर्ण वेळ चार्लीचे व्यवहार बघू लागला. हे अगदी दिलीपकुमार आणि त्याचा भाऊ नसीर खान सारखेच आहे.

खरेतर मोठा भाऊ नासीर खान दिलीपकुमार आधी चित्रपट क्षेत्रात आला आणि बऱ्यार्पैकी प्रसिद्धी ही पावला पण लवकरच दिलीपकुमारच्या यशापुढे त्याचे यश झाकोळून गेले. पण दोनही ठिकाणी भावाभावात वितुष्ट आले नाही.

म्युच्युअल फिल्म कोर्पोरेशनने त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन, बजेट, टीम, कथा, वेळापत्रक सगळेकाही तो ठरवत असे.

 

charlie- chapllin-15- InMarathi

चार्ली चित्रपट कसा बनवायचा आहे, काय प्रक्रिया असणार आहे, एवढेच काय कथा, पटकथा, दृश्य, सेट आजच्या दिवसाचे काम काही काही कुणाला सांगत नसे त्याची टीम ही फक्त त्याच्या सुचनाचे तंतोतंत पालन करण्यासठी असे.

एडनासारख्या अभिनय फारसा न जमणार्या लोकांनी त्याच्या कडे इतका काळ काढला कारण ते स्वत:चे डोके वापरत नसत चारली त्याना कुठे बसायचे कसे बसायचे हे बारीक सारीक तपशीलही सांगत असे. हा एक खंबी तंबू होता. आणि त्यात स्वतंत्र वृत्तीच्या माणसाना फारसा वाव नव्हता.

 

Directors-Cuts-Chaplin-inmarathi
nerdist.com

इथे अभावितपणे दादा कोंडके ह्यांची आठवण होते. निळू फुले ह्यांनी एका मुलाखतीत दादांच्या ह्या अशाच स्वभावाचे वर्णन केलेले आहे त्यामुळेच ते फार काळ दादांच्या बरोबर राहिले नाहीत.  चार्लीच्या मृत्युनंतर त्याच्या बायकोने त्याचा सगळा  फिल्म रोलचा संग्रह त्याच्यावर माहितीपट बनवायला आलेल्या लोकांना दिला त्यातून त्याचे फिल्म बनवण्याचे अफलातून पण हुकुमशाही तंत्र उघड झाले.

तो स्वत: देखील पटकथा लिहित असे. कॅमेरातून दृश्य बघूनच त्याला चित्रीकरण बरोबर त्याला हवे तसे झाले आहे कि नाही कळत असे आणि पुढे कथा कशी घेऊन जायची हे समजत असे त्यामुळे तो नेहमी प्रेक्षकांना कसे दिसतेय आणि आपण काय दाखवू इच्छितो हे पाहत असे आणि पुढे काय करायचे ठरवत असे.

त्यामुळे कधी कधी एका साध्या साध्या दृश्याचे ५०-६० रिटेक होत असत. दिवसभराच्या शुटिंग नंतर तो स्वत:ला एका खोलीत कोंडून घेत असे आणि आपण दिवसभर शूट केलेल्या फिल्म्स वर काम करत असे. त्या खोलीत फक्त प्रोजेक्टर दिवा टेबल आणि खुर्ची एवढेच असायचे. तेथेच तो पुढे काय करायचे हे ठरवत असे.

charlie chaplin 16 InMarathi

 

दिवस भराच्या कामाचा शिणवटा, भूक, झोप कशाचीही तमा तो बाळगत नसे. दिवसभर मेहनत केल्यावर संध्याकाळ आरामात, मजा करत खात पीत घालवणे त्याला आवडत नसे. तो तितका सोशलही नव्हता, असे कष्ट करणारा चार्ली त्याकाळात आठवड्याला साधारण दीड लाख डॉलर इतकी कमाई करत होता. पण त्याचा वैयक्तिक खर्च ५०० डॉलर ही नव्हता.

त्या काळात पहिले महायुद्ध जोरावर होते पण चार्ली ह्या युद्धप्रयत्नांपासून दूरच होता. त्याबद्दल मायदेशातून इंग्लंडमधून त्याच्यावर टीकाही होत असे. पण त्याने इंग्लंड मधील गरीब मुलांना युद्धामुळे सर्वत्र अन्नाचे दुर्भिक्ष्य झालेले असताना उत्तम खायला मिळावे म्हणून सार्वजनिक शाळातून पैसा पुरवला होता अर्थात ही गोष्ट त्याने अप्रसिद्धत ठेवली.

टीकेचा रोष वाढला तसा त्याने युद्ध प्रयत्नासाठी निधी उभाकाराण्यासाठी सरकारने काढलेल्या लिबर्टी बॉंडची जाहिरात करणारी शोर्ट फिल्म केली. तसेच SHOULDER ARMS  ही विनोदी  शोर्ट फिल्म बनवली ज्यात लिटल ट्रम्प खंदकात लढाई करायला जातो आणि धमाल उडवून देतो. हा चित्रपट त्याने सर्व जगभरात फुकट दाखवला- म्हणजे त्याचे पैसे त्याने न घेता युद्ध प्रयत्नांना दान केले.

 

Little_Tramp_inmarathi
charliechaplin.com

 

तेव्हा अमेरिकेत मोठ मोठ्या स्टुडीओन्चा बोलबाला असे आणि अनेक नट-नट्या त्यांच्याकडे पगारावर काम करत. प्रसिद्ध नटाना जास्त मोबदला देऊन पळवले जात असे ह्याचा फायदा त्या नट-नट्याही घेत आणि सध्याच्या मालकाची अडवणूक करत म्हणून सर्व बड्या स्टुडीओनी आणि वितरकांनी एकत्र येऊन पगार, मानधन कामाच्याशर्ती ह्याबाबत आचारसंहिता लागू करायचे ठरवले. अर्थात ह्यात नटांचा तोटा होणार होता.

म्हणून मग डग्लस फेअर बँक्स, मेरी पिकफोर्ड, चार्ली, ग्रिफिथ अशा बड्या नटलोकांनी एकत्र येऊन आपली UNITED ARTISTS नावाची कंपनी स्थापन केली. ते स्वत:च निर्मिती दिग्दर्शन ते वितरण सगळे करणार होते.

इतर कुणाचीही गरजच नाही. हा त्याकाळी एक क्रांतिकारक निर्णय होता आणि यशस्वीही. ह्याचवेळी चार्ली मिल्ग्रेड हरीस ह्या षोडशवर्षीय नटीच्या प्रेमात पडला आणि ती गर्भवती झाली. दोघांना घाई घाई ने लग्न करावे लागले (लहान वयाच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून नाहीतर तो आत गेला असता.)७ जुलै १९१८ ला  त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव ठेवले नॉर्मन पण तो १० दिवसातच वारला.

चार्ली त्यावेळी लहान मुलासारखा धाय मोकलून रडला अशी आठवण मिल्ग्रेड हरीसनेच नंतर  सांगितली. ह्यानंतरच त्याने  THE KID  हा अत्यंत गाजलेला चित्रपट करायला घेतला.

ही शोर्ट फिल्म नव्हती एक पूर्ण लांबीचा चित्रपट होता आणि त्याचे पूर्ण लांबीचा असणे हे एक आव्हान होते. विनोदी मूकपट अर्ध्यातासाचे असत, त्यात विनोदी घटनांची अव्याहत मालिका असे  लोक पोट धरून हसत पण ही गोष्ट २-२.५ तास सतत चालत नाही. ते प्रकार कंटाळवाणे होऊ लागतात. तेथे मग कथा. करुणा, प्रेम, राग, संशय, समज-गैरसमज अशा इतर भावना, घटना ह्यांचे महत्व वाढू लागते. हे शिवधनुष्यही चार्लीने सहज पेलले.

charlie chaplin 17 InMarathi

 

हा चित्रपट आपल्या पैकी अनेकांनी पहिला असेल आणि नसला पहिला तरी ब्रह्मचारी( शम्मी कपूरचा ) ड्रीम गर्ल. कुंवारा बाप ( मेहमूद) तरी पहिले असतीलच. हे गाजलेले चित्रपट ह्या THE KID वरच बेतलेले होते. नव्हे त्यातले अनेक प्रसंगही THE KID मधील प्रसंगांवरून सही सही उचलले होते.

रस्त्यावरच्या टाकून दिलेल्या अनाथ मुलाला भणंग ट्रंप वाढवतो दोघात बाप मुलाचे नाते तयार होते, पुढे अनाथाश्रामावले सत्य कळल्यावर त्यामुलाला जबरदस्तीने ट्रंप पासून काढून घेऊन जातात हे दृश्य फक्त हृदय द्रावक नाही तर त्याला स्वत: चार्ली लहान असताना आईला वेडाचे झटके येतात म्हणून त्याच्यापासून तोडून मनोरुग्णालयात दाखल केलले गेले होते त्याची खरी पार्श्व भूमी आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com |त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?