गुरुदत्त…!!! (भाग २)

पहिल्या भागाची लिंक: गुरुदत्त…!!! (भाग १)

===

‘बाजी’ च्या वेळेसच त्याच्या डोक्यात प्यासाचं कथानक घोळत होतं. पण इतकी तरल भावस्पर्शी कथा प्रेक्षक स्वीकारणार नाहीत अशी भीती वाटून त्याने थोडसं थांबायचा निर्णय घेतला आणि त्याचे जाल(१९५२), बाज(१९५३) आरपार(१९५४) हे सगळे धंदेवाईक चित्रपट ओळीने आले. त्याच्या पहिल्या चित्रपटची नायिका गीताबाली हिला घेऊन जाल आणि बाज काढले होते . बाज अत्यंत भिकार पोशाखी चित्रपट होता तो, अर्थातच कोसळला. या चित्रपटाच्या निमित्ताने गुरुदत्त, गीताबाली ची बहिण (योगिता बालीची आई) हीच्या बरोबर भागीदारी करून ‘फिल्म आर्ट’ ही संस्था काढून तो निर्माता आणि नायक ही झाला. खरंतर हा चित्रपट त्याचा नायक म्हणून पहिला चित्रपट पण तो दाणकन आपटला. गाणी ही फारशी बरी नव्हती. त्यामुळे बाजी मध्ये हात दिलेली खेळी ती पुन्हा एकदा आरपार मध्ये खेळला.

gurudatta-02-marathipizza

१९५४ साली आलेल्या गुरुदत्त प्रोडक्शन च्या आरपार ह्या पहिल्याच चित्रपटाने ओ.पी. नय्यर ला संगीतकार म्हणून नावारूपाला आणले. तसे ह्या आधी त्याने संगीत दिलेले कनीज(१९४९) आणि आसमान(१९५२) हे दलसुखलाल पंचोलीची निर्मिती असलेले चित्रपट येऊन गेले होते पण त्याचं फारसं नाव काही झाल नाही. गुरुदत्तच्या भिकार ‘बाज’ चा हि तोच संगीत दिग्दर्शक होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बेतलेली कथा, धमाल गाणी, श्यामा, शकीला सारख्या नायिका आणि तत्कालीन प्रचलित अशी मुंबईया हिंदी-मराठी भाषेवर बेतेलेले संवाद (म्हणजे ‘हमको’ ‘तुमको’ असे शब्द किंवा स्वतःबद्दल बोलताना ‘याऱोका टाईम आजकल खराब चल रहा है.’ असे संवाद). मुंबईतले गल्लीबोळ, तिथली खट्याळ, वात्रट, काहीशी मवाली मुलं, हे सगळं बारकाईने सिनेमात पहिल्यांदा आरपारने आणले. श्यामा ह्या अत्यंत सुंदर, अवखळ, बोलक्या डोळ्याच्या, फ्रेश नायिकेनी कमाल केली. तिची सगळी गाणी गाजली. आजही ती गाणी नुसती श्रवणीय नाहीत तर प्रेक्षणीय सुद्धा आहेत.

=====

=====


‘ये लो मै हारी पिया’… म्हणताना फक्त गाडीत बसून तिने चेहऱ्यावर जे जे विविध भाव दाखवले आहेत ते पाहून गाणं ऐकायचं विसरायला होतं. या गाण्यात एक प्रसंग आहे. श्यामा ‘लडते हि लडते मौसम, जाये नाही बित रे…’ म्हणत असताना, गुरुदत्त गाडी चालवत असतो. अचानक कोणीतरी गाडी समोर येतं म्हणून गुरुदत्त पटकन पुढे स्टेअरिंग कडे सरकतो आणि परत मागे सीट कडे येतो तो जसा मागे पुढे सरकतो त्या लयीत श्यामा सुद्धा पुढे मागे सरकते आणि नुसती सरकत नाही तर अगदी तरंगत गेल्यासारखी वाटते. ती त्याच्या चेहऱ्यावरची स्वतःची नजर जरासुद्धा हलवत नाही.

कितीही वेळा हा प्रसंग पहिला तरी मनाचं समाधान होत नाही. जेव्हा जेव्हा हे गाणं मी पाहतो तेव्हा हा शॉट मी २-३ वेळा रिपीट करून पाहतोच. ते कशाला? खाली लिंक दिलेली आहे गाण्याची, गाणं आणि तो प्रसंग आवर्जून पहाच.

गाण्याची लिंक: ये लो मै हारी पिया

संगीत कथा संवाद अभिनय सर्वच बाबतीत ‘आरपार’ ने इतिहास घडवला आणि मुख्य म्हणजे गुरुदत्तला तगवलं.

‘आरपार’ नंतर त्याचे Mr. & Mrs. ’55 (१९५५), आणि सी आय डी (१९५६) हे चित्रपट आले.

Mr. & Mrs. ’55 हा रोमांटिक कॉमेडी होता. मधुबाला, टूणटूण, जॉनी वॉकर, ललिता पवार, यांनी मजा उडवून दिली. यातली गाणी सगळी गाजलीच पण त्याच बरोबर गाणी चित्रित करण्याच एक वेगळ, खास गुरुदत्ती तंत्र इथे पूर्ण पणे विकसित झालेलं पाहायला मिळालं. पुढे हि कला राज खोसला आणि विजय आनंदने अधिक जोपासली.मी काय म्हणतो हे जो पर्यंत तुम्ही ‘जाने कहा मेरा जिगर गया जी…’ किंवा ‘दिल पर हुवा ऐसा जादू…’ ही गाणी पहात नाही तोपर्यंत नीट कळणार नाही. खाली लिंक दिलेल्या आहेत.

जाने कहा मेरा जिगर गया जी

दिल पर हुवा ऐसा जादू…

 

पूर्वी गाणं सुरु होताना आधी चित्रपटात वातावरण निर्मिती व्हायची, काही विशिष्ट प्रसंग, नायक, नायिकेचे हावभाव, संवाद झडायचे. नंतर सुरावट वाजू लागायची. म्हणजे प्रेक्षकांना कळायचं की आता ‘गाणं होऊ घातलय.’ आणि ते सावरून बसत किंवा झोपायची तयारी करत. पण ‘दिल पर हुवा ऐसा जादू…’ ने प्रथमच हे संकेत पायदळी तुडवले. काहीही वातावरण निर्मिती न करता धाडकन ‘दिल पर हुवा ऐसा जादू…’असे शब्द आपल्या कानावर येऊन आदळतात. मज्जा येते.

ह्या चित्रपटातले प्रसंग ही तसेच खुमासदार होते. ललिता पवार (सीता देवी ) गुरुदत्तने(प्रीतम) काढलेल्या कार्टून मुळे( हे कार्टून प्रत्यक्षात आर के नारायण यांनी काढले होत एव्हढच नाहीतर चित्रपटात कार्टून काढताना दाखवलेला हात त्यांचाच आहे – रोमन ष्टाइल रथात ललिता पवार बसलेली आहे आणि घोड्याच्या जागी गुरुदत्त आणि मधुबाला यांना दावणीला बांधले आहे असे ते कार्टून आहे ) भडकून त्याला जाब विचारायला जाते तेव्हा तिच्या प्रश्नांना तो फक्त ‘जी हां” एवढेच उत्तर देतो. तो एकूण चार वेळा ‘जी हां’ म्हणतो पण प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने म्हणतो. एवढ कमी म्हणून कि काय शेवटी चिडून जेव्हा ललिता पवार वैतागून “तुमसे तो कोई शरीफ इन्सान बात हि नही कर सकता. मेरा वकील हि तुमसे बात करेगा” असे म्हणते तेव्हा गुरुदत्त “क्यु, आपके वकील साहब शरीफ इन्सान नही है क्या?” असे विचारतो तेव्हा ह्या प्रसंगावर कळस चढतो.

‘जाने कहा मेरा जिगर गया जी…’ या गाण्यात साधी exstra असलेल्या जुली हे तिच्या पात्राचे नाव होतं – यास्मिन -विनिता भट्टने जो अभिनय केला आहे तो नक्कीच तिच्या कडून गुरुदत्तने करून घेतला असेल. “बाते है नजर कि नजर से समझाऊन्गि… म्हणताना तिने केलेले दृष्टीविभ्रम केवळ अप्रतिम. या एका गाण्याने ती अजरामर झाली आहे. आणि श्रेय गुरुदत्तचच आहे. तिला ह्या एका चित्रपटामुळे भरपूर प्रसिद्धी मिळाली पण तिने त्याच चित्रपटाच्या प्रोडक्शन टीम मधल्या जिमी विनिंग नावाच्या पारशी मेकअप आर्टिस्ट बरोबर लग्न केले, पुढे काम केले नाही किंवा केले असल्यास मला माहित नाही.

‘बाजी’ मध्ये देव आनंदने पाळलेल्या वचनाची परतफेड गुरुदत्तने १९५५ साली आलेल्या ‘सी. आय. डी.’ मध्ये त्याला हिरो करून केली. ‘सी. आय. डी.’हा तुफान चालला. कथा, गाणी सगळ हिट होतं. राज खोसला गाण्याच्या चित्रीकरणाला होता. तो आठवण सागतो, अत्यंत गाजलेल्या ‘लेके लेके पहला पहला प्यार’ च्या चित्रिकरणावेळी देव आनंद विचारत होता “मी या गाण्यात नक्की काय करायचं/ शीला वाज गाणं म्हणत नाचते, पेटीवाला गाणं म्हणतो, शकीला रुसल्याचा अभिनय(?) करते, मी काय करू?” गुरुदत्त म्हणाला “काही नाही तू फक्त चाल.” देवआनंद म्हटला “म्हणजे! मी अभिनय किंवा हातवारे काय करायचे आहेत?” गुरुदत्त म्हणाला “नाही, काही नाही , काहीही नाही, तू फक्त चाल. चालत रहा, तुझा देवानंद म्हणून वावरच पुरेसा आहे.”

=====

=====

हा वहिदा रेह्मानाचा गुरुदत्त कडचा पहिला चित्रपट यात तीची भूमिका काहीशी निगेटिव होती. तिचं गुरुदत्तच्या आयुष्यातलं पदार्पण ही निगेटिवच ठरणार होतं, ह्याची ती नांदी होती.

अजून गुरुदत्तचे प्यासा , साहिब बीबी और गुलाम कागज के फुल अशा अत्यंत महत्वाच्या चित्रपटाबद्दल लिहायचे आहे . पण ह्या एका एका चित्रपटावर एक स्वतंत्र लेख होईल म्हणून आता हा जरा लांबलेला लेख आवरता घेतो. आणि हे चित्रपट पुढच्या लेखाकरता राखून ठेवतो…

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: