' मौका पोस्टबाजीच्या वस्त्रहरणाचा : परळी वैजनाथच्या राजकारण्यांची सोशल मिडीयावर सुंदोपसुंदी ! – InMarathi

मौका पोस्टबाजीच्या वस्त्रहरणाचा : परळी वैजनाथच्या राजकारण्यांची सोशल मिडीयावर सुंदोपसुंदी !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : अनिरुद्ध जोशी

===

काल रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस होता. पण, परळी वैजनाथ शहरातील सोशल मीडिया तुंबळ आरोप-प्रत्यारोपात गुंतलेला होता. मागे विश्वचषक स्पर्धेत “मौका, मौका” नावाची जाहिरात चांगलीच गाजली होती. अगदी त्याच पद्धतीने आज मौका आहे समाज माध्यमांतील पोस्टबाजीच्या वस्त्रहरणाचा. मात्र, या सर्व घटनेत आपण सारे माणूस म्हणून उत्तरोत्तर किती संकुचित होत आहोत हे जाणवलं. मागे एका भेटीत अरविंद जगताप म्हणाले होते की “सध्या इमारतींचे मजले वाढतं आहेत पण माणसांची मने खुजी होत आहेत.” या घटनेनंतर अनेकांच्या अनेक स्वभाव छटा समोर आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष महोदयांची सोशल मीडियावर नागरिकांनी चांगलीच फिरकी घेतली आहे. त्यांनी फेसबुकवर रविवारी सकाळी परळी वैजनाथ – अंबेजोगाई रस्त्याच्या संथ कामांबाबत एक ओपिनियन पोल घेतला.

तसे पाहता तो पोल रास्तही होता. मात्र त्याचवेळी नजीकच्या काळात नगर परिषदेने बांधलेल्या निकृष्ट रस्त्यांचे दायित्व कोणाचे? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर काही तासांतच भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि शहरातील सुजाण नागरिकांनी त्यांच्या पोलची पोलखोल केली. घटना वरकरणी साधी वाटतं असली तरी त्यात मानवी भावभावनांचे कंगोरे आहेत.

मूळात फेसबुक पोलने काय साध्य होते हे आजवर समाज माध्यमं विश्लेषकांनादेखील न उलगडलेले कोडे आहे. समाज माध्यमांत वावरताना आपला उथळपणा किंवा बालिशपणा लवकर उघडा पडण्याची भीती असते. नेमका काहीसा प्रकार याप्रकरणात बघायला मिळाला. माजी नगराध्यक्षांना अगदी नवखा युवा मोर्चा अध्यक्ष आणि त्याचे सहकारी भारी पडले की उलटपक्षी माजी नगराध्यक्ष शिरजोर ठरले हे येणार काळच ठरवेल.

 

parali-vaijanath-inmarathi
suri441.wordpress.com

हा ड्रामा अधिकाराने बघून भाष्य करणाऱ्या सामान्य लोकांच्या समस्या मात्र अनुत्तरीतच राहिल्या. गेल्या काही वर्षांपासून शहरात नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. एक नाकारून चालणार नाही की गेल्या काही काळात काही विकास कामे झालीत मात्र बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची किंवा अपूर्ण आहेत.

त्यामुळे इथले विरोधक म्हणून भाजपा पदाधिकारी अधून-मधून काहीतरी आंदोलने करत राहतात. पण एकंदर बघता देशात काँग्रेसला जशी मरगळ आली आहे तशी मरगळ इथल्या भाजपला आली असल्याचे जाणवते. उलटपक्षी इथे राष्ट्रवादी काँग्रेस देशातल्या भाजपप्रमाणे जोमात आहे.

या सर्व राजकारणी वातावरणात सामान्य जनतेच्या मणक्याचे आणि गाड्यांच्या Shock Absorber ची वाट लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आणि केंद्रात समन्वय नसला की तिथल्या नागरिकांची कशी हेळसांड होते याचे Prime Example म्हणजे परळी वैजनाथ शहर.

शहरांतर्गत बांधलेल्या निकृष्ट रस्त्यांचे दायित्व घ्यायला कोणी तयार होत नाहीये. तर, खराब राज्य महामार्ग बांधताना जी संथ गती सुरु आहे तिलासुद्धा कोणी वाली नाही. इथे भाजपच्या जाहीरनाम्यात जड-अवजड वाहनांसाठी बायपासची घोषणा होऊन आता ९ वर्षे उलटतील पण हा प्रकल्प कोण “बायपास” करतोय हे कळायला मार्ग नाही. तसेच शहरांतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल वाहतुकीसाठी अपुरा आहे म्हणून नवीन पर्यायी पुलाची घोषणा भाजपतर्फे केली गेली. मात्र, बहुधा पुन्हा ती घोषणा २०१९ च्या निवडणूक रणधुमाळीत केली जाईल.

शहरांतर्गत अडचणींसाठी भाजप राष्ट्रवादीला बोल लावते. तर शहर बाह्य कामांबाबत राष्ट्रवादी भाजपच्या नावाने शंख करते. थोडक्यात यात सामान्य माणसाचा फुटबॉल केला जातो.

 

Slogans-inmarathi
ailypost.in

असं म्हणतात की “यशाचे श्रेय घ्यायला अनेकजण सरसावतात पण अपयशाचा वाली कोणी नसतो”. अशावेळी सामान्य जनतेने किंवा पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्यांची हेटाळणी केली जाते. जी काही पोस्टबाजीची राळ काल-परवा उडाली त्यातून भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे चीत – पट आहेत. पण, हे नाण जनतेच्या कामाबाबतीत चलनी आहे का याचा ज्याचा त्याने करावा. आणि हा विचार करताना एक लक्षात घेतलेले बरे की राजकारणी लोकांना जनताच चीत – पट करू शकते.

या घटनेतून अजून एक बाब समोर आली ती म्हणजे ‘मनुष्याला इतिहासात रमणे प्रचंड आवडते त्यामुळे तो वर्तमान आणि भविष्य दोन्हींवर अधिकाधिक अन्याय करत असतो.’ “तुमच्या काळात झालं नाही, तुम्ही केलं नाही, तुम्ही काय केलं माहितीय, तुम्ही राज्यात – केंद्रात आहात” असे रटाळ सूर आळवले गेले. यातील चर्चेत कोणीही वर्तमानात

“पक्षभेद विसरून आपण सारे मिळून शहरांतर्गत आणि शहरबाह्य रस्त्यांसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आदी लोकांची भेट घेऊ आणि कामे तत्काळ मार्गी लावू जेणेकरून सर्व नागरिकांच्या येण्याजाण्याची सोय होईल.”

असे म्हटले नाही हे दुर्दैव आहे. ही एका गावाची परिस्थिती नाहीतर देशातील बहुतांश भागात नागरिकांच्या समस्यांचे मूळ असलेल्या केवळ राजकीय ईच्छाशक्तीच्या अभावाची वास्तव दाहकता आहे. आपल्याला डेमो आवडतो म्हणून 3 इडियट्स चित्रपटाप्रमाणे डेमो देण्यासाठी प्रातिनिधीक स्तरावर माझेचं गावं निवडले.

◆ विराम घेता घेता..

या प्रकरणात काही बाष्कळ “तळीरामांनी” चौथ्या स्तंभाला उद्देशून शिखंडीसारख्या टिपण्णी केल्याचे दिसून आले. अजून एक महत्त्वाचे म्हणजे “जेव्हा विचार करण्याची क्षमता समाप्त होते किंवा समोरची व्यक्ती अपरिपक्व असते तेव्हा वैयक्तीक टीका टिप्पणीचे खेळ खेळले जातात.” त्यांना सुज्ञ नागरिक या नात्याने शुभेच्छा देण्याव्यतिरीक्त मी काहीच करू शकतं नाही. कारण शेवटी हा ज्याच्या त्याच्या संस्कारांचा भाग असतो.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?