' जस्टिन बिबरच्या लिप सिंक चे गुन्हेगार आपणच! – InMarathi

जस्टिन बिबरच्या लिप सिंक चे गुन्हेगार आपणच!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जस्टिन बिबर कॉन्सर्टमध्ये निव्वळ लिप-सिंकिंग करत होता म्हणून लोक भडकलेयत म्हणे! का भडकावं त्यांनी? तो जर लिप-सिंकिंग करत होता, तर ते या लोकांमुळेच ना! नाही समजलं?

साधा विचार करा. आज लोकांना गायक कसा हवा असतो? हँडसम, एखाद्या मॉडेलसारखा! त्याचे शरीरसौष्ठव एखाद्या अॅक्शनस्टारप्रमाणे हवे, त्याचे नखरे राजस हवेत, त्याचा रुबाब जगावेगळा हवा. त्याचे दिसणेच नव्हे, तर बोलणे-चालणे, हात हलवणे सगळे कसे परिपूर्ण हवे! याला काय म्हणतात? इमेज! याउलट काही काही गायक या इमेजचे अँटीथिसिस असतात. ते पारोश्यासारखे फिरतात, दाढीचे खुंट भणंगासारखे वाढवून भटकतात, अगम्य वागतात-बोलतात आणि त्याहून अगम्य गातात! हीदेखील इमेजच!! याही इमेजमागे वेडे होणारे लोक असतातच. पण ही काय अथवा ती काय, दोन्हीही इमेज बनवताना प्रचंड मेहनत लागते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे पैसा लागतो. बरं नुसतं इमेज बनवून भागत नाही. हजारो मार्ग वापरून ती टिकवावीही लागते. मोठंच वेळखाऊ काम! आता अश्या महत्त्वाच्या कामात गुंतल्यामुळे रियाजासारख्या कमी महत्त्वाच्या, दुय्यम कामांसाठी वेळ मिळतो होय? तुम्हाला वाटेल, मी रियाजाला दुय्यम का म्हणालो? या उपहासापाठचे बोचरे सत्य समजून घ्या.

justi-bieber-lip-sync-marathipizza01
indianexpress.com

बिबरच्या कॉन्सर्टला आता बोल लावणाऱ्यांपैकी किती जण खरोखर त्याला ‘ऐकायला’ आले होते नि किती जण त्याला नुसतेेच ‘पाहायला’ आले होते? साहजिकच बिबरच्या स्टार स्टेटसमुळे त्याला पाहायला आलेल्यांची संख्या निश्चितपणे जास्त असणार, शिवाय ऐकण्यासाठी जो तयार कान लागतो त्यावर मेहनत घेण्याची अक्कल असती, तर हे लोक बिबरच्या कॉन्सर्टला का गेले असते, कुणा पंडितजी वा खानसाहेबांना नसतं ऐकलं? मग जर ऐकणे हेच मुळात लोकांसाठी दुय्यम होऊ लागलेय, तर त्या बिबरसाठी आणि त्याच्यासारख्या इतर सगळ्यांसाठीही रियाज दुय्यम होणारच ना! शेवटी ज्याची जी लायकी असते, तेच त्याला मिळते!!

याची अजून एक बाजू आहे. एखादं गाणं रिलिज होतं. ते तुम्हाला आवडतं. गायक प्रसिद्ध होतो, स्टार होतो. त्याची लाईव्ह-इन कॉन्सर्ट अनाऊन्स होते. तुम्हाला ती ऐकायला/बघायला जायचीच असते. या इथे सगळी गडबड आहे. हल्ली क्वचित, लाखात एखादा अपवाद वगळता, कोणतेच गाणे चिरकाल टिकणारे होत नाही. कसे होणार? संगीतकाराने संगीतासाठी कधी तळमळून जीव झुरवलेलाच नसतो. गायकाला लहानपणी कुणीतरी सांगितलेले असते की, मस्त गातोस/गातेस हं! तेवढ्याने हुरळून जाऊन आईबापाने गाण्याच्या क्लासला घातलेले असते. रिअॅलिटी शोजनी असली काही पाचर मारून ठेवलीये की, तिथली चमकधमक पाहून सगळ्यांनाच झटपट प्रसिद्ध व्हायचे वेध लागलेयत. त्यामुळे दोन-एक पुस्तकी परिक्षा दिल्या अथवा जरा चार-दोन गाणी ‘बसली’ की, लोकांना आपण पट्टीचे गायक असल्याचा साक्षात्कार होतो. मग आहे नाही तो क्लासही सोडून रिअॅलिटी शोज अथवा युट्यूबवर झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी धावणे सुरू होते.

रिअॅलिटी शोज मुळातच उथळ पाणी. तिथेही गाण्यापेक्षा दिसणे, वागणे, फ्लर्टींग, सहानुभूती असल्याच प्रकारांची चलती असते. त्यामुळे मोठे गायक असल्याचा गैरसमज तिथेही धुवून निघत नाही. नाव होते, गाणी हिट होऊ लागतात. तासनतास रियाज? ते काय असतं! खरी गंमत येते ती, रिकॉर्डिंगच्या वेळेस. तुम्ही-आम्ही जे गाणं ऐकून वाहवा करतो, ते गाणं प्रत्यक्षात रिकॉर्ड होताना शेकडो टेक्स झालेले असतात. कधी आवाजच लागत नाही, तर कधी सुरच पोहोचत नाही, कधी अमुक, कधी तमुक! सुर पक्के नसले की काहीतरी गायचं म्हणून गायलं जातं. पण त्याची कुणीच पर्वा करत नाही. सुर पक्के करून गाणं परिपूर्ण करण्याइतका वेळ आहेच कुणाकडे? पैश्यांच्या शर्यतीत धावताना रोजच्या अनेक रिकॉर्डिंग्स उरकायच्या असतात. रिकॉर्डिंग्स जरी नसल्या तरी उगाचच “हा हा हू हू” करत बोंबलत फिरायचं असतं, छान छान दिसायचं असतं, सोशल मिडियावर फॅन्सशी इंटरॅक्ट करायचं असतं! अश्यावेळी मदतीला येतात ती वेगवेगळी सॉफ्टवेअर्स!

indian-singer-recording-marathipizza
bollywoodmantra.com

ऑटोट्यून आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक असेल. अशी अनेक सॉफ्टवेअर्स असतात. ती तुमची पिच सुधारण्यापासून काय वाट्टेल ते करून देतात. तुम्ही-आम्ही जे हिट गाणं ऐकून माना डोलावतो ना, ते गाणं नैसर्गिक नसतंच मुळी! बहुतांशी वेळा ते शेकडो रिटेक्स आणि अनेक सॉफ्टवेअर्सच्या मार्गांनी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आता मला सांगा, असा गायक वा गायिका कॉन्सर्टमध्ये त्याच दर्जाचं काय कप्पाळ गाणार? मग आपलं पितळ उघडं पडू नये यासाठी म्हणा, वा श्रोत्यांचा रसभंग होऊ नये म्हणून म्हणा, ही मंडळी प्रि-रिकॉर्डेड व्होकल्सचा आसरा घेतात.

वर मी रिअॅलिटी शोजबद्दल लिहिलंय. खरं सांगतो, एकेकाळी मला वाटायचं की ते जे दाखवतात ते खरंच असतं. माझे सर्वाधिक आवडते गायक आहेत एस. पी. बालासुब्रह्मण्यम! केवळ ते होस्ट करतात म्हणून काही वर्षांपूर्वी मी एक तेलुगू सिंगिंग रिअॅलिटी शो पाहायला सुरुवात केली “पाडुदा तिय्यगा”.

माझे एक एक गैरसमज धडाधड उन्मळून पडू लागले त्या शोनंतर. त्यातली पोरं दिसायला सामान्य, मेकअप वगैरे फारसा न केलेली; पण गायकीवर मेहनत? अहाहा! प्रत्येक गाण्यानंतर विद्वान एस. पी. असं काही सुरेख निरुपण करायचे की बासच!!

Padutha-Theeyaga-marathipizza
youtube.com

आपल्याकडे होतो तो केवळ कमी वकूबाच्या लोकांचा स्क्रिप्टेड ड्रामा!! मुळात हिंदू संस्कृतीनुसार संगीत ही साधना आहे. ती वर्षानुवर्षे खपून करायची असते. तेव्हा कुठे त्याला अध्यात्माचा सुगंध येऊ लागतो व ते संगीत दैवी होऊ लागते. मगच ते अनेक वर्षे टिकू शकते. हल्ली साधना, पूजा, ईश्वराचे अस्तित्व, अध्यात्म म्हटले की नाक मुरडणाऱ्या पिढ्या आपण जन्माला घालून ठेवल्यायत. भौतिक चमकधमक पाहून आम्ही त्यांचं एवढं काही अनुकरण करू लागलो की, सारे काही एकाच ठराविक साच्यात बनू लागलेय. तिथे नवोन्मेषाचा सुगंध कसा काय येणार? इतका मूलभूत विचार केला की आपण त्याच्यावर प्रतिगामी असल्याचं लेबल चिकटवून टाकतो आणि तरीही आश्चर्य करत बसतो की साठच्या दशकातली गाणी अजूनही कशी लक्षात राहातात पण आजची गाणी पंधरा दिवसही का धड टिकत नाहीत!!

आजसुद्धा संगीताला तपश्चर्या मानून त्याची साधना करणारे अनेक गायक/संगीतकार आहेत. संख्येने थोडे असतील, पण आहेत. त्यांच्या कॉन्सर्ट्सची तिकिटं लाखों रुपयांना नसतात. पण ते त्यांच्या कॉन्सर्ट्समध्ये जे गातात वा वाजवतात, ते शंभर नंबरी खरे असते. सापडायला अवघड असतील ते, पण शोधले तर नक्की सापडतात. संगीताच्या व्यवसायाची सिस्टिमच नव्हे, तर आज आपल्या तथाकथित प्रगत जगाने प्रगतीच्या नावाखाली बनवलेल्या अनेक सिस्टिम्स प्रत्यक्षात फालतू आणि कमी दर्जाच्याच निघाल्या आहेत. सृष्टी इतकी परिपूर्ण आहे की, ती कोणतीच अनफिट गोष्ट फार काळ राहू देत नाही. यासुद्धा सिस्टिम्स कोसळणार. भले त्यांचा काळ तुमच्या-आमच्या आयुर्मानांपेक्षा अनेक पटींनी जास्तही असेल कदाचित, पण ब्रह्मांडाच्या कॅनव्हासवर तो काळ म्हणजे किस झाड की पत्ती! तेव्हा ही मिडियॉक्रसीसुद्धा थांबणार. सगळीच पडझड झाली, की काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण होईल. जुनी खोडं जातील, पण त्यातूनच नवीन, सकस अंकुर फुटतील. बघाच!!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?