' ब्राह्मणाऐवजी कुणबी केले म्हणून तुकोबा देवाचे आभार मानीत आहेत : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३२ – InMarathi

ब्राह्मणाऐवजी कुणबी केले म्हणून तुकोबा देवाचे आभार मानीत आहेत : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३२

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३१

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

दुसऱ्या दिवशी आबा आणि नारायण ह्या दोघांना काही शिकवावे म्हणून रामभट आले ते हाती चिपळ्या घेऊन आणि गाऊ लागले –

सुंदर ते ध्यान उभें विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ।।
तुळशीहार गळां कासे पितांबर ।
आवडे निरंतर तें चि रूप ।।
मकरकुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ।।
तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ।।

मग म्हणू लागले,

आबा, नारायणा, एकेकाळी तुकोबांच्या ज्या अभंगाला मी हसत असे तो हा अभंग आहे. मला वाटत असे, भोळ्या भाबड्या लोकांना बरे वाटावे म्हणून हा तुकाराम एका दगडी शिल्पाचे किती कौतुक करतो! ह्या तुकारामाची भाषा छान पण ह्याला काही अर्थ आहे काय? कौतुक कुणाचे केले पाहिजे, तर ती सुंदर मूर्ती ज्याने घडविली त्या शिल्पकाराचे. ते केलेले मी कधी पाहिले नाही. पांडुरंगाचे गुणगान मात्र सारखे चालू ठेवीत.

 

सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती ।
रखुमाईचे पती सोयरिया ।।
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ ।।
विठो माऊलिये हा चि वर देईं ।
संचरोनि राहीं हृदयामाजी ।।
तुका ह्मणे कांही न मागे आणीक ।
तुझे पायीं सुख सर्व आहे ।।

 

तुकोबांनी असे केवळ पांडुरंगाच्या रूपाचे केवळ कौतुकच चालविले नव्हते तर त्याच्याकडे ते याचनाही करीत होते! मला ह्या सर्व गोष्टींचे फार नवल वाटत असे. जो काही देऊ शकत नाही त्याच्याकडे काय मागायचे आणि तो देणार तरी काय?
आदि शंकराचार्यांचे एक स्तोत्र आहे. ते म्हणतात –

 

आनन्दे सच्चिदानन्दे निर्विकल्पैकरूपिणि ।
स्थितेऽद्वितीये भावे वै कथं पूजा विधीयते ।।
पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनम् ।
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं तु शुद्धस्याचमनं कुतः ।।
निर्मलस्य कुतः स्नानं वस्त्रं विश्वोदरस्य च ।
निरालम्बस्योपवीतं पुष्पं निर्वासनस्य च ।।
निर्लेपस्य कुतो गन्धो रम्यस्याभरणं कुतः ।
नित्यतृप्तस्य नैवेद्यस्ताम्बूलं च कुतो विभोः ।।
प्रदक्षिणं ह्यनन्तस्य ह्यद्वयस्य कुतो नतिः ।
वेदवाक्यैरवेद्यस्य कुतः स्तोत्रं विधीयते ।।
स्वयं प्रकाशमानस्य कुतो नीराजनं विभोः ।
अन्तर्बहिश्च पूर्ण्स्य कथमुद्वासनं भवेत् ।।
एवमेव परा पूजा सर्वावस्थासु सर्वदा ।।
एकबुद्ध्या तु देवेश विधेया ब्रह्मवित्तमैः ।।
।। इति परा पूजा स्तोत्रम् समाप्तम् ।।

 

मी शंकराचार्यांचा अभिमानी. किंवा म्हणा दुराभिमानी. आचार्यांना नेमके काय म्हणायचे आहे ते कळण्याइतके शहाणपण माझ्याकडे त्यावेळी होते कुठे? तुकोबांचे सगुणाचे कौतुक मला राग आणू लागले. दुसरे असे झाले की लोकांमध्ये तुकोबा त्याच सगुणभक्तीमुळेच लोकप्रिय होत आहेत असा माझा समज झाला. देवळादेवळांतून तुकोबांचे विठ्ठलावरचे अभंग ऐकू येऊ लागले. ते मला पटे ना. आजही मी हेच म्हणतो की आचार्यांसारखा तत्त्ववेत्ता सहजी व्हायचा नाही. तेव्हाही हेच म्हणत असे. फरक इतकाच की आचार्यांनी पुनःप्रस्थापित केलेला अद्वैत सिद्धांतच ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ आणि आता तुकोबा सांगत आहेत हे मला तेव्हा कळत नव्हते. हे न कळण्याचे कारण इतकेच मी एक ब्राह्मण आणि त्यात संस्कृताचा चांगला जाणकार होतो. अनेक दर्शनांचा अभ्यास केला होता. ब्राह्मण समुदायात मला मान होता, शब्दाला वजन होते. माणसाला अभिमान कधी स्पर्श करतो ते त्याला कधी कळत नसते. माझ्यासारख्या लोकांकडे पाहूनच तुकोबा म्हणून म्हणाले –

 

बरा कुणबी केलो । नाहीं तरि दंभेचि असतों मेलों ।।
भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ।।
विद्या असती कांही । तरी पडतों अपायीं ।।
सेवा चुकतों संतांची । नागवण हे फुकाची ।।
गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ।।
तुका ह्मणे थोरपणे । नरक होती अभिमाने ।।

 

तुकोबा स्पष्टपणे सांगत आहेत की गर्व झाला की, माणसाला विनाकारण ताठा येतो आणि तो अवनत होऊ लागतो, मृत्यूपंथालाच जणू तो लागतो. मनुष्य स्वतःला थोर समजू लागला की, त्या चुकीच्या अभिमानाने स्वतःच नरक बनतो. मग त्याच्याकडून संतांची सेवा होत नाही आणि आपणच आपली फुकाची नागवण केली असे होते. असा ताठा त्याला येतो याचे कारण त्याच्यापाशी काही विद्या असते. मात्र, त्या विद्येचाच त्याला गर्व होतो आणि तो स्वतःला अपाय करून घेतो. म्हणून आपल्याला ब्राह्मण न करता कुणबी केले म्हणून तुकोबा देवाचे आभार मानीत आहेत! म्हणत आहेत की ब्राह्मण केला असतास तर दंभानेच मेलो असतो, दंभातच मेलो असतो!

रामभटांचे हे बोलणे ऐकून नारायणाने विचारले,

आदि शंकराचार्यांना तुम्ही अजूनही मानता, सारे जग मानते आणि तरी तुम्ही आता तुकोबांना इतके मानता हे समीकरण सोडवायचे कसे?

रामभट म्हणाले,

सांगतो. पण त्या आधी मी आत्ता म्हटले त्या आचार्यांच्या स्तोत्राचा अर्थ सांग पाहू. आबासाठी.

मग नारायणाने मराठीत अर्थ करून सांगितला –

जर तो अखंड निर्विकल्प सच्चिदानन्दस्वरूप आहे, तर त्याची मूर्ती बनूच शकत नाही! जर मूर्तीच नाही तर पूजा ती कशाची? तो जर सर्वत्र आहे, परिपूर्ण आहे तर त्याला आवाहन करण्याचे कारणच काय? तोच जर सर्वांचा आधार आहे तर त्याला आसनाच्या आधाराने पुन्हा बसविता कसे? ज्याचे पाय स्वच्छच आहेत, ते धुता कशाला आणि शुद्धाला आचमन तरी का करविता? जो स्वतःच निर्मल आहे, त्याला तुम्ही स्नान का घालता? जो ह्या जगाचे आवरण म्हणायचा, त्याला वस्त्रे कशी चढविता? ज्याला कोणतीही उपाधी नाही त्याला यज्ञोपवित कसे घालता आणि जो स्वतः अतीव सुंदर आहे त्याला आभूषणे का लेवविता? जो स्वतः निर्लेप आहे त्याला चंदनाचा लेप का लावता! ज्याला सुगंधाची इच्छाच नाही त्याला फुले का वाहता? त्याच्यासाठी धूप का जाळता आणि जो स्वतःच प्रकाशमान आहे त्याच्यासमोर दीपप्रज्ज्वलन तरी का करता?
जो नित्यतृप्त आहे त्याला नैवेद्य का दाखविता आणि जो संपूर्ण निष्काम आहे त्याला विडा, फळे अर्पण का करता?
आणि, जो अनंत आहे त्याला प्रदक्षिणा तरी कशी घालता? थोडक्यात, काका, आचार्यांनी सगुणोपासनेचा निषेध केला आहे की!

रामभट म्हणाले,

हो ना! हे ऐकून तसेच वाटते आणि आपल्या बुद्धिवादी स्वभावाला ते पटतेही! आणि इकडे पाहावे तर तुकोबांचे अखंड विठ्ठल विठ्ठल! विठ्ठलाचे रूप आणि विठ्ठलाचे नाम ह्याने तुकोबा हा ठार वेडा झालेला मनुष्य आहे अशी माझी समजूत झाली होती. तुकोबा म्हणतच,

 

तुझें रूप पाहतां देवा । सुख झाले माझ्या जीवा ।।
हें तों वाचे बोलवेना । काय सांगो नारायणा ।।
जन्मोजन्मीचें सुकृत । तुझे पायीं रमे चित्त ।।
जरी योगाचा अभ्यास । तेव्हा तुझा निजध्यास ।।
तुका ह्मणे भक्त । गोड गाऊं हरिचें गीत ।।

 

तुम्हाला तुकोबांचे विठ्ठलावरचे किती अभंग सांगू? पण एक प्रसंग असा घडला की तुकोबा काय सांगत आहेत ते मला उमगले. ती कथा आता मी तुम्हाला उद्या सांगतो.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?