' सुखे बोले ब्रह्मज्ञान । मनी धनअभिमान ।। : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ११ – InMarathi

सुखे बोले ब्रह्मज्ञान । मनी धनअभिमान ।। : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ११

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १०

आबाचा दीर्घ प्रश्न तुकोबांनी शांतपणे ऐकून घेतला व त्याला म्हणाले,

आबा, खरे आहे तुमचे. जगातले दुःख पाहिले की जगात देव आहे की नाही याची शंका वाटतेच.

इतके म्हणून तुकोबा काहीसे थांबले आणि नेहमीच्या देहूकरांना म्हणाले,

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

मंडळी, हा प्रश्न सर्वांना केव्हा ना केव्हा पडतोच पण त्याची तड लावण्याकरता आबांनी घरदार सोडले ह्याचे आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे. ज्या अर्थी आबांनी ह्या प्रश्नासाठी आपला जीव असा पणाला लावला आहे त्या अर्थी पांडुरंग त्यांचे पूर्ण समाधान करील या विषयी मला काहीच शंका नाही. आबा गावोगाव फिरले पण त्यांना उत्तर देणारा सापडला नाही. ते म्हणतात, अनेकांना भेटलो, अनेकांशी बोललो. मला वाटते, आबा, तुम्हाला असा संत भेटायला हवा की तुमचे पुरते समाधान झाले पाहिजे. तसा माझ्या पांडुरंगासारखा कुणीच नाही! जे स्वतःला संत म्हणवून घेतात त्यांच्या विषयी काय बोलावे? कुणी एक संत महात्मा अमुक एका ठिकाणी आहे असे आपण ऐकावे आणि त्याला पाहण्यासाठी तिकडे जावे तर काय दिसते?

ह्मणविती ऐसे आईकतो संत । न देखीजे होत डोळां कोणीं ।।
ऐसियांचा कोण मानिते विश्वास । निवडे तो रस घाईंडाईं ।।
पर्जन्याचे काळी वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ।।
हिऱ्या ऐशा गारा दिसती दूरोन । तुका ह्मणे घन न भेटे तों ।।

दूरून पाहिल्या तर गारा हिऱ्यासारख्या दिसतात पण म्हणून त्यांना धरून मेघाची भेट घ्यायला गेले तर निराशाच व्हायची! अहो, पावसाळ्यात साध्या ओहोळाचेही नद होतात आणि पाऊस गेल्यावर पाहावे तो तिथे थेंबही नाही! जे टिकणारेच नाही त्याचा विश्वास वाटावा कसा?

जगात संतजन आहेत असे ऐकायला येते पण प्रत्यक्ष डोळ्यांना ते दिसतात कोठे?

अशा स्थितीत आबा, जिथे संतच दुर्मीळ तेथे तुम्ही देवाचा शोध घेण्यास निघाला आहात! संत महात्मे भेटावे म्हणून मी ही प्रयत्न केले आणि करीत असतो. प्रत्यक्षात दिसते असे की,

सुखे बोले ब्रह्मज्ञान । मनी धनअभिमान ।।
ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ।।
पोटासाठी संत । झाले कलींत बहुत ।।
विरळा ऐसा कोणी । तुका त्यासी लोटांगणी ।।

मंडळी, ह्या काळात पोटासाठी लोक संत होतात त्यावर काय बोलावे? अशांची सेवा करून आपल्या पदरी काहीही पडायचे नाही. त्यांच्या बोलण्यात ब्रह्मज्ञान आणि मनात पैसा आणि स्वतःबद्दलचा दुराभिमान!

खरा संत प्रत्यक्षात भेटावा असे मलाही वाटते आणि तसा कुणी भेटला तर हा तुका त्यास लगेच लोटांगणच घालील! पण, असा कुणी मिळणे फार कठीण. कारण, असे लोक विरळाच असायचे!

तुकोबांचे हे विवेचन चालू असता आबासह तेथील सर्व उपस्थितांच्या मनात एकाच वेळी एकच विचार आला,

आमचे महद्भाग्य म्हणून आज आम्ही अशाच एका विरळा संताभोवती जमलो आहोत!

समोरच्या लोकांच्या मनात उमटलेले हे भाव तुकोबांच्या नजरेतून थोडेच सुटणार? त्यांनी ती भावना वाढून मुख्य मुद्दा सुटू नये म्हणून लगेच पुढे सुरू केले –

आबा, सांगायचे हे की गावोगावीं फिरल्याने तुम्हाला खरा संत भेटेल ही आशा व्यर्थ आहे! आणि म्हणून, ह्या मार्गाने तुमच्या प्रश्नांची तड लागेल ही आशा देखील व्यर्थ आहे! अशा वेळी काय करावे ह्याची युक्ती मी तुम्हाला सांगतो –
जाणे अंतरिंचा भाव । तो चि करितो उपाव ।।
न लगे सांगावें मागावें । जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें । फळ धीर धरोनि ।।
बाळां न मागतां भोजन । माता घाली पाचारून ।।
तुका ह्मणे तरी । एकीं लंघियेले गिरी ।।

तर आबा, थोडा धीर धरा. कुणीतरी माणूस आपल्या प्रश्नांना उत्तर देईल ही अपेक्षा सोडा. उत्तरे बाहेरून आंत येतात ही भावनाही सोडा!

अहो, जिथून प्रश्न येतात तिथेच उत्तरे असतात! बाहेर हिंडण्याफिरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आंत पाहा. आपले अंतरंग कसे आहे त्याचा वेध घ्या. आपल्या अंतरीचा भाव जाणणे हाच खरा तुमच्या प्रश्नावरील उपाय आहे!

एकदा अशी सवय तुम्हाला लागली की तुम्हाला लहान बाळांना येतो तसा अनुभव येईल. बाळाला भूक लागली आहे हे बाळाच्या आईला आधीच कळावे आणि तिने हाकां मारून त्यास जेवू घालावे तसे तुमच्याही बाबतीत होईल.

आबा, अशी आपल्याच अंतरंगात खोलवर जाण्याची ओढ लागली की मग कुणाला काही सांगावे लागणार नाही की कुणाकडे काही मागावेही लागणार नाही! ही सवय तुम्ही जीवाभावाने जोपासलीत की तुमच्या समस्यांना मिळणारे उत्तर अविनाशी असेल! ते फळ मिळण्यासाठी तुम्ही धीर मात्र धरला पाहिजे.

आबा, मी तुम्हाला प्रश्न कसे सोडवत न्यायचे त्याची युक्ती सांगत आहे, ती स्वीकारलीत तर तुमच्या प्रश्नांचे डोंगर तुम्ही सहज पार कराल!

आबा, देव आहे की नाही ह्याचे एक उत्तर तुम्हाला सापडले आहे की देव नाही! तरी देखील या विषयीचा तुमचा संदेह फिटलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही घर सोडलेत, गावोगांव फिरलात. जग पाहिलेत. कितीक लोकांशी तुम्ही बोलला असाल. ह्या विषयावर बोलायला खूप जण तयार असतात, वाद करण्यात पटाईत असतात. अशांना तुम्ही भेटलात. समाधान मात्र झाले नाही. कारण काय तर –

शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाही कोणा ।।
पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मिळती अर्था निजसुखा ।।
तुका ह्मणे जैसी लांचासाठी ग्वाही । देतील हे नाही ठावी वस्तु ।।

ह्या पंडित, ज्ञानी म्हणविणाऱ्यांना बोलता छान येते. काय शिकले असतील ते घडाघडा सांगतील. पण, आपण जे बोलतो त्याचा अनुभव आपल्याला यायला नको? आपण बरोबर बोललो ह्याचा पडताळा आपण घ्यायला नको? त्या शिवाय बोलणे आणि परिस्थिती यांचा मेळ बसेल कसा? सफाईने बोलल्याने अर्थाची मिळवणी होत नसते.

देव ही काय वस्तु आहे ते कळण्यासाठी आपल्या अंतरात आपल्याला शिरता आले पाहिजे. ज्यांना निजसुखच प्राप्त झालेले नाही त्यांना ह्या वस्तुचा परिचय नसावा हेच स्वाभाविक. अशी मंडळी लांच घेऊन कोणतीही बाजू मांडू शकतात आणि ती बाजू बरोबर असल्याची ग्वाहीही देऊ शकतात!

अशांना भेटणे आणि बोलणे हे अर्थहीन आहे आबा. आणि पाहा, तुम्ही इतके फिरलात पण आपल्या सग्यासोयऱ्यांशी बोलायला मात्र विसरलात! अहो,

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥
आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ।।
तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥

एक घोंगडी आणि एक तांब्या (कंथाकमंडलू) सोबत घ्यावा आणि माणसाने गांव सोडावे. ह्या दोन वस्तु असल्या म्हणजे देहाच्या उपचारांची काळजी मिटली. एकदा लोकांपासून दूर गेले की सुखाने एकांताचे सेवन करता येईल. लोकांत असले की जपून वागायला हवे. एकांतात आपले आपण. अंगाला गुणदोष लागतील ही चिंता आता नाही.

वर पाहावे तो आकाशाचा मंडप आणि खाली बसण्यास पृथ्वीचे आसन. आहाहा! अधूनमधून वाऱ्याच्या झुळुका येत आहेत. पक्षी सुस्वर गात आहेत. आपले मन रमेल अशा ठिकाणी मग आपण वास करावा आणि हवी ती क्रीडा करावी!
अशा रम्य वातावरणात आपल्या मनाचा आपल्याशीच होणारा संवाद किती सुंदर असेल!

आबा, जगाशी वाद घालून प्रश्न सुटत नाहीत हो! वाद असतो तो आपला आपल्याशीच. आपल्या विचारांत इतरांच्या शब्दांची लुडबूड कशाला? एखादा प्रश्न सुटत नसला तर वृक्षांना विचारावा! वेलींशी बोलावे! पक्ष्यांच्या आळवणीचा वेध घ्यावा!
सोबत हरिकथेचे भोजन असावे. त्याचे अनेक प्रकार करावे, विस्तार करावा. आणि अगदी चवीने ते जेवावे. त्या रम्य स्थळी होणारे हे विचारांचे भोजन किती रूचकर असेल ह्याची कल्पना तरी करा!

मी मागे सांगितले होते की भांडावे तो हित! वाद करा! पण कोणाशी करायचा तो वाद? तर आपल्याशीच. आपले पूर्ण समाधान होईपर्यंत.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?