' …..आणि इंद्रायणीने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३७ – InMarathi

…..आणि इंद्रायणीने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३७

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक : संतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

तुकोबा रामभटाकडे वाघोलीला जाऊन आले आणि गाथा घेऊन इंद्रायणीवर पोहोचले आहेत, तेथे कीर्तनाला उभे आहेत ही वार्ता देहूजवळच्या वाड्यावस्त्यांत गावांत वायुवेगाने पसरली आणि जो तो प्रसंगस्थळी धावू लागला. नदीकाठावरची गर्दी वाढू लागली. मात्र गर्दी वाढली तरी तेथे गोंगाट नव्हता. किंबहुना, लोकांचे श्वासही रोखले गेले आहेत की काय अशी जीवघेणी शांतता होती.

तुकोबांच्या चेहेऱ्यावरील निश्चयाचे तेज वाढू लागले होते आणि दुसऱ्या बाजूस कान्होबा, वहिनीबाई आदी घरच्या चारपांच लोकांच्या मुद्रा हळूहळू म्लान होऊ लागल्या होत्या. माझ्या अहंकाराचा पूर्ण नाश कर हे तुकोबांनी नुकतेच पांडुरंगाला केलेले आवाहन त्यांना कसेतरीच वाटत होते.

पारावर ठेवलेल्या गाथेवरून त्यांची दृष्टी हटत नव्हती. त्यांच्या मनाची अशी घालमेल चाललेली असताना इकडे तुकोबांनी निरुपणाला नवा अभंग घेतला होता –

फजितखोर मना किती तुज सांगो । नको कोणा लागों मागें मागें ।।
स्नेहवादे दुःख जडलेसे अंगी । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ।।
निंदास्तुति कोणी करो दयामाया । न धरी चाड या सुखदुःखे ।।
योगीराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ।।
तुका ह्मणे मना पाहें विचारून । होईं रे कठिण वज्राऐसे ।।

हा अभंग ऐकला आणि कान्होबांच्या डोळ्यांना धारा लागल्या. तुकोबा आपली फजिती झाली असे स्पष्ट म्हणत होते आणि फजितीचे कारणही सांगत होते. आपण कुणाच्या मागे लागू नये, कुणावर प्रेम करू नये – शेवटी दुःखच पदरी येते असा ह्या बोलण्याचा आशय होता.

तुकोबा म्हणत होते,

योगी मंडळी एका जागी स्थिर राहात नाहीत. त्यामुळे त्यांना कोणाची निंदास्तुती झेलत बसावे लागत नाही. एका ठिकाणी राहिले की प्रेम वाढते खरे पण ते सुख किती निष्ठुर होते त्याचाही अनुभव घ्यावा लागतो. एका जागी न थांबणारे योगी ह्या स्नेहवादापासून आपोआप लांब राहतात. हे तुकारामा, आज तुझ्यावर ओढवलेला प्रसंग हा प्रेम दिल्याघेतल्याने निर्माण झालेला आहे.

तू एका गावी ठाण मांडून बसला नसतास तर ही वेळ तुझ्यावर आली नसती. आपण लोकांवर आणि लोकांनी आपल्यावर दयामाया करावी ही अपेक्षा मग निर्माणच झाली नसती. अपेक्षा नसती म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःखही नसते.

बरं का तुकारामा, हे जे मी म्हणतो आहे, त्यावर तू विचार करून पाहा आणि झाली ही फजिती स्वीकार.

आता मन वज्रासारखे कर आणि पुढे चल. पुढे जायचे असेल तर तुला आजच्या जीवनपद्धतीचा त्यागच केला पाहिजे. लोकांनी तुला ज्या कारणास्तव थोरपण दिले ते कारणच तू आता नाहीसे कर. मुळात हे थोरपण तुला चिकटले हेच काहीतरी झाले!

 

कोठे देवा आले अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ।।
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीने नाम गाईन तें ।।
न पुसतें जन कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ।।
तुका ह्मणे जन अव्हेरिते मज । तरी केशीराज सांभाळिता ।।

 

तुकारामा, हे विसरू नकोस की तुला कोणीही अव्हेरू देत, तुझा केशीराज, तुझा विठ्ठल तुला कधी अंतर द्यायचा नाही! वास्तविक तू पूर्वीचा एक छोटासा मनुष्य होतास तेच बरे होते! हे थोरपण आले कोठून? आपण आपली संतांची सेवा करावी, आवडीने नाम घेत काळ कंठावा. हे साधन उत्तम असताही ते सुटले कसे?

तुकारामा, आपण अशा ठिकाणी असे असावे की आपली विचारपूसही कोणी करू नये. त्या एकांताच्या सुखात मग आपण समाधान भोगावे! तू असा नावारूपाला आलास ना, त्याचेच हे भोग तू भोगीत आहेस.

 

ऐसा माझा कोण आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ।।
काय सेवा रुजू आहे सत्ताबळ । तें मज राऊळ कृपा करी ।।
काय याती शुद्ध आहे कुळकर्म । तेणे पडे वर्म तुझे ठायी ।।
कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगी एक बळ आहे सत्ता ।।
तुका ह्मणे वांयां झालो भूमीभार । होईल विचार काय नेणो ।।

 

लोकहो, ह्या तुकारामाची कोणाला भीड पडावी, त्या भीडेचा भार व्हावा असे काय आहे त्याच्याजवळ? हा तुकाराम अशा कोणत्या मोठ्या जातीत, शुद्ध कुळात जन्माला आला की त्याच्या ठायी जीवनाचे वर्म वसावे? तरी त्याने आपल्या परीने सेवा रूजू केली. जर ह्या विश्वावर कुणाचे सत्ताबळ असेल तर त्याने तुकारामावर कृपा करावी.

अशी कृपा करू शकेल असा तपोनिधी, दानधर्मशील कुणी असेल तर नक्कीच त्याच्या अंगी बळ असेल आणि त्याची त्याचमुळे येथे सत्ताही असेल. लोकहो, असे जर होणार नसेल तर हा तुकाराम नाव मिळाल्याने वायां गेला असाच त्याचा अर्थ होईल. असा तुकाराम ह्या भूमीला मग भारच म्हणायचा!

अशा भूमीला भार झालेल्या तुकारामाने नेमका कसा विचार करावा ते काही मला कळत नाही! इतके मात्र नक्की कळते की त्याचा लौकिक फार वाढला, उगीचच वाढला.

 

वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिका वाद दोघां ।।
नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणें ।।
शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ।।
जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ।।
तुका ह्मणे मागें कळों येतें । न घेतों हें पिसें लावूनियां ।।

 

ह्या तुकारामाला जर मागेच कळले असते तर त्याने आधीच काळजी केली असती आणि हा नांवलौकिक वाढू दिला नसता. आज स्थिती अशी आहे की ह्या विनाकारण वाढलेल्या नांवलौकिलाने दोन पक्ष झाले आहेत आणि त्या दोघांत एक अर्थहीन वाद उभा राहिला आहे. जगात काही लोक भुकेले आहेत आणि काही व्यवस्थित जेवणारे आहेत. अशा दोन्हीकडच्या लोकांना आज माझ्या मनात चाललेली घालमेल कळायची नाही.

“जगात देव नाही” असे माझे मत बनण्यासारखी परिस्थिती आज मजवर ओढविलेली आहे.

माझी वाणी, जी देवाने शब्दज्ञानाने गौरविली असे मी म्हणतो, त्या वाणीमुळेच त्याच देवाचे पाय मला अंतरले असे आज मला वाटत आहे. थोडक्यात काय तर, मागे संसार तुटला आणि आज देवही तुटला. माझ्या मुखातून जे ज्ञान बोलले गेले ते माझ्याच मनात नीट बिंबले नाही की काय असे आज मला वाटते आहे. ज्याने माझी वाणी घडविली त्यानेच मला आता योग्य काय ते सांगावे. मला तर काही कळेनासे झाले आहे.

 

साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काय नव्हे ।।
करावें तें बरें जेणें समाधान । सेवावे हे वन न बोलावें ।।
शुद्ध माझा भाव होईल तुझे पायीं । तरि च हें देईं निवडूनि ।।
उचित अनुचित कळो आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ।।
तुका ह्मणे मज पायांसवे चाड । सांगसी ते गोड आहे मज ।।

 

हे देवा, हे पांडुरंगा, आज मला काय योग्य आणि काय अयोग्य ह्याचा निर्णय करता येत नाही आहे. तुझी सेवा नेमकी कशाने होते आणि कशाने होत नाही याबद्दल मनात संदेह उपजला आहे. तर तूच माझे आता समाधान कर आणि काय बरे ते सुचव.

देवा, मला आज वाटते आहे की हे सर्व जग सोडावे आणि काहीही न बोलता वनात जाऊन राहावे! जर ते योग्य असेल आणि त्यामुळे माझा भाव तुझ्या पायी राहून शुद्ध होणार असेल तर तसे अवश्य सांग. तुझी कृपादृष्टी असल्यानेच मला आजवर उचित काय आणि अनुचित काय ह्याचा बोध झाला. तुझ्या पायीं असावे इतकीच काय ती माझी इच्छा आहे. त्यासाठी तू जे सांगशील ते मला गोडच वाटेल.

तुकोबांचा हा विलाप, त्यांचे काहीसें उलटसुलट बोलणे कान्होबांना ऐकवेना. तुकोबांचे ते विकल रूप त्यांना पाहवेना. त्यांनी तुकोबांना हांक मारली व मोठ्याने म्हणाले,

दादा, किती त्रास करून घेता? दुपार टळून गेली. चला, आता घरी जाऊ या.

कान्होबांचे हे शब्द ऐकताच तुकोबांनी पारावर ठेवलेली गाथा उचलली, दोन्ही हातांत धरली आणि ते म्हणू लागले –

न मनावी चिंता । कांही माझेविशीं आतां ।।
ज्याणें लौकिक हा केला । तो हे निवारिता भला ।।
माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ।।
सुखा आणि दुःखा | म्हणे वेगळा मी तुका ।।

हा तुकाराम सुख आणि दुःखांहून वेगळा झालेला आहे हे जाणून तुम्ही आता यापुढे माझेविषयी काही चिंता करू नका. ज्याने माझा हा नावलौकिक केला तोच हा प्रसंग निवारून नेईल. माझी इच्छा काय तर सर्व एका ठायी मिळून जावे.

तुकोबांचे हे शब्द ऐकताच कान्होबा तुकोबांच्या दिशेने धावत निघाले आणि त्यांना तसे येताना पाहून तुकोबांनी इंद्रायणीच्या दिशेने धांव घेतली. त्यांचा आवाज चढला, विलक्षण आर्त झाला आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले –

लक्ष्मीवल्लभा । दीनानाथा पद्मनाथा ।।
सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायी ।।
माझी अल्प हे वासना । तू तो उदारांचा राणा ।।
तुका ह्मणे भोगें । पीडा केली धांव वेगें ।।

असे म्हणता म्हणता तुकोबा गाथेसह पात्रात उतरलेसुद्धा! कान्होबांना चकवून ते नदीच्या मध्यभागी जाऊन उभे राहिले आणि काय सांगावे हा सारा प्रकार पाहात असलेली इंद्रायणीही अस्वस्थ झाली आणि तिने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?