' संसार सगळेच करतात, तुम्ही जाणते व्हा आणि पुढे चला : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३० – InMarathi

संसार सगळेच करतात, तुम्ही जाणते व्हा आणि पुढे चला : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३०

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २९

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

आबा मौनात रमलेला पाहून एके दिवशी सकाळची न्याहरी वगैरे झाल्यावर रामभटांनी नारायणाला बोलावले आणि आबाला घेऊन येण्यास सांगितले. नारायण म्हणाला,

आता आबा सापडणे कठीण आहे. आजकाल तो न्याहरीला येतच नाही आणि सकाळी कधी कुठे निघून जातो ते ही कळत नाही.

इतके बोलून नारायण एक क्षण थांबला आणि म्हणाला,

काका, तुम्ही पाहताय का, तो आताशा धड जेवतही नाही. तब्येतही उरतल्यासारखी वाटते आहे. गालफडे आत चालली आहेत. रोड होतो आहे. मी म्हणतो, मौन कर रे बाबा, पण जेव की रोजच्यासारखा. त्याच्यासमोरच मी छान जेवतो खरं पण ते बरं नाही वाटत. काका, तुमच्याही लक्षात आलंच असेल हे.

रामभट म्हणाले,

पूर्ण लक्ष आहे माझे त्याच्यावर. तो कमी जेवतो आहे असे तुला वाटते आहे पण मला मात्र वेगळे वाटते. त्याची भूकच कमी झाली आहे आणि तो मौनात पूर्ण रंगल्याचे ते लक्षण आहे. त्याच्या एकूण गरजाच कमी होत चालल्या आहेत. अन्न हा त्याचा एक भाग आहे. आणि त्याच्या बारीक होण्याबद्दल म्हणशील तर अनावश्यक ते निघून चालले आहे इतकेच. अशा साधनेला लागले की ह्या गोष्टी अशाच व्हायच्या. त्याची काळजी करण्यासारखे काहीच नाही. उलट एका शिक्षकाला समाधान वाटावे असेच चालू आहे सारे. तू ही एका साधकाचा प्रवास ही नीट पाहून ठेव.

नारायण म्हणाला,

हे असे असते का? आता ह्या दृष्टीने पाहीन. पण काका, एक सांगा, तुम्ही स्वतःला शिक्षक का म्हणवून घेता? ह्या साधनेसाठी तुम्ही त्याचे गुरुच आहात की.

छान जेवतो खरं पण ते बरं नाही वाटत. काका, तुमच्याही लक्षात आलंच असेल हे.

रामभट म्हणाले,

अरे, मी स्वतःला शिक्षक म्हणवितो ते काही विनयाने नव्हे. शिक्षक अनेक असू शकतात. ते आपल्या विद्यार्थ्याकडून ठरविल्या गोष्टी करवून घेऊ शकतात. रोज सकाळी इतकी मुले येतात. त्यांच्याकडून मला घोकून घेता येते. परंतु, मिळालेल्या त्या विद्येचे पुढे काय करावे ते त्यांना मी नाही सांगू शकत. ती माझी मर्यादा. गुरुला अशी मर्यादा नसते. तो तुमचे अगदी जीवनच बदलवून टाकतो. ते सामर्थ्य तुकोबांच्यात आहे, माझ्यात नाही. गुरुने आपल्या जीवनात काय क्रांती केली ते ज्ञानोबांनी ज्ञानदेवीत अनेक ठिकाणी सांगितले आहे. सुरुवातीलाच ते म्हणतात,

 

मज हृदयी सद्गुरु । जेणे तारिलो हा संसारपुरु ।

 

जो आपला संसार तारून नेईल तो गुरु. आणि अशा शिष्यांचे संसारही आपल्यासारखे बायकामुलांचे नसतात. जगाचा संसार करायला निघालेली माणसे ही. त्यांचे संसार पार पडण्यासाठी जे मार्गदर्शक होतात ते गुरु. बाकीचे माझ्यासारखे शिक्षक. ज्ञानोबांच्या हाती त्यांच्या गुरुंमुळे चिंतामणी आला. ते म्हणतात,

 

कां चिंतामणी आलिया हातीं । सदा विजयवृत्ती मनोरथीं । तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ।।

 

नारायणा, चिंतामणी रत्न म्हणजे म्हणाल ती इच्छा पूर्ण करणारे. त्याने ज्ञानोबांना काय मिळाले तर अखंड विजयी मनोवृत्ती! म्हणजे ज्ञानोबा निर्भय झाले! त्यामुळे ते पूर्णकाम झाले, त्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या! गुरु असा असतो. तो शिष्याला घडवितो. तो शिष्याला असा पार नेतो. आबाला पार नेण्याची क्षमता माझ्यात नाही. मी त्याला पोहणे शिकवीन, पोहोण्यातील विविध तऱ्हाही शिकवीन पण अवघड प्रसंगी त्या आणि त्यातील योग्य निवडण्याची बुद्धी मी त्याला देऊ शकत नाही, तसेच त्या क्षणाला जे अपूर्व मनोबल लागते ते ही मी पुरवू शकत नाही. तुकोबा तसे आहेत. शिष्याने पार जावे असे त्यांना वाटते आणि योग्य शिष्य मिळाला तर त्याला सारे अडथळे पार करून पार नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. शिष्यही ते पारखूनच घेतात. आपली सेवा करून घेण्यासाठी आणि आपला उदोउदो करवून घेण्यासाठी शिष्यांचा गोतावळा जमविणारे तुकोबा नव्हेत. एकनाथ महाराजांच्या सद्गुरुचे वर्णन करणाऱ्या काही ओव्या आहेत. पाहा, तुकोबा अगदी तसे आहेत.

 

शिष्ये करावे माझे भजन । ऐसे वांछी जरी गुरुचे मन ।
तो गुरुत्वा मुकला जाण । अभिमाने पूर्ण नागवला ॥
जगी दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान ।
ते जाण शिश्नोदरपरायण । तेथे अर्धक्षण ज्ञान न थारे ॥
मुख्यत्वे गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान ।
सर्वांगी शांतीचे भूषण । तो सद्‍गुरु पूर्ण परब्रह्म ॥

 

तुकोबा वेगळ्या शब्दांत असेच काही सांगतात. ते म्हणतात,

 

शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखे ।।
त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ।।
त्याचें खरें ब्रह्मज्ञान । उदासीन देहभावीं ।।
तुका ह्मणे सत्य सांगें । येवोत रागें येती ते ।।

 

तर नारायणा, मी शिक्षक आहे आणि त्या नात्याने आबावर लक्ष ठेवून आहे. तो हटलाय पण आजारी झालेला नाही. मला कौतुक वाटते की फार थोड्या काळात त्याने मोठी प्रगती केली. लक्षात घे, तुकोबा भेटायच्या आधीही त्याने अनेकांच्या नादी लागून काहीबाही प्रयोग केले आहेत. पण आजची ही अवस्था त्याला त्याने तुकोबांचा जो सहवास केला त्याने प्राप्त झालेली आहे. गुरुकृपा म्हणतात ती हीच. हाच अभ्यास त्याने पूर्वी केला असता तर तो निस्तेज होत गेला असता. आज त्याची गालफडे बसू लागली असतील पण चेहेऱ्यावरचे तेज वाढलेले आहे. नजर बदलली आहे आणि ती स्थिर होऊ लागली आहे. सतत प्रश्नांकित असणारा चेहेराही बदलत चालला आहे, सौम्य होऊ लागला आहे. ही प्रगती का होते आहे? तर त्याला माहीत आहे की त्याच्या मागे तुकोबा उभे आहेत. तसे नसते तर प्रगतीचा इतका वेग राहू दे, कदाचित काहीच बदल झाला नसता. नारायणा, आणखी ऐक. तुकोबा गुरु थोर आहेतच पण शिष्य होण्यास आबाही पात्र आहे. त्याची तुकोबांवर पूर्ण निष्ठा बसलेली आहे. त्याने तुकोबांशी वाद केला असेल पण तुकोबांना तो ओलांडणार नाही. आज त्याने माझे ऐकले. ते का? तर तुकोबांनी माझ्याकडे पाठविले म्हणून. तुकोबांनी अशांचेही वर्णन केले आहे. ते म्हणतात,

 

निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हे वर्म चुको नये ।।
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ।।
तुका ह्मणे ऐसा कोणें उपेक्षिला । नाही ऐकिला ऐसा कोणीं ।।

हे सारे ऐकून नारायणाने विचारले,

आबाची ही अशी स्थिती झाली त्याचा बराच अर्थ आता मला लागला. तुकोबांना काय वाटेल हे ऐकून? आनंद होईल?

रामभट म्हणाले,

त्यांना नक्कीच समाधान वाटेल. एके काळी ते ही ह्या अवस्थेतून गेले आहेत. त्यावर त्यांचा अभंग आहे एक.

 

नको ऐसे झाले अन्न । भूक तान ते गेली ।।
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ।।
राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ।।
देह धरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ।।
जाऊं नेदी करितां सोस । क्षमा दोष करवीन ।।
तुका ह्मणे या च पाठी । आतां साटी जीवाची ।।

 

नारायणाने पुढे विचारले,

काका,  हे सारे ऐकून सामान्य माणूस विचारेल, ही मंडळी कशासाठी करतात हे सारे? यांतून त्यांना काय मिळत असेल?

रामभट उत्तरले,

मला तरी वाटते की मनुष्य साधनेस सुरुवात करतो तेव्हा त्याला अंतिमतः कोठे पोहोचणार आहोत याचा काही अंदाज नसतो. साधनेच्या अंती आपली अवस्था काय असेल ह्याची कल्पना कितीही केली तरी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय बांधलेले अंदाज चुकीचे निघण्याचीच शक्यता अधिक. मात्र, तुकोबांनी याचेही उत्तर देऊन ठेवले आहे, साधनेचे फळ काय मिळाले ते सांगितले आहे. त्यावरून थोडी कल्पना येईल. ते म्हणतात,

 

नाही त्रिभुवनी सुख या समान । ह्मणउनी मन स्थिरावले ।।
धरियेलीं जीवीं पाऊलें कोमळी । केली एकावळी नाममाळा ।।
शीतळ होऊनियां पावलो विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ता ।।
तुका ह्मणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगे ।।

 

नारायणा, संत कोणत्याही काळी जन्मो, त्याचा अनुभव हा असाच असतो. तुला थोड्यावेळापूर्वी ज्ञानदेव काय म्हणाले ते सांगितले होते ना? मी पूर्णकाम झालो असे म्हणतात. हे म्हणतात, झाले सकळ सोहळे, पुरविले सकळ डोहळे! पांडुरंगाने माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या. दोघांच्या अनुभवांतील किती साम्य हे! अशा संतांचे असे अनुभवाचे बोल ऐकून आबासारखे काही लोक प्रेरित होतात आणि ह्या वाटेवर प्रवासाला निघतात. तू ही तसाच निघ, नारायणा. तुकोबा म्हणतात, संसार सगळेच करतात, तुम्ही जाणते व्हा आणि पुढे चला.

 

तरि च जन्मा यावे । दास विठोबाचे व्हावे ।।
नाहीं तरी काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ।।
ज्याल्याचें तें फळ । अंगी लागो नेदी मळ ।।
तुका ह्मणे भले । ज्याच्या नावें मानवलें ।।

 

नारायणा, आपण थोरांच्या सहवासात आलो ना? आता आपण लहान राहायचे नाही. नुसते वय वाढू द्यायचे नाही. आता आपल्याला पुढे पुढे चलावेसे वाटले पाहिजे. आता थांबू नकोस. जा, त्या आबाला शोध. त्याला घेऊन ये. आजपासून तुम्हाला काही सांगावे म्हणतो. तत्त्वज्ञानाच्या चार गोष्टी.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?