' सार्वजनिक जीवनात काम करताना “आपल्याच” लोकांकडून होणारी घुसमट : What NOT to be in Life – InMarathi

सार्वजनिक जीवनात काम करताना “आपल्याच” लोकांकडून होणारी घुसमट : What NOT to be in Life

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भूमिका : या लेखाद्वारे InMarathi.com कोणाचे ही व्यक्तिगत उदात्तीकरण करत नाहीये. लेखातील माहितीच्या सत्यसत्यतेची संपूर्ण जबाबदारी लेखकाची आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकांना ज्या संकटांना किंवा आव्हानांना सामोरे जावे लागते त्या घुसमटीला वाट मोकळी करून देणे तसेच चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा आमचा प्रांजळ हेतू आहे.

टीम इनमराठी

===

“What not to be in life “.

मला कल्पना आहे बहुतांश लोकांना याविषयी देणंघेणं नाही. कारण, शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी, ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. पण, यातून एकजण जरी जागा झाला तर लिखाण सार्थकी लागेल. कदाचित आजची तासिका आजवरची सर्वात जास्त स्वार्थी तासिका असेल पण आज लिहीणं अपरिहार्य आहे.

अभियांत्रिकीची पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तथाकथित corporate world मध्ये काही वर्षे धुमाकूळ घातलेला मुलगा वयाच्या पंचविसाव्या वर्षी स्वकमाईचे अंदाजे २५ लाख रुपये (संपूर्ण white money) मित्रांवर खर्च करून अचानक गावी परत येतो. त्यांनतर पुनःश्च नव्याने सुरुवात करत महिला, पाणी आणि शेती विषयांत काहीतरी करू बघतो अन् ते काम करत करत अपघाताने लेखन आणि पत्रकारिता जगतात रांगू लागतो. मात्र, या प्रवासात त्याच्या आई वडिलांना प्रचंड वेदना तो देतोय ह्याची जाणीव असताना तो वाटचाल करत असताना त्याच्या लक्षात येतं कुठेतरी चुकतंय. त्याच्या कुटुंबाचा दैदिप्यमान वारसा तो विसरतोय.

थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी

या मुलाचे आजोबा ज्यांना नाना म्हणतं ते असे व्यक्ती ज्यांनी देव, देश अन् धर्म कार्यासाठी स्वतःच्या हिश्श्याला आलेल्या वडिलोपार्जित शेकडो एकर जमिनीवर विधिवत पाणी सोडले. पुढे राष्ट्रसंत पाचलेगांवकार महाराजांसोबत एक साम्राज्य ऊभं केलं. भारताचा स्वातंत्र्य लढा असो किंवा हैद्राबाद मुक्तीसंग्राम किंवा गोवा मुक्तीसंग्राम त्यात नाना महाराजांसोबत सहभागी होते.

या वाटचालीत नाना चांगले संबंध राखून होते ते हेडगेवार, मुंजे, बाळासाहेब देवरस, गोळवेलकर गुरुजी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, शिवराज पाटील चाकूरकर आदी राजकारणी व्यक्तींशी. संतांच्या बाबतीत बोलायचे झाले तर साधारणपणे सन १९३० ते १९९० दरम्यानच्या सर्व संत महंत आणि नाना एकमेकांच्या संपर्कात असायचे. देवाची पूजा म्हणजे धर्मकार्य नाही तर देशाची सेवा म्हणजे धर्माची सेवा असे मानणारे नाना हा लेखनाचा वेगळा विषय होईल.

नानांचा मधला मुलगा श्रीपाद वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेऊन महाराजांच्या आज्ञेवरून देव, देश अन् धर्म कार्यासाठी स्वतःला झोकून देतो. आजही अतिशय प्रतिकुल परिस्थितीत स्वतःच उभ्या केलेल्या भस्मासुराशी टक्कर देतोय. पण, एक पिता म्हणून आपण कमी पडतोय असे त्यांना वाटते. आता मात्र त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी मैदानात उतरणार आहे तेव्हा संबंधितांनी कायद्याने वागावे अन्यथा कर्माचे फळ भोगण्यास सिद्ध व्हावे.

लेखातील मध्यवर्ती पात्र असलेल्या श्रीपाद यांचा मुलगा सध्या काय करतोय? हे त्याच्या जवळच्यांना कळतं नाहीये म्हणून ते चिंताक्रांत आहेत. इंजिनीअरिंग करताना कधी सिगरेटचा कश किंवा दारुच्या थेंबाला स्पर्श न केलेल्या ह्या मुलाने ८ ऑगस्ट २००७ रोजी पहिला कश आणि पेला हातात घेतला. त्याचा परिणाम त्याच्या कामावर कधीच झाला नाही पण समोरच्यांना त्याला बदनाम करण्यासाठी आयते कोलीत भेटले. त्याने कधी कोणाचे वाईट केले नाही असे त्याला आजही वाटते. पण, कमालीचे emotion driven असणे हा त्याचा अजून एक दुर्गुण की asset हे माहिती नाही. Automotive, Aerospace, Radio, BTL, Event management आदी क्षेत्रात अल्प कालावधीत वर गेलेल्या मुलाला अडसर ठरू लागले ते त्याचे so called मित्र. स्वतःचा सतत स्वार्थ साध्य करून घेणारे मित्र मंडळ त्याच्याच पाठीत खंजीर खुपसतं आलेत तरी हा माणूस आहे तसा जगत होता.

 

social-worker-inmarathi
ww.pinterest.com

Money Bank पेक्षा Man Bank वर विश्वास ठेवणाऱ्या ह्या मुलाने आजवर लाखो रुपये उधळले ते मित्रांच्या अडचणींवर तरी त्याच्या पदरात अधिकाधिक लोकांनी परतावा दिला तो विश्वासघातात. त्याच्या खिशात १०० रुपये नसले तरी करोडो रुपये बाळगून असलेला मित्र त्याला कॉल करतो आणि म्हणतो “अरे, माझा हप्ता रुकलाय म्हणून गाडी ओढून नेत आहेत. जरा बघ न् काहीतरी”. तो मुलगा लगेच प्रकरण त्याला जमते तसे हाताळतो पण समोरचा मित्र इतर मित्रांसोबत बसला की त्याच्याच माघारी त्याची टर उडवतो.

काही जणांचे मीठ आळणी असते असे म्हणतात कदाचित त्या मुलाच्या नशिबात तसेच असेल. बरं असं नाही की त्या मुलाला राग येत नाही. राग तर प्रचंड येतो पण आपल्यामुळे कोणाचे नुकसान नको म्हणून तो विषय सोडतं पुढे जातो.

अलीकडच्या काळात तो थोडेफार लिहू लागलाय, बोलू लागलाय. हे बघून त्याच्या मित्रांना आनंद व्हायला हवा. पण, काहीजण त्याला अकारण बदनाम करण्यात धन्यता मानत आहेत. हरकत नाही, तो मुलगा त्यांना शुभेच्छाच देतोय. आपलेपणाने काही विषय शेयर केल्यावर मन लावून त्या मुलांचं म्हणणं ऐकून घेणारे मित्र जेव्हा त्याच्या माघारी म्हणतात “त्याचं काय खरंय? रोज सिगारेटचे दहा पाकिटं उडवतो आणि रोज त्याला एक युनीट लागतं.” जेव्हा की तो मुलगा सध्या काय करतोय हे त्याच्या आई वडिलांना पूर्ण ठाऊक आहे. नेमकं तेव्हाचं मुलाच्या आईलाच तिचे सहकारी काळजीपोटी काही गोष्टी सांगतात आणि आई मुलाला; तेव्हा त्या मुलाने काय करायला हवं?

शेवटी किसने कहा था की खुशियाँ बांटने से बढती है, आजकल खुशियाँ बाँट दो तो दुश्मन बढ़ जाते है! असचं म्हणावं लागेल.

गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या आणि घडतं आहेत की ज्यांना मनापासून आपलं मानलं त्यांचे खरे चेहरे आपोआप उघडे पडतं आहेत. त्यात काही नातेवाईक आणि मोठ्या प्रमाणावर त्या मुलाने मित्र मानलेले व्यक्ती आहेत.

पण, आता बस्स.

आई वडिलांना अपेक्षित perfect son होऊ शकेन असे आता त्याला वाटतं नाही; पण आता स्वतःतले दुर्गुण लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न तो मुलगा करत आहे. त्यानंतर सर्वात पहिले स्वार्थी व्हायचं त्याने ठरवलंय. आयुष्यात त्याच्या गरजा कमी आहेत किंबहूना उत्तरोत्तर अजून कमी करत आहे त्यामुळे वैयक्तिक खर्च कमी आहे. मग विचाराल त्याला जास्त पैसे कशाला कमवायचे आहेत? त्याचं उत्तर म्हणजे त्याचं स्वप्न आहे, दत्तवाडी येथे पाचलेगांवकर महाराजांच्या आश्रमात आनंदवनाच्या १% जरी काम करता आलं तर त्याचं जीवन सार्थकी लागेल असं तो समजतो. आधी corporate world मध्ये ज्या professionalism ने तो रहात होता अगदी तसा किंबहुना तसूभर अधिक स्वार्थी मित्रांसाठी असेल. आणि सामान्य माणसासाठी तसाच झोकून देऊन काम करेल.

म्हणतात न् “आईने के सामने खड़े हो कर खुद से ही माफ़ी मांग ली मैने। क्योंकि सबसे ज्यादा खुद का ही दिल दुखाया है मैंने, दूसरों को खुश करने के लिए।”

आजवर लोकांनी त्याचा वेळ, थोडीफार असलेली हुशारी, पैसे आदी गोष्टी वापरून घेतल्या. त्यात लोकांची चूक नाही कारण “वापरणाऱ्या पेक्षा वापरून घेऊ देणारा जास्त दोषी असतो” हे साधं सरळ सूत्र तो विसरला होता. आजवर त्याची औकात अनेकांनी काढली आणि त्याने सहजपणे काढू दिली पण आता बस्स. त्याला पूर्ण कल्पना आहे स्वतःची औकात शून्य आहे आणि तो ज्या दत्तवाडी आणि वैद्यनाथावर श्रद्धा ठेवतो त्याची ताकद प्रचंड आहे.

असं अजिबात नाही की त्याचं आयुष्य रुक्ष आहे. काही हळवे कप्पे आहेत ज्याबद्दल लिहणे इतरांना ‘पटेल’ पण त्याला पटणार नाही. आजही तो हळवा कप्पा अत्तराच्या कुपीप्रमाणे म्हणण्यापेक्षा कस्तुरी अन् मृदगंधासारखा त्याच्या काळजात कायमचा रुजला आहे. सुनील जवंजाळ यांच्या काळीजकाटामध्ये म्हणतात “काळाच्या वळचणीला जाण्याअगोदर देव आपल्याकडून बरंच काही करवून घेतो. नदीत राख होऊन वाहत होण्याऐवजी काळालाच वळचणीला आणण्याची प्रचंड ताकद आपल्यात निर्माण करावी…” त्याप्रमाणे आता तो जगणार म्हणजे जगणार ते बहीण, आई-वडीलांसोबत, आजोबांना आळंदीच्या घाटावर वचन दिल्याप्रमाणे देव, देश अन् धर्मासाठीचं.

लेखणीला विराम देता देता…

या तीन दशकांत तो काय शिकला असेल तर “What not to be in life” अर्थात आयुष्यात काय करू नये हेच. यापुढे त्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन त्याचं विविध प्रकारे चारित्र्यहनन व बदनामी करणाऱ्यांनी सावधान असलेले बरे कारण आज जर तो स्वतःच एकप्रकारे नागडा झालाय, किंबहुना काही जणांनी त्याला असे करायला भाग पाडले तेव्हा समोरच्या व्यक्तीला नियती जसे संकेत देईल तसे दान तो त्या व्यक्तीच्या पदरात नक्कीचं टाकल्याशिवाय राहणार नाही. त्याला काही जणांचे काहीशे किंवा काही हजार देणं असेल पण आतापर्यंत अनेकांनी त्याचे बुडवलेले लाखो रुपयांवर त्याने पाणी सोडलं असलं तरी नियतीचं त्याला ते पैसे वसूल करून देईल असे वाटते.

आजवर अनेकांची अनेक गुपीतं त्याच्याकडे आहेत, मात्र संबंधितांनी निर्धास्त रहावे कारण विनाकारण तो कधीचं कोणाला त्रास देत नाही आणि देणार नाही. इतरांची रेष खोडण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करण्यावर त्याचा विश्वास आहे.

आजवरच्या प्रवासात त्याने अनेक ओंडके वाहीले ज्यांना तो त्याचीच जिम्मेदारी समजत होता. तेच ओंडके त्याचा प्रवाह थांबण्याचा प्रयत्न करत असतील तर तो त्यांना आता बाजूला सरकवून नदी सारखा प्रवाही होत राहील. हा प्रवाह कुठल्याश्या दुसऱ्या नदीत मिळेल की राष्ट्रसागरात हे येणारा काळच ठरवेल.

दैवी कृपेने आजवरच्या प्रवासात त्याला त्रास देणाऱ्यांपेक्षा अनेकांनी निर्व्याजपणे प्रेम देत साथ दिली आणि देत आहेत त्या सर्वांचे आभार मानून तो भार वाढवणार नाही किंवा धन्यवाद म्हणून वाद घालू इच्छित नाही. सदैव त्यांचे ऋणानुबंध जपतं तो त्यांच्या ऋणात राहण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. योगायोगाने आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तवार त्याची कहाणी सांगण्याचा योग आला. देव, देश अन् धर्मासाठी जगायचा त्याचा संकल्प अक्षय राहो आणि ते कार्य पेलावण्याचं बळ त्याला ईश्वर देवो अशी प्रार्थना.

“मंजिल मिल ही जायेगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं!” याप्रमाणे तो वाटचालं करतचं राहणार. त्याची शर्यत त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरुचं असेल कारण त्याची स्पर्धा असेल ती स्वतःशीचं म्हणजे अनिरुद्ध श्रीपाद नाना जोशी सोबत.

जय हिंद !

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?