' ३ आंधळ्यांच्या संघर्षात फसलेल्या काश्मीरला उ:शाप मिळेल? : काश्मीर आणि भारतीय जनमानस ६ – InMarathi

३ आंधळ्यांच्या संघर्षात फसलेल्या काश्मीरला उ:शाप मिळेल? : काश्मीर आणि भारतीय जनमानस ६

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मागील भागाची लिंक : फाळणीची अपरिहार्यता व ‘मुस्लिमाना हाकला’चा मूर्खपणा : काश्मीर आणि भारतीय जनमानस-५

===

समारोप

अशाप्रकारे इथे काश्मीर भारतात विलीन कसे झाले ह्याचा इतिहास पूर्ण होतो. काश्मीर प्रश्न मात्र पुढे हि चालूच आहे. त्यात पुढे शेख अब्दुल्ला – नेहरू ह्यांचे बिघडलेले संबंध, त्यांचा कारावास, आर्टिकल ३७०, पाक प्रणीत दहशत वाद, काश्मीर ची अलगाववादी चळवळ अशा अनेक गोष्टी येतात पण त्या वेगळ्या आणि अशाच दीर्घ लेखमालेचा विषय आहेत.

पुढे काय?

काश्मीर प्रश्नाचे ३ मुख्य तोडगे असू शकतात :

१. काश्मीरला स्वातंत्र्य देणे आणि त्याकरता भारतातील जनमत तयार करणे

२. काश्मिरी जनतेला भारतात सामील होण्याकरत राजी करणे

३. शस्त्राच्या बळावर काश्मीर वर ताबा ठेवणे जसा तो सध्या आहे

ह्या आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे जनतेला विश्वासात घेतल्याने ह्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढता येईल ह्याबाबत मला शंका आहे. कारण १९४७ नंतर आज २०१६ पर्यंत भारतीय जनतेला किंवा अगदी काश्मिरी जनतेला तरी विश्वासात घेऊन परिस्थितीची जाणीव करून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न किती झाले? शून्य.

जो खराखुरा इतिहास मांडतो त्याला देशद्रोही, पाक धार्जिणा, अन काय काय म्हणून हिणवले जाते. किती गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण ह्यात चालते ते मी काय वेगळे सागावे?

जनमत हे एखाद्या मृगजळाप्रमाणे असते असे म्हणतात. ते खरे असेल कदाचित. पण ह्या जनमताच्या मागे धावणाऱ्याच्या नाका तोंडात जाणारे पाणी मात्र खरे असते! काश्मीर बाबत भारतीय जनतेच्या भावनेचा जो राजकारणी अनादर करेल त्याच्या करत ती नक्कीच राजकीय आत्महत्या असेल. हीच गोष्ट काश्मिरी जनतेच्या आणि तेथल्या राजकारण्यांबाबत ही म्हणता येईल. शिवाय भारतातील मुसलमानांकरता ही गोष्ट फारशी हितावह असणार नाही.

ही गोष्ट नेहरूंना जेव्हा जाणवली, त्यानंतर त्यांनी नैतिकता गुंडाळून बाजूला ठेऊन, हा प्रश्न चिघळू दिला. आता तर १-१.२५ कोटी काश्मिरी लोकांच्या इच्छेसाठी भारतातल्या ८५ कोटी हिंदूंना नाराज करणे किंवा १५ कोटी मुसलमानांना धोक्यात टाकणे कधीही व्यवहार्य असणार नाही आणि हे सत्तेवर बसणारे सगळेजण जाणतात आणि म्हणूनच ते काहीही करीत नाहीत. म्हणूनच पहिले २ उपाय अशक्य ठरतात.

मग उरतो तिसरा उपाय. शस्त्राच्या बळावर काश्मीर वर ताबा ठेवणे…!

एक लक्षात घ्या काश्मीरला स्वातंत्र्य देणे हा राजकीय शहाणपण असणार नाही.

 

jammu kashmir 02 marathipizza

 

आपल्या पासून तुटून वेगळे झालेले २ शेजारी देश पाकिस्तान आणि बांगला देश ह्यांची उदाहरण आपली समोर आहेत. तिथे कधी दीर्घकाळ लोकशाही नांदली नाही, जनता सुखात नाही. मुख्य म्हणजे ते आपले भरवशाचे सहकारी नाहीत उलट शत्रूच आहेत. नेपाळ आणि श्रीलंका हे बिगर मुस्लीम देश ही आपले भरवशाचे सहकारी म्हणता येत नाहीत. शिवाय महत्वाकांक्षी आणि पाताळयंत्री चीन आहेच.

अशा वेळी अजून एक संभावित शत्रू राष्ट्र आपल्या डोक्यावर तयार होऊ देणे राजकीय शहाणपण असणार नाही. काश्मिर गेले तर उत्तर हिंदुस्थानातील अत्यंत महत्वाची ठाणी आणि शहरे धोक्यात येतील. काश्मीर आपण सर्वकाळ नसले तरी दीर्घकाळ बळाच्या जोरावर आपल्याकडे ठेवू शकतो, आज आपण ही अण्वस्त्रधारी देश आहोत आणि भारतीय जनता काश्मीरला जीवन मरणाचा प्रश्न मानते त्यामुळे जगातील इतर बडी राष्ट्र ज्यांना ही गोष्ट माहित आहे ती एवढ्या थराला गोष्टी जाऊ देणार नाहीत.

शेजारी असलेल्या चीन आणि पाकिस्तानलाही ते परवडणार नाही आणि भारत वेळ पडली तर काश्मीर करता अण्वस्त्र वापरायला हयगय करणार नाही. तेव्हा ती बाजू भक्कम आहे. पण त्याबरोबर हेही  लक्षात ठेवावे लागेल की, लष्करी उपायांनी फारतर काश्मिरच्या भूभागावर ताबा ठेवता येईल पण तेथील जनतेला भारताच्या बाजूने वळवता येणार नाही.

शेवटी काश्मीर म्हणजे फक्त भूमी नाही तिथली माणसे ही तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची. ह्या वरचा आणखी एक उपाय म्हणून काश्मीरला अधिक स्वायत्तता द्यावी असेही बऱ्याचदा म्हटले जाते. अर्थात काश्मीरला स्वायत्तता कशासाठी हवी आहे ह्यावर ह्या उपायाची फलश्रुती अवलंबून आहे.

 

Stone-Pelting-Kashmir-inmarathi
satyavijayi.com

काश्मिरी लोकांना पाकिस्तानात न जाण्याची किंवा वेगळे न होण्याची किंमत म्हणून अधिक स्वायत्तता हवी असेल तर ह्या स्वायत्ततेचा काही उपयोग नाही. उलट ह्यामुळे अलागाववाद अधिकच वाढेल. पण त्यांना कायदा व सुव्यवस्थेचा लाभ, इतर पायाभूत सुविधांचा विकास, देशाच्या इतर राज्याबरोबर विकासाच्या संधी उपलब्ध होत गेल्या, त्याच बरोबर त्यांची प्राणप्रिय काश्मिरियत धोक्यात येत नाही असे खात्रीलायक रित्या वाटत राहिले पाहिजे. सरकारचे वर्तन त्याला धरून दीर्घकाळ असले पाहिजे. कलम ३७० चे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे. आपण हे कलम अनेकदा पायदळी तुडवले आहे (बनावट निवडणूका हे याचे उत्तम उदाहरण).

ह्या कलमाचा यथायोग्य वापर होतो आहे हे, किंवा त्यांना परमप्रिय अशा त्यांच्या काश्मिरीयतला आपण स्वतः जपत आहोत आणि येथील लष्कर हे जुलुमासाठी नसून पाकिस्तान पासून आपल्या संरक्षणासाठी आणि आपत्तीमध्ये मदतीसाठी आहे हे त्यांना दिसले तर त्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीतील हवा निघून जाईल. आणि काश्मिरच नाही तर काश्मिरी जनता भारताचे अविभाज्य भाग बनतील. अशी आशा करूयात.

१९४७ सालापासून भारतीय नेत्यांचे काश्मीर बाबत वर्तन फार दुटप्पी राहिले आहे. त्यांना लोकशाही तत्वानुसार स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य आहे, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणजे सार्वमत आणि त्यानुसार येणारे पुढचे काश्मीरचे भारताकडून विभाजन नको आहे. त्याकरता जनमत तयार करायचा प्रयत्न ही ते करीत नाहीत. हे किती काळ चालेल माहिती नाही पण नियती न्यायनिष्ठुर आणि निर्दयी असते असा इतिहासाचा धडा आहे. वास्तवाला नाकारून आंधळेपणाने वागणाऱ्याना ती शापच देत असते.

विलीनीकरण झाल्यावर आणि भारतीय सैनिकांनी रक्त सांडल्यावर काश्मीर पाकिस्तानात जाणे शक्य नाही, ते स्वतंत्र होणे ही शक्य नाही. हे वास्तव शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या काश्मिरी जनतेने आंधळेपणाने नाकारले. काश्मीर भारतापासून तोडणे कालत्रयी शक्य नाही, हे पाकिस्तानने कधी समजून घेतले नाही. आणि काश्मिरी लोकांना पूर्वीही आणि आजदेखील भारतात राहायचे नाही हे भारतीय जनतेला कळत नाही. असा हा तीन आंधळ्यांचा हा शापमय संघर्ष आहे. ह्या तिघांपैकी एकाला तरी नजीकच्या भविष्यकाळात दृष्टी प्राप्त होवो. (तसे भारतीय जनतेबाबातच घडायची शक्यता त्यातल्यात्यात अधिक आहे म्हणून हा लेखन प्रपंच.) तोपर्यंत तरी काश्मीरला उ:शापाची प्रतीक्षाच राहील.

अशी गोष्ट सांगतात की मोझेस हा नित्य ईश्वराशी बोलत असे. असेच एकदा गप्पा मारताना तो ईश्वराला म्हणाला –

ईश्वरा, तु भविष्यात कधी लोकांवर नाराज झालास, रागावलास तर त्यांचे धन, जमीन- जुमला, संपत्ती, सर्वस्व अगदी प्रसंगी त्यांचे स्वातंत्र्य आणि जीवित ही हिरावून घे पण त्यांची बुद्धी, त्यांचा विवेक, त्यांची विचार करण्याची, भलं-बुरं, चांगल-वाईट ठरवण्याची क्षमता कधीच हिरावून घेऊ नकोस.

त्यावर मंद हसून ईश्वर म्हटला –

मोझेस, माझ्या प्रिय बाळा, मी नाराज झालो की सगळ्यात आधी हेच तर हिरावून घेतो. आणखी काही नाही.

ही गोष्ट पाकिस्तान, काश्मीर आणि आपल्याला अगदी चपखल लागू होते. नाही का !

इथे मला एका उर्दू शायराचा शेर आठवतो, शायराचे नाव आठवत नाही पण शेर असा –

कश्ती भी नही बदली, दरिया भी नही बदला,
हम डूबनेवालोंका जज्बा भी नही बदला ।
है शोक ए सफर ऐसा, एक उम्र हुई हमने,
मंझिल भी नही पायी, रस्ता भी नही बदला ।।

मी आशावादी आहे.

समाप्त

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?