' अभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” ? – InMarathi

अभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” ?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : सागर वाघमारे

===

सुर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी नी इतर ग्रह हेच सुर्याभोवती फिरतात हा निकोलस कोपर्निकसचा वैज्ञानिक सिध्दांत, चर्चच्या मताच्या विरोधात जाउन प्रखरतेने आपल्या प्रबंधात मांडणाऱ्या गॅलिलीओला पाखंडी इश्वरनिंदेचा गुन्हेगार ठरवत 1633 मध्ये तरूंगात डांबण्यात आलं होतं.

 

galileo_galilei_inmarathi
Illustration showing Galileo in 1638 (Mary Evans Picture Library) | BBC

आज याचप्रकारे प्रचलित धर्ममताविरोधात भूमिका घेणाऱ्या व्यक्तीला ईश्वरनिंदेचा गुन्हेगार ठरवत तुरूंगात डांबण्यात येणार असेल तर?

नुकताच पंजाब मधील काँग्रेस सरकारने मध्ययुगीन धर्मखुळ्यांना शोभेल असा एक प्रतिगामी कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पंजाब सरकारचा कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आला.

भारतीय दंडसंहितेत संशोधन करून धर्मग्रंथांचा उपमर्द करणार्‍या व्यक्तीला ईश्वरनिंदेचा गुन्हेगार पापी ठरवत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. पाकिस्तान, इंडोनेशिया, सौदी अरेबियासारख्या इस्लामी राष्ट्रांप्रमाणेच आता सेक्युलर भारतीय राष्ट्रात देखील ईश्वरनिंदा रोखणारे कायदे तयार करण्यात येणार असतील तर हा आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे.

आज “अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनिर्बंध नसावा. अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा अर्थ आक्षेपार्ह वक्तव्ये करून इतरांचा धार्मिक भावना दुखावणे हा नसतो” वगैरे वगैरे अतार्किक कारण देत एखाद्या व्यक्तीचा आयुष्याची, धर्मग्रंथांची, प्रचलित विचारांची चिकित्सा कशी करावी, कधी करावी, कोणत्या शब्दात करावी, करावी की न करावी याचेही काही नियम तयार करत बोलणाऱ्या लिहणाऱ्या व्यक्तिंवर कायदेशीर बंधने टाकून त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत आहे.

भारतीय विचारवंत देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा अर्थ आपल्या आपल्या सोयीनुसारच काढत आले आहेत. आमेरिके सारखं अनिर्बंध अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशात आजही कोणत्याही विचारवंताला नको आहे. फक्त सगळे बोलघेवडेच!

ईश्वरनिंदा रोखणारे कायदे हे मानवी अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा नैसर्गिक अधिकारावर अतिक्रमण करणारे तर आहेतच पण या कायद्यांमुळे धार्मिक उन्माद देखील वाढतो आहे. या कायद्यांचा वापर तुच्छ राजकीय स्वार्थासाठीही करण्यात येत आहे. धर्मवेड्यांचा उन्मादी झुंडी आपल्या धार्मिक भावना दुखावल्याच कारण पुढे करत, कायदा स्वतःच हातात घेत संशयित ईश्वरनिंदकांना ठेचून ठेचून जिवे मारून टाकत आहेत.

गाईला गोमाता समजून तीचा रक्षणाकर्ता तयार करण्यात आलेला “गोवंशहत्या बंदी” सारखा कायदा हा देखील एकप्रकारचा ईश्वनिंदा रोखणारा कायद्याच आहे. आज जगभरात ईश्वरनिंदा नी धर्मग्रंथांचा अपमान केल्याचे आरोप ठेवत मुक्त विचार करणार्यांना, नास्तिकांना, विवेकवाद्यांना कारावासाचा शिक्षेपासून ते देहदंडाचा शिक्षेपर्यंतचा शिक्षा देण्यात येत आहेत.

काही दिवसांपूर्वी चीनी वंशाचा एका इंडोनेशियन महिलेने मस्जिदवरील लाऊडस्पीकरचा आवाजा विरोधात तक्रार केल्याने इंडोनेशियन न्यायालयाने ईश्वरनिंदा केल्याचे गुन्हेगार ठरवत तिला 18 महिन्यांची, तर इंडोनेशियातच मागचा वर्षी जकार्ताचा गव्हर्नरला पवित्र कुराणाचा अपमान केल्याचे गुन्हेगार ठरवत 2 वर्षे करागृहवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

2008 मध्ये जॉर्डन देशात कवि इस्लाम समहान यांना आपल्या कविता संग्रहांमध्ये कुराणातील काही आयत वापरल्याने इश्वरनिंदेचा गुन्हेगार ठरवत 1 वर्षे कारावासची तर 2010 मध्ये असिया बिबी नावाचा पाकिस्तानी महिलेला पाकिस्तानी न्यायालयाने पैगंबर मुहम्मदांचा अपमान केल्याचे दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

अशाप्रकारचे अ-मानवीय अ-लोकतांत्रिक मध्ययुगीन प्रतिगामी कायदे भारतीय लोकप्रतिनिधीही धार्मिक लांगूलचालनासाठी तयार करणार असतील तर भारतीय समाजासाठीही ही एक धोक्याचीच घंटा आहे.

सध्या नास्तिक विवेकवादी आपला वैचारिक लढा जिकंत चालले आहेत. जगभरात नास्तिकतावाद वाढत आहे. धार्मिक कट्टरवाद्यांचा मनात असुरक्षेतीची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे ते अधिकच हिंसक नी उन्मादी बनत चालले आहेत. ते शासन यंत्रणेचा मदतीने धार्मिक कायदे बनवत आपले धार्मिक विचार इतरांवर थोपवत लोकांनाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य नी आर्थिक स्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर निर्बंध घालण्याच काम 1950 पासुनच सुरू झाले. भारतीय मुळ घटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमेरिकेसारखच अनिर्बंध होतं.

1950 मध्ये कॉम्युनिस्ट पत्रकार रोमेश थापर यांनी Cross Roads या साप्तहिकात नेहरूंच्या काही नीतींवर टीका केल्याने तत्कालीन मद्रास सरकारने त्या साप्ताहिकावर बंदी घातली. बंदी विरोधात थापर यांनी सर्वोच्च न्यायालयात न्याय मागतीला व निर्णय त्यांच्या बाजूने दिला गेला. पण –

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय फिरवण्यासाठी तात्कालिन नेहरू सरकारने 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती करून भारतीय संविधानातील कलम 19(1)(a)मध्ये असणाऱ्या अनिर्बध अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार नैतिकता, देशहित इत्यादी कारण पुढे करून तो काढून घेतला.

पुढे आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी ब्रिटिशांच्याही काळात जो “देशद्रोहाचा” गुन्हा अदखलपात्र होता त्याला दखलपात्र करून पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीची गळचेपी केली.

जे ब्रिटिशांनाही कधी करावं वाटलं नाही ते इंदिरा गांधींजीनी केलं, हे हि विशेष नाही का?

देशद्रोहासारखे अलोकतांत्रिक अन्यायकारी कायदे स्वतंत्र भारतात रद्दबातल ठरविण्या ऐवजी त्या कायद्यांना अधिकच कठोर बनवत राज्यसंस्थेने स्वतःचाच हातात आज प्रचंड शक्ती घेतली आहे.

या सगळ्यांचाच परिणाम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा रक्षणात आपला देश करत असलेली खूपच खराब कामगिरी होय.

भारतीय राज्यसंस्था सुद्धा भारतीयांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा रक्षणात अपयशीही ठरल्या आहेत नी राज्यसंस्थेने सुद्धा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर वेळोवेळी अतिक्रमण केलं आहे. पेव्ह रिसर्च सेंटरने केलेल्या एका शोध अभ्यासाने भारत देश अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा रक्षणात अतंत्य वाईट कामगिरी करत असल्याचं दाखवून दिल आहे.

आफ्रिकेतील टांझानिया, केनिया, घाना वगैरे देशांपेक्षाही या सर्वेक्षणात आपण अतंत्य खराब निंदनीय कामगिरी करत आहोत. पण – भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परिस्थिती किती वाईट आहे हे समजण्यासाठी कुण्या संस्थेचा शोध अभ्यासाचीही गरज नाही. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आल्याची अनेक उदाहरणं देता येतील.

लेखक,पत्रकारांचा हत्या किंवा राज्यकर्त्यांकडून त्यांचावर येणारा दबाव असू द्या, धर्मसुधारणा नी अंधश्रद्धा निर्मुलनाच काम करणारे नास्तिक विवेकवादी डॉ.दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी यांचा हत्या असू द्या की प्रसिद्ध राजकारणी नेत्याच वंग्यचित्र काढल्याने किंवा फेसबुकवर फक्त एखादी पोस्ट लिहल्यामुळे होणारी पोलिसी कारवाई असु द्या – अशी अनेक उदाहरण देता येतील.

काही वर्षांपूर्वी असिम त्रिवेदी नावाचा वंग्यचित्रकार तरुणावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्याला अटक करणे किंवा कन्हैया कुमार या जेएनुत शिकणाऱ्या तरुणावर राजकीय शत्रुत्वातून करण्यात आलेला देशद्रोहचा आरोप नी त्याची अटक असू द्या ही अशी अनेक अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गळा घोटणारी उदाहरण देता येतील.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचं मूल्य. ते मिळविण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं रक्त देखील सांडलं.

अतोनात यातना सोसल्या आहेत.

तरूंगवास भोगला.

आज मात्र त्याच मूल्याचं अवमूल्यन केलं जात आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील मूल्यांचं रक्षण करणे हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचं आज घटनादत्त कर्तव्य आहे. पण दुर्देवाने याच कर्तव्याचं पालन होताना दिसत नाही.

माझा आवडता आमेरिकेन Rapper Eminem ज्याप्रकारे त्यांचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंपवर आपल्या संगीतातून टिका करतो तशीच त्याच भाषेतील टिका एखाद्या मोठ्या राजकारणी व्यक्तीवर केली तर आज आम्हाला स्वतंत्र भारतदेशातही गजाआडच डांबल जाईल. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवत गीतेची चिकित्सा करताना श्रीकृष्णाला मनोरोगी ठरवून येड्याच्या इस्पितळात पाठवलं होत.

ज्याप्रकारे हिंदू धर्माची चिकित्सा कठोर कडवट भाषेत त्यांनी केली त्याचप्रकारची चिकित्सा आज घडीला स्वतंत्र भारतात डॉ आंबेडकरांनी केली असती तर देशाचा प्रत्येक न्यायालयात त्यांच्या विरोधात “आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचं” कारण पुढे करत खटले भरले गेले असते. वेगवेगळ्या कायद्यांचा हवाला देत त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला असता.

भारतीय मुळ घटनेप्रमाणेच आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य पून्हा अमर्याद नी अनिर्बंध मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात मला तुमचा भावना दुखावण्याचा नी तूम्हाला माझ्या भावना दुखावण्याचा अधिकार असावा. माझ्या तुमचा भावनेपेक्षा लोकांचा अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार टिकणे जास्त महत्वाचं असतं.

 

freedom of speech inmarathi
123rf.com

दुखावलं गेलेलं मन काही काळानंतर पूर्ववतहोतं. पण अभिव्यक्तीची गळचेपी केल्याने त्या विरोधात लढणं अवघड होवून जातं. त्यात अनेक कायदेशीर नी समाजिक अडचणी येऊ लागतात.

समाजातील वाईट अन्याकारी गोष्टी चालूस्थितीत तशाच राहतात. अमर्याद अभिव्यक्तीचा स्वातंत्र्यांची गरज प्रत्येकाला असते.

मानवी अधिकारांसाठी शोषणा विरूद्ध लढणार्या दलित अदिवाशी नी इतर वर्गातील शोषितांला, स्त्रीयांना या सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज असते.

समाजातील दांभिकतेवर नियंत्रण मिळविण्यासाठीही अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य गरजेचं असतं. देशाचा वैचारिक सामाजिक नी आर्थिक विकास होण्यासाठी व एक सहिष्णू संस्कृती देशात उपजण्यासाठीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अनिर्बंधच असायला हवं.

जितकं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी तितकाच समाज असहिष्णु नी अज्ञानी राहतो.

डॉ.आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी काही लोकांचा धार्मिक भावनांना ठेच पोहचते म्हणून धर्मचिकित्सा केली नसती तर? येशू, मुहम्मद पैगंबर व गौतम बुद्धासारख्या महात्म्यांनी आपण कुणाच्या तरी धार्मिक भावना दुखावत आहोत म्हणून आपला काम जागीच थांबवलं असत तर?

मानवी समाजाचा प्रगतीसाठी अमर्याद अभिव्यक्तीच स्वातंत्र्य ही पूर्वअटच आहे. ब्रिटिश फिलॉसॉफर जॉर्ज बर्नाड शॉ ने म्हंटल्याप्रमाणे “All great truth begins with Blasphemies.” म्हणून इश्वनिंदेचा,इतरांचा भावना दुखावण्याचा अधिकाराचा देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकारामध्ये समावेश असावा. पश्चिमेकडची राष्ट्रे पुरोगामी, सहिष्णू, आधुनिक, प्रगत नी धर्मनिरपेक्ष हे तिकडे ख्रिश्चन धर्म नी चर्च विरोधात झालेल्या मोठमोठ्या आंदोलनांमुळेच आहेत.

अमेरिकन लोक भारतीयांपेक्षा वैचारिक नी आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगत नी मॅच्यूअर त्यांचा देशात त्यांना मिळालेल्या अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्यामूळेच आहेत. त्या अमर्याद अनियंत्रित अभिव्यक्ति स्वातंत्र्यामूळे अमेरिकेत आधी चांगले विचार निर्माण झाले व त्यानंतरच त्या विचारांचा जोरावर त्यांनी त्यांची फारमोठी आर्थिक नी सामाजिक प्रगती केली आहे.

“Give me the liberty to know, to utter, and to argue freely according to conscience, above all liberties.”

– Jhon Milton

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?