' सर्पदंशामुळे झाला अभिनेत्रीचा मृत्यू: असा कराल सर्पदंशाचा सामना – InMarathi

सर्पदंशामुळे झाला अभिनेत्रीचा मृत्यू: असा कराल सर्पदंशाचा सामना

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पश्चिम बंगाल मध्ये ६३ वर्षाच्या अभिनेत्री कालीदासी मंडल यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. ही घटना एका नाटकादरम्यान झाली. अभिनेत्री कालीदासी नाटकात भिकारिणीचा रोल करत होती. या नाटकात सापाची सुद्धा भूमिका 🙂 होती. ती कोब्रा सापाबरोबर स्टेजवर चालत होती. तर तेव्हा मध्येच अचानक स्पेक्टकल कोब्राने अभिनेत्रीला दंश केला आणि तिचा मृत्यू झाला.

कालीदासीच्या सहअभिनेत्रीने असा आरोप केला आहे की या घटनेनंतर त्यांना डॉक्टरांकडे न नेता मंत्रिकाकडे नेले गेले. आणि हेच त्यांच्या मृत्यूचे सगळ्यात मोठे कारण आहे.

 

indian-cobra-inmarathi
snake-facts.weebly.com

सर्पदंश झाल्यावर लोकांना भीती वाटते. आणि ती साहजिकच आहे. त्यामुळे ते कुठेतरी कोणाकडून तरी ऐकलेले उपचार करतात. पण बहुतेकांना हे माहीत नसतं की रुग्णाला वाचवण्यासाठी योग्य उपचार काय करावेत. सर्पदंश झाल्यावर पुढे सांगितलेले काही उपाय केले तर विष पसरत नाही. त्याचबरोबर काही गोष्टी करायच्या टाळायला हव्यात.

सर्पदंश झाल्यावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते. म्हणून ती मिळण्यापूर्वी काही उपचार करावे लागतात. हे उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत ब-याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत हा उपचार अत्यंत महत्त्वाचा आहे, तो कसा कराल?

◆ जखम स्वच्छ पाण्याने धुवा.
◆ सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा.
◆ साप चावलेल्या व्यक्तीला आडवे झोपवून शांत राहण्यास सांगितले पाहिजे. त्याला चालायला लावू नये. यामुळे विष लवकर पसरत नाही.
◆ पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे.
◆ विषारी साप हाताला चावला असेल तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे.
◆ विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने बांधून आवळून घ्यावे जेणेकरून ते विष शरीरात अजून कुठे भिनू नये.
◆ आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट चाकून बांधावे बांधल्यानंतर ते बाहेर काढावे. दर 15 ते 20 मिनिटांनंतर बंद 15 सेकंदांसाठी सोडावा व पुन्हा त्याच पद्धतीने बांधावा. किंवा उपलब्ध असल्यास संपूर्ण हात किंवा पाय लवचीक पट्टीने (इलॅस्टिक क्रेप बँडेज) बांधावा. यामुळे विषारी रक्त सगळीकडे पसरणार नाही. सर्व विष रक्तातून न पसरता मुख्यतः रससंस्था किंवा लसिकातून पसरते. थोडा दाब दिला तरी यातला प्रवाह थांबतो.
◆  नंतर त्या हाताला किंवा पायाला लांब काठी बांधावी म्हणजे त्याची जास्त हालचाल होणार नाही.
◆ दंश झालेल्या व्यक्तीला दमा किंवा अ‍ॅलर्जी अथवा एखादा आजार असल्यास डॉक्टरांना आधीच कळवावे.
◆ दवाखाना लांब असेल तर तोंडाने विष चोखून थुंकून द्यावे. मात्र जर ते विष काही प्रमाणात आपल्या तोंडात राहिले तर त्यामुळे आपल्याला विषबाधा होऊ शकते. अशावेळी आपल्या तोंडातून फेस यायला लागतो. त्यामुळे आपला मृत्यू पण होऊ शकतो. त्यामुळे असे करणे आपल्या जीवावरही बेतू शकते.

 

whatsnakeisthat.com

सर्पदंश झाल्यास हे करू नका:

◆ सापाचे विष मंत्राने उतरत नाही. त्यामुळे दंश झालेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे नेऊ नका. रुग्णाला मांत्रिकाकडे नेणे हे वेळ दवडण्यासारखेच आहे.
◆ सर्पदंश झालेल्या व्यक्तीला कडूलिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नका.
◆ सर्पदंश झालेल्या जागेवर कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका किंवा कोणत्याही बिया वगैरे खाण्यास देऊ नका.
◆ सर्पदंश झालेल्या जागेवर गरम केलेल्या लोखंडाच्या डागण्या देऊ नका.
◆ सर्पदंश केलेला साप मारून अथवा जिवंत डॉक्टरांकडे नेऊन दाखवण्याची गरज नसते.
◆ एक उपाय म्हणून काही लोक एकामागे एक कोंबडयांचे गुदद्वार जखमेला दाबून लावतात. याचा काहीच उपयोग होत नाही. फक्त कोंबड्या बळी जातात.
◆ सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये.
◆ दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये. त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.
◆ रुग्णाच्या अवयवावर एकाच ठिकाणी आवळपट्टी बांधून ठेऊ नये. यामुळे जखमेतून जास्त रक्त जाते आणि त्या अवयवाचा रक्तपुरवठा थांबूही शकतो. दोन तासांहून जास्त वेळ अशी आवळपट्टी बांधल्यास हात काळा पडून शेवटी कायमचा गमवावाही लागू शकतो.
◆ सर्पदंश होताना तो उलटला तरच विषबाधा होते हा समज चुकीचा आहे. वेळ न दवडता तत्काळ दवाखान्यात जा.
◆ सर्पदंश झाल्यास त्या सापास पकडून चावल्याने विष उतरते, असा गैरसमज आहे. तसे करू नका. अशा वेळी साप चवताळलेल्या अवस्थेत असल्याने तो आणखी चावा घेऊ शकतो.
◆ सर्पदंश झालेल्या व्यक्तीने एकट्याने दवाखान्यात जाऊ नये.
◆ दंश झालेल्या व्यक्तीने कोणतेही वाहन चालवू नये.

 

pnpmedianepal.com

सर्पदंशावरील इतर सर्व उपाय हे निरर्थक व वेळ वाया घालवणारे आहे. असे उपाय विषबाधित व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे सर्पदंशावर एकमेव उपाय म्हणजे  प्रतिसर्पविष (स्नेक अँटिव्हेनिन) हेच होय, जे शासकीय सामान्य रुग्णालयात मोफत दिले जाते.भारतातील सर्व प्रमुख जातींच्या विषारी सापांचे विष वापरून हे तयार केलेले असल्याने कोठल्याही सर्पविषावर हे गुणकारी आहे. पण सर्पविष आधीच शरीरातील निरनिराळया अवयवांत भिनलेले असेल तर मात्र याचा उपयोग होत नाही.

विषाचे अवयवावर जे दुष्परिणाम आधीच सुरू झालेले असतात ते तसेच राहतात. म्हणूनच सर्पविषावरचा उतारा लवकरात लवकर दिला गेला पाहिजे.

याची सहसा तीन इंजेक्शने पुरतात. पण कधीकधी विष अधिक पसरले असल्यास जास्त इंजेक्शने द्यावी लागतात. हे इंजेक्शन शिरेतून किंवा सलाईनमधून देतात.

एकूणच सर्पदंशाचा उपचार हा खूप जोखमीचा असतो. विषारीपणाची खात्री झाल्याझाल्या ताबडतोब चांगले उपचार सुरू झाले तर जीव वाचण्याची खूप चांगली शक्यता असते. यात जेवढा उशीर होईल तेवढे नुकसान अधिक. आपण प्रथमोपचार काय आणि किती करू शकू हे रुग्णालयातल्या पुढच्या उपचारांइतकेच महत्त्वाचे असते. चांगले उपचार झाले तर विषारी दंश झालेल्यापैकी 70-80 टक्के व्यक्ती वाचू शकतात हे निश्चित !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?