' काल्पनिक आणीबाणीखाली दडपलेल्यांचा शिझोफ्रेनिया, अर्थात भ्रमिष्ठावस्था : भाऊ तोरसेकर – InMarathi

काल्पनिक आणीबाणीखाली दडपलेल्यांचा शिझोफ्रेनिया, अर्थात भ्रमिष्ठावस्था : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

“आमच्या मनात प्रथमपासून एक संशय होता. तो अण्णांच्या आंदोलनाच्या एकेका दिवसानंतर अधिक बळकट होत गेला. भारताची राज्यघटना ही कार्यकारी विभाग, कायदे मंडळ आणि न्यायसंस्था या तीन वेगवेगळया स्वायत्त खांबांवर उभी आहे. यामागे एक कल्पना आहे. जर एका घटकामध्ये घसरण झाली, तर दुसरा विभाग परिस्थितीला लगाम घालून देशाला सावरू शकतो.

राज्यघटनेतील या व्यवस्थेमुळे स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, तरी देशात हुकूमशाहीचा उदय झाला नाही. १९७५ साली पं. इंदिरा गांधींनी घटनात्मक चौकटीत राहून देशावर आणीबाणी लादली. लोकशाहीचा एक खांब – कार्यकारी विभाग – उर्वरित दोन खांबांना तुच्छ लेखू लागला. त्यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये नष्ट केली होती.

तरीही आंतरिक शक्तीच्या आधारे 1977 च्या निवडणुकीत देशाने इंदिरा गांधींना पराभूत केले. कोन्ग्रेस पक्षाची सत्तेवरून हकालपट्टी केली.

लोकशाहीची पुनर्स्थापना केली. भारतीय राज्यघटनेने संकटकाळी आपले अंतर्भूत सामर्थ्य आणि तेज दाखविले. त्या संकटात लोकशाही प्रणाली एका अग्निदिव्यातून बाहेर पडली. हा ऐतिहासिक अनुभव गाठीशी असूनही प्रस्थापित राज्यघटना बदलून टीम अण्णाची अध्यक्षीय प्रणाली लागू करायची पूर्वतयारी चालू आहे की काय, अशी आम्हाला शंका येऊ लागली.

 

Ramdev-anna-inmarathi
akashverma.in

जनलोकपाल बिल आणि त्यासाठी जनआंदोलन नामक बाजारू प्रदर्शन ही अध्यक्षीय लोकशाहीची रंगीत तालीम आहे असा संशय आम्हाला येऊ लागला. त्याला कारण होते. अमेरिकेच्या अध्यक्षाला तेथील सिनेटपेक्षा (संसदेपेक्षा) अधिक अधिकार आहेत. तेथील संसदेने बहुमताने एखादा ठराव संमत केला तरी त्या ठरावाच्या विरोधात अध्यक्षाला निर्णय घेता येतो.

अमेरिकेच्या अध्यक्षावर निवडून आलेल्या सिनेटर्समधूनच काहींना मंत्रिमंडळात सदस्य म्हणून घेण्याचे बंधन नसते. त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही व्यक्तीला तो मंत्रिमंडळात घेऊ शकतो.

याचा अर्थ सार्वजनिक जीवनाचा स्पर्श नसलेली मंडळी अमेरिकेच्या जनतेवर राज्य करू शकतात. भारतीय लोकशाहीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी मामुली आहेत असा तुच्छतादर्शक भाव काही विचारवंत मंडळींमध्ये आढळतो.

ते स्वतःला सर्वज्ञानी, एक्सपर्ट समजतात. वास्तवात ते पढतमूर्ख असण्याची शक्यता असते. प्रशांत भूषण, शांती भूषण, संतोष हेगडे, किरण बेदी, अरविंद केजरीवाल या टाईपची माणसे स्वतःला खासदारांपेक्षा, केंद्रिय मंत्र्यांपेक्षा, पंतप्रधानांपेक्षा किंवा निवडून आलेल्या कुणाही व्यक्तीपेक्षा अधिक विद्वान समजतात. तसेच देशावर राज्य करायला केवळ तेच मुठभर लोक लायक आहेत असा गैरसमज ते जनतेत पसरवितात.

एवढेच नव्हे; तर ते स्वतःला सार्वजनिक चारित्र्याचे व नैतिकतेचे शिरोमणी समजतात. ही मंडळी इतरांवर ‘नैतिक पोलीस’ म्हणून दंडूकेशाही करू इच्छितात.

त्यांच्या व्यक्तिमत्वात सत्ताकांक्षा किती आणि नैतिकतेचा अंश किती असतो याबद्दल आमच्या मनात शंका होती. ती शंका रास्त आहे हे या मंडळींनी आपल्या आचाराने व विचाराने वारंवार सिध्द केले. अण्णा व त्यांची टीम ही मंडळी विद्वान किती, चारित्र्यवान किती आणि ते नैतिकतेचे कितपत पालन करणारी आहे?

ते स्वतःला सर्वांपेक्षा ते उच्च स्तरावरील पवित्र लोक मानतात? ते खरोखर तसे आहेत की नाहीत हे शंकास्पद आहे.

अण्णा व त्यांचा संच यांचा नेहमीच ‘आपण उच्च नैतिक स्तरावर जगणारे स्पेशल लोक आहोत’ असे शिफारसपत्र स्वतःला घेण्याचा पवित्रा असतो. यालाच ‘ब्राह्मण्य’ असे म्हणतात. जन्माने ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीमध्ये देखील ‘ ब्राह्मण्य’ ठासून भरलेले असू शकते, हे अजून भारतीय नागरिकांना उमगलेले नाही.

 

Anna-Hazare-inmarathi
thewirehindi.com

हा ब्राह्मण्याचा दोष अण्णांमध्ये जन्मामुळे नव्हे; तर त्यांच्या पायामधून डोक्यात शिरलेला आहे. जेव्हा लोक आपल्या पाया पडतात, तेव्हा आपण देव आहोत असा भ्रम पाया पडून घेणार्‍याच्या बुध्दीत शिरतो. तसे होणे स्वाभाविक आहे. दुसर्‍याने आपल्या पायावर माथा टेकवावा ही इच्छा हा सत्ताकांक्षेचाच अविभाज्य भाग आहे. हा मानसिक रोग आहे. तो वाढत जातो.

मग देशाच्या संसदेने आपल्या पायावर डोके टेकवावे, आपण संसदेचे बाप आहोत, देशाने राज्यघटना आपल्या पायावर अर्पण करावी असेही वाटू लागते.

भोवती सतत कॅमेरे असतील तर कशाचाही विधीनिषेध राहत नाही. कॅमेर्‍यांची संख्या कमी झाली की अधिक विवादास्पद बोलावे, म्हणजे कॅमेरेवाले धावत येतील हे कळते. मग माणूस काहीबाही बोलून कॅमेरे आकर्षित करू लागतो. सामान्य माणसांना चॅनेल्समधून ज्या प्रतिमा त्यांच्यावर आदळतात तेच वास्तव वाटू लागते.

अण्णा – टीमची दर्पोक्ती ऐकली की आमच्या मनात प्रश्न उभा राहिला. टीम-अण्णाच्या मनात अण्णा हजारे यांच्या विषयी तुच्छतेची भावना असावी. गर्विष्ठ अन आत्मकेंद्री विचारवंत हे लोकशाहीला मोठा धोका असतात.

अण्णा हजारे यांचा वापर करण्यात फक्त त्यांची सोय होते. त्यांच्या मोठेपणासाठी देशाला वेठीस धरणे अनैतिक आहे असे त्यांना वाटत नाही. अण्णा हजारे स्वतःला जेष्ठ व श्रेष्ठ मानू लागले. स्वतःचे भलतेच मूल्यमापन करू लागले. त्यामुळेच ते या विद्वान मंडळींच्या गळाला लागले. अहंकारामुळे विवेकबुध्दी नष्ट होते. जणू अण्णा भारताचे राष्ट्राध्यक्ष बनणार आणि ते टीम अण्णातील प्रत्येक सदस्याला केंद्रिय मंत्रिमंडळात घेणार असा भ्रम निर्माण झाला.

त्याचबरोबर आपण भारताला महासत्ता बनविणार व जगात देशाला भ्रष्टाचारमुक्त, नैतिकतेच्या सुर्याने तळपणारे एक बलाढय राष्ट्र बनविणार अशी अण्णांच्या मनात चुकीची धारणा झाली.”

===

उपरोक्त उतारा वाहिन्यांवरील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व अधूनमधून राजकीय विश्लेषक म्हणून पेश केल्या जाणार्‍या डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या तब्बल सहा वर्षे जुन्या राजकीय विश्लेषणातील एक भाग आहे. तेव्हा त्यांना जनलोकपाल या अण्णा आंदोलनाने कसे भयभीत केले होते, त्याचा हा लिखीत पुरावा आहे.

आधी त्यांच्या मनात संशय होता आणि हळुहळू त्या संशयाचे रुपांतर खात्रीमध्ये होत गेले. देशातील राज्यघटना व लोकनियुक्त सरकार कसे जमिनदोस्त होणार आणि त्याच्या जागी अमेरिकन पद्धतीची अध्यक्षीय लोकशाही येणार, इथपर्यंत त्यावेळी डॉक्टरांनी निदान केलेले होते.

नशीब त्यांनी उपाय व उपचार सुरू करून शस्त्रक्रीया केलेली नव्हती. अन्यथा मोठेच आक्रित घडले असते. कारण सप्तर्षी पुण्यातून वैद्यकशास्त्रातले डॉक्टर झालेले आहेत आणि तसे डॉक्टर वैद्यकक्षेत्र सोडून अन्य बाबतीतच नावारूपाला येतात असा इतिहास आहे. राजकारण, अभिनय वा समाजकारण साहित्य अशा क्षेत्रातील पुणेकर तात्कालीन डॉक्टरांची मजल फ़ार मोठी असते. सहाजिकच त्यांची शस्त्रक्रीया आक्रीत घडवण्याचा धोका संभवतो.

 

KumarSaptarshi-inmarathi
mitsog.org

तर अशा कुमार सप्तर्षींना सहा वर्षापुर्वी देशातील घटना व घटनात्मक राज्यव्यवस्था धोक्यात आल्याची खात्री पडलेली होती. पण आज सहा वर्षे उलटून गेली व अण्णा हजारे थंडावले असले, तरी राज्यघटना शाबुत आहे आणि त्यानुसार सत्तेत आलेले सरकारही चार वर्षे निर्धोकपणे चालून पाचवर्षाची मुदत पुर्ण करण्याच्या स्थितीत आहे. इतक्यात अशा डॉक्टर मंडळींना नवा संशय येऊ लागला आहे.

त्यांना आजकाल देशात आणिबाणी असल्याचे भास आभास होऊ लागलेले आहेत आणि मग त्यातून पुढे आणखी काय होईल, त्याची निदाने असले बिन दवाखान्याचे डॉक्टर्स सांगू लागलेले आहेत. त्याला सामान्य वैद्यकशास्त्रामध्ये शिझोफ़्रेनिया किंवा भ्रमिष्टावस्था असेही म्ह्णतात.

बाकी कुठल्याही आजारावर किंवा शारिरीक रोगावर उपचार औषधे असतात. पण जे काही ठराविक मानसिक आजार वा रोग असतात, त्याला बाहेरून काही औषधे देऊन उपयोग नसतो. त्यात मनोरुग्णाला आपणच रोगमुक्त होण्याची अतीव इच्छा असावी लागते. तिथेच तर सप्तर्षी वा तत्सम पुरोगामी डॉक्टरांची अडचण असते. त्यांना आपण रुग्ण नसून रोगनिदान करणारे डॉक्टर असल्याच्या समजूतीने पछाडलेले असते. त्यामुळेच मग एकाच आजाराविषयी परस्परविरोधी टोकाची निदाने असले डॉक्टर्स करू शकत असतात.

जनलोकपाल आंदोलन वा तात्कालीन सरकारविरोधी उक्ती कृतीविषयी जे काही निदान सप्तर्षी यांनी उपरोक्त लिखाणातून १५ ऑगस्ट २०१२ च्या ‘सत्याग्रही विचारधारा’ संपादकीयातून केलेले आहे, त्यापेक्षा त्यांची आजची विश्लेषणे कितीशी जुळणारी असतात?

तेव्हा अण्णा हजारे किंवा त्यांच्या समर्थकांकडून जी भाषा वा दुषणे सरकारला दिली जात होती, त्यापेक्षा आजची सप्तर्षी यांची दुषणे किती वेगळी असतात? आपण नित्यनेमाने डॉक्टरना विविध वाहिन्यांवर विचारवंत म्हणून पेश केलेले ऐकत असतो? त्यापैकी किती विश्लेषण वा मतप्रदर्शनात, हे गृहस्थ निवडून आलेले सरकार वा लोकप्रतिनिधींविषयी सन्मानाने बोलत असतात? की तुच्छतेने बोलत असतात?

सर्वकाही अक्कल व ज्ञान आपल्याच माथ्यामध्ये साठेबाजी करून दडपून ठेवलेले आहे आणि विद्यमान सरकार वा निवडून आलेले लोकप्रतिनिधी कसे बेअक्कल आहेत, याचाच उहापोह ते करतात ना? मग त्यातून राज्यघटना वा तिच्या चाकोरीत चालणार्‍या कारभारावर स्तुतीसुमने उधळली जात असतात काय?

तेव्हाही अण्णा हजारे वा त्यांचे सहकारी तात्कालीन सरकारवर दोषारोप करीत होते आणि आज कुमार सप्तर्षी तेच करत असतात ना? मग याला बुद्धीमत्ता म्हणावे की मानसिक आजार संबोधावे?

आम्ही म्हणू तोच कायदा व विधेयक मसूदा संसदेने संमत केला पाहिजे आणि संसदेने आपल्या पायावर माथा टेकला पाहिजे; असे अण्णा हजारे यांनी तेव्हाही म्हटले नव्हते. पण सप्तर्षी यांचे कान इतके तिखट, की न बोललेलेही त्यांना ऐकू यायचे आणि आजही त्यांना अनेक गोष्टी घडल्या नसल्या तरी स्वच्छ दिसू शकतात. अर्थात एकटे कुमार सप्तर्षीच तितकी सिद्धी प्राप्त झालेले सिद्धपुरूष नाहीत. पुरोगामीत्व किंवा तत्सम काही ठराविक शब्दांचा जप केला, मग ही सिद्धी झटपट प्राप्त होत असते.

त्यामुळे अशा बुद्धीमंतांचा सुकाळ आजकाल झालेला आहे. त्यांनाच माध्यमातून संधी मिळत असल्याने त्याचा बोभाटा होत असतो आणि नसलेल्या गोष्टीही दृगोचर होत असतात.

सहाजिकच अनेकांना अघोषित आणिबाणी दिसू शकते आणि अनुभवासही येऊ शकत असते. मानसिक आजार असेच असतात. त्यांची बाधा झाली, मग काहीही घडल्याशिवाय दिसू शकते आणि त्याची प्रचितीही येऊ शकते. म्हणून सप्तर्षींना तेव्हा भारतात येऊ घातलेली अमेरिकन अध्यक्षीय पद्धती साक्षात दर्शन देऊ शकलेली होती आणि आज त्यांच्यासारख्यांना नसलेली आणिबाणी भयभीत करू शकते.

इतरांचे सोडून द्या आणिबाणीत खुद्द सप्तर्षींनी येरेवड्यात काही महिने खर्ची घातले आहेत. त्याचे कारणही ते उपरोक्त परिच्छेदात सांगतात. ‘त्यांनी (इंदिराजींनी) भारतीय नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये नष्ट केली होती.’ असे सांगणार्‍यांना आज आपण थेट टिव्ही वाहिनीवर सरकार विरुद्ध बोलतोय, याचेही भान नसेल; तर त्याला मानसिक रुग्णावस्था म्हणावे लागते.

पण ती बाधा एकट्या सप्तर्षींची नाही तर त्यांच्यासारख्या बौद्धीक अहंगंडाने पछाडलेल्या हजारो शहाण्यांची झालेली आहे. एकदा अशी रोगबाधा झाली, मग वास्तवाशी नाळ तुटत असते आणि मनात असेल ते दिसू लागत असते. अन्यथा सहा वर्षापुर्वी अण्णांविषयी घेतलेल्या आक्षेपाचे अनुकरण आज खुदद सप्तर्षींनी कशाला केले असते?

 

anna-inmarathi
punjabkesari.in

सप्तर्षी यांच्या तेव्हाच्या संपादकीय लेखातील हा उतारा जसाच्या तसा एवढ्यासाठी दिला, की त्यांनाच त्याचे स्मरण उरलेले नसावे. अर्थात मानसिक आजाराचा आरंभ स्मृतीभ्रंशानेच होत असतो. सहाजिकच डॉक्टरांना त्यांचेच शब्द आठवणे शक्य नाही, तर ओळखणे कसे शक्य आहे?

त्यामुळे हे शब्द वा उतारा त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अजिबात नाहीत. तर त्या निमीत्ताने त्यांना वाहिन्यांवर बोलावणार्‍या व बोलते करणार्‍या संपादकांच्या स्मृती जागवण्यासाठी इथे सादर केले आहेत.

अशा लोकांना समजावणे अशक्य असते. त्यांना भिंतीवरची पाल ही हत्ती वाटली वा भासली असेल, तर उगाच हुज्जत करू नये. त्यांना त्यातला हत्ती बघण्यातली मजा लुटू द्यावी. अकारण त्यांना पाल व हत्तीतला फ़रक समजवायला गेलात, तर ते पालीला हत्ती ठरवणाराही युक्तीवाद करू शकतात. भिंतीवरच्या त्या पालीला नसलेले सुपाएवढे कान दाखवू शकतात आणि सोडही सिद्ध करू शकतात.

सहाजिकच सध्या तत्सम लोकांना जी आणिबाणी भेडसावते आहे, तिचा त्यांच्याशी बोलताना इन्कार करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा अशा अघोषित आणिबाणीमुळे ते कसे तुरूंगात खितपत पडलेले आहेत आणि आपण त्यांना तुरूंगातच भेटायला आलोय, म्हणून संवाद साधावा.

त्यांच्याही पुढे जाऊन देशातली राज्यघटना कशी खंडीत झाली आहे आणि मोदी देशाचे अध्यक्ष बनून त्यांनी अध्यक्षीय राज्यव्यवस्था प्रस्थापित केल्याचा दिलासाही देऊन टाकवा.

तेवढेच आपले सहा वर्षापुर्वीचे भाकित व विश्लेषण किती खरे ठरले याचा डॉक्टरांना आनंद होईल. रुग्णांना भेटायला जाणार्‍याने त्याला कष्ट होतील असे काही करायचे नसते ना? म्हणून शक्य झाल्यास अशा लोकांशी बोलताना दबल्या आवाजात घाबर्‍यागुबर्‍या संवाद करावा आणि आपणही आणिबाणीच्या दहशतीखाली असल्याचा छानपैकी देखावा करावा. तेवढाच भयभीत जीवाला आधार मिळतो ना?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

bhau-torsekar has 26 posts and counting.See all posts by bhau-torsekar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?