' काश्मिरी लोक पाकिस्तान प्रेमी आहेत काय? वाचा २ प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण उत्तरं! – InMarathi

काश्मिरी लोक पाकिस्तान प्रेमी आहेत काय? वाचा २ प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण उत्तरं!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतातील नेहमीच चर्चेत असणारा प्रदेश म्हणजे काश्मीर, आता तो का चर्चेत असतो हे काही तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. तुम्ही देखील जाणता तेथील परिस्थितीला कारणीभूत आहे आपला शेजारी ‘पाकिस्तान’! विभक्त झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पाकिस्तानचा आपल्या काश्मीरवर डोळा आहे. पण आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही काश्मीर भारताच्या हातून निसटू न दिल्याचं खरं श्रेय आपल्या केंद्र सरकारला आणि शूर भारतीय सैन्याला जातं. ह्याच गोष्टीमुळे पाकिस्तानचा नेहमीच तिळपापड होत असतो. पण गेली ७० वर्षे जरी आपण काश्मीर आपल्या बाजूने राखण्यात यशस्वी झालो असलो तरी गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये भारतासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ही प्रतिकूल परिस्थिती निर्माण करण्यामागे देखील पाकिस्तानचाच हात आहे. त्यांनी थेट युद्ध करून काश्मीर काबीज करण्यापेक्षा भारतीय काश्मिरांना भारताविरुद्ध चीथावण्याचे काम सुरु केले आहे आणि हळूहळू त्याचा परिणाम काश्मिरात दिसू लागला आहे. फुटीरतावादी गटाची संख्या वाढीस लागली आहे. आपलेच काश्मिरी लोक आपल्याच देशाविरोधात आवाज उठवू लागले आहेत. त्यांचेच रक्षण करणाऱ्या सैनिकांवर हल्ले करू लागले आहेत. अश्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामान्य भारतीयांच्या मनात हा प्रश्न येणे साहजिक आहे की, खरंच काश्मिरी लोक पाकिस्तान प्रेमी आहेत काय?

kashmir-marathipizza01
dawn.com

क्वोरा या सोशल साईटवर हाच प्रश्न विचारण्यात आला होता, त्यापैकी २ उत्तरे आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत, जी या प्रश्नामागचं उत्तर समजून घेण्यात तुम्हाला मदत करू शकतील.

पहिलं उत्तर आहे एका काश्मिरी तरुणाचं

रिझवान नावाचा हा तरुण म्हणतो की,

भारताशिवाय काश्मीर काहीही नाही, जी परिस्थिती आज अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिरीया आणि इराकची आहे तीच परिस्थिती भारताशिवाय काश्मीरची होईल. एक काश्मिरी म्हणून मला वाटते की काश्मीरने भारतापासून वेगळं होऊ नये. त्याउलट भारताने काश्मीरला आपल्यात सामावून घ्यावं असं माझं मनापासून मत आहे. काश्मीर मध्ये कोणीही थोर विचारवंत, शास्त्रज्ञ, गणितीतज्ञ, अभियंता, अर्थतज्ञ, राजकीय आणि सामाजिक अभ्यासू नेतृत्व नाही आहे, जो स्वतंत्र काश्मीर सुबत्तेच्या दिशेने नेऊ शकेल, वा त्याला प्रगतीपथावर नेऊ शकेल. काश्मीर मध्ये बहुसंख्य समाज हा शेती करतो, ज्यांचे शिक्षण जास्त नाही, त्याचाच फायदा गिलानी आणि बुर्हाण वाणी सारखे लोक घेतात आणि त्यांना स्वत:च्या स्वार्थासाठी भारताविरुद्ध भडकवतात. त्यांना एक कट्टर इस्लामिक आणि शरीया कायदा मानणारा काश्मीर तयार करायचा आहे. आज ह्या अज्ञानी लोकांच्या भावना इतक्या दुषित झाल्या आहेत की आपल्या धर्मावर भाष्य करणार साधं कोणी व्यंगचित्र काढलं तरी त्या व्यक्तीला संपवायला देखील हे मागेपुढे पाहणार नाहीत. येथील अनेकांना काश्मीर स्वतंत्र व्हावं असं वाटतंय. पण अजूनही ही मागणी म्हणावी तितकी तीव्र नाही. जम्मू मध्ये हिंदू धर्मीय अधिक आहेत आणि लडाख मध्ये बौद्ध आणि शिया धर्मीय अधिक आहेत. त्यामुळे काश्मीरच्या स्वातंत्र्याचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, काश्मीर कायमस्वरूपी भारतातच राहणार.

kashmir-marathipizza02
economictimes.indiatimes.com

आता जाणून घेऊया एका अभ्यासकाचं उत्कृष्ट उत्तर

कादंबरीकार सिद्धार्थ सिंह म्हणतात,

असा प्रश्न करून सर्वच काश्मिरी लोकांना एका तराजूत तोलणे योग्य नव्हे, कारण याचं भारतभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा २२ वर्षीय लेफ्टनंट उमर फय्याज हा देखील काश्मिरीच होता. त्यामुळे मनाने भारतीय असणाऱ्या खऱ्या काश्मिरींना पाकिस्तानीप्रेमी ठरवणे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उर्वरित भारतीयांच्या मनात असा गैरसमज आहे की संपूर्ण काश्मीरमध्ये हिंसा सुरु आहे, पण हा गैरसमज दूर व्हायला हवा. खाली मी जो नकाशा दिला आहे त्यात जे हिंसाचाराला बळी पडलेले भाग दाखवले आहे, त्या व्यतिरिक्त उर्वरित काश्मीर शांत आहे.

kashmir-marathipizza03

 

काश्मिरातील श्रीनगरच्या आसपासचा मुस्लीमबहूल भाग आणि पाकव्याप्त काश्मीरच्या भागाचा परिणाम सोडला तर उर्वरित काश्मीर बद्दल भारताला चिंता करण्याची गरज नाही, तेथील सर्व काश्मिरी लोक ही कायमस्वरूपी भारतीय म्हणूनचं राहणार आहेत. जेव्हा २ वर्षांपूर्वी काश्मिरात पुर स्थिती उद्भवली होती तेव्हा काश्मिरातील सर्वच भागातील लोकांनी सहाय्य केल्याबद्द्ल भारतीय सैन्याचे आणि केंद्र सरकारचे आभार मानले होते, पण त्याला अपवाद होता स्वतंत्र काश्मीरची मागणी करणाऱ्या प्रांतांचा भाग. या पूरस्थितीत त्यांचे अतोनात नुकसान झाले, ज्यांना ते स्वत:चे तारणहार मानतात ते फुटीरतावादी गट आणि पाकिस्तान ह्या प्रतिकूल परिस्थिती त्यांच्यासाठी धावून आले नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांना आपली पाकिस्तान समर्थनाची चूक उमगली आहे. आता केवळ काहीच लहाल लहान संस्था उरल्या आहेत, ज्यांना पाकिस्तानचा पुळका आहे आणि त्यांना हा पुळका येतोय कारण त्यांना सत्तेची हाव आहे. पण सामान्य काश्मिरी मात्र त्यांच्या या प्रभावाला जास्त बळी पडत नाही, कारण त्याला हवं आहे साधं सुखी जीवनं जे स्वतंत्र होण्याने किंवा पाकिस्तानासोबत जाण्याने आपल्याला मिळणार नाही याचीही त्याला खात्री आहे. आपलं हित हे भारतासोबतच राहण्यात आहे हे ते पुरते ओळखून आहेत. त्यामुळे काश्मीर भारतापासून कधीही विलग होणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे.

तर मंडळी अशी आहे सगळी परिस्थिती…तुमच्या  देखील या बाबत काही प्रतिक्रिया असतीत किंवा उतरे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?