' “मेक इन इंडिया”च्या कौतुकांत धर्मा पाटील ह्यांचा मृत्यू – “निषेध” पुरे : यल्गारच पाहिजे! – InMarathi

“मेक इन इंडिया”च्या कौतुकांत धर्मा पाटील ह्यांचा मृत्यू – “निषेध” पुरे : यल्गारच पाहिजे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शेतीचा न्याय मागणारे धर्मा पाटील गेल्याची बातमी वाचली अन क्षणभर डोळ्यासमोर अंधार पसरला.

कोणतंही सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसतं, विरोधात राहूनच त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं, हे वाचलंय. शेताभातात राबणारा धर्मा पाटील नावाचा 80 वर्षाचा शेतकरी सरकारच्या दखल न घेण्यामुळे आत्महत्या करून देवाघरी गेला.

 

dharma patil inmarathi

 

शेताभातात राबणाऱ्या अन हयातभर फाटकं जगणं जगलेल्या या बापाला नव्या इंडियाचं स्वप्न दाखवलं गेलं. अर्थात ते वाईट नसेलही. मात्र त्यामार्फत सरकार करत असलेली कार्यवाही ही हरामखोर अधिकाऱ्यांच्या तकलादू भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या जीवावर उठली.

धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा विखरण इथला हाडाची काडं झालेला शेतकरी बाप मंत्रालयात कित्येक हेलपाटे घालून थकला. सरकारनं सौर ऊर्जा प्रकल्प आणला आणि भरघोस शेती संपादित केली. चार पट मोबदला देतो म्हणणाऱ्या औलादी एक पटही देऊ शकल्या नाहीत. ५ एकर जमिनीचे केवळ ४ लाख रुपये हातावर टेकवले गेले. ८० वर्षीय शेतकरी बाप मंत्रालयाच्या वाऱ्या करतोय, सुसंस्कारित सरकार मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती करणार म्हणत योजना आखत असताना प्रशासनातील मुजोर अधिकारी असतील किंवा मुख्य शासनाचे भाट असतील यांनी शेतकरी माय बाप, मजूर, कष्टकरी समाजाला कायम होरपळत ठेवलं.

आज धर्मा पाटील गेले हे वाचलं आणि डोळे भरून वाहायला लागले. शरद जोशींनी सांगितलं होतं हा कष्टकरी एक दाण्याचे हजार दाणे करणारा आमचा बाप योद्धा शेतकरी म्हणून जगला पाहिजे. तुमच्या वीज वितरण कंपन्यांनी लुटलेला खेड्याचा बाप, शेतसारा भरण्यासाठी लावलेला तगादा आणि घरात दुखणं खुपण उराशी घेऊन गुमान जगणारी लाकडी माणसं. शेतकरी या व्यवस्थेला आव्हान देत नाही कारण त्याला जगण्याचा संघर्ष करत आणि कुडावरचा फाटका संसार सांभाळत जिंदगीची काशी करण्यात आणि चार घास मिळवण्यात पराकोटीचं दुखः सहन करावं लागतं.

 

farmer-marathipizza01

 

 

योद्धा शेतकरी म्हणून नवा सूर्य हाती देणाऱ्या शरद जोशींनी शेतकऱ्यांना अर्थशास्त्र सांगितलं. पण या व्यवस्थेला जर शेतकरी बळीच घ्यायचा असेल, शेतकऱ्यांना सन्मान द्यायचाच नसेल तर काय? सरकार कार्यवाही करताना कमी पडत असेल तर काय?

80 वर्षाच्या धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्याला मंत्रालय दरबारी न्याय मिळत नाही, दखल घेतली जात नाही म्हणून आत्महत्या करावी लागते यापेक्षा या कृषिप्रधान देशात दुर्दैव काय असू शकते?

६०० आंब्याची झाले आणि सर्व नियोजनबद्ध शेती करणाऱ्या धर्मा पाटील यांची जमीन घेऊन सरकारने विकासाची परिभाषा त्या बागायती जमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. खेड्यामातीत राबणारे हात संघर्षही करू शकतात मात्र ते बळ त्यांच्या बाहुंमध्ये कुणीतरी भरावं लागतं.

 

farmers-marathipizza

 

हा शेतकरी गावातून तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, जिल्हाधिकारी, तत्सम ठिकाणचा लोकप्रतिनिधी आणि नंतर थेट मंत्रालय इतका प्रचंड हेलकाव्याचा प्रवास करत, व्यवस्थेच्या ठोकरा सहन करत गेली तीन महिने न्याय मागतोय. आणि आम्ही मुर्दाड व्यवस्थेचे, सरकारचे, लोकप्रतिनिधी आणि या स्वातंत्र्य भारताचे पाईक म्हणून कृषिप्रधान भारताच्या गोष्टी जगभर मिरवतोय.

आता त्यांना विष देणाऱ्यांची चौकशी करण्याची आवई उठवली जातीय. खेड्यामातीचे प्रश्न तुमच्या मखमली गादीला आणि चंदेरी सत्तेला नाहीत समजणार तुमचाही बाप एकेकाळी शेतीत झिजला होता हे विसरले असाल. पण किसानपुत्र म्हणून आम्ही इतके दुबळ्या बुद्धीचे नाही झालो.

एकेकाळी आंदोलन करून शेतकऱ्यांना अन्यायाची जाणीव करून देणाऱ्या संघटना आता “सरकार” झाल्या. मात्र कोणतीही संघटना सरकारमध्ये गेल्याने कधीच प्रश्न सुटत नसतो हे शिकवलं गेलंय राज्यशास्त्रात. एक शेतकरी समूहाचा दबाव गट करून तत्कालीन सरकारला योजना राबवायला आणि न्याय द्यायला भाग पाडणं हे संघटनेचं तत्व चळवळी विसरल्या असतील कदाचित.

धर्मा पाटील गेले. निषेध, श्रद्धांजली आणि चीड याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल. आणि यल्गार करावा लागेल की शेताभातात राबणारा धर्मा नावाचा बाप या तुमच्या “मेक इन इंडियाच्या” नाही पण कृषिप्रधान भारताच्या प्रत्येक घरात आहे.

मावळच्या ऊसदर आंदोलनात घातलेली गोळी आणि आता धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या माझ्यासारखा शेताभातात राबणाऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला किसानपुत्र एकाच तराजूत तोलतो, आणि ते तोललंच पाहिजे.

निषेध कुणा कुणाचा करू? सरकारचा करू? सरकारी भाटांचा करू? अधिकाऱ्यांचा करु की या दळभद्री व्यवस्थेचा करू?

उद्या माझा, तुमचा आणि आणखी कुणाचा तरी ही व्यवस्था बळी घेण्याआधी मातीतल्या माणसांनी शपथ घ्यायला हवी की त्या मस्तवाल खुर्चीला तुमच्या अन्यायाची जाणीव करून देण्याची.

धर्मा पाटील ही एक व्यक्ती नाही. असे हजार धर्मा पाटील असेच गेलेत. पण आता जाग यायला हवीय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?