' विमुद्रीकरण: भावनिक विचार आणि प्रतिक्रियांचा अतिरेक – InMarathi

विमुद्रीकरण: भावनिक विचार आणि प्रतिक्रियांचा अतिरेक

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्या नोटबंदी ह्या विषयावरून न्युज चॅनेल्स वर चर्चा महाचर्चा करण्याची अगदी चढाओढच लागली आहे. बऱ्याच चर्चा ह्या मूळ मुद्द्याला सोडून बऱ्याच अंशी भाजप विरुद्ध काँग्रेस, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी किंवा भाजप विरुद्ध डावे असेच होताना पाहायला मिळतात. हा निर्णय घेताना त्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रासाला कसे कमी करता येईल ह्याबद्दल केलेल्या उपायांमध्ये नक्कीच काही त्रुटी राहिल्या हे मान्य करावेच लागेल पण जेव्हा लोक आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या प्रामाणिकपणावरच शंका उपस्थित करतात तेव्हा खरंच वाटते कि समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत ?

१२५ कोटी जनतेला सरळ प्रभाव पडेल असे किती निर्णय आपल्या देशात आतापर्यंत घेतले गेले आहेत? असा निर्णय गोपनीयता ठेवून घेतला नाही गेला तर त्या निर्णयाला काहीच महत्व राहणार नाही हे समजायला साधारण बुद्धिमत्ता ही पुरेशी आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे उपायांमध्ये नक्कीच काही त्रुटी राहिल्या, पण इथून पुढे त्रास कमी कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा घेतलेला निर्णयच कसा चुकीचा आहे हे दाखवण्यातच बरेच लोक सध्या स्वतःची बुद्धी पणाला लावत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कोणताही विचार नं करता घेतलेला हा निर्णय आहे हे स्टुडिओ मध्ये बसून जोरजोरात ओरडून लोकांना पटवून देणे हे म्हणजे टेस्ट मॅच मध्ये कधीही सेंचुरी न केलेल्या खेळाडूने स्टुडिओ मध्ये बसून सचिन ने कसा शॉट मारला तर तो आऊट नसता झाला हे पटवून देण्याइतके बालिशपणाचे वाटते.

सांगण्याचा मुद्दा असा की चर्चा सुरु असताना मत विचारले जाते पण आपल्याकडे मता ऐवजी थेट उपदेश देण्याची फॅशन च बनली आहे. प्रश्न असतो की नोटबंदी बद्दल तुम्हाला काय वाटते ? पण ज्यांना हा निर्णय रुचला नाही ते लोक त्याचं उत्तर “पंतप्रधानांनी मला नं विचारता हा निर्णय घेतलाच कसा!” अश्या आवेशात देतात आणि “मला आवडला नाही तरी हा निर्णय मागे घेतला जाणार नाही” ह्याची खंत त्यांना जास्त वाटते.

तात्पर्य असं की वैचारिक विरोधापेक्षा भावनिक विरोध जास्त प्रमाणात दिसू लागला आहे.

दुसरी एक गोष्ट फार गमतीदार वाटते ती अश्या विचारवंत लोकांची – ज्यांना नोटबंदी च्या विरोधात सोशल मीडिया वर पोस्ट लिहून हा निर्णय म्हणजे किती अमानुष, मूर्खपणाचा, लोकांचा जीव जाण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे हे जास्तीत जास्त लोकांना कसे पटवून द्यायचे आणि त्यासाठी लागणारी वैचारिक सामग्री कुठून मिळेल हा विचार करण्यातच कसा वेळ घालवायचा हाच एक छन्द जडला आहे.

मग काय, समर्थक असलेले लोक त्यापेक्षा मोठी पोस्ट रिप्लाय म्हणून लिहितात आणि निर्णयाचा कसा फायदा होईल हे पटवून द्यायची धडपड करतात आणि विरोधात असलेले लोक पोस्ट ला लाईक करून आणि रिप्लाय करून स्वतःच्या विचारांना भावनिक आधार मिळाल्याचा मानसिक आनंद मिळवतात.

500-and-1000-rupees-notes-banned-marathipizza

अश्या वेळेस समर्थक गटाला आपण मागे पडत असल्याचे जाणवले की त्यामधील एक कट्टर समर्थक “नाही ह्यापेक्षा मोठी पोस्ट लिहून ह्यांची तोंड बंद केली तर नाव नाही सांगणार” अश्या आवेशातच आपल्या दिवसाची सांगता करतो. मग दुसऱ्या दिवशी समर्थकांना मानसिक आनंद लाभतो आणि विरोधकांचा रक्तदाब वाढतो. मला नं पटणाऱ्या पोस्ट ला इतक्या लाईक्स कश्या मिळाल्या किंव्हा मला आवडलेल्या पोस्ट ला कोणीच कसे लाईक केले नाही ह्या विचारानेच आपण जास्त निराश होतो.

पुन्हा तात्पर्य तेच कि आपण भावनिक आधारावर सगळ्या गोष्टींचे मूल्यमापन करतो आणि ती कधी आपली सवय होऊन जाते हे आपणच विसरून जातो.

आता तुम्ही म्हणाल की मग काय गप्पा राहायचे का ? कुठेच मनातले विचार व्यक्त करायचे नाही का? तर असे नक्कीच नाही.

जे सर्वसामान्य लोक ह्या निर्णयाचं समर्थन करतात त्यांनी किती लोकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग वापरण्यासाठी शिकवले, किती लोकांना बँकेत फॉर्म भरून देण्यासाठी, नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी अश्या अनेक गोष्टींमध्ये किती आणि कशी मदत केली ह्याबद्दल लिहावे आणि दुसऱ्या समर्थकांना प्रोत्साहन द्यावे.

जे लोक ह्या निर्णयाचा विरोध करतात त्यांनी आधी तर ही गोष्ट मान्य करावी की सोशल मीडियावर कितीहि थयथयाट केला तरी निर्णय मागे घेतला जाणार नाही. त्यांनी उलट आपला आवाज आणि विरोध अश्या ठिकाणी नोंदवावा ज्या ठिकाणी त्याची योग्य ती दाखल घेतली जाईल व त्यावर उपाय शोधण्याचे काम होईल.

राजकीय पक्ष, कार्यकर्ते आपापल्या परीने समर्थन आणि विरोध ही दोन्ही कामे करतच आहेत पण सर्वसामान्य नागरिक म्हणून जर आपल्याला बदल घडवायचे असतील तर सोशल मीडियावर एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा आपले विचार , कल्पना घेऊन आपल्याला काही सकारात्मक बदल घडवता येतील का ह्यावर आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

माझा सोशल मीडियाचा वापर बर्याच अंशी फक्त ऑफिस नंतर घरी आल्यावर काही मजेदार पोस्ट वाचून आनंद मिळवणे, मित्रांचे फोटो लाईक करणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे एवढा मर्यादित आहे. माझं राजकीय गोष्टींबद्दलचं ज्ञान अगदी मर्यादित आहे. पण सोशल मीडियावर हजारो लाईक्स कंमेंट्स मिळाल्याने एखादी गोष्ट चांगली असेलच असे नाही आणि खूपच कमी लोकांनी लाईक कंमेंट केल्यामुळे कोणती गोष्ट अप्रिय ठरत नाही.

हे सगळे लिहिण्याचा खटाटोप फक्त मनातली खदखद व्यक्त करण्यासाठी होता. कारण उपदेश देण्यासाठीची योग्यता फार थोड्या लोकांमध्ये असते आणि मी त्यातला नक्कीच नाही!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?