' चित्रपटांच्या आठवणींचा चित्रपट – (Nuvuo) Cinema Paradiso – InMarathi

चित्रपटांच्या आठवणींचा चित्रपट – (Nuvuo) Cinema Paradiso

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

रोम मध्ये राहत असलेल्या श्रीमंत, मध्यम वयीन आणि यशस्वी चित्रपट दिग्दर्शक असलेल्या साल्व्हाटोरला (Jacques Perrin) जेव्हा आपल्या जुन्या आणि म्हाताऱ्या मित्राच्या, अल्फ्रेडो (Philippe Noiret) च्या मृत्यू ची बातमी कळते, तेव्हा नकळतच, गेल्या तीस वर्षात कधीही आपल्या गावी न परतलेला, साल्व्हाटोर आपल्या भूतकाळाच्या आठवणीत हरवून जातो. आणि इथूनच सुरु होतो Cinema Paradiso चा कडूगोड आठवणीने भरलेला प्रवास.

Cinema-Paradiso-marathipizza01
dmovieblog.blogspot.in

ज्युसेपी टोर्नाटोर (Giuseppe Tornatore) या इटालियन दिग्दर्शकाने, लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला Cinema Paradiso १५ नोव्हेंबर १९८८ ला इटलीत प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर आपटलेल्या या चित्रपटाला, चांगलीच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. १९८९ ला कान्स मध्ये “Special Juries Prize”, त्यानंतर “Golden Globe For Best Foreign Language Film” आणि पुढे त्याच वर्षी “Academy Award for Best Foreign Language Film” असे पुरस्कार या चित्रपटाने पटकावले.

१९४० च दशक, दुसरे महायुद्ध नुकतेच संपलेले. अशावेळी इटलीच्या, सिसिली मधील जिआँकाल्डो (Giancaldo) गावात आपल्या विधवा आई आणि तान्ह्या बहिणी सोबत राहणारा ६ वर्षाचा गोड, खोडकर पण तितकाच चाणाक्ष साल्व्हाटोर उर्फ टोटो (Salvatore Cascio), हा अल्टार बॉय (Altar Boy) म्हणून गावतल्या चर्च मध्ये पाद्रीला मदत करत असतो. चर्च मध्ये प्रार्थनेच्या वेळेला डुलक्या मारणाऱ्या टोटो ला चित्रपटांची भारी हौस आहे. तशीच आवड आहे चर्च च्या पाद्री ला देखील. नव्हे ते त्याचे कामच आहे.

Cinema-Paradiso-marathipizza02
imdb.com

गावतल्या एकमेव सिनेमा थिएटर Cinema Paradiso (Paradise Cinema) मध्ये लागणाऱ्या चित्रपटांचं Censoring करण्याच काम हा पाद्री करत असतो. हे सेंसोरिंग म्हणजे, पाद्रीने एकट्याने चित्रपट पाहून चित्रपटातली चूंबन आणि प्रणय दृश्ये काढून टाकणे. अशी दृश्य पडद्यावर आली कि पाद्री घंटी वाजवून, प्रक्षेपण खोलीतल्या (Projection Room), प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या, मध्यमवयीन, अल्फ्रेडो ला इशारा देतो, अल्फ्रेडो लगेच रिळ वर त्याची खून करवून घेवून, चित्रपट पूर्ण झाला की ही दृश्ये त्यातून कट करतो. अशा ह्या कापलेल्या रिळ चा खचच त्या खोलीत पडलेला असतो. पण पाद्री आणि अल्फ्रेडो बरोबरच, चाणाक्ष टोटो देखील हे चित्रपट चोरून बघत असतो. अशारितीने पूर्ण गावात अनकट चित्रपट पाहणारे, पाद्री, अल्फ्रेडो आणि टोटो हे तीनच लोक असतात. त्या कापलेल्या प्रणय दृश्यांसाठी हळहळणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीतले मात्र अनेक चेहरे आपल्या लक्षात राहतात.

सूरूवातीला टोटो ला टाळणारा, त्याला प्रोजेक्टर रूम मधून हाकलणाऱ्या अल्फ्रेडो ला ही टोटो आवडू लागतो. अपत्यहीन असलेला अल्फ्रेडो, पित्याच छत्र हरवलेल्या टोटो ला वडिलांची माया देतो. चित्रपटालाच सर्वकाही समजणार्या टोटोला, “Life is not like movies, it’s far more different and much harder.” सांगताना टोटो प्रती त्याचा असलेला जिव्हाळा दिसून येतो.

Cinema-Paradiso-marathipizza03
italymagazine.com

ज्वालाग्रही चित्रफिती मुळे लागलेल्या आगीत Cinema Paradiso खाक होत. याच अपघातात लहानगा टोटो अल्फ्रेडो चे प्राण वाचवतो पण अल्फ्रेडो आपली दृष्टी गमावतो. नव्याने बांधलेल्या थिएटर मध्ये टोटो प्रोजेक्टर चालवायला लागतो. अल्फ्रेडो मात्र वेळोवेळी त्याला हे तूझे काम नाही, तू काहितरी मोठ काम करण्यासाठी जन्माला आला आहेस हे सांगतो. तरूण टोटो ला गाव सोडून, आपल नशीब आजमावण्यासाठी उद्युक्त करतो, तेव्हा त्याचा “Never come back. Never think about us. Never look back. Never write. Never give into nostalgia.” हा संवाद लक्षात राहतो.

टोटो गाव सोडतो ते ३० वर्षांनी अल्फ्रेडो च्या अंत्ययात्रेला परतण्यासाठीच. ३० वर्षांनी आल्यावर जून्या अनेक ठिकाणी भेट देतो. निघताना अल्फ्रेडो ची बायको, अल्फ्रेडोने टोटोसाठी दिलेली खास भेट त्याला देते. ही भेट खरच थक्क करणारी असते. हि भेट टोटो आणि आपल्यालाही थक्क करते, आणि टोटोसोबत आपणही ती पाणावल्या डोळ्यांनी बघतो.

Cinema-Paradiso-marathipizza04
alexraphael.wordpress.com

भूमिकांना साजेसा अभिनय, खुमासदार विनोद, सुरेख संगीत, आणि आल्फ्रेडो व टोटो च निर्माण केलेला भावविश्व हे ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. चित्रपटांची प्रचंड आवड असलेल्या लहानग्या टोटो, आणि त्याला वडिलांची माया देऊन आयुष्यात मोठा काहीतरी करण्याची प्रेरणा देणाऱ्या अल्फ्रेडो ची कथा सांगणारा हा चित्रपटांच्या आठवणींचा चित्रपट एकदा तरी नक्कीच पाहावा.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?