छत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
आजकाल झी टीव्हीवर चालू असलेल्या छत्रपती संभाजी राजेंवरील मालिकेने गोदावरीचा एवढा उदोउदो चालविला आहे की लोकांना ती कथा खरी वाटू लागली आहे. आता ‘चंपा’, आणि ‘थोरातांची कमळा’ यावर एपिसोड चालू केला नाही म्हणजे निर्मात्यांचे उपकार मानायला हवे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ नावावरून आम्हास सर्वांना खुप अपेक्षा होत्या पण शेवटी टीआरपी मध्ये ही मालिका अडकली.

आमची मालिकेच्या निर्मात्यांना विनंती आहे की टीआरपीमध्ये अडकून छत्रपतींचा इतिहास काळवंडून देऊ नका. ज्येष्ठ पुराणकथा लेखक श्री द. ग. गोडसे यांनी केसरीच्या १९८४ च्या दिवाळी अंकात ‘संभाजी राजा आणि गोदावरीची कथा’ या नावाने आपले एक संशोधन प्रसिद्ध केले होते. त्या लेखावर आधारित गोदावरी नावाच्या काल्पनिक स्त्रीचा वापर करून अनेक बखरकारांनी, इतिहासकारांनी व नाटककारांनी संभाजीराजेंना बदनाम केले.
संभाजी महाराज आणि गोदावरी यांच्यातील प्रसंग रंगवून दाखवून नाटके, कादंबऱ्या रंगविल्या व राजांची यतेच्छ बदनामी केली. त्यासर्वांचे मत श्री. द. ग. गोडसे यांनी पुराव्यानिशी खोडुन दाखविले.
सभासदच्या बखरीत संभाजीराजेंचा उल्लेख ‘बिघडलेला युवराज’ असा केला असला तरी कुठल्याही स्त्रीबद्दल त्यात उल्लेख केलेला नाही. मात्र पुर्वग्रह मनात ठेवुन संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर तब्बल १२२ वर्षांनी लिहिल्या गेलेल्या चिटणीस बखरीमध्ये संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले गेले.
चिटणीसाचे खापरपणजोबा म्हणजे बाळाजी आवजी. ज्यांना स्वराज्यद्रोहामुळे संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. त्यामुळे मनात अढी ठेवुन लिहिलेल्या या बखरीमध्ये संभाजीराजेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले गेले.
या चिटणीस बखरीची नक्कल अदिलशाहीचा इतिहास लिहणारा महम्मद झुबेरी याने केली. ‘बुसातीन उस सलातीन’ हा ग्रंथ त्याने चिटणीस बखरीनंतर सुमारे १३ वर्षांनी म्हणजे सन १८२४ साली लिहिला.
या ग्रंथात त्याने चिटणीसाप्रमाणे शंभुराजेंना दोषी ठरवले आहे. सन १८२६ साली सातारचा पॉलिटिकल एजंट असलेल्या ग्रँड डफ याने ‘हिस्टरी ऑफ़ मराठाज’ हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात त्याने चिटणीस बखरीमधे असलेले संभाजी राजांच्या दुर्वर्तनाचे उल्लेख केले आहेत. याच चिटणीस बखरीचा आधार घेऊन अनेक नाटककार, कादंबरीकार, शिवशाहीर यांनी संभाजी राजांच्या विरोधात मत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

खोटी माहिती प्रसिध्द झाल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची एक प्रतिमा अय्याशी, लंपट, हेकेखोर अन स्वराज्य सांभाळण्यास अयोग्य असलेले युवराज अशाच स्वरूपात समाजासमोर निर्माण झाली. सन १९६० नंतर वसंतराव कानिटकर यानी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक लिहिले. या नाटकालाही वसंतरावांनी चिटणीस बखरीचाच आधार घेतला.
चिटणीस बखरीतील अनामिक असलेल्या स्त्रीला गोदावरी नाव देवुन आपले नाटक त्यांनी समाजापुढे आणले. त्यामुळे काल्पनिक गोदावरीला अजरामर करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
संभाजी महाराज व गोदावरी ही एक लोककथा आहे ती इतिहासात घडलेली नाही हे श्री द. ग. गोडसे यांनी सिध्द केले. या लोककथेचे मुळ बेगडा महंमद –चंद्रगुजरी या गुजराती लोककथेत आहे. ही लोककथा दक्षिणेत येणाऱ्या व्यापारी लोकांकडून रायगडच्या परिसरात स्थिरावली असे अनुमान त्यांनी काढले.

लोककथेचा संबंध इतिहासाशी असतोच असे नाही, हे प्रतिपादन करताना श्री गोडसे म्हणतात,
“लोककथांचे वैशिष्ट्य हे की आपल्या श्रध्दा, निष्ठा जपण्यासाठी त्या नवे नवे संदर्भ शोधत असतात. त्यामुळे त्या सतत प्रवाही असतात. त्यामुळे लोककथांचा संबंध शिवकाळाशी जोडून त्या अधिक रंगविल्या गेल्या.”
गोदावरीच्या अनुषंगाने श्री गोडसे यांनी संभाजी राजांच्या तथाकथित दुर्वर्तनासंबंधीच्या ऐतिहासिक पुराव्याची चिकित्सा केली आहे. रायगडच्या परिसराचा शोध घेत असताना त्यांना कळले की पायथ्याशी सती गोदावरीची जी समाधी दाखविली जाते ती मुळी गोदावरीची नाहीच; तर ती सवाई माधवराव यांच्या स्त्री यशोदाबाई यांची आहे.
यशोदाबाईंची समाधी काळाच्या ओघात दुर्लक्षित झाली; अनामिक बनली. या अनामिक समाधीवर गोदावरीची लोककथा अलगद बसली.

याचाच वापर करून बखरकारांनी, इतिहासकारांनी व नाटककारांनी संभाजीराजेंना बदनाम केले. मुळात मराठ्यांच्या इतिहासात गोदावरी नावाची स्त्रीच नाही. बेगडा महंमद (दोन गडाचा स्वामी) हा गुजरातच्या इतिहासातील पराक्रमी सुलतान होता. या सुलतानाने चंद्रगुजरी या सामान्य पण देखण्या स्त्रीला पळविली व ती वश होत नाही म्हणून तिच्यावर कसलाही जुलूम अथवा जबरदस्ती न करता तिला सोडून दिली हे गुजराती लोककथेचे कथानक.
या गुजराती लोककथेशी गोदावरीच्या कथेचे बरेच साम्य आढळते. नावामध्ये फरक पण दोन्ही लोककथांचा आशय आणि निष्ठा एकच.
चंद्रगुजरीची कथा शिवकालापुर्वीची आहे. गुजरातेतून कोकणात उतरणारा उत्तर दक्षिण प्राचीन व्यापारी महामार्ग रायगडच्या परिसरातून जातो. त्यामुळे ही कथा नवे संदर्भ घेऊन रायगडच्या परिसरात विसावली.
गोदावरीच्या लोककथेमध्ये तरूण मराठा राजपुत्र देखण्या लग्न झालेल्या स्त्रीला पळवून आणतो. तिची भेट आदब राखून घेतो, जुलूम जबरदस्ती तिच्यावर केली नाही. आपलं खानदान विसरला नाही. ही गोष्ट शिवाजीराजेंच्या कानावर गेली. त्यांनी तिला तिच्या घरी पाठवायचा विचार केला पण ती घरी जाईना. तिचं म्हणणं एकच माझी चिता रचा, मी सती जाणार.
शिवाजीराजेंनी तिची समजुत काढली पण ती काही बधली नाही. शेवटी तिनं आपला हट्ट पुरा केला व ती सती गेली ! पण.. पण.. गोदावरी सती कशी गेली?

‘सती जातेवेळी तिनं सांगितलं, माझी चिता संभाजी महाराजांनी पेटवली पाहिजे. गोदावरीची चिता संभाजी महाराजांनी पेटविली’.
गोदावरीला जलसमाधी घेता आली असती पण जलसमाधी ऐवजी सती जाण्याचा निर्णय ती घेते. या निर्णयामध्ये परत एक विचित्र अट की संभाजी महाराजांनी माझी चिता पेटविली पाहिजे. सारेच विचित्र आणि गोंधळात टाकणारे! किंबुहना गोंधळात टाकणारी विचित्र अटच या लोककथेचा आत्मा आहे.
ज्या काळात (सन १६७६) ही घटना घडली असे सांगितले जाते. त्याकाळात संभाजीराजे रायगडावर नव्हते तर गोवा, उत्तर कर्नाटक, भागानगर, फोंड्याच्या मोहिमेवर होते (सन १६७५-१६७६). ऑगस्ट १६७६ रोजी संभाजीराजे रायगडाला परत आले. छत्रपती शिवाजी महाराज ऑक्टोबर १६७६ रोजी कर्नाटक मोहिमेवर निघाले असताना त्यांच्याबरोबर संभाजीराजे रायगडाबाहेर पडले व शृंगारपुरी प्रभावलीचे सुभेदार म्हणून संभाजीराजे शृंगारपुरास गेले.
मुळात अण्णाजी दत्तोला गोदावरी नावाची मुलगी नव्हतीच. अण्णाजी दत्तोला संभाजी महाराजांनी केलेले राजद्रोहाचे शासन जाणुनबुजून केले आहे हे दाखविण्यासाठी बखरकार, इतिहासकार व नाटककारांनी पुर्वग्रह दुषित ठेवुन लोककथेत गोदावरीला आणले.

रायगडाच्या पायथ्याची जी समाधी दाखविली जाते तिचे बांधकाम शिवकाळातले नसून पेशवेकाळातील आहे. त्या समाधीवर सती गेलेल्या स्त्रीच्या समाधीवर आढळणारे एका हातात चुडा असलेले कोणतेही दगडी शिल्प नाही. यशवंतराव होळकरांच्या पुण्यावरील स्वारीच्या धामधुमीत दुसऱ्या बाजीरावाच्या कुटूंबकबिल्याचे वास्तव्य सुरक्षितेसाठी रायगड किल्ल्यावर होते. या कुटूंबकबिल्याबरोबर पुण्यात बंदी असलेल्या सवाई माधवरावांच्या पत्नी यशोदाबाई यांचीही रवानगी रायगडावर केली गेली. बंदीवासात असल्यामुळे रायगड परिसरात ती अज्ञातच राहिली.
रायगडावरच यशोदाबाई मृत्यु पावली. तिचे दहन किल्लेवाडीच्या वाटेवर केले गेले. सवाई माधवरावांची पत्नी म्हणून त्या जागेवर तिची समाधी बांधण्यात आली. कालांतराने ती लोकांच्या स्मृतीतून नाहिशी झाली व यशोदाबाईंची समाधी अनामिक झाली. आज हीच समाधी लोककथेतल्या गोदावरीची समाधी म्हणून ओळखली जाते.
अजिंक्य योध्दा असणाऱ्या मराठा साम्राज्याच्या छत्रपतीला बदनाम करण्याची एकही संधी इतिहासाने सोडली नाही. महान संस्कृतपंडीत, ‘बुधभूषणम्’ हा संस्कृत तर ‘नायिकाभेद’, ‘नखशिख’, ‘सातसतक’ या ब्रजभाषेतील ग्रंथरचयिता असणारे शंभुराजे जसे लेखणीतही श्रेष्ठ होते तसे ते रणांगणात श्रेष्ठ होते.
एकाच वेळी चार-चार पादशाह्यांना धुळ चाळणारे, स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवुन त्याचा विस्तार करणाऱ्या शंभुराजेंवर बदफैलीचे आरोप करणे म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमी, जाज्वल्य इतिहासाला नाकारण्यासारखे आहे.
आतातरी आपण शहाणे होऊन छत्रपती शंभुराजेवर बखरकार, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार व शिवशाहीरांनी लावलेला बदनामीचा डाग कायमचा पुसून टाकू!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
मल्हार रामराव चिटणीस हा बाळाजी आवजी चिटणीस चा खापरपणजोबा होता आण्णाजी दत्तो चा नाही!
DHARMVEER MATLAB SHAMBHAJI
Yogy ti mahiti sangitlya bddal dhanyawad.. Tumche khup khup aabhar… Maza raja stri vishayi aadar thewnara hota tyancha sanman kranara hota… Asa itihas jyane tyancha charityavar shintode udawale to nasht ksa hoil