परमवीर जोगिंदरसिंग : एक धाडसी सैनिक ज्यांचा चीनी सैन्यानेही सन्मान केला
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
सैनिक हा आपल्या देशाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आज सैनिक आपल्या सीमेवर तत्परतेने उभे राहून देशाचे रक्षण करत आहेत, म्हणून आपण येथे सुरक्षित आणि आनंदाने राहत आहोत. आजपर्यंत कितीतरी सैनिकांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. सैनिक हे आपले रक्षण करण्यासाठी स्वत: च्या कुटुंबीयांपासून लांब राहतात आणि शत्रूला मोठ्या शौर्याने सामोरे जातात. आज आपण अशाच एका शूर सैनिकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या शूरतेचा चीनने देखील सन्मान केला होता.

ह्या येत्या एप्रिलच्या ६ तारखेला सुभेदार जोगिंदर सिंग हा पंजाबी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जोगिंदर सिंग या सैनिकाच्या जीवनावर आधारलेला आहे. या चित्रपटामध्ये गिप्पी ग्रेवाल आणि आदिती शर्मा हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. ह्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि हा ट्रेलर लोकांच्या चांगलाच पसंतीस पडलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याची लोक वाटच पाहत आहेत.
सुभेदार जोगिंदर सिंग यांनी भारत – चीन युद्धामध्ये देशासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते.
पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यामध्ये मोगाच्या तालुक्यात मेह्ला कलामध्ये जोगिंदर सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२१ या दिवशी झाला होता. त्यांचे वडील शेर सिंग आणि आई कृष्ण कौर हे मूळचे होशियारपुरच्या मुनका गावामधून आले होते. जोगिंदर यांनी प्राथमिक शिक्षण गावातील शाळेमध्ये आणि त्यानंतर दरौली गावामध्ये माध्यमिक शालेय शिक्षण घेतले. पण घरच्या परिस्थितीमुळे ते जास्त काही शिकू शकले नाही.

त्यानंतर २८ सप्टेंबर १९३६ मध्ये ते शीख रेजिमेंटमध्ये सैनिक म्हणून भर्ती झाले. सैन्यामध्ये भर्ती झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या परीक्षा दिल्या आणि आपली एक सन्मानपूर्वक जागा बनवली. त्यांना त्यांच्या युनिटमधील एज्युकेशन इंस्ट्रक्टर बनवले गेले.
ब्रिटीश इंडियन आर्मीसाठी ते बर्मासारख्या मोहिमेवर लढले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ मध्ये जेव्हा काश्मीरमध्ये पाकिस्तानी जमातीने हल्ला केला, तेव्हा तिथे देखील त्यांच्याशी लढण्यासाठी शीख रेजिमेंटचा ते एक भाग होते.
ऑगस्ट १९६२ मध्ये चीनी सेनेने थगला रिज काबीज केले. त्यावेळेचे सुरक्षा मंत्री वी. के. कृष्णमेनन यांनी पंतप्रधान नेहरू यांच्याकडून परवानगी घेत, २२ सप्टेंबरला सेनाध्यक्षाला आदेश दिला की, थागला रीजमधून चीनला बाहेर पाठवावे.

भारतीय सैन्यातील एका नवीन IV कॉर्प्सने या असंभव कामासाठी तुकड्या एकत्र केल्या. पण चीनी सेना जास्त नियंत्रित होती. चीनी सेनेने २० ऑक्टोबरला नमखा सेक्टर आणि लद्दाख यांच्या बरोबरच पूर्व भागांमध्ये एकत्र हल्ले केले. तीन दिवसातच त्यांनी खूप जमीन काबीज केली आणि धोला – थगलामधून भारतीयांना माघार घ्यायला भाग पडले.
आता चीनला तवांग काबीज करायचे होते, त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी भारतीय सैन्यातील पहिल्या शीख बटालियनला सांगण्यात आले.
ट्वीन पिक्सच्या एक किलोमीटर दक्षिण – पश्चिम दिशेला ‘टोंन्गपेंग ला’ वर पहिल्या शीख बटालियनच्या एका डेल्टा कंपनीने आपला बेस बनवला होता. ज्याचे कमांडर लेफ्टनंट हरीपाल कौशिक होते. त्यांच्या डेल्टा कंपनीची ११ वी प्लाटून आयबी रीजवर तैनात होती. ज्याचे कमांडर सुभेदार जोगिंदर सिंग होते.

२० ऑक्टोबरला शेकडो चीनी सैन्य जेसिओच्या बॉर्डरवर जमा झाले. ते पाहून जोगिंदर सिंगची तुकडी सावधान झाली. त्यानंतर त्या सर्वांनी आपापली हत्यारे घेतली आणि ते त्यांची वाट पाहत तयार होऊन बसले. त्यानंतर २३ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता आसाम रायफल्सच्या पोस्टवर हल्ला झाला. त्यानंतर चीनी सैन्याने आयबी रिजवर हल्ला केला, जेणेकरून ते ट्वीन पिक्स मिळवू शकतील.
आईबी रीजवर जोगिंदर सिंग यांनी आपले चतुर डोके लावून बंकर आणि खंदक बनवले होते. त्यावेळी त्यांच्या तुकडीकडे फक्त चार दिवसांचे खाण्याचे सामान होते. हिमालयातील थंडी पूर्ण अंग गोठवून टाकणारी होती. पण जोगिंदर सिंगने आपल्या माणसाना प्रोत्साहन दिले आणि त्यांना फोकस करण्यासाठी प्रेरित केले. एवढेच नाही, तर अनुभवी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या चीनी सैनिकांना जोरदार टक्कर दिली.

लवकरच समोरासमोर युद्ध सुरु झाले. पहिल्या हल्ल्याच्या वेळी जवळपास २०० चीनी सैनिक समोर होते, तिथेच त्याच्यासमोरील ही भारतीय पलटण छोटी होती. पण जोगिंदर सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी चीनी सैन्याचा धुव्वा उडवला. त्या लोकांना पळता भुई थोडी झाली, पण यामध्ये आपलेही काही नुकसान झाले.
काही वेळातच २०० चीनी सैनिकांची अजून एक तुकडी एकत्रित झाली आणि दुसऱ्यांदा भारतीय सैन्यावर आक्रमण केले.
याचवेळी भारतीय तुकडीची नजर चुकवून एक चीनी तुकडी वरती चढली आणि भयंकर गोळीबार करायला लागली. त्यावेळी जोगिंदर यांना जांघेमध्ये गोळी लागली. गोळी लागल्यानंतर ते बंकरमध्ये घुसले आणि त्यांनी त्यावर पट्टी बांधली. असे असूनही, ते मागे न हटता शूरपणे परत लढू लागले आणि आपल्या साथीदारांना मोठमोठ्याने ओरडत निर्देश देऊ लागले. जेव्हा त्यांचा गनर शहीद झाला, तेव्हा त्यांनी दोन इंचावाली मोर्टार स्वतः घेतली आणि कितीतरी राउंड शत्रूवर चालवले. त्यांच्या पलटणीने खूप चीनी सैनिकांना मारले होते, पण त्यांचे देखील खूप लोक मारले गेले होते आणि खूप जखमी झाले होते.

काही वेळाने अजून २०० चीनी सैनिकांची तुकडी तिथे आली. त्यावेळी जोगिंदर सिंग यांनी आपल्या काही मोजक्या उरलेल्या सैनिकांना हाताशी घेतले आणि आपला संघर्ष चालू ठेवला. पण यावेळी चीनी सैनिक येतच गेले. त्यांच्याकडचा दारुगोळा देखील आता संपला होता. तरीही त्यांनी बंदुकीवर बायोनेट म्हणजेच चाकू लावून, “जो बोले शो निहाल, सत श्री अकाल ” ची गगनभेदी घोषणा देत कितीतरी चीनी सैनिकांना मारले. पण यामध्ये ते खूप जखमी झाले.
चीनी सैनिकांनी त्यांना युद्धबंदी बनवले. तिथून तीन भारतीय सैनिक वाचले होते, ज्यांनी नंतर ह्या लढाईबद्दल भारतीय सैन्याला माहिती दिली.
चीनने त्यांना बंदी बनवल्याच्या काही काळानंतरच पीपल्स लिबरेशन आर्मी (जनतेची मुक्तिसेना) चे बंदी म्हणून सुभेदार जोगिंदर सिंग यांचा मृत्यू झाला. या धाडसीपणासाठी त्यांना मृत्युनंतर भारताचा सर्वात मोठा पुरस्कार परमवीर चक्र देण्यात आले. जेव्हा चीनी सैन्याला हे समजले की, सुभेदार जोगिंदर सिंग यांना परमवीर चक्र मिळाले आहे, तेव्हा आदराने त्यांचे मन भरून आले. १७ मे १९६३ ला त्यांच्या अस्थी चीनी सैन्याने त्यांच्या बटालियनला सन्मानाने परत दिल्या.

त्यांचे अस्थी कलश मेरठच्या शीख रेजिमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गुरुद्वारा साहिबमध्ये त्यांची श्रद्धांजली सभा झाली. त्यानंतर एक सेरेमनी आयोजित करण्यात आली, जिथे तो कलश त्यांची पत्नी गुरदयाल आणि त्यांच्या मुलाकडे सुपूर्त करण्यात आला.
असे हे सुभेदार जोगिंदर सिंग हे खूप धाडसी होते आणि त्यांनी केलेल्या या कार्यामुळे प्रत्येक भारतीयाला त्यांचा आजही अभिमान वाटतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.