' भाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा – InMarathi

भाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा

सदर विषयावर/लेखावर आपलं मत आमच्या फेसबुक पेज –  facebook.com/InMarathi.page  – वर मेसेजमध्ये कळवा. निवडक, अभ्यासपूर्ण मतांना प्रसिद्धी देण्यात येईल.

लेखक: प्रा. बाबा गाडे , जेष्ठ पत्रकार, संस्थापक संपादक – दैनिक महानायक, औरंगाबाद

जन्माने आंबेडकरी बौद्ध समाजातील असलेल्या काही व्यक्तींनी हिंदू धर्माच्या चाली रीतीनुसार गणपती बसविल्यानंतर समाजांतर्गत वाद-विवाद आणि चर्चा-प्रती-चर्चा होत आहेत. या वादाच्या संदर्भात सविस्तर आणि समाजाला दिशादर्शक असे काही लिहिले जावे अशा सूचना आल्याने हे लिहावे लागत आहे. वास्तविक त्या व्यक्ती कोण आहेत? शिक्षित आहेत कि अशिक्षित? सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या आहेत कि सामान्य? माझ्या मते या दोन्हीही या चर्चेच्या अनुषंगाने या गोष्टी दुय्यम आहेत.

“हे असे का झाले किंवा होते आहे” याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. कारण एखाद्याने गणपती बसविणे, कुणीतरी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देणे, सामाजिक दबावातून त्याने माफी मागणे आणि नंतर त्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला वगैरे अशी चर्चा सुरु होणे इतक्यापुरताच हा मुद्दा मर्यादित नाही. माझ्या मते या दोन्हीही मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे.

मुळात आजच या गोष्टी घडताहेत असे नाही. गेल्या अनेक वर्षापासून या गोष्टी घडत आहेत. याची चर्चा फक्त सोशल मिडीयाच्या वाढत्या प्रभावामुळे यावेळी थोडी अधिक होते आहे इतकेच. एक आंबेडकरी बौद्ध विचारवंत अर्थतज्ज्ञ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असतानाही हि चर्चा झाली होती. त्यावेळीही आम्ही या प्रकरणावर लिहावे असे सुचविण्यात आले, परंतु लिहावे असे वाटले नाही. कारण या मध्ये अंतर्भूत असलेली व्यक्ती कुणी साधीसुधी नव्हती तर समाजातील अतिशय प्रतिष्ठित, उच्च विद्या विभूषित असल्याने अशा व्यक्तीला आपण काही सांगावे, अशातला भाग नाही. कारण “बौद्ध विचार काय आहे?”, “आंबेडकरी विचार काय आहे?” हे मला वाटते त्यांना कुणीही समजावून सांगण्याची तशी गरज नाही. कारण या सर्व बाबतीत ते स्वतःच प्रज्ञावान आहेत. म्हणून हा विषय आम्ही त्यावेळी त्यांच्यावरच सोडून दिला. बाकी सभा, समारंभातून बौद्ध लोकांनी कसे वागावे याची प्रवचने चालूच असतात. त्यामुळे या काळातच काही प्रबोधन करावे अशातला भाग नाही.

मुद्दा असा आहे कि, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाजातील ज्या अस्पृश बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो समाज मनाने आणि बुद्धीने किती प्रगत झाला आहे किंवा नाही, हा. तो जर झाला असेल तर ठीक आहे, आणि नसेल झाला तर तो आज धार्मिकदृष्ट्या काय करतो आहे? या समाजाचे चित्र आहे कि, इतर हिदू धर्मियांप्रमाणे यांचे डोके बौद्ध धम्मात असले तरी मन आणि धड मात्र पूर्वाश्रमीच्या हिंदू धर्माच्या चालीरीतीतच रमत आहे हे मान्यच करावे लागते. अर्थात ज्यांची बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या निर्देशानुसार वाटचाल चालू आहे त्यांना या सर्व गोष्टी न पटणा-या वाटतात यात वाद नाही म्हणूनच जन्माने आंबेडकरी बौद्ध असूनही ज्यांचे मन हिंदू धर्मात रमते, ते रमू नये आणि त्यांनीही बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या शिकवणुकीनुसार आचरण करावे असे त्यांना वाटत राहते. याच जाणीवेतून सध्या जो काही प्रकार घडला किंवा घडत आहे, तो घडला आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आता प्रश्न आहे – हे चूक कि बरोबर? याचे उत्तर दोन अधिक दोन चार या गणिती सूत्राने देणे अवघड आहे.

gautam buddha marathipizza
pinterest.co.kr/pin/402790760398242089

या प्रकारावर चर्चा करावयाची असेल तर कोणाला शिवीगाळ करून किंवा मारहाण करून, धमकावून होणार नाही हे लक्षात घेतले तर चर्चा करणे सोयीचे होईल अन्यथा नाही. वास्तविक जे लोक या चर्चेचे कारण आहेत त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा वगैरे हा विषय नाही कारण त्यांनी मुळात हे कृत्य व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे आपल्याला आहे म्हणून केलेले नाही तर जाणते -अजाणतेपणाने त्यांच्या हातून हे कृत्य घडलेले आहे कारण ते दरवर्षी हे करीत आलेले आहेत . अर्थात त्यांना असे करणे आवडते म्हणूनच. पण या लोकांना संरक्षण देऊ इच्छिणा-या लोकांनी याला व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला वगैरे असे नाव देऊन बौद्धातील तालिबानी प्रवृत्ती वगैरे असा कल्ला करून यावर चर्चा घडवून आणली.

मुळात ज्यांच्या बाबतीत हा प्रकार झाला त्यांनी स्वतः अशी काही तक्रार केल्याचे मला तरी आढळून आले नाही. मुळात त्यांच्यापेक्षा याचा प्रचार आणि प्रसार दुस-याच लोकांनी अधिक केला असे निदर्शनास येते आहे . ज्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला त्यांच्या कुठल्याच नकारात्मक प्रतिक्रिया अद्याप तरी माझ्या वाचनात नाहीत. त्यामुळे हा मुद्दा त्यांच्यापुरता मर्यादित आहे हे आपण प्रारंभी समजून घेतले पाहिजे. विशेष करून ज्या दोन-तीन प्रकरणाची चर्चा प्रकर्षाने होते आहे, त्यापैकी एका प्रकरणात एका व्यक्तीने सोशल मिडीयावरून म्हणजे WhtasApp वरून अतिशय खासगी मेसेजवरून “माझी चूक झाली, मी समाजाची माफी मागतो. इथून पुढे मी असे करणार नाही, समाजाने मला माफ करावे” असे स्पष्ट केले.

 

bhau kadam ganpati-dispute-marathipizza05

 

खरे तर गणपती बसविणे जशी त्यांची खासगी बाब होती तशी ही सुद्धा त्यांची पूर्णतः खासगी बाब होती. तरीही त्यांच्या गणपती बसाविण्याला आणि त्यांनी मागितलेल्या माफी प्रकरणाला जाणीवपूर्वक सार्वजनिक करण्यात आले. हे योग्य नाही. दुस-या एका प्रकरणात ज्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला त्यांनी सुद्धा स्वतः जाहीरपणे अशी बोंब केली नाही तर त्यांच्या मित्रांनी ” धावा धाव , अमुक अमुक यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय” असे संदेश सोशल मिडीयावरून टाकण्यात आले. परंतु त्याला कुणीही सकारात्मक -नकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

तिस-या एका प्रकरणात, ज्या व्यक्तीने गणपती बसविला त्याची आणि धम्मकार्य करणा-या कार्यकर्त्यांची काही चर्चा झाली आणि त्यांनी जे काही “इथून पुढे असे काही करणार नाही ” असे जे काही लिहून दिले किंवा घेतले तो सुद्धा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे. हे पत्र सुद्धा कारण नसताना इतरांनीच सोशल मिडीयावर व्हायरल केले ज्याची काहीही गरज नव्हती.

(ह्या संपूर्ण प्रकरणाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास पुढील लेख वाचावा : गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत! घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का? )

या तिनही प्रकरणात जर असा काही व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग वगैरे काही झाला असेल किंवा बहिष्काराच्या धमक्या वगैरे देण्याचे प्रकार झाले असतील त्याची माहिती, ज्यांच्या बाबतीत हे प्रकार घडल्याचे सांगण्यात येते त्यांच्याकडून अद्यापही प्रत्यक्ष देण्यात आलेली नाही किंवा त्यांनी आपल्यावर अन्याय झाला म्हणून कायद्याची मदत घेतली असे काही घडल्याचे दिसून येत नाही. किंवा तसे त्यांनी काही केले असेल तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी केलेली कारवाई उचितच आहे असे म्हणावे लागेल पण त्यांची तशी तक्रार आहे असे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे इतरांनी या वादावर बोंबा मारून याला तालिबानी कृत्य वगैरे संबोधू नये असे सुचवावेसे वाटते.

शेवटी प्रश्न उरतो तो जन्माने आंबेडकरी बौद्ध असलेल्या व्यक्तींनी पूर्वाश्रमीच्या हिंदू धर्माच्या चालीरीती पाळाव्यात कि नाही हा. या विषयावर चर्चा केल्यास त्यांनी त्या पाळायला नकोत अशी रास्त अपेक्षा आहे. त्याचे कारण जर आपण एखादा धर्म पळत असू किंवा आपण ज्या धर्माचे अनुयायी म्हणून ओळखले जातो त्या धर्माच्या शिकवणूकीनुसार आपण आपले आचरण करणे केवळ आवश्यकच नाही तर माझ्या मते बंधनकारक आहे. अन्यथा आपण त्या धर्माचे अनुयायी आहोत असे समजणे दिशाभूल केल्यासारखे होईल. यावर असा एक आक्षेप घेण्यात येतो कि , जे स्वतःला आंबेडकरी बौद्ध म्हणवून घेतात ते तरी कुठे बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतीज्ञांचे पालन करतात? हा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित करणे निरर्थक आहे कारण जे लोक स्वतःला आंबेडकरी बौद्ध म्हणवितात त्यांनी याचे पालन करणे आवश्यकच आहे किंवा त्यांनी ते करायलाच हवे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

ambedkar-marathipizza02
wp.com

या पार्श्वभूमीवर याच समाजातील काही काही स्वतंत्र प्रज्ञेच्या विचारवंतांनी या निमित्ताने डॉ . बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतीज्ञांचे पालन करणे म्हणजे बौद्ध धम्म नाही, किंवा त्यातील काही प्रतिज्ञा कालबाह्य झाल्या आहेत असे ज्ञान प्रसवले आहे. लेखनाचे स्वातंत्र्य म्हणून त्यांची मते आपण विचारात घेतली तरी ते बाबासाहेबांच्या ज्या २२ प्रतिज्ञांवर चर्चा करतात त्या आजही समाजाला तितक्याच आवश्यक आहेत जितक्या १४ ऑक्टोबर १९५६ ला आवश्यक होत्या. कारण आजही हा समाज तथाकथित हिंदुत्वाच्या गुलामीतून बाहेर पडलेला दिसत नाही आणि आपली चर्चासुद्धा त्याचीच साक्ष आहे. समाजाला अजूनही सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाची गरज आहे.

ज्या समाजात आपल्याला किड्या -मुंगी इतकी किंवा जनावरांइतकीही किंमत नसेल त्या समाजाविषयी आपल्याला स्वाभिमान वाटावा किंवा जे आपल्या गेलेल्या पिढीने सोडले ते आपण पुन्हा पुन्हा करावे असे त्यात काहीही नाही हे समाजाला सांगण्याची आजही तितकीच गरज आहे जितकी बाबासाहेबांच्या काळात होती. आणि याच बाबासाहेबांच्या विचारधारेच्या जाणीवेतून देशभरातील मागास समाज मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो आहे, वळतो आहे. त्यामुळे या २२ प्रतीज्ञांची आजही प्रकर्षाने गरज आहे. मात्र ज्यांना ही गरज संपली आहे असे वाटते त्यांनी या प्रतीज्ञाना कालबाह्य म्हणण्यापेक्षा या वर्तुळातून खुशाल बाहेर पडावे, असे त्यांना सुचवावेसे वाटते. इतकेच नव्हे तर ज्यांना हिंदू धर्माच्या देव-देवताविषयी आजही आकर्षण वाटते आणि ज्यांना ज्यांना हिंदू धर्मातील कर्मकांड पुन्हा करावेसे वाटते त्यांनीही खुशाल जन्माने मिळालेल्या आंबेडकरी बौद्ध धर्मातून स्वेच्छेने मुक्त व्हावे. पण याच धर्मात राहून व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देव देव करून या धम्माच्या विचाराला बदनाम करू नये आणि स्वतः सुद्धा कोणाच्याही दहशतीत जीवन जगू नये हेच या निमित्ताने सुचवावेसे वाटते.

वास्तविक बौद्ध धम्म हा पूर्णतः विज्ञानवादी धम्म आहे. इथे कुठल्याही प्रकारची मानसिक गुलामी नाही, कर्मकांड नाही. बुद्धाने मानवी समाजाला दिलेले त्रिशरण, पंचशील, आर्यअष्टांगिक मार्ग, दहा पारमिता आणि चार आर्य सत्ये सुखाने मानवी जीवन जगण्याचा मार्ग आहे. बरे इथे इतर धर्मासारखी कुठलीही सक्ती बुद्ध आपल्या अनुयायांवर करीत नाही. “बुद्ध धम्माच्या न्यायाने वागाल तर तुमचा उद्धार होईल, नाही तर होणार नाही . तुमचा निर्णय तुम्ही घ्या.” असे बुद्ध सांगतो. येथे अनुयायांवर कोणतीही सक्ती बुद्ध करीत नाही. स्वर्ग-नरकाची इथे कोणतीही भीती किंवा प्रलोभन नाही. बुद्ध आणि बाबासाहेब भारतीय राज्य घटनेच्या कितीतरी आधीपासून मानवी स्वातंत्र्याचे प्रचंड भोक्ते असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची मानसिक गुलामी नाही. मात्र शिस्तीचा आग्रह दोघेही धरतात. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा याच शिस्तीचा एक भाग आहे. त्या देण्यामागे हा धम्म स्वीकारताना कोणावरही मानसिक गुलामी राहू नये असा प्रामाणिक उद्देश त्यामागे आहे. मोठी पार्श्वभूमी त्यामागे आहे हे समजून घेतल्याशिवाय यावर भाष्य करणे सर्वथा निरर्थक आहे.

याठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे कि, बाबासाहेबांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक विचार आणि धार्मिक विचार यांना एकाच पातळीवर आणून त्यावर चर्चा करणे केवळ निरर्थक नाही तर अनावश्यक आहे. राजकीय पातळीवर विचार करताना बाबासाहेब एकूणच भारतीय समाजाचा विचार करतात. तेथे धर्म हि ज्याची त्याची व्यक्तिगत बाब म्हणून बाबासाहेब प्रत्येक धर्माचा आदर करण्याची विचारधारा मांडतात. बाबासाहेबांनी त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाच्या खुल्या पत्रात त्यांनी प्रत्येकाचे धार्मिक स्वातंत्र्य मान्य करून एकसंघ भारतीय समाजाचे स्वप्न पाहिलेले आहे. कारण “मी प्रारंभी भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच आहे” असे म्हणणारे बाबासाहेब एकमेव राष्ट्रीय महापुरुष आहेत, हे सुद्धा आपण या निमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.

dr-babasaheb-ambedkar-marathipizza

अनुभवावरून मला असे वाटते कि, प्रत्येकाला आपापला धर्म पाळूनही भारतीय समाजात समता आणि बंधुभाव जोपासता येतो आणि कुणालाही त्याचे वाईट वाटत नाही. वाटण्याचे कारण नाही. सार्वजनिक जीवनात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी केवळ निमंत्रितांच्या आग्रहाखातर पुजा-अर्चा केली किंवा इतर धर्मियांना त्यांच्या सणा-वाराला शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या व्यक्तिगत धर्माचा कुठेही अवमान होत नाही. हे त्यांच्यावर टीका करणारांनी समजून घेणे गरजेचे आहे.

बुद्ध-आंबेडकरी विचारधारा मानणारे नेते, राजकारणी, कलावंत यांच्यावर टीका करताना या गोष्टींची जाणीव धर्म बांधवांनी ठेवणे आवश्यक आहे. केवळ या भीतीमुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा मुस्लिमांच्या कार्यक्रमात जाताना त्यांची टोपी घालताना नकार देताना दिसतात त्याचे कारण असे आहे कि, आपण मुस्लीम धर्मीयांची टोपी घातली तर कट्टर हिंदू समाज आणि आपले भक्त आपल्यावर नाराज होतील अशी भीती त्यांना वाटते. त्याच प्रमाणे रामदास आठवले, बाळासाहेब आंबेडकर, रामविलास पासवान किंवा मायावती यांच्यावरही आंबेडकरी धार्मिक लोक अज्ञानातून अतिशय खालच्या थरावरून त्यांच्यावर टीका करून आपल्या धार्मिक अज्ञानाचे ओंगळ प्रदर्शन करतात. मात्र या नेत्यांनी आपल्या व्यक्तिगत किंवा कौटुंबिक जीवनात आपल्या धम्मानुसार आणि विचारानुसारच आचरण करण्याची खबरदारी घेणेही गरजेचे आहे. कारण त्यांना बघूनच त्यांच्या समाजाची धार्मिक, वैचारिक वाटचाल होते हे हि तितकेच खरे आहे.

सदर विषयावर/लेखावर आपलं मत आमच्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page  – वर मेसेजमध्ये कळवा. निवडक, अभ्यासपूर्ण मतांना प्रसिद्धी देण्यात येईल.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?