' पॅडमॅन की ‘थापाड्या’मॅन?! – अक्षय कुमार भारताची खोटी बदनामी का करतोय? – InMarathi

पॅडमॅन की ‘थापाड्या’मॅन?! – अक्षय कुमार भारताची खोटी बदनामी का करतोय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

९ फेब्रुवारी २०१८ रोजी अक्षयकुमारचा पॅडमॅन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तामिळनाडूमधील अरुणाचलम् मुरुगनाथम् यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल. महिलांचे मासिक पाळीच्या दिवसातले आरोग्य राखण्यासाठी अरुणाचलम् यांनी स्वस्तात सॅनिटरी पॅडची निर्मिती करणारे यंत्र बनवण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला.

 

Arunachalam-Muruganantham-inmarathi
stackpathdns.com

जेणेकरून भारतातील जास्तीत जास्त महिला सॅनिटरी पॅडचा वापर करू शकतील व रजःस्रावाच्या काळात त्यांची स्वच्छता जोपासली जावून त्यासंबंधाने होणाऱ्या आजारांना आळा घालण्यास मदत होईल.

त्यांनी तयार केलेली यंत्रे सध्या भारतातील २३ राज्यांत कार्यरत आहेत. ती सर्वच राज्यांत लवकरच कार्यरत होतील. या योगदानाबद्दल टाईम मगझीनने २०१४ साली त्यांचा समावेश ‘जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती’त केला तर केंद्र सरकारने २०१६ साली त्यांना पद्मश्री या सन्मानाने गौरवले.

‘मेक इन इंडिया’ धोरणाचा विचार करतादेखील मुरुगनाथम् यांचे कार्य हे अत्यंत महत्वाचे आहे असेच म्हणावे लागेल यात शंकाच नाही. मात्र या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने मुलाखती वगैरे देणाऱ्या अक्षयकुमारचे एक वक्तव्य ऐकून मी चकित झालो. त्याच्या सांगण्यानुसार

“भारतातील सुमारे ८२% महिला या सॅनिटरी पॅडस् वापरत नाहीत. आजही या महिला राख, माती किंवा तत्सम अनारोग्यकारक पर्यायांचा वापर करतात!!”

माझ्या स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायात माझ्या १००% रुग्णा सॅनिटरी पॅडस् वापरतात. यामुळेच मला हे विधान ऐकून धक्का बसला.

कदाचित शहरी/ ग्रामीण असा फरक असावा म्हणून माझ्या परिचित असलेल्या काही अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ज्ञांशी याबाबत चर्चा केल्यावर त्यांनीही हा आकडा अवाजवी असल्याचे सांगितले.

त्यांच्या मतानुसार-

गेल्या ५-१० वर्षांत पाळीच्या वेळी घेण्याची काळजी, स्वच्छता यांबाबतची जागृती झपाट्याने वाढली आहे. अगदी ग्रामीण भागांतही ही जागृती विशेषतः दिसते आहे. क्वचित काही अपवाद नक्कीच असतील; मात्र जेमतेम १८ टक्के भारतीय महिलाच सॅनिटरी पॅडस् वा तत्सम योग्य हायजिनची साधने वापरतात ही कपोलकल्पित आकडेवारी आहे.

 

mittur-pad-distribution-inmarathi
grasshopperfiles.files.wordpress.com

याच विषयावर आणखी शोध घेतल्यावर जी तथ्ये समोर आली ती आवर्जून मांडत आहे.

८२% हा अक्षयकुमार यांचा आकडा हा बहुतेक तरी २०११ साली करण्यात आलेल्या एका सर्व्हेच्या आकडेवारीतून आला असावा. The Neilson Company आणि NGO Plan India यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या या सर्व्हेत भारतात सुमारे ८८% महिला पाळीच्या वेळी सॅनिटरी पॅडस् वगैरे आरोग्यदायी पर्यायांचा वापर करत नाहीत असे निरीक्षण नोंदवले गेले.

मजेची गोष्ट म्हणजे हा सर्व्हे कसा केला? त्याची पद्धत नेमकी काय होती? यापैकी कसलेही उत्तर कधीच देण्यात आले नाही. हा संपूर्ण सर्व्हेदेखील लोकांसमोर मांडला गेला नाही.

भारतीय महिलांचे मासिकधर्मकालीन आरोग्य याविषयी काम करणाऱ्या कित्येक संघटनांनी सदरचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने राबवला गेला असल्याचेही मान्य केले! मात्र तोवर ही खोटी आकडेवारी इतकी फोफावली होती की; काही उत्साही लोकांनी त्या आधारे ऑनलाईन पेटीशनदेखील दाखल केली. प्रत्यक्षात मात्र याबाबतचे दृश्य या आकडेवारीच्या पूर्णतः विपरीत असून सकारात्मक असेच आहे.

केंद्र शासनामार्फत करण्यात येणाऱ्या The National Family Health Survey (NFHS) या २०१५-१६ सालच्या सर्व्हेक्षणानुसार भारतातील शहरी भागातील ७७.५% तर ग्रामीण भागातील ४८.२% महिला पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडस्, टॅम्पोन्स वा स्वच्छ सुती कापड या आरोग्याच्या दृष्टीने योग्य मार्गांचा अवलंब करीत आहेत.

 

sanitary-pad-inmarathi
bbci.co.uk

विशेष म्हणजे ‘पॅडमॅन’ अरुणाचलम् मुरुगनाथम् यांचे तामिळनाडू हे राज्य पंजाब, गोव्यासारख्या राज्यांसहच याबाबत आघाडीवर आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड अशा राज्यांत मात्र ही आकडेवारी कमी असली तरी १२% इतकी कमी नक्कीच नाही. एकूणच याविषयाच्या बाबतीतली सजगता वाढत आहे हे सत्य आहे.

महिलांचे मासिकधर्मकालीन आरोग्य या विषयात कार्यरत असणाऱ्या सिनू जोसेफ यांसारख्या अभ्यासकांच्या संशोधनानुसार; अंगावरून अधिक प्रमाणात जाण्याच्या तक्रारीचे भारतीय महिलांतील प्रमाण १-२३% इतकेच असून इंग्लंडमध्ये मात्र हेच प्रमाण ५२% इतके आहे. पाळीच्या वेळी वेदनांचे प्रमाण भारतीय महिलांत ११.३५ ते ७२.६% इतके आहे. हेच प्रमाण ऑस्ट्रेलियन महिलांत तब्बल ९४% तर सिंगापूरमध्ये ८३% इतके आहे.

थोड्क्यात –

आपल्या देशातील महिलांचे पाळीच्या काळातले आरोग्य हे अन्य तथाकथित विकसित देशांतील महिलांपेक्षाही अधिक चांगले आहे!!

याशिवाय; केवळ सॅनिटरी पॅडस् म्हणजेच पाळीच्या वेळची स्वच्छता जपण्याचा एकमेव मार्ग हादेखील गैरसमज आहे. धुवून सुकवलेल्या सुती कापडाच्या घड्या हा खरे तर या काळातील संक्रमणे रोखण्यास अधिक आरोग्यदायी मार्ग आहे.

मात्र हे कापड धुणे, सुकवणे या गोष्टी करणे सोयीचे नसल्याने पॅडस् चा सर्रास वापर होवू लागला. त्यात गैर असे काहीच नसले तरी ‘केवळ तोच’ योग्य मार्ग आहे हे मत अवास्तव आहे.

किंबहुना या सॅनिटरी पॅडस् चाच पुढील अवतार म्हणून मेन्स्ट्रुअल कप्स आणि इंट्राव्हजायनल टॅम्पोन्सचा गवगवा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र ही उत्पादने गर्भाशयमुखाला अधिक संक्रमण वा इजा पोहचवतात असे लक्षात येवू लागल्याने त्याचे फॅड कमी झाले. वापरलेल्या सॅनिटरी पॅडस् ची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नही जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या दृष्टीने चर्चिला जातोय याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. अजूनही याबाबत ठोस मार्ग सापडलेला नाही हेही सत्य आहे.

 

Akshay-Kumar-Padman-inmarathi
itrendspot.com

असे असले तरी सॅनिटरी पॅडस्, टॅम्पोन्स वा स्वच्छ सुती कापड यांपैकी कोणत्या गोष्टीचा उपयोग करावा हा खरेतर प्रत्येक महिलेचा वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे असे म्हटल्यास गैर ठरू नये. या साऱ्याच गोष्टी आपापल्या जागी आरोग्यकारक स्वच्छतारक्षक पर्याय आहेत. मात्र या वैद्यकीय तथ्याकडे दुर्लक्ष करत दिशाभूल करणारी वा कोणताही आधार नसलेली आकडेवारी केवळ आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रसारित करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.

अक्षयकुमारसारख्या अभिनेत्याची अशी बेजबाबदार वक्तव्ये जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करत आहेत याची त्याला खंत नसावी का?

का कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारल्यापासून आपल्या देशाची बदनामी करणाऱ्या थापा मारण्यात त्याला गैर वाटेनासे झाले आहे?!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?